Nykaa ते Mama earth : स्किन केअरमध्ये भारत जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे, कारण

जान्हवी कपूर नायकाची ब्रँड अँबेसेडर आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जान्हवी कपूर नायकाची ब्रँड अँबेसेडर आहे
    • Author, मेरिल सेबेस्टियन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतीय स्किन केअर बाजार जगातल्या पाच सगळ्यांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे आणि गेल्या काही वर्षांतच या मार्केटने उसळी घेतली आहे.

तज्ज्ञ म्हणतात की, या बाजारात सर्वाधिक पैसा तरुणांचा येतो. कारण 'सुंदर दिसण्यासाठी' पैसा खर्च करायला त्यांची काहीच हरकत नसते. गेल्या काही वर्षांत अनेक मेकअप स्टार्टअप्सने पण या इंडस्ट्रीत पाय रोवले आहेत.

अनेक दशकं भारतात देशांतर्गत ब्रँड्सचा बोलबाला होता. यात हिंदुस्तान युनिलिवर, हिमालया वेलनेस, इमामी आणि निवीया अशा काही ब्रँड्सचा समावेश होतो.

1990 च्या दशकात लॉरियलसारख्या परदेशी ब्रँड्सनी भारतात प्रवेश केला. याच काळात भारतात अर्थव्यवस्थेचं उदारीकरण होत होतं आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात होतं.

पण तरीही ग्राहकांसमोर मर्यादित पर्याय होते.

भारतीय स्किनकेअर मार्केट

पण आता अनेक देशी ब्रँड्स उपलब्ध आहेत आणि या बाजाराने उसळी घेतली. मार्केट रिसर्च कंपनी स्टेटिस्टानुसार 2013 मध्ये 5.8 बिलियन डॉलर्सची उलढाल असलेला हा व्यवसाय आता 2 बिलियनने वाढून 7.65 पर्यंत पोहचला आहे. आणि येत्या 2026 पर्यंत हा अजून 2 बिलियन डॉलर्सने वाढेल अशी शक्यता आहे.

मामाअर्थसारख्या अनेक स्किन केअर ब्रँड्सची मुख्य कंपनी असणाऱ्या होनासाचे सह-संस्थापक आणि सीईओ वरुण अलघ म्हणतात, "व्यवसायात अचानक झालेल्या वृद्धीचं कारण थेट ग्राहकांपर्यंत पोहचता येणं आणि इ-कॉमर्ससारख्या माध्यमातून वेगवान डिलिव्हरी हे आहे."

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने 2021 मध्ये आपल्या स्किन केअर रूटीनचा व्हीडिओ शेअर केला होता. यात तिने नियासिनमाईड सीरम, वॉटरमेलन-बेस्ड मॉईश्चरायजर आणि कॅफीन ड्रॉप्ससारख्या प्रॉडक्ट्सचा उल्लेख केला होता.

अगदी पाच वर्षांपूर्वी भारतातल्या लोकांनी या उत्पादनांची नावंही ऐकली नव्हती, ना अशी उत्पादनं खिशाला परवडतील अशा बजेटमध्ये उपलब्ध होती.

स्किनकेअर जगात क्रांती

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नायकाने 2012 साली आपल्या वेबसाईटवर ब्यूटी आणि स्किन केअर उत्पादनं विकायला सुरुवात केली.

नायकाच्या प्रवक्त्या म्हणातात, "त्या काळात भारतात स्कीन केअर आणि पर्सनल केअर हा वेगाने वाढणारा व्यवसाय होता पण इथली मागणी आणि पुरवठा इतर देशांच्या तुलनेत कमी होता."

नायकाने वेगाने देशात आपले हातपाय पसरले.

आज नायका देशातल्या जवळजवळ 95 टक्के पोस्टल कोड्सपर्यंत पोचली आहे. यानंतर बरोबर 5 वर्षांनी होनासा लॉन्च झाली.

स्किनकेयर ब्रँड

फोटो स्रोत, Getty Images

याच काळात आणखी एक बदल होत होता, जास्तीत जास्त लोक आपल्या त्वचेची काळजी घ्यायला लागले होते.

स्वस्त आणि सुलभ

मध्य प्रदेशातल्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ मानसी शिरोलीकर म्हणतात की, "फोमो म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आऊट (आपण स्पर्धेत मागे तर पडणार नाही ना ही भीती) यामुळे 18 ते 35 या वयोगटात स्किन केअर उत्पादनं, कॉस्मॅटिक्सचा खप वाढतोय."

ऑनलाईन कोणतंही नवं उत्पादन पाहिलं की लोकांना ते हवं असतं. ती उत्पादनं स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी अनेक देशी ब्रँड्स तयार असतातच.

मिनिमलिस्ट, डॉट अँड की, रिइक्विल आणि कॉन्शियर केमिस्टसारखे अनेक ब्रँड्स चेहऱ्यावरचा काळपटपणा, सुरकुत्या आणि पोअर्स कमी करण्यासाठी 'आधुनिक विज्ञानाचा वापर करून तयार केलेली' उत्पादनं विकतात.

दुसरीकडे नीमली नॅचरल्स, अर्थ रिदम आणि ज्युसी केमिस्टीसारखे ब्रँड्स स्वतःला आयुर्वेदिक आणि नैसर्गिक, रसायनविरहित ब्रँड्स म्हणून पुढे आणत आहेत.

डॉ शिरोलीकर म्हणतात की भारतीय त्वचेवर पिंपल्स, काळे डाग आणि सूज असण्याचा धोका असतो.

अँटी-एजिंगसाठी

स्किन केअर क्षेत्रात आलेले नवे स्टार्टअप्स व्हिटॅमिन-सी आणि रेटिनॉल असणाऱ्या गोष्टी लोकांना विकतात. या दोन्ही गोष्टी चेहऱ्यावरचे काळे डाग, काळेपणा आणि सुरकुत्या, सैल त्वचा अशा गोष्टींना लांब ठेवण्यासाठी उपयुक्त असतात.

स्किन केअर ब्रँड मिनिमलिस्टचे सीईओ आणि सहसंस्थापक मोहित यादव म्हणतात की, "पिंपल्स, पिंगमेंटेशन आणि एजिंग या भारतीय लोकांच्या त्वचेच्या बाबतीत सगळ्यात मोठ्या समस्या आहेत."

त्यामुळे पिगमेंटेशन आणि अॅक्ने यासाठी वापरण्यात येणारे सीरम्स सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनं आहेत.

नायकाच्या सीईओ आणि संस्थापक फाल्गुनी नायर म्हणतात की, "सुंदर दिसण्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे."

भारतीय ग्राहकांना योग्य माहिती आणि ज्ञान मिळण्याची गरज होती.

नायका आपल्या वेबसाईटवर स्किन केअर ब्लॉगही चालवतं आणि त्यांच्या युट्यूबवर अनेकदा इंन्फ्लुएन्सर लोकांचे व्हीडिओ असतात.

अलघ म्हणतात ग्राहक कोणतंही उत्पादन विकत घेण्याआधी त्यात वापरेलेले घटक, त्यांचं प्रमाण आणि त्या उत्पादनाचं परीक्षण सगळं जाणून घेऊ इच्छितात.

डॉ शिरोलीकर म्हणतात की, "मला स्वतःला टोनर, इसेन्स यासारख्या शब्दाबद्दल स्वतःला शिकवावं लागलं कारण माझ्याकडे येणारे पेशंट ऑनलाईन मिळणाऱ्या माहितीमुळे इतके कंफ्युज होतात आणि त्यांना योग्य माहिती देण्यासाठी आधी मला सगळं शिकावं लागतं."

स्किनकेयर ब्रँड

फोटो स्रोत, Getty Images

"कारण आमच्या वैद्यकीय अभ्यासात आम्ही सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यावी यापेक्षा सोरायसिस, व्हिटीलिगो यासारखे त्वचेचे रोग आणि त्यांचे उपचार काय आहेत हे शिकतो."

मुख्यधारेत जागा आणि सुधारणेला वाव

वर उल्लेखलेले अनेक स्टार्टअप भारतात फक्त डिजिटल बिझनेसच्या स्वरूपात सुरू झाले होते पण आता नायका एक पब्लिक लिस्टेट कंपनी आहे आणि भारतातल्या ब्युटी आणि पर्सनल केअर बाजारात या कंपनीचा हिस्सा 28.6% इतका आहे.

होनासा कंपनीची किंमत आता 1 अब्ज डॉलरवर पोहचली आहे.

या स्टार्टअप्सच्या यशाने जुन्या ब्रँड्सलाही त्यांचं मॉडेल आपलसं करण्याची प्रेरणा दिली आहे.

पॉण्ड्स आणि लॉरियलनी आपल्या परदेशात लोकप्रिय असलेल्या उत्पादनांना भारतात आणलं आहे. लॅक्मे आणि गार्नियरने व्हिटॅमीन सी उत्पादनांची एक नवी सीरिज आणली आहे.

लॅक्मे आणि लोरियल एआय प्लॅटफॉर्मव्दारे आपल्या वेबसाईटवर त्वचेसंबंधी सल्ले घेण्याची सुविधा देतात.

त्वचारोग तज्ज्ञ आणि अनेक ब्युटी एक्सपर्ट आता व्हॉट्सअॅप आणि इमेलवर सल्ला देतात.

अनेक डॉक्टरांनी स्वतःचे ब्रँड लॉन्च केले आहेत, उदाहरणार्थ डॉ सेठ, डॉ जमुना पै स्किनलॅब इत्यादी.

मिनिमलिस्टचे सीईओ आणि सहसंस्थापक मोहित यादव म्हणतात, "मोठ्या शहरातले ग्राहक अधिक अनुभवी आणि जागरूक आहेत, तिथून मागणी जास्त आहे असं वाटू शकतं. पण प्रत्यक्षात वेगळं घडतंय. आमच्या व्यापाराचा 50 टक्क्याहून जास्त हिस्सा टीयर-टू आणि टीयर-थ्री या लहान शहरातून येतो. याच मार्केटमध्ये वृद्धीच्या संधी आहेत.

मोहित यादव म्हणतात की, "अमेरिकेत स्किन केअरवर दरडोई खर्च 65 डॉलर आहे तर भारतात जवळपास 1 डॉलर."

अलघ म्हणतात की, "भारतीय स्किन केअर इंडस्ट्री आता अगदी प्रारंभिक अवस्थेत नाहीये आणि ज्याप्रकारे या इंडस्ट्रीची वाढ होतेय ते पाहाता आम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय ब्रँडशी स्पर्धा करू."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)