व्हॅम्पायर फेशियलमुळे HIV चा संसर्ग, फेशियलचा 'हा' प्रकार आहे काय?

व्हॅम्पायर फेशियल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हॅम्पायर फेशियल

अमेरिकेत त्वचेवर चमक आणणारा 'व्हॅम्पायर फेशियल' उपचार घेतल्यानंतर काही महिलांना एचआयव्हीची लागण झाली.

या घटनेमुळे काही कॉस्मेटिक उपचारांच्या सुरक्षिततेबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधन केंद्राच्या (सीडीसी) अहवालानुसार, 2018 मध्ये न्यू मेक्सिकोच्या स्पामध्ये उपचार घेतलेल्या किमान तीन महिलांना एचाआयव्हीची लागण झाली आहे. या प्रकरणांमुळे एचआयव्ही लागण होण्याचे नवे मार्ग कळतील.

अमेरिकेत कॉस्मेटिक प्रक्रिया करताना एचआयव्ही संक्रमित होण्याचे हे पहिले प्रकरण असल्याचा अंदाज आहे.

पण हे ‘व्हॅम्पायर फेशियल’ म्हणजे नेमकं काय आहे आणि या उपचाराने महिलांना एचआयव्हीची लागण कशी झाली? तसेच कॉस्मेटिक उपचार घेताना संसर्गापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय करावं?

याबाबत तज्ज्ञ काय सांगतात तेही जाणून घेऊया.

व्हॅम्पायर फेशियल म्हणजे काय?

व्हॅम्पायर फेशियल ही 'प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा' - किंवा पीआरपी - फेशियलची रूढ नावं आहेत."

व्हॅम्पायर फेशियल मध्ये रुग्णाच्या रक्तकोशिकातून रक्त काढलं जातं आणि नंतर सेंट्रीफ्यूज प्रोसेसचा वापर करून त्यापासून प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा वेगळे केले जाते. त्यानंतर हे प्लाझ्मा पुन्हा चेहऱ्यावर सूक्ष्म सुईने टोचून टोचून इंजेक्ट केले जाते.

असं म्हणतात या उपचारामुळे नवीन कोलेजन आणि इलास्टिन तयार होण्यास प्रोत्साहन मिळून त्वचेच्या संरक्षणात्मक थराची दुरुस्ती होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग कमी केले जातात.

ही उपचारपद्धती बऱ्याच काळापासून असल्याचं दिसून येतं. 2013 मध्ये रिअॅलिटी टेलिव्हिजन स्टार किम कारदाशियन हिने या उपचारानंतरचा स्वतःचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसत होता.

2013 मध्ये रिअॅलिटी टेलिव्हिजन स्टार किम कारदाशियन हिने 'व्हॅम्पायर फेशियल' उपचार घेतल्यानंतरचा स्वतःचा फोटो पोस्ट केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2013 मध्ये रिअॅलिटी टेलिव्हिजन स्टार किम कारदाशियन हिने 'व्हॅम्पायर फेशियल' उपचार घेतल्यानंतरचा स्वतःचा फोटो पोस्ट केला होता.

काही वर्षांनंतर कारदाशियनने स्वतःच्या वेबसाइटवर लिहिलं होतं की, "मी पुन्हा हा उपचार करून घेणार नाही. चेहऱ्यावर असे उपचार करणं माझ्यासाठी खरोखरच कठोर आणि वेदनादायी ठरलं."

ऑनलाइन माहिती देणाऱ्या एका वैद्यकीय स्पाच्या अंदाजानुसार, परवानाधारक ठिकाणाहून उपचार करण्यासाठी 1000 ते 2000 डॉलर इतका खर्च येऊ शकतो.

न्यू मेक्सिकोमध्ये उपचार घेतलेल्या महिलांना एचआयव्ही संसर्ग कसा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सीडीसीच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, 40 ते 50 वर्षांच्या वयोगटातील एक अमेरिकन महिला परदेशात असताना तिला एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले.

या महिलेने इंजेक्शनद्वारे ड्रग्स घेतल्याचा कोणताही पूर्वेतिहास नव्हता, किंबहुना तिने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले नव्हते.

मात्र, तिने त्याच वर्षाच्या सुरुवातीला न्यू मेक्सिको स्पामध्ये ‘व्हॅम्पायर फेशियल’ उपचार घेतल्याचे सांगितले.

या महिलेने ‘व्हॅम्पायर फेशियल’ घेतलेल्या स्पामध्ये बोटॉक्ससह इतर इंजेक्शनही घेतले होते. सीडीसीच्या तपासात या स्पाकडे परवाना नसल्याचे आणि वापराच्या अनेक असुरक्षित पद्धती आढळून आल्या.

या तपासात स्पा मध्ये विना लेबल असलेल्या रक्ताच्या नळ्या आणि वैद्यकीय सुया आढळून आल्या. त्या स्वयंपाकघरात फ्रिजमध्ये अन्नाच्या बाजूला अस्वच्छ पद्धतीने साठवल्या होत्या, तसेच वापरलेल्या आणि झाकून न ठेवलेल्या सुया डब्यांमध्ये आणि टेबलवर पसरलेल्या आढळून आल्या.

या तपासात सीडीसीला काही रक्ताच्या नळ्या पुन्हा वापरण्यात आल्या असण्याची चिन्हे दिसून आली. तसेच स्पा मध्ये उपचार घ्यायला येण्याआधीच एकाला एचआयव्हीची लागण झाली होती.

आरोग्य संस्थेन या स्पाशी पाच एचआयव्हीच्या प्रकरणांशी संबंध जोडला आहे. यात चार महिला आणि एका पुरुषाने मे ते सप्टेंबर 2019 दरम्यान 'व्हॅम्पायर फेशियल' उपचार घेतला होता.

अखेर 2018 साली हा स्पा बंद करण्यात आणि त्याची मालकीण 62 वर्षीय मारिया डे लूर्डेस रामोस दे रुइझ ही परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

2022 मध्ये तिने परवाना नसताना उपचार केल्याची कबुली दिली.

कॉस्मेटिक उपचार आपल्यासाठी हितकारक असतात का?

कॉस्मेटिक उपचारद्वारे खेळताना झालेल्या जखमा, चेहऱ्यावरील न भरून येणाऱ्या जखमा, एक्झिमा आणि इतर त्वचारोगांवर उपाय करता येतात. याची उपयुक्तता सुचविणारी शेकडो वैद्यकीय संशोधन निबंध प्रकाशित झालेले आहेत.

अमेरिकेची त्वचारोग संस्था असं म्हणते की, ही प्रक्रिया योग्यरित्या पार पडली असेल तर यापासून कोणताही धोका नाही.

उपचार करणाऱ्या रुग्णालयात रक्त हाताळण्याच्या पद्धतीचा सर्वात जास्त धोका असतो.

अमेरिकेची त्वचारोग संस्था म्हणते की, "शरीरातून काढलेले रक्त निःसंक्रमित ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर, त्याला संसर्ग होऊ शकतो."

एकदा एका रुग्णासाठी एक सुई वापरल्यास ती पुन्हा दुसऱ्या रुग्णाला वापरता कामा नये नसल्यास रुग्णाला गंभीर प्रतिक्रिया उद्भवू शकतात.

सौंदर्य उपचार करून घेण्याचा विचार करणाऱ्यांनी उपचार करणारी संस्था ही परवानाधारी आहे का याची खात्री करण्यासाठी आधीपासूनच संशोधन करावे असे तज्ञांचे मत आहे. तसेच, सुईसारख्या वैद्यकीय उपकरणांची हाताळणी कर्मचारी कशी करतात याकडेही लक्ष द्यावे.

व्हॅम्पायर फेशियलची चर्चा आत्ता असली तरी याआधी अनेक असे सौंदर्य उपचार चर्चेत आलेत.

स्कीन केअर

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात बनावट बॉक्टॉक्सशी संबंधित बोट्युलिझमच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला होता. त्यामुळे 11 राज्यांमध्ये 22 जण आजारी आहेत, त्यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोटॉक्स इंजेक्शन हा एक लोकप्रिय उपचार आहे. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी याचा वापर केला जातो.

याच्या प्रत्येक उपचारासाठी इंजेक्शनची किंमत साधारणपणे 530 डॉलर इतकी असते.

व्हॅम्पायर फेशियल किंवा बोटॉक्स इंजेक्शन उपचार करू इच्छिणार्‍यांनी मान्यताप्राप्त संस्था आणि तज्ज्ञांचे सल्ले घेऊनच उपचार करावे असा सल्ला सीडीसी देते.