योनीभागाच्या स्वच्छतेसाठी इंटिमेट वॉश वापरावं? बिकिनी वॅक्स करणं गरजेचं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
- Role, बीबीसी मराठीसाठी
काही दिवसांपूर्वी एक तरुण सुंदर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत घाईघाईत क्लिनिकमध्ये आली. वेदनेने पिळवटलेला तिचा चेहरा बघून रिसेप्शनिस्टने लगेच तिला आत पाठवले.
"मॅम, माझं लग्न आहे म्हणून बिकिनी वॅक्स करायला गेले होते तर ते करताना त्या भागात मोठी जखम झाली आणि खूप ब्लिडींग सुरू झालं आहे. मला खूप भीती वाटतेय मॅम."
तिने रडायलाच सुरुवात केली.
तिला धीर देऊन शांत करून तपासले तर योनीमार्गाच्या अतिशय नाजूक भागात चांगला मोठा कट गेला होता चक्क.
नशिबाने साधे उपचार करून टाका घ्यावा न लागता ब्लीडिंग थांबलं आणि मग जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून औषधे देऊन तिची रवानगी केली.

सध्या योनी मार्गाच्या आसपासचे केस काढून टाकण्यासाठी बऱ्याच तरुणी, महिला बिकिनी वॅक्स करताना दिसतात. आता यामागे खरंच आपल्या नाजूक भागाची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे हा हेतू असतो की केवळ फॅशन, ट्रेंड फॉलो करणं आहे? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे.
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी 'बिकिनी वॅक्स' म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस वॅक्सिंग करून काढून टाकणे जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा 'बिकिनी वॅक्स'चा उद्देश असतो.
हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे चांगलेच वेदनादायक असते. तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही हे नियमित करून घेतात.
यामागे काय कारण असावे?
बऱ्याच जणी हे पुरुषांना आवडते म्हणून करत असाव्यात. प्रथमदर्शनी विचार करताना खरं तर असं वाटतं की, अजिबात केस नसलेला बाल्यावस्थेत असल्यासारखा दिसणारा योनीमार्ग पुरुषांना का आवडत असेल?
मग जरा खोलवर जाऊन विचार केला तर हल्लीच्या तरुण पिढीवर पोर्नोग्राफीचा असलेला प्रभाव हे कारण असू शकेल असं वाटतं.
या फिल्म्समध्ये दाखवत असलेली पूर्णतः केसविरहित शरीरे आणि अवास्तव चित्रण तरुण पिढीची दिशाभूल करत असावी का, अशी शंका येते.
आजच्या वयात येणाऱ्या आणि तरुण पिढीला पोर्नोग्राफी बघणे फारच सोपे झाले आहे, पण त्याचे त्यांच्या लैंगिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि त्याबद्दल नंतर बोलू.

फोटो स्रोत, Getty Images
आता जरा शास्त्रीय दृष्टिकोनातून यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
योनीमार्गावरील केस पूर्णपणे काढावे का?
स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जीवाणूंचं वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते.
या जीवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकार शक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो.
हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा वॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात, दुखावली जातात.
त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो. परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात.
कोरड्या पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते तसंच खाज सुटू शकते. या एवढ्या सगळ्या समस्या सगळे केस मुळासकट काढण्याच्या अट्टाहासामुळे होऊ शकतात.
वर नमूद केलेल्या मुलीच्या बाबतीत जशी इजा झाली तसे काही घडले किंवा त्यापेक्षा अधिक दुखापत झाली तर हा प्रकार अजूनच धोकादायक ठरतो.
हेअर रिमूव्हिंग क्रीमही या भागात वापरणे अतिशय धोक्याचे आहे. तशी पॅकवर सूचना पण असते. त्यामुळे केमिकल रिअॅक्शनही येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्वी आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ कोणतीही शस्त्रक्रिया करायच्या आधी योनिमार्गाच्या भागातले सगळे केस काढायला सांगायचो पण यामुळे नंतर जंतुसंसर्ग वाढू शकतो, असं लक्षात आल्यावर आता गरज असेल तेवढेच केस काढले जातात.
सतत शेविंग करणे हे सुद्धा केसाची मुळे उघडी पडल्यामुळे तिथे फोड येणे, खाज सुटणे अश्या गोष्टींना आमंत्रण देऊ शकतो.
अजून एक मुद्दा. योनिमार्गाच्या भागातले केस समूळ काढण्यापेक्षा कात्रीने काळजीपूर्वक कमी करणे हे सर्वांत योग्य आहे. त्यामुळे स्वच्छ्ता पण राखली जाते आणि बाकी त्रास होत नाही.
या भागात अजिबात स्वच्छता न करणेही चुकीचे आहेच. अंघोळीच्या वेळी योनीमार्ग स्वच्छ न करणे, तिथले केस वेळीच न कापणे, सॅनिटरी पॅड वेळेवर न बदलणे, ओली अंतर्वस्त्रे वापरणे या सगळ्या गोष्टी टाळायलाच हव्यात. कारण त्यामुळे अजून वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पण आपल्या नाजूक भागाची स्वच्छता कशी राखायची, हेही महत्त्वाचं आहे. शेव्हिंग किंवा ट्रिमिंग हा त्यातला एक भाग आहे. त्याव्यतिरिक्त या जागेचं हायजिन कसं पाळावं? कारण जसं स्वच्छता न पाळणं घातक आहे, तसंच कधीकधी अतिस्वच्छतेचेही दुष्परिणाम होऊ शकतात.

"मॅम दोन महिन्यापूर्वीच लग्न झालंय माझं, पण सेक्स करताना खूप जळजळतं आणि दुखतं. मग मी नकोच म्हणते. नवरा खूप वैतागलाय! तरी मी रोज दोन वेळा इंटिमेट वॉशने तो भाग स्वच्छ धुते. शेव्हिंग पण नियमित करते. प्रत्येकवेळी बाथरूमला जाऊन आले की हॅण्ड शॉवरने धुवून टिश्यू पेपरने पुसून घेते. आता अजून काय करू?"
नुकतीच लग्न झालेली पंचविशीची युवती उद्विग्न होऊन सांगत होती. खरंतर योनीमार्ग स्वच्छ ठेवण्याच्या चुकीच्या अट्टाहासापायी ती करत असलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या त्रासाला कारणीभूत ठरत होत्या.

योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठी इंटिमेट वॉश गरजेचे?
सध्या स्त्रिया आणि मुलींमध्ये योनीमार्गाची स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळे 'intimate wash' वापरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
यामुळे वारंवार योनीमार्गात कोरडेपणा आणि संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढलेच आहे. याचं कारण असं की योनिमार्गाच्या आतल्या भागाचा PH अॅसिडिक असतो. म्हणून हे वॉश अॅसिडिक बनवले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
पण ह्या वॉशने योनीमार्गाचा बाहय भाग धुतला जातो, आतला नव्हे आणि ते योग्यही नाही. बाहेरच्या भागात नेहेमीसारखी त्वचा असते. या अॅसिडिक वॉशमुळे ही त्वचा दुखावली जाऊन हुळहुळी होते.
योनीमार्गात वेगवेगळे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे जीवजंतू असतात. या वॉशमुळे त्याचं संतुलन खराब होतं परिणामी योनीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार संसर्ग आणि कोरडेपणा याचा त्रास होऊ लागतो.
त्यामुळे ह्या वॉशची अजिबात गरज नाही.
वॅक्सिंग, इंटिमेट वॉश किंवा जाहिरातींमधून भडीमार केले जाणारे अनेक प्रॉडक्ट्स न वापरताही, आपण अगदी साध्या-सोप्या पद्धती वापरल्या, मूलभूत काळजी घेतली, तर योनीमार्ग स्वतःला स्वच्छ ठेवू शकतो. (Vagina can keep itself clean.)
या 10 गोष्टींमुळे राखता येईल योनीमार्गाची स्वच्छता

फोटो स्रोत, Getty Images
- अंघोळीच्या वेळी नाजूक भाग साध्या पाण्याने धुणे पुरेसे आहे. योनीमार्गाचा PH अॅसिडिक असतो आणि साबण अल्कली असतो. त्यामुळे साबण टाळावा.
- रात्री हवं तर एकदा वॉश घ्या. त्यापलीकडे सारखे धुणे, हँड शॉवर वापरणे, सारखे पुसणे अजिबात नको. हँड शॉवरच्या फवाऱ्यामुळे योनीमार्गातील ग्रंथी उत्तेजित होऊन पांढरा स्त्राव जास्त प्रमाणात जाऊ शकतो. तसेच टॉयलेट पेपरने जास्त जोरात पुसल्यामुळे कोरडेपणा आणि चांगल्या जीवजंतूंचा समन्वय बिघडू शकतो.
- योनीमार्गाच्या जवळ कोणत्याही प्रकारची पावडर कधीही वापरू नका. टाल्कम पावडर योनीमार्गात जाऊन ओव्हरीचा कॅन्सर होऊ शकतो, असे निदर्शनास आले आहे. मांड्यांना पावडर लावायची असेल, तर आधी अंडरवेअर घालून मग पावडर लावा.
- थोडे पांढरे जाणे नैसर्गिक आहे. जास्त जात असेल किंवा त्यात खाज, जळजळ, वास असेल तर लगेच स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवणे आवश्यक आहे.
- मनाने अथवा केमिस्टच्या सल्ल्याने अथवा जाहिराती बघून क्रीम्स आणून वापरू नका. स्टिरॉइड असलेल्या अशा क्रीम्समुळे आम्ही डॉक्टर्स आजकाल कोणत्यात औषधांना दाद न देणारी अतिशय चिवट इन्फेकशन्स बघत आहोत.
- कित्येक स्त्रिया पाळीची तारीख जवळ आली की, पॅड लावायला सुरवात करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे हमखास रॅश येते आणि सॅनिटरी पॅड मध्ये dioxin नावाचे केमिकल असतं. त्याचा संबंध योनीमार्गाशी कारण नसताना जास्त येतो. पॅड जवळ ठेवून गरज लागेल तेव्हाच वापरावे.
- घरगुती पॅड वापरण्यातही जंतुसंसर्गाचा धोका संभवतो.
- लैंगिक संबंधानंतर वॉश घेणे योग्य आहे.
- योनीमार्गाच्या भागात सेंट, परफ्युम्स ,डिओडरंट्स वापरणे शक्यतो टाळावे. थेट त्वचेवर या गोष्टी वापरण्यापेक्षा कपड्यांवर मारावे. ते जास्त सुरक्षित आणि रिअॅकशनची शक्यता कमी असते.
- अंतर्वस्त्रे कायम कॉटनचीच असावीत. नवीन अंतर्वस्त्रे घेतल्यावर धुवून वापरावीत. धुताना साबण किंवा डिटर्जंटचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यावी. साबणाचा अंश राहिल्यास त्रास होऊ शकतो.
या गोष्टी नियमित पाळल्या तर योनीमार्ग निश्चित स्वच्छ राहतो. त्यासाठी कोणत्याही फॅन्सी ट्रेंड फॉलो करण्याची गरज उरणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








