शशी थरूर की अशोक गेहलोत, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाचं पारडं जड?

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचा अध्यक्ष 17 ऑक्टोबरला निवडला जाणार आहे. यावेळी पक्षाची धुरा बिगर गांधी परिवाराकडे असेल की गांधी परिवारच काँग्रेसचं नेतृत्व करेल याची चर्चा जोरात आहे.
प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार खासदार शशी थरुर पक्षाच्या अध्यक्षपदाची दावेदारी सादर करू शकतात. सोमवारी शशी थरुर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे, अशाही बातम्या येत आहेत. सोनिया गांधी यांनी या निर्णयाला समर्थन दिलं आणि त्या निवडणूक प्रक्रियेत निष्पक्ष भूमिका घेणार असल्याचं सांगितलं आहे.
त्यानंतर अशा बातम्या आल्या की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शशी थरूर या निवडणुकीत त्यांना आवाहन देऊ शकतात.
जर राहुल गांधी यांनी उमेदवारी सादर केली तर निवडणूक लढवणार नाही, असंही मानलं जात आहे. जर राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्यावर ठाम राहिले तर ते अध्यक्षपदाची दावेदारी करतील असंही मानलं जात आहे.
दोन नेत्यांतर्फे किंवा पक्षातर्फे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या दोन नेत्यांच्या नावाने काँग्रेस अध्यक्षपदाच्या चर्चेने वेग घेतला आहे.
20 वर्षांत पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी अशा प्रकारे निवडणुका होत आहे जिथे बिगर गांधी नेत्यांच्या दावेदारीची चर्चा होत आहे.
काँग्रेस नेते अशोक गेहलोत म्हणाले की ते पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष होण्याचा आग्रह करतील. शशी थरूर यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांची भेट घेतली, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेहलोत यांच्या वक्तव्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. "निवडणुका होतील, हे अंतर्गत लोकशाहीसाठी चांगलं आहे." असं अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
तर काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, "बहुतांश राज्यांचं असं मत आहे की राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष व्हायला हवेत. निवडणूक लढवायच्या की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मात्र एक गोष्ट आहे की 17 ऑक्टोबर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल."
या दोन नेत्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया:

फोटो स्रोत, Getty Images

शशी थरूर- संयुक्त राष्ट्र ते संसदपर्यंतचा प्रवास

- शशी थरूर जी-23 गटाचे सदस्य आहेत. जी-23 हा नेत्यांचा गट आहे. या गटाने काँग्रेस पक्षात मोठे बदल घडवून आणण्याची विनंती सोनिया गांधींना केली होती. त्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं होतं.
- शशी थरूर यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे आणि अमेरिकेच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी मधून पीएचडी केली आहे.
- थरूर यांनी 1978 ते 2007 या काळात संयुक्त राष्ट्रात काम केलं. 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी दक्षिण कोरियाच्या बान की मून यांची नियुक्ती झाली. तेव्हा या पदाच्या दावेदारीत थरूर दुसऱ्या स्थानावर होते.
- त्यांनंतर संयुक्त राष्ट्रातून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती.
- 2009 मध्ये शशी थरूर काँग्रेस पक्षात सामील झाले आणि तिरुवनंतपुरममधून खासदार झाले.
- युपीए-1 मध्ये 2009-10 पर्यंत त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम केलं.
- 2012-14 मध्ये थरूर मानुष्यबळ विकास मंत्री होते.
- भारतीय इतिहास, संस्कृती, चित्रपट, राजकारण, समाज, परराष्ट्र धोरण या विषयावर त्यांनी 23 पुस्तकं लिहिली आहेत.
पक्षाच्या अध्यक्षपदाबद्दल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना ते म्हणाले, "मला वाटतं जास्तीत जास्त लोक समोर येतील आणि उमेदवारी जाहीर करतील. त्यामुळे पक्ष आणि देशासाठी व्हिजन समोर आणण्यासाठी जनतेत रूची निर्माण होईल."
शशी थरूर त्यांच्या इंग्रजीसाठी कायम चर्चेत असतात. ट्विटरवर अनेकदा ते नवीन शब्दांचा वापर करून चर्चेत राहतात.

फोटो स्रोत, Getty Images

अशोक गेहलोत: गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय

- अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे.
- अशोक गेहलोत 1968 ते 1972 या काळात गांधी सेवा प्रतिष्ठान बरोबर सेवाग्राममध्ये काम करायचे.
- 1973 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय छात्र संगठनेशी त्यांचा संबंध आला. त्यावेळी ते एम.ए. करत होते.
- गहलोत यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केलं आणि त्यानंतर कायद्याचा अभ्यास केला आणि राजकारणाकडे वळले.
- पक्षाने 1974 मध्ये त्यांची विद्यार्थी संगठनेच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.
- गहलोत यांनी 1977 मध्ये पहिल्यांदा जोधपूरमधून विधानसभा निवडणूक लढले तेव्हा ते चार हजार मतांनी पराभूत झाले.
- जोधपूरमधून पहिल्यांदाच 1980 मधून ते खासदार म्हणून निवडून आले. ते जोधपूरमधून पाच वेळा खासदार झाले.
- 1982 मध्ये इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.
- 1991 मध्ये जेव्हा ते कपडा मंत्री झाले तेव्हा त्यांच्या कामचं मोठं कौतुक झालं होतं.
- गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रभारी करून पाठवलं होतं.
याआधी सीताराम केसरी यांच्या रुपात काँग्रेसला गांधी कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष मिळाला होता. नंतर 1998 मध्ये सोनिया गांधीनी पक्षाची कमान त्यांच्या हातात घेतली होती.
त्यावेळी काँग्रेसची परिस्थिती अतिशय बिकट होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणापासून दूर होत्या. 1998 मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आणि 2004, 2009 या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








