सेलप्पन निर्मला: 'भारतात एड्स आलाय' हे पुराव्यानिशी सांगणारी महिला शास्त्रज्ञ

- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
तीस वर्षांपूर्वी सहा देहविक्री करणाऱ्या महिलांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली तेव्हा भारतातही या भयंकर एचआयव्ही विषाणूचा शिरकाव झाल्याचे निदर्शनास आले.
एका तरुण महिला शास्त्रज्ञाचा या प्रयत्नांमध्ये मोठा वाटा होता. पण आतापर्यंत त्यांचे महत्त्वाचे काम विस्मरणात गेले आहे.
एचआयव्ही / एड्स असलेल्या व्यक्तींची चाचणी करण्याचे सेलप्पन निर्मला यांना पहिल्यांदा सुचविण्यात आले तेव्हा त्या हे काम करण्यास फार इच्छुक नव्हत्या.
1985 च्या अखेरचे दिवस होते. चेन्नईमधील (मद्रास) वैद्यकीय महाविद्यालयाची 32 वर्षांची मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) शाखेची विद्यार्थिनी आपल्या प्रबंधासाठी विषय शोधत होती.
सुनिती सोलोमन या तिच्या प्राध्यापिका व मार्गदर्शकाकडून तिला हा विषय सुचविण्यात आला. 1982 मध्ये एड्सच्या रुग्णांची अधिकृत आकडेवारी घेण्यास अमेरिकेत सुरुवात झाली होती आणि या रोगाचा शिरकाव भारतात झाला असेल तर त्याबद्दल इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनभिज्ञ राहून चालणार नव्हते.
“पण त्या वेळी हा आजार येथे असू शकतो, ही कल्पनाच कुणी करत नव्हते.”, अशी आठवण निर्मला सांगतात.
त्या वेळी माध्यमांमध्ये लिहून आले होते की, पाश्चिमात्य देशांमध्ये मुक्त शरीरसंबंध व समलैंगिकतेमुळे हा केवळ तिथलाच आजार आहे. भारतीय मात्र भिन्नलिंगी शरीरसंबंध ठेवणारे, एकपत्नीव्रता आणि देवाची भीती असलेले असतात, अशे चित्र रंगवण्यात आले होते.
सेलप्पन निर्मला शास्त्रज्ञ कशा बनल्या?
काही वर्तमानपत्रांनी तर अशीही मल्लिनाथी केली होती की हा रोग भारतात पोहोचेपर्यंत अमेरिकनांनी या रोगावरील इलाजही शोधला असेल.
त्याचप्रमाणे चेन्नई आणि तामिळनाडूचा परिसर हा पारंपरिक समाज समजला जात असे.
लैंगिकतेच्या बाबतीत तुलनेने मुक्त विचारसरणी असलेल्या मुंबईतून शेकडो नमुने गोळा करण्यात आले होते आणि पुण्यातील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि तोपर्यंत एकही पॉझिटिव्ह नमुना आढळला नव्हता.

त्यामुळे निर्मला यासुद्धा फार उत्साही नव्हत्या. “मी डॉ. सोलोमनना म्हणाले की, परिणाम निगेटिव्हच असतील, अशी मला खात्री आहे.”, त्या सांगतात.
तरीही सोलोमन यांनी त्यांच्या विद्यार्थिनीला हा प्रयत्न करून पाहायला सांगितला.
देहविक्री करणाऱ्या महिला, समलैंगिक पुरुष आणि आफ्रिकन विद्यार्थ्यांसारख्या जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींकडून रक्ताचे 200 नमुना गोळा करायचे, असा निर्णय घेण्यात आला.
पण हे सोपे काम नव्हते. या आधी निर्मला यांनी कुत्रे व उंदरांपासून पसणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य रोगासंदर्भात काम केले होते. तिला एचआयव्ही किंवा एड्सबद्दल काहीच माहिती नव्हती.
त्याचप्रमाणे रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी लागणाऱ्या व्यक्ती कुठे शोधायचा हेही तिला माहीत नव्हते. मुंबई, दिल्ली किंवा कोलकात्यात देहविक्री करणाऱ्या महिला एका निश्चित ठिकाणी असायच्या. चेन्नईमध्ये असे कोणतेच ठिकाण नव्हते.

म्हणून त्या मद्रास जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊ लागल्या. तिथे अनेक महिलांवर लैंगिक संक्रमित रोगांवर उपचार झाले होते.
“तिथे मी देहविक्री करणाऱ्या काही महिलांशी ओळख वाढवली. त्या मला देहविक्री करणाऱ्या अजून महिलांची ओळख करून देत. जेव्हा मी त्यांचे अर्ज पाहिले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणींनी त्यावर व्ही-होम असे लिहिलेले असते. जेव्हा मी या संदर्भात विचारणा केली तेव्हा ‘व्हिजिलन्स होम’ असे त्याचे नाव असल्याचे मला समजले. त्या ठिकाणी वेश्या आणि निराधार महिलांना प्रशासनाने रिमांडमध्ये ठेवलेले असे.”
देहविक्री करणे तेव्हाही आणि आताही भारतात बेकायदेशीर आहे आणि या महिलांना अटक केली जात असे आणि जामीन घेण्याची त्यांच्या ऐपत नसल्याने त्यांना रिमांड होममध्ये पाठविण्यात येत असे.
त्यामुळे दररोज सकाळी कामावर जाण्याआधी निर्मला रिमांड होममध्ये जाऊन देहविक्री करणाऱ्या महिलांची भेट घेऊ लागल्या.
त्या स्वतः एका छोट्या गावात पारंपरिक घरात वाढल्या होत्या. त्यांचे लग्न झाले होते, दोन लहान मुले होती: “मी पटकन घाबरणारी होते, मी तमिळ भाषा बोलायचे आणि मला शांत आयुष्य जगायचे होते.”
पण त्यांना त्यांच्या पतीने म्हणजेच वीरप्पन राममूर्ती यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रत्येक पावलावर राममूर्ती यांनी पाठिंबा दिला.
अनेकदा वीरप्पन स्वतः निर्मला यांना स्कूटरवरून रिमांड होममध्ये नेत असत. हे पती-पत्नी त्यांचे करिअर नुकतेच सुरू करत होते आणि त्यांच्याकडे अशा प्रकारे खर्चासाठी रक्कमही नसायची. त्या बस तिकिटाचा खर्च वाचवत असत.

निर्मला आणि त्यांचे पती वीरप्पन राममूर्ती, जे त्यांना त्यांच्या स्कूटरवरून नमुने गोळा करण्यास नेत असत
तीन महिन्यांत त्यांनी 80 हून अधिक नमुने गोळा केले. त्यांच्याकडे ग्लोव्ह्ज नव्हते, सुरक्षेची साधने नव्हती आणि आपल्या रक्ताचे नमुने कशासाठी घेतले जात आहेत, हे त्या देहविक्री करणाऱ्या महिलांना माहीत नव्हते.
“मी एड्सची चाचणी करायला नमुने घेत आहे, हे त्यांना सांगितले नव्हते.”, त्या म्हणाल्या. “त्या निरक्षर होत्या आणि मी त्यांना सांगितले असते तरी एड्स म्हणजे काय हे त्यांना समजले नसते. मी गुप्तरोगाची तपासणी करण्यासाठी त्यांच्याकडून नमुने घेत आहे, असे त्यांना वाटत होते.”
सोलोमन यांचे पती हृदय व फुफ्फुसविकारतज्ज्ञ होते. सोलोमन यांनी आपल्या पतीकडून आणि इतरांकडून उपकरणे घेऊन एक छोटीशी तात्पुरती प्रयोगशाळा तयार केली होती.
या प्रयोगशाळेत त्या आणि निर्मला रक्ताच्या नमुन्यातून सीरम वेगळे काढत. चाचणी प्रक्रियेचा हा महत्त्वाचा भाग होता. साठवणुकीची योग्य सुविधा नसल्यामुळे निर्मला हे नमुने त्यांच्या घरच्या फ्रिजमध्ये ठेवत असत.
एलायझा चाचणीची सुविधा चेन्नईमध्ये नसल्याने चेन्नईपासून 200 किमी अंतरावर असलेल्या वेल्लूरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये (सीएमसी) नमुन्यांची चाचणी करण्याची सोय डॉ. सोलोमन यांनी केली होती.
“फेब्रुवारी 1986 मध्ये माझे पती आणि मी रक्ताचे नमुने आइसबॉक्समध्ये घातले आणि काटपाडीसाठी रात्रीची ट्रेन पकडली. तिथून आम्ही रिक्षा घेऊन सीएमसीमध्ये गेलो.”
तिकडे व्हायरोलॉजी विभागाचे संचालक जेकब टी जॉन यांनी पी जॉर्ज बाबू आणि एरिक सिमोस या दोन कनिष्ठ सहकाऱ्यांना निर्मलाच्या मदतीसाठी पाठवले.

“आम्ही सकाळी 8.30 वाजता चाचण्या सुरू केल्या. दुपारी वीज खंडित झाली. त्यामुळे आम्ही चहाचा ब्रेक घेतला. जेव्हा आम्ही परतलो तेव्हा डॉ. जॉर्ज बाबू आणि मी सर्वात आधी प्रयोगशाळेत आले होते.” निर्मला यांनी सांगितले.
“डॉ. जॉर्ज बाबू यांनी झाकण उघडले आणि पटकन बंद केले. ‘खेळू नकोस’ त्यांनी चेतावनी दिली. पण मी पाहिले होते. सहा नमुने पिवळे पडले होते. मी स्तिमीत झाले होते. असे काही होईल, अशी मी अपेक्षाच केली नव्हती.
काही मिनिटांनंतर सिमोस आले. त्यांनीही परिणाम पाहिले. “काही नमुने पॉझिटिव्ह आहेत.”, ते म्हणाले आणि जॉन यांना फोन करून कळवले. तेही लगबगीने प्रयोगशाळेत आले.
परिणाम पॉझिटिव्ह होते, हे नाकारणे शक्यच नव्हते.
“तुम्ही हे नमुने कुठून गोळा केले?” जॉन यांनी निर्मलांना विचारले.
ते चेन्नईला परत येण्याआधी ही बाब गोपनीय ठेवण्याचे वचन निर्मला व तिच्या पतीकडून घेण्यात आले.
“आम्हाला सांगितले गेले की, ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. त्यामुळे कुणालाही सांगू नका.” राममूर्ती म्हणाले.
चेन्नईमध्ये परतल्यावर निर्मला सोलोमन यांच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांनी ही बातमी सांगितली.

लवकरच त्या व्हिजिलन्स होममध्ये परतल्या. या वेळी सोलोमन, बाबू आणि सिमोस त्यांच्यासोबत होते. त्यांनी सहा महिलांच्या रक्ताचे नमुने पुन्हा गोळा केले.
सिमोस हे नमुने घेऊन अमेरिकेला गेले. तिथे त्यांची वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केली आणि भारतात या घातक एचआयव्ही व्हायरसचा शिरकाव झाल्याचे निश्चित झाले.
ही गंभीर बातमी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेला कळविण्यात आली. या संस्थेने ही बातमी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी आणि तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एचव्ही हांडे यांना कळवली.
मे महिन्यातील विधानसभेच्या अधिवेशनात हांडे यांनी ही वाईट बातमी जाहीर केली तेव्हा निर्मला आणि सोलोमन अभ्यागतांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या होत्या.
सुरुवातील कुणाचा यावर विश्वासच बसत नव्हता. काहींनी या चाचण्यांबाबत शंका उपस्थित केली, काहींच्या मते डॉक्टरांच्या हातून चूक झाली होती.
गेल्या वर्षी निधन झालेल्या सोलोमन यांना त्या वेळी एकटे पाडण्यात आले. कारण त्या बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्रातील होत्या.
“लोकांमध्ये खूपच रोष होता. ते म्हणत होते की, एक उत्तर भारतीय स्त्री आम्हाला सांगत आहे की, आम्ही व्यभिचारी आहोत. पण प्रत्येकालाच, अगदी माझ्या आईलासुद्धा धक्का बसला होता,” असे त्यांचा मुलगा सुनील सोलोमन सांगतो.
या समस्येला हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली.
“आयसीएमआरच्या संचालकांनी मला सांगितले की, हे फक्त हिमनगाचे टोक आहे. आपल्याला खूप काम करावे लागणार आहे.” निर्मला सांगतात.
प्रशासनाने व्यापक तपासणी व प्रतिबंधात्मक कार्यक्रम सुरू केले. गेल्या काही वर्षांमध्ये एचआयव्ही-एड्स ही भारतात एक महामारी झाली आहे, तो वेगाने वाढत आहे आणि देशातील कानाकोपऱ्यात पसरला आहे.
भारतातील एड्सची आकडेवारी
1990 आणि 2000 मध्ये भारत सरकारने विस्तृत एचआयव्ही/एड्स प्रतिसाद कार्यक्रम सुरू केला.
अनेक वर्षे जगभरात भारतात एचआयव्हीची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण होते. हा आकडा तब्बल 52 लाख इतका होता. 2006 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार ही संख्या निम्म्यावर आली होती.
पण आजही भारतात एचआयव्हीचा संसर्ग असलेले 21 लाख रुग्ण राहतात. या आजारावर अजूनही उपाय सापडलेला नाही.
निर्मला यांनी आपला अभ्यासक्रम पुन्हा सुरू केला. त्यांना त्यांच्या प्रबंधासाठी अजूनही 100 हून अधिक नमुने गोळा करायचे होते.
पुढील काही आठवडे त्या रिमांड होममध्ये जाऊन देहविक्री करणाऱ्या महिलांना आणि तुरुंगात जाऊन समलैंगिक पुरुषांची भेट घेत होत्या.
मार्च 1987 मध्ये त्यांनी आपला प्रबंध - सर्व्हेलन्स फॉर एड्स इन तामिळनाडू सबमिट केला, परीक्षा दिली, उत्तीर्ण झाल्या आणि चेन्नईमधील किंग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन या संस्थेत लसनिर्मिती कार्यक्रमात कार्यरत झाल्या. 2010 मध्ये या संस्थेतून त्या निवृत्त झाल्या.
भारतात एचआयव्ही-एड्सचा शिरकाव झाल्याचे निश्चित करणाऱ्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामाच्या 30 वर्षांनंतर निर्मला विस्मरणात गेल्या आहेत.
त्यांच्या या कामगिरीविषयी त्यावेळी काही वर्तमानपत्रात वार्तांकन करण्यात आले होते. पण त्यांच्या लाखमोलाच्या कामाची फारच कमी दखल घेण्यात आली.
आपल्या कामाची योग्य प्रकारे दखल घेतली नाही, असे वाटते का, असे मी त्यांना विचारले.
“मी गावात मोठी झाले. तिथे कुणीही अशा गोष्टींबाबत फार रोमांचितही होत नाहीत आणि फार निराशही होत नाहीत. मला ही संधी मिळाल्याचा आणि मी समाजासाठी काहीतरी केल्याचा मला आनंद आहे,” त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
एचआयव्ही/एड्स म्हणजे काय?
एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशिअन्सी व्हायरस) हा एक प्रकारचा विषाणू आहे. हा विषाणू रोगप्रतिकारकशक्तीवर हल्ला करतो आणि असुरक्षित संभोग, संक्रमित सुया आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या महिलांमधून आणि स्तनपानातून बाळांना संक्रमित झालेल्या आजारांना व संसर्गांशी लढा देण्याची क्षमता कमकुवत करतो.
हा आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही. पण या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे जीवनमान दीर्घ असू शकते.
एड्स हा एचआयव्हीच्या संसर्गाचा शेवटचा टप्पा असतो. या टप्प्यावर शरीर घातक ठरणाऱ्या संक्रमणांशी लढा देऊ शकत नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









