गोध्रा दंगलींबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले, अमेरिकन पॉडकास्टरला दिली मुलाखत

फोटो स्रोत, ANI
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या युट्युब चॅनेलवरील एका पॉडकास्टसाठी मुलाखत दिली आहे.
हा पॉडकास्ट 3 तास 17 मिनिटांचा आहे. यात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त, आरएसएस, हिंदू राष्ट्र आणि महात्मा गांधींसह अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केलं आहे.
या पॉडकास्टमध्ये ते गुजरातमधील दंगलीवर देखील सविस्तर बोलले. याशिवाय चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर देखील ते बोलले.
अमेरिकन पॉडकास्टमधील पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की जो व्यक्ती पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना तोंड देण्यास घाबरते, त्यांनी एका 'उजव्या विचारसरणीच्या परदेशी पॉडकास्टरला मुलाखत दिली आहे.'
जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आणि त्या व्यक्तीनं त्यांच्या सरकारला धारेवर धरणाऱ्या प्रत्येक संस्थेला शिस्तबद्धपणे संपवलं असताना देखील, ती व्यक्ती हे म्हणण्याचं धैर्य दाखवते की टीका ही लोकशाहीचा आत्मा आहे."
"त्यांनी टीकाकारांवर अशाप्रकारे हल्ला केला आहे, ज्याची तुलना अलीकडच्या इतिहासातील कोणाशीही केली जाऊ शकत नाही."


'दहशतवाद कुठेही घडो, त्याची सूत्रं पाकिस्तानात'
शेजारील पाकिस्तानबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी त्याची मूळं कुठेतरी पाकिस्तानातच असतात."
ते म्हणाले, "अमेरिकेत 9/11 ची इतकी मोठी घटना घडली. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन शेवटी कुठे सापडला? तो पाकिस्तानातच लपून बसला होता."
पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तान फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी आहे. आम्ही सातत्यानं पाकिस्तानला सांगत आलो आहोत की या मार्गानं कोणाचंही भलं होणार नाही. तुम्ही दहशतवादाचा मार्ग सोडा. राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद थांबला पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीत मोदी पुढे म्हणाले, "शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मी स्वत: लाहौरला गेलो होतो. दोन्ही देशातील संबंधांची एक चांगली सुरूवात व्हावी यासाठी पंतप्रधान झाल्यानंतर शपथविधी समारंभाला मी पाकिस्तानला विशेष आमंत्रण दिलं होतं."
"मात्र प्रत्येक वेळेस चांगल्या प्रयत्नांचा परिणाम नकारात्मक झाला. त्यांना सद्बुद्धी मिळेल अशी आम्हाला आशा आहे."
गोध्रा आणि त्यानंतर झालेल्या दंगलीवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
मुलाखतीदरम्यान फ्रीडमन यांनी पंतप्रधान मोदींना 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीविषयीदेखील विचारलं.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी त्याआधीची परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो. 24 डिसेंबर 1999 ला भारतीय विमानाचं अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आलं होतं. 2000 मध्ये दिल्लीत लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला."
"11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर दहशतवादी हल्ला झाला. ऑक्टोबर 2001 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला. 13 डिसेंबर 2001 ला भारताच्या संसदेवर हल्ला झाला."

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्यावेळेस आठ ते दहा महिन्यांमध्ये झालेल्या घटना लक्षात घ्या. अशा परिस्थितीत मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्याआधी शतकातील सर्वात मोठा भूकंप आला होता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मी या कामाला लागलो."
ते पुढे म्हणाले, "27 फेब्रुवारी 2002 ला विधानसभेत अर्थसंकल्पीय सत्र होतं. आम्ही सभागृहात बसलो होतो. आम्ही आमदार होण्यास त्याच दिवशी तीन दिवस झाले होते आणि गोध्राची घटना घडली. ही भयंकर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं."
"विमानाचं अपहरण करून ते कंदहारला नेण्यापासून सुरू झालेल्या अनेक मोठ्या घटनांची पार्श्वभूमी आणि त्यात इतक्या मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू, त्यांना जिवंत जाळणं. त्यावेळेस काय परिस्थिती असेल याची तुम्ही कल्पना करू शकता?"
ते म्हणाले की, खूप मोठी दंगल झाली असं जे सांगितलं जातं, तो गैरसमज पसरवण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "2002 च्या आधीची आकडेवारी जर पाहिली तर लक्षात येतं की गुजरातमध्ये किती दंगली व्हायच्या? पतंगावरून जातीय हिंसा व्हायची. सायकलची टक्कर झाल्यावर हिंसा व्हायची."
"2002 च्या आधी गुजरातमध्ये 250 हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या. 1969 मध्ये ज्या दंगली झाल्या होत्या त्या सहा महिने चालल्या होत्या. इतकी मोठी घटना स्पार्किंग पॉईंट बनली आणि काही जण मारले गेले."
'मी युद्धाच्या नाहीतर शांततेच्या बाजूनं'
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "आमची पार्श्वभूमी इतकी भक्कम आहे की जेव्हाही आम्ही शांततेसाठी बोलतो, तेव्हा जग आमचं ऐकतं. कारण भारत ही बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे."
रशिया-युक्रेन बाबत मोदी म्हणाले, "माझे रशिया आणि युक्रेन दोघांशीही चांगले संबंध आहेत. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर असं म्हणू शकतो की ही युद्धाची वेळ नाही."
"तसंच मित्रत्वाच्या नात्यानं झेलेन्स्की यांनादेखील सांगतो की जग कितीही तुमच्या पाठिशी उभं राहिलं तरी युद्धातून कधीही मार्ग निघणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांना वाटतं की चर्चेतूनच युद्धावर तोडगा निघणार आहे. हा तोडगा तेव्हाच निघेल जेव्हा रशिया आणि युक्रेन दोघेही वाटाघाटी करतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "संपूर्ण जगानं युक्रेनबरोबर कितीही चर्चा केली, तरी वाटाघाटींसाठी दोन्ही बाजूंचा सहभाग आवश्यक आहे. मी नेहमीच म्हणतो की मी शांततेच्या बाजूनं आहे."
आरएसएस आणि महात्मा गांधींबाबत काय म्हणाले मोदी?
या मुलाखतीत पंतप्रधान मोदी आरएसएसबद्दल सविस्तर बोलले.
ते म्हणाले, "आरएसएस मोठी संघटना आहे. संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. जगात इतकी मोठी स्वयंसेवी संघटना कुठे आहे का? कोट्यवधी लोक आरएसएसशी जोडले गेलेले आहेत. आरएसएसला समजणं तितकं सोपं नाही. आरएसएसचं काम समजून घेतलं पाहिजे. आरएसएस जीवनाच्या उद्देशाला दिशा देतो."

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आरएसएसचे काही स्वयंसेवक जंगलांमध्ये वनवासी कल्याण आश्रम चालवतात. आदिवासींमध्ये राहून ते शाळा-विद्यालय चालवत आहेत. अमेरिकेत काहीजण आहेत जे त्यांना 10 ते 15 डॉलर दान करतात."
"अशी 70 हजार विद्यालयं सुरू आहेत. याचप्रकारे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी विद्या भारती नावाची संघटना उभी करण्यात आली. देशात त्यांच्या जवळपास 25 हजार शाळा आहेत."
पंतप्रधान मोदी भारतीय मजदूर संघाबद्दल देखील बोलले.
ते म्हणाले की "डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना म्हणतात, जगातील कामगारांनो संघटित व्हा. आरएसएसच्या शाखेतून निघालेले जे लोक मजदूर संघ चालवतात ते म्हणतात, 'कामगारांनो, जगाला एक करा.' दोन शब्दांचाच फरक आहे. मात्र विचारांमधील बदल मोठा आहे. संघाच्या सेवाभावामुळे मी घडलो आहे."

पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीत सांगितलं की आजदेखील भारतीय जीवनावर महात्मा गांधी यांचा प्रभाव कोणत्यातरी स्वरुपात दिसून येतो.
ते म्हणाले, "स्वातंत्र्याबद्दल बोलायचं, तर इथे लाखो वीरांनी बलिदान केलं. तारुण्य तुरुंगात घालवलं. ते देशासाठी शहीद झाले. त्यातून एक परंपरा तयार झाली आणि त्यामुळे देखील एक वातावरण तयार झालं."
"मात्र गांधींनी लोकआंदोलन उभं केलं. त्यांनी प्रत्येक कामाला स्वातंत्र्याच्या रंगानं रंगवून टाकलं. इंग्रजांना कधीही अंदाज आला नाही की दांडी यात्रेमुळे एक खूप मोठी क्रांती होईल."
पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी सामूहिकतेची भावना निर्माण केली आणि लोकशस्तीचं सामर्थ्य ओळखलं. माझ्यासाठी आजदेखील ते तितकंच महत्त्वाचं आहे. मी कोणतंही काम करतो, तेव्हा सर्वसामान्यांना जोडण्याचाच माझा प्रयत्न असतो.
'नजरेला नजर भिडवून बोलणं'
पंतप्रधान मोदी म्हणाले की "2013 मध्ये जेव्हा पक्षानं त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवलं तेव्हा लोक म्हणत होते की, त्यांनी तर एका राज्याचा कारभार पाहिला आहे, त्यांना परराष्ट्र धोरण कसं काय समजणार."
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "त्यावेळेस मी म्हटलं होतं की एका मुलाखतीत संपूर्ण परराष्ट्र धोरण तर मला समजवता येणार नाही. मात्र मी तुम्हाला फक्त इतकंच सांगतो की हिंदुस्तान नजर झुकवून बोलणार नाही, नजर वर करून बोलणार नाही. मात्र आता हिंदुस्तान नजरेला नजर भिडवून बोलेल. आजदेखील मी त्याच विचारांनी पुढे जातो आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मोदी म्हणाले, "माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी आहे. मात्र कोणालाही तुच्छ लेखणं, निंदानालस्ती करणं, हे माझ्या संस्कृतीचे संस्कार नाहीत आणि माझी सांस्कृतिक परंपरादेखील नाही."
डोनाल्ड ट्रम्पबाबत काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टनच्या स्टेडियममधील हाउडी मोदी कार्यक्रमाचाही उल्लेख केला.
त्यांनी भाषणानंतर जेव्हा ट्रम्प यांना विचारलं की स्टेडियमला चक्कर मारुया का, तेव्हा ते लगेचच तयार झाले.
मोदी म्हणाले, "अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था अवस्थ झाली होती. तुम्हाला माहीत आहे की किती कडक सुरक्षा असते. किती तपासणी होते. या व्यक्तीमध्ये किती हिंमत आहे ही गोष्ट माझ्या मनाला भिडली. ते स्वत: निर्णय घेतात आणि दुसरं म्हणजे, त्यांना मोदीवर विश्वास आहे की मोदी त्यांना घेऊन असतील तर जाऊया."

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान मोदी म्हणाले की ट्रम्प यांनी सर्व प्रोटोकॉल मोडत त्यांना सर्व भवन दाखवलं.
मोदी म्हणाले, "ते अमेरिका फर्स्ट धोरण असणारे आहेत आणि मी भारत फर्स्ट धोरण असणारा आहे. आमची जोडी बरोबर जमते."
चीनबरोबरच्या संबंधांवर काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान मोदी यांनी चीनबरोबरच्या संबंधांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची देखील उत्तरं दिली.
ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत. एकेकाळी जगाच्या अर्थव्यवस्थेत अर्धा वाटा भारत आणि चीनचा असायचा.
ते असंही म्हणाले की दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा कोणताही इतिहास नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "कधीकाळी चीनवर बुद्धांचा खूप मोठा प्रभाव होता. भारतातूनच हा विचार तिथे गेला होता."

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान मोदी म्हणाले, "दोन्ही देशांमधील संबंध कायमस्वरूपी असेच भक्कम असले पाहिजेत. दोन शेजारी देशांमध्ये काहीतरी होत असतं. कधीकधी मतभेद होणंदेखील स्वाभाविक आहे. कुटुंबातदेखील असं होत असतं. मात्र आमच्यातील मतभेदाचं रुपांतर वादात होऊ नये असेच आमचे प्रयत्न आहे."
गलवान घटनेकडे इशारा करत मोदी म्हणाले, "2020 मध्ये सीमेवर ज्या घटना घडल्या, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी माझी भेट झाली. त्यानंतर सीमेवर जो तणाव होता, तो निवळला असून स्थिती सामान्य झाली आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











