सचिन पायलट : काँग्रेसमधील 'युवा तुर्क'ची 50 वर्षांनंतर पुनरावृत्ती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी
सचिन पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंड केलं आहे. या घडामोडींमुळे राजस्थानसह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसमधील 'ज्येष्ठ विरूद्ध तरुण' हा वाद पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सचिन पायलटच नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावेळीही अशी चर्चा झाली होती. कमलनाथ, दिग्विजय सिंग या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांविरुद्ध ज्योतिरादित्य शिंदेंची नाराजी होती, हे आता लपून राहिलेलं नाही.
माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद, माजी खासदार प्रिया दत्त इत्यादी अनेक नेत्यांनीही सचिन पायलट यांच्या बंडानंतर नाराजीचे संकेत दिलेत. यातील काहींनी सोशल मीडियावरील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या टीकेनंतर स्पष्टीकरणंही दिली. मात्र, यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला, असं नाही.
ज्योतिरादित्य शिंदेंपासून सुरू झालेल्या गेल्या काही महिन्यातील या घटनांमुळे काँग्रेस पक्षाच्याच इतिहासातील एका प्रसंगाची पुनरावृत्ती होतेय की काय, अशी शक्यता वर्तवली जातेय. बऱ्याच ज्येष्ठ पत्रकारांनी आणि राजकीय जाणकारांनी विविध ठिकाणी याबाबत शंकाही व्यक्त केलीय. तो प्रसंग म्हणजे - 'युवा तुर्क'.

फोटो स्रोत, NURPHOTO
या 'युवा तुर्क' प्रकरणाचा भारतातील आणि जगातील इतिहासही फार रंजक आहे. आपण हे सगळं क्रमाक्रमानं पाहूच. तत्पूर्वी 'युवा तुर्क'ची आता आठवण का यावी आणि अशी बातमी आम्हाला का करावी वाटली, हे थोडक्यात समजून घेऊया.
'युवा तुर्क'ची आठवण का?
मार्च महिन्यात मध्य प्रदेशातील तत्कालीन काँग्रेसचे तरुण नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी ज्योतिरादित्य शिंदे यांचं सख्य नव्हतं, हे एव्हाना उघड झालंय.
शिंदेंनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसमधील अनेक तरुण नेत्यांनी खंत व्यक्त केली आणि अनेकांनी तरुणांना आता पक्षात संधी देण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष इच्छाही व्यक्त केली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर काही महिन्यातच आता काँग्रेसमधील आघाडीचे तरुण नेते सचिन पायलट यांनीही पक्षाअंतर्गत बंडाचा झेंडा फडकावला आहे. पायलट हे राजस्थानच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदी होते. मात्र, अशोक गहलोत यांच्या नेतृत्त्वावर त्यांची नाराजी आहे.
दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, राजस्थानमधीलच तरूण नेते जितिन प्रसाद असे अनेक तरूण नेतेमंडळी पक्षाअंतर्गत वेळोवेळी नाराजीचे संकेत देत राहतात. यातील बहुतांश जणांचा रोख ज्येष्ठांवर दिसतो.
तरुणांनी पुढे जाण्यासाठी महत्वाकांक्षी राहणं यात चूक नसल्याचं काँग्रेसच्या मुंबईतील माजी खासदार प्रिया दत्त यांनी सचिन पायलट यांच्या बंडानंतरही सोशल मीडियावर जाहीररित्या म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
एकूणच काँग्रेसमधील तरुणांचा गट पक्षाची धुरा हाती घेण्याचा प्रयत्न करतोय का? किंवा पक्षातील ज्येष्ठांनी आता बाजूला व्हावं, असा या गटाला वाटतं का? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा माध्यमांचे प्राईम टाईम आणि राजकीय वर्तुळ घेत असताना, अनेकजण काँग्रेसमधील या घुसळणीची तुलना साठच्या दशकातील 'युवा तुर्क'शी जोडत आहेत.
सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांचा संघर्ष चंद्रशेखर, मोहन धारिया यांच्या 'युवा तुर्क'शी जोडणं न्याय्य आहे का, याबद्दल जाणकारांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रिया आपण पाहूच. तत्पूर्वी, हे 'युवा तुर्क' प्रकरण काय होतं, हे आपण पाहूया.
50 वर्षांपूर्वी काँग्रेसमधील ज्येष्ठांना आव्हान देणारे 'युवा तुर्क'
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी या भारताच्या राजकारणात अधिक सक्रीय झाल्या. मात्र, त्यावेळी काँग्रेसमधील पक्षाची धुरा ज्येष्ठांच्या हाती होती. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, कामराज आणि निजलिंगप्पा यांसारख्या नेतेमंडळींचा शब्द काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत वजनदार होता.
याच काळात काँग्रेसमध्ये समाजवादी विचारांच्या तरुणांची सुद्धा एक फळी होती. चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णन कांत, अमृत नाहटा अशा त्यावेळच्या तरुण नेतेमंडळींचा त्यात समावेश होता.
ही गोष्ट साधारण 1967 च्या दरम्यानची. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या.

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR FAMILY
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय अभ्यासक उल्हास पवार सांगतात, "काँग्रेसमध्ये त्यावेळी विविध विचारधारांचा संगम होता. समाजवादी आणि गांधीवादी विचारधारा होती, तशीच भांडवलादारी विचारांचे नेतेही होते. मोरारजी देसाईंसारखी मंडळी भांडवलादारी विचारधारेकडे झुकणारी होती. मात्र, चंद्रशेखर, मोहन धारिया ही मंडळी समाजवादी पार्श्वभूमीची होती. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने ही मंडळी आग्रही होती."
भारतातील या 'युवा तुर्क' गटाला याच समाजवादी विचारांची पार्श्वभूमी आहे.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे या 'युवा तुर्क'चे प्रमुख मानले जात. त्यांनी त्यांच्या 'जीवन जैसा जिया' या आत्मकथेत याबद्दल विस्तृतपणे सांगितलंय.
बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, कोळशाच्या खाणींचं राष्ट्रीयकरण अशा आर्थिक क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांच्या दहा मागण्याचा 'दशसूत्री' कार्यक्रम त्यांनी तयार केला आणि काँग्रेसच्या वरिष्ठांसमोर ठेवला. या दहा मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही चंद्रशेखर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. या मागण्यांना समर्थन मिळवण्यासाठी चंद्रशेखर यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी खासदारांच्या स्वाक्षरीची मोहीमही उघडली होती. मात्र, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाईंचा याला विरोध होता.
या दशसूत्रीची प्रत ज्यावेळी चंद्रशेखर यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष कामराज यांना पाठवली, त्यावेळी मोठा गदारोळ झाल्याचं चंद्रशेखर यांनी आत्मकथेत सांगितलंय. दशसूत्री आर्थिक कार्यक्रमाला पाठिंबा मिळवण्यासाठी चंद्रशेखर यांनी ज्यावेळी देशभरात दौरा सुरू केला, त्यावेळी काँग्रेसच्या पक्षीय वरिष्ठांकडून आदेश काढण्यात आला की, या 'युवा तुर्कां'ना पक्षीय कार्यलयानं महत्त्व देऊ नये.

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR FAMILY
मात्र, या युवा तुर्कांच्या या अनेक मुद्द्यांना इंदिरा गांधींचा पाठिंबा होता. पुढे इंदिरा गांधींनी त्यांच्या काही मागण्या अमलातही आणल्या. त्यात बँकांचं राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे हे त्यातलेच निर्णय. युवा तुर्कांचा हा एकप्रकारे विजयच होता.
मात्र, पुढे राजकीय घडामोडीत युवा तुर्कांचा गट शाबूत राहिला नाही. पुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यानं ते पक्षातून बाहेर पडलेच, मात्र अनेकांनी तुरुंगवासही भोगला.
साठचं दशक चंद्रशेखर, मोहन धारिया आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलं. ज्येष्ठांविरोधात आवाज बुलंद करून, आर्थिक-सामाजिक मुद्दे पुढे रेटण्यासाठी या युवा तुर्कांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे मानले गेले.
या युवा तुर्कांची उपमा अनेकजण आताच्या काँग्रेसमधील बंडखोर,नाराज युवा नेत्यांना देऊ पाहत आहेत. मात्र, ते योग्य आहे का, हे राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतलं.
पायलट-शिंदेंच्या बंडाची 'तरूण तुर्क'शी तुलना कितीपत योग्य?
ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय राजकारणाचे अभ्यासक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "चंद्रशेखर यांच्यावेळचे युवा तुर्क आणि आताचे काँग्रेसचे तरुण नेते यांची कदापि तुलना होऊ शकत नाही. साठ-सत्तरच्या दशकातील राजकारणात विचारधारा, राष्ट्रीय मुद्दे इत्यादी गोष्टींसाठी वाद होत असत. आता वैयक्तिक महत्त्वकांक्षा दिसून येतात."
शिवाय, रशीद किडवई हे आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात, "आता काँग्रेसमधील नाराज किंवा बंडखोरी करणारे बरेचजण मुळात राजकीय वारसा घेऊन आलेत आणि दुसरं म्हणजे 'ओल्ड गार्ड' म्हणजे ज्येष्ठ नेते सुद्धा मर्जीतले होऊन बसलेले आहेत. त्यामुळे एकूणच चित्र पूर्णपणे वेगळं आहे."
चंद्रशेखर किंवा तत्कालीन युवा तुर्कांशी तुलना करायची झाल्यास, आताच्या युवा नेत्यांमध्ये तितकी त्यागाची भावना दिसतच नसल्याचं रशीद किडवई म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवारही रशीद किडवई यांच्याशी सहमत होतात.
"साठच्या दशकात युवा तुर्क हे आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांसाठी एकत्र आले होते. इंदिरा गांधींचाही त्यांना पाठिंबा होताच. शिवाय, या युवा तुर्कांच्या मुद्द्यांमुळे इतर समाजवादी किंवा डाव्या विचारसरणीचे नेतेही काँग्रेसकडे वळले. त्यामुळे त्यांचा पक्षालाही फायदा झाला. आताच्या युवा नेत्यांच्या बंडाच्या किंवा पक्षांतरच्या घटना पाहता, त्यातलं यात काहीच दिसत नाही," असं उल्हास पवार म्हणतात.
'तुर्क' शब्दाचा तुर्कस्थानच्या देशव्यापी बंडाशी संबंध
संपूर्ण बातमीत तुम्ही 'तुर्क' हा शब्द वाचला असाल. पण हा शब्द कुठून आला? तर याचाही स्वतंत्र इतिहास आहे. मध्य-पूर्व आशियाचा विशेष अभ्यास असणारे लेखक निळू दामले यांनी याबाबत बीबीसी मराठीशी बोलतना सविस्तर माहिती दिली.
तुर्कस्तानमधील इस्तंबूलमधून खिलाफत बरखास्त करून तिथं धर्मनिरपेक्ष सरकार प्रस्थापित करण्याची अत्यंत अवघड कामगिरी केमाल पाशा अतातुर्क यांनी केली. अतातुर्क ही तुर्कस्तानी जनतेनं केमाल पाशा यांना प्रेमानं आणि आदरानं दिलेली पदवी आहे. अतातुर्क म्हणजे 'तुर्कांचा पिता'.

फोटो स्रोत, Getty Images
"तुर्कस्तानातील सत्तांतरासाठी केमाल पाशा यांनी मोठा लढा लढला. 3 मार्च 1924 रोजी केमाल पाशा यांनी तुर्कस्तानात प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली.
इस्लाम आणि धर्माच्या नावावर लादण्यात आलेल्या परंपरा मोडीत काढून, त्यानं विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक समाजनिर्मितीच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं. मुस्लीम स्त्रियांसाठीही अनेक आधुनिक निर्णय घेतले.
तुर्कस्तानात झालेली ही पहिली क्रांती होती. अतातुर्क केमाल पाशाने ही क्रांती करून सत्तांतर घडवलं, त्यावेळी तो तरुण वयात होता. त्यामुळे पुढे जगात कुठेही तरुणांनी बंड केल्यास बऱ्याचदा केमाल पाशांच्या नावातील 'तुर्क' शब्दाची उपमा दिली जाते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








