अशोक गहलोत-सचिन पायलट संघर्षात सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडून काय चुकलं?

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपक मंडल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना पक्षाचं प्रधान्य खरं तर ही निवडणूक असायला हवी परंतु काँग्रेस समोर नवीन संकट उभं ठाकलं आहे.
काँग्रेसची ही परिस्थिती पाहता काँग्रेस हायकंमडाने यासाठी तयारी केली नव्हती का? आणि राजस्थानमध्ये नेतृत्त्व बदलण्याची पूर्वतयारी न करताच अशोक गहलोत यांना अध्यक्ष पदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार म्हणून उतरवलं गेलं का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
राजस्थानमध्ये सत्तेसाठी राजकारण तापलेलं असताना काँग्रेस अडचणीत आल्याचं दिसून येतं. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीआधीच राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्यासाठी खलबतं सुरू आहेत.
काँग्रेस हायकमांडला सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु गहलोत यांच्या गटातील काँग्रेसच्या 90हून अधिक आमदारांनी पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्यापकडे सामूहिक राजीनामा पत्र दिलं आहे.
राजीनामा दिलेल्या आमदारांचा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्यास विरोध आहे. सचिन पायलट किंवा त्यांच्या समर्थक नेत्यांपैकी कोणालाही त्यांना मुख्यमंत्री बनवायचं नाही असं दिसतं.

फोटो स्रोत, AFP
राजस्थानमधला विरोध शांत करण्यासाठी दिल्लीहून पक्षाने अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांना जयपूरला पाठवलं. पण दोन्ही नेते विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची साधी भेटही घेऊ शकले नाहीत. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाठी गेलेले दोन्ही नेते दिल्लीत परतले.
त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या चर्चेत दोन्ही नेत्यांना याबाबत लेखी अहवाल देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणामुळे काँग्रेस हायकमांड संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे.
इतिहासातले वाद
उदयपूर येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात 'एक व्यक्ती एक पद' हा प्रस्ताव लागू करण्यात आला आणि त्यानुसार अशोक गहलोत यांना पक्षाचं अध्यक्ष बनवलं जाईल आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल असं ठरल्याचं सांगितलं जातं. परंतु गहलोत यांच्या गटातील आमदारांच्या भूमिकेवरून हा बदल काँग्रेससाठी सोपा नाही हे स्पष्ट आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात पूर्वीपासून रस्सीखेच सुरू आहे. अशोक गहलोत यांना कोणत्याही परिस्थितीत सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद सोपवायचं नाही.
2020 मध्ये सचिन पायलट यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आपल्या गटातील आमदारांसह हरियाणात दबावतंत्र वापरलं होतं. त्यावेळी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पायलट यांच्या अटी मान्य करत त्यांची समजूत काढली होती.

फोटो स्रोत, The India Today Group
आता जेव्हा अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असताना पुन्हा एकदा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सचिन पायलट यांच्या हातात जाताना दिसत आहे आणि काँग्रेस पुन्हा एकदा सत्तासंघर्षात संभ्रमावस्थेत अडकल्याचं दिसतं.
राजकीय विश्लेषक काय सांगतात?
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काँग्रेस हायकंमाडला याची पूर्वकल्पना नव्हती का? त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे का? की त्यांची तयारी कमी पडली?
ज्येष्ठ पत्रकार संजीव श्रीवास्तव सांगतात, "अनेक उदाहरणांवरून दिसून येतं की काँग्रेस हायकंमाड परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरत आहे. पक्षात या क्षणी अहमद पटेल यांच्यासारखा एकही नेता नाही. राजकीय संकट हाताळण्यासाठी कोणीही नाही. पक्षाला अशा नेत्याची गरज आहे जो अनुभवी आणि धाडसी असेल."

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी या सुद्धा काँग्रेस नेतृत्त्वाच्या अनुभवावर प्रश्न उपस्थित करतात. त्या म्हणाल्या, "20 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती होती ती आता नाही. काँग्रेसला अनुभवी, जमिनीवरील वास्तवाची माहिती असलेला आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या नेत्याची गरज आहे."
चूक कुठे झाली?
संजीव श्रीवास्तव सांगतात, "काँग्रेस नेतृत्वाला गहलोत आणि पायलट यांच्यातल्या संघर्षाची पूर्वकल्पना असणार. मग त्यांनी याचा विचार किंवा पूर्वतयारी आधीच का केली नाही? ही परिस्थिती का उद्भवू दिली? त्यांनी सुरुवातीलाच दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलवायला हवं होतं. दोन्ही गटाच्या आमदारांशी चर्चा करायला हवी होती. पण तुम्ही खरगे आणि माकन यांना जयपूरला पाठवलं.
एकेकाळी इंदिरा गांधी माखनलाल फेतेदार यांना पाठवत होत्या. पण काँग्रेसने हे लक्षात घ्यायला हवं की त्यांच्याकडे प्रचंड बहुमत होतं तो काळ आता गेला. आता वास्तव हे आहे की पक्षाकडे केवळ 53 खासदार आहेत."
गहलोत यांच्या गटातील आमदार आक्रमक झाले यावर बोलताना संजीव श्रीवास्तव सांगतात, "अशोक गहलोत आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी जे काही केलं ते चुकीचं होतं पण यावेळी काँग्रेस नेतृत्वातही बालिशपणा दिसला.
नेतृत्वाला वाटलं की गहलोत यांना पक्षाचं अध्यक्षपद देता येईल आणि पायलट यांना मुख्यमंत्री बनवता येईल आणि असं करत सताना सर्वकाही सहज पार पडेल. पण हा अंदाज चुकला. राजकारणात दोन आणि दोन चार नसतात."
गहलोत आणि पायलट यांच्यातला वाद कायम का?
अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला वाद नवीन नाही. मग पक्षाने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही. हा प्रश्न यापूर्वीच सोडवला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.

फोटो स्रोत, Getty Images
यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर अय्यर सांगतात, "2018 ची निवडणूक सचिन पायलट यांच्या नेतृत्त्वात लढवली गेली. त्यावेळी ते राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष होते. पायलट यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. ते राज्यभरात सगळीकडे फिरले. पण मुख्यमंत्री बनले अशोक गहलोत. त्यामुळे दोघांमधला वाद कधीच शांत झाला नाही. वाद सोडवण्याचा प्रयत्नही झाला नाही."
काँग्रेसच्या कमकुवत नेतृत्वावर अय्यर प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणाले, "राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यासाठी हायकंमाड ज्या नेत्यावर विश्वास ठेवतात तोच नेता त्यांचं ऐकत नाही. काँग्रेससाठी याहून मोठी अडचण काय असू शकते? यामुळे पक्षात सोनिया गांधी यांच्या वर्चस्वावरही प्रश्न उपस्थित होतात."
शेखर अय्यर पुढे सांगतात, "गहलोत यांनी अजय माकन आणि खरगे यांना काँग्रेस आमदारांना स्वतंत्र भेटूही दिलं नाही. सर्व आमदारांना एकाच वेळी भेटायचं असं त्यांना सांगितलं. हा शिस्तभंग आहे असं माकन म्हणाले. पण तरीही घटनाक्रम हेच सिद्ध करतो की सध्या काँग्रेस नेतृत्त्वाची स्थिती काय आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








