डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात भारताला इशारा आणि पाकिस्तानचं कौतुक, नक्की काय झालं?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात टॅरिफच्या प्रश्नावर भारत, चीन, कॅनडा, दक्षिण कोरियासह अनेक देशांवर भाष्य केलं. या सर्वांवर 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणाही त्यांनी केली.
त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं कौतुक केलं. त्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त सत्रात सांगितले, "दुसरे देश आपल्याविरोधात अनेक वर्षांपासून टॅरिफ लावत आहेत. आता आपली वेळ आहे. युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको, कॅनडा आणि इतर अनेक देश अमेरिकेच्या तुलनेत भरपूर टॅरिफ लावतात. हा मोठा अन्याय आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा खास उल्लेख करुन म्हटले, "भारत अमेरिकन वाहनांवर शंभर टक्के टॅरिफ लावतो. चीन अमेरिकन वस्तूंवर आपल्या दुप्पट टॅरिफ लावतो. दक्षिण कोरियाचं सरासरी टॅरिफ आपल्या चौपट आहे."
"आता टॅरिफ आपल्या अमेरिकेला पुन्हा श्रीमंत आणि महान बनवण्यासाठी लावलं जात आहे. ते आता वेगानं लागू केलं जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेत थोडे अडथळे येऊ शकतात मात्र ते आम्ही सांभाळून घेऊ", असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी साधारणतः दोन तास भाषण केलं. यात अमेरिकन इमिग्रेशन पॉलिसी, युक्रेन आणि कायदा-सुवयवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केलं.
अफगाणिस्तानात एका कट्टरवादी हल्ल्याच्या म्होरक्याला पकडण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.
शरिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिलं, या पूर्ण प्रदेशात पाकिस्तानने दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये पाकिस्तानने भाग घेऊन मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
ते म्हणाले, पाकिस्तानच्या संरक्षण दलांनी नुकतेच आयएसकेपीचा म्होरक्या मुख्य कमांडर शरीफुल्लाहच्या अटकेला मदत केली होती. तो अफगाणिस्तानचा नागरिक आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर झालेल्या एका विशेष मोहिमेत त्याला अटक झाल्याचं शरीफ यांनी सांगितलं.


ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा सर्वाधिक परिणाम कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर होणार आहे.
अमेरिकेला स्टील अथवा स्टीलची उत्पादने निर्यात करणाऱ्या टॉप 5 देशांमध्ये कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे.
अमेरिकन आयर्न अँड स्टील इन्स्टिट्यूटच्या (एआयएसआय) माहितीनुसार, 2024 मध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक स्टील कॅनडातून आयात झालेलं होतं. कॅनडानंतर ब्राझील, मेक्सिको आणि दक्षिण कोरियाने अमेरिकेमध्ये स्टील निर्यात केलं होतं.
इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशननुसार, अमेरिकेमध्ये ॲल्युमिनियम उत्पादनांपैकी सर्वाधिक उत्पादने कॅनडातूनच आयात होतात.
कॅनडाव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरात, चीन, कोरिया, बहरीन, अर्जेंटीना आणि भारतदेखील अमेरिकेला ॲल्युमिनियमची उत्पादने निर्यात करतो.
आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान, ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि युरोपीय संघाकडून स्टील आयात करण्यावर 25 टक्के आणि ॲल्युमिनियम आयात करण्यावर 10 टक्के टॅरिफ टॅक्स लागू केला होता.
कॅनडाने काय म्हटलं होतं?
मात्र, एका वर्षानंतर अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोसोबत हा टॅरिफ टॅक्स समाप्त करण्यासाठी एक करार केला. मात्र, युरोपीय संघावर हा टॅरिफ टॅक्स 2021 पर्यंत लागू राहिला.
ट्रम्प यांनी याआधीच टॅरिफ टॅक्सबाबतचे मनसुबे स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांच्या या मनसुब्यांवर कॅनडाचे इंडस्ट्री मिनिस्टर फ्रान्सवा-फिलीप शॅम्पेन यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "कॅनडातील स्टील आणि ॲल्युमिनियम हे अमेरिकेतील संरक्षण, जहाज निर्मिती आणि ऑटो यांसारख्या प्रमुख उद्योगांसाठी वापरलं जातं. आम्ही कॅनडातील श्रमिक आणि उद्योगांना साथ देऊ."
ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतील उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही देशातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही योजना 30 दिवसांकरीता पुढे ढकलण्यात आली.
दुसऱ्या बाजूला अमेरिकेत येणाऱ्या सर्व चायनीज सामानावर 10 टक्के नवीन अमेरिकन शुल्क लागू करण्यात आलं आहे. यानंतर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅनडाकडून तीव्र प्रतिक्रिया
कॅनडातील नेत्यांनी ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ योजनेवर कठोर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, यामुळे दोन्ही देशांच्या सीमेपल्याडच्या नोकऱ्या समाप्त होतील.
कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख कॅन्डेस लैंग यांनी म्हटलं की, "आजचं हे वृत्त स्पष्ट करतं की, येणाऱ्या काळात अनिश्चितता अशीच राहणार आहे."
लँग यांनी एका वक्तव्यात म्हटलं की, "व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आधीपासूनच 30 दिवसांपर्यंत टॅरिफ पुढे ढकलण्यात आल्याच्या कारणामुळे अस्थिर स्थितीमध्ये आहेत.
आता अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सामायिक यशासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियम उद्योगांना अक्षरश: आग लागली आहे."
ओंटारियोतील कन्झर्व्हेटीव्ह पार्टीचे प्रमुख डग फोर्ड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका करणारे पहिले कॅनेडियन राजकारणी आहेत.
त्यांनी असं लिहलंय की, हा टॅरिफ टॅक्स अमेरिकेतील व्यापाराचं नुकसान करतील. त्यांचं असं म्हणणं आहे की, यामुळे किंमती वाढतील आणि अमेरिकेतील श्रमिकांच्या नोकऱ्या जातील.
त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केली, "अमेरिकेचं नुकसान, कॅनडाचं नुकसान, चीनचा फायदा.."
कॅनडा हा अमेरिकेला स्टीलचा पुरवठा करणारा मोठा देश आहे. हा उद्योग कॅनडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ओंटारियोमध्ये केंद्रित आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











