जेव्हा नानाजी देशमुख म्हणाले होते, 'सतरंज्या आम्ही उचलतो आणि श्रेय अटलजी घेतात'

फोटो स्रोत, Deendayal Research Institute
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनसंघ स्थापन करण्याची घोषणा केली.
यावेळी मी पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला 'सोन्याचे पाच तुकडे देईन', असं आश्वासन तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना दिलं होतं.
यानंतर गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांना नवीन पक्षाच्या मदतीसाठी पाठवलं होतं. यामध्ये दीनदयाल उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी, बापूसाहेब सोहनी, बलराज मधोक आणि नानाजी देशमुख यांचा समावेश होता.
अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोन्ही नेते त्यावेळी अनुभवी नव्हते. कारण, 1950 च्या दशकात या सगळ्या घडामोडी घडत होत्या.
भारतीय जनसंघात उत्तर प्रदेशची जबाबदारी नानाजी देशमुखांवर सोपवण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात भारतीय जनसंघाच्या आमदारांची संख्या वाढली. 1957 मध्ये भारतीय जनसंघाचे 14 आमदार निवडून आले. पुढे 1967 मध्ये आमदारांची संख्या शंभरावर पोहोचली.
नानाजी देशमुख यांचे चरित्रकार मनोजकुमार मिश्र त्यांच्या 'नानाजी देशमुख एक महामानव' या पुस्तकात लिहितात, "नानाजी यांचे दुसऱ्या पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध होते. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर संपूर्णानंद, चौधरी चरण सिंह, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यासोबत देशमुखांचे चांगले संबंध तयार झाले होते."
डॉक्टर लोहिया संघविरोधी होते. त्यामुळे त्यांनी नानाजींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तरीही नानाजींच्या स्वभावामुळे लोहियांसोबत त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. त्यानंतर जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी 1963 च्या फारूखाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत लोहिया यांना निवडून आणण्यासाठी जनसंघाची ताकद पणाला लावली.


इतर पक्षांशी युतीसाठी पुढाकार
नानाजी देशमुख यांच्या पुढाकारानेच जनसंघाने निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षासोबत युती केली होती. त्यामुळे 1967 च्या निवडणुकीनंतर जनसंघानं संयुक्त विधायक दलाचे सदस्यत्व मिळवून इतर राज्यातील सरकारमध्ये प्रवेश मिळवला.
नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 ला महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील कडोली गावात झाला होता. डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रेरणेने ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले.

फोटो स्रोत, ANI
त्यांचं शिक्षण पिलानीच्या बिर्ला कॉलेजमध्ये झालं. तिथंच त्यांनी संघाच्या प्रचाराचं काम सुरू केलं. याच महाविद्यालयाचे संस्थापक घनश्याम दास बिर्ला यांनी जेवण, निवासासह प्रति महिना 80 रुपये देत सहकारी होण्याचा प्रस्ताव देशमुखांना दिला होता. पण, देशमुखांनी संघाच्या कामाला पहिली पसंती दिली.
देशमुखांनी कधीही लग्न केलं नाही. समाजातील सगळ्या घटकांसोबत त्यांचा चांगला संपर्क होता. कूमी कपूर आपल्या 'द इमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री' या पुस्तकात लिहितात, जनसंघ आणि आरएसएसच्या स्वयंसेवकांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांची नावंदेखील नानाजींना माहिती होती. त्यांनी विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता.
पक्षासाठी निधी गोळा करण्यामध्ये नानाजी देशमुखांची भूमिका
जनसंघासाठी निधी गोळा करण्यात नानाजी देशमुखांची मोठी भूमिका होती. विनय सीतापती आपल्या 'जुगलबंदी, द बीजेपी बिफोर मोदी' या पुस्तकात लिहितात, "नानाजी देशमुख हे प्रामाणिक होते. त्यावेळी पक्षासाठीचा निधी गोळा करण्यासाठी पक्ष त्यांना एकट्यालाच पाठवायचा. पण, त्यांच्यानंतर या कामासाठी पक्षानं दोन लोकांना नेमलं. कारण, यामध्ये कुठलीही अफरातफर होऊ नये, असं एनएम घटाटे यांनी मला सांगितलं होतं."

फोटो स्रोत, ANI
नानाजी सत्तरच्या दशकात टाटा, मफतलाल, आणि नुस्ली वाडिया यांसारख्या उद्योगपतींच्या संपर्कात आले. वाडियांसोबत तर साठच्या दशकापासून त्यांचे संबंध होते.
सीतापती लिहितात, नुस्ली वाडिया यांनीच नानाजी देशमुख आणि टाटांची भेट घालून दिली. जनसंघाचं वृत्तपत्र 'मदरलँड'मध्ये सर्वांत आधी वाडियांनी आपल्या 'बॉम्बे डाईंग'ची जाहिरात द्यायला सुरुवात केली होती.
बिहार आंदोलनात नानाजी देशमुखांची भूमिका
1974 साली झालेल्या बिहार आंदोलनात नानाजी देशमुखांची सक्रिय भूमिका होती. नानाजी देशमुख यांचे संघटन कौशल्य उत्कृष्ठ होते. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांनी त्यांना लोक संघर्ष समितीच्या सचिव पदाची जबाबदारी दिली होती.
3 आणि 4 ऑक्टोबर, 1974 मध्ये 'बिहार बंद'ची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी करण्यासाठी नानाजींनी पूर्ण बिहार पिंजून काढला. यावेळी वाजपेयीसुद्धा नानाजी देशमुखांना आपले प्रतिस्पर्धी समजायला लागले होते, असं सुब्रमण्यम स्वामी यांना वाटायचं.
विनय सीतापती लिहितात, स्वामींनी सांगितलं की नानाजींसोबत जाऊ नका असा सल्ला त्यांना वाजपेयींनी दिला होता. कोणतेही कष्ट न करता श्रेय घेण्याची वाजपेयींची प्रवृत्ती नानाजींना आवडत नव्हती. एकदा त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, "आम्ही गर्दी जमवतो, आम्ही सतरंज्या टाकतो आणि सर्व श्रेय अटलजी घेऊन जातात."

फोटो स्रोत, Getty Images
चार नोव्हेंबरला बिहार विधानसभेला घेराव घालणार असल्याची घोषणा झाली. पोलिसांनी 30 ऑक्टोबरला नानाजी देशमुखांना बिहारमधून हद्दपार होण्याची नोटीस दिली.
मनोज कुमार मिश्र लिहितात, नानाजी पोस्टमनच्या वेशात आरएमएसच्या डब्यात पाटण्याला पोहोचले आणि स्वतःला वाचवण्यासाठी ते गांधी मैदानात जेपींच्या सावलीसारखे चालू लागले. सीआरपीएफ जवानाची काठी जेपींच्या डोक्यावर पडणारच होती इतक्यात नानाजींनी समोर उडी घेतली. त्यांनी हातावर काठीचा वार झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताचे हाड मोडले. पण, जेपींचा जीव वाचला. त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली होती.
आणीबाणीवेळी भूमिगत झाले होते नानाजी देशमुख
25 जून 1975 साली विरोधी पक्षांनी रामलीला मैदानावर एक सभा घेतली होती. त्यानंतर नानाजी देशमुख घरी परतत असताना त्यांना एक अनोळखी फोन आला आणि त्यांना घरी न झोपण्याचा सल्ला देण्यात आला. ते घरी झोपले तर त्याच रात्री त्यांना अटक केली जाईल, असं फोनवरून त्या अनोळखी व्यक्तीनं नानाजींना सांगितलं. त्याची ओळख विचारायच्या आधीच समोरच्यानं फोन ठेवला.
कूमी कपूर लिहितात, त्यांनी ती रात्र आपले शिष्य डॉ. जे. के. जैन यांच्या व्हीपी हाऊस इथल्या फ्लॅटवर घालवली. सकाळी सकाळी ते पालम विमानतळावर जेपींना भेटायला गेले. तिथं एका व्यक्तीनं नानाजींना ओळखलं. जेपींना अटक झाली. आतापर्यंत तुम्हाला ताब्यात कसं घेतलं नाही? असं त्या व्यक्तीनं विचारताच नानाजी लगेच व्हीपी हाऊसला पोहोचले आणि डॉ. जैन यांना म्हणाले मला तिथून लगेच निघायला लागेल.
कूमी कपूर पुढे लिहितात, "त्यावेळी मदनलाल खुराणा यांनी फोन करून सांगितलं लगेच भूमिगत व्हा. यानंतर नानाजी देशमुख सतत घर बदलत होते. एका ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त ते थांबत नव्हते."
नानाजी देशमुखांना अटक
नानाजी देशमुख पांढऱ्या फिएट कारमध्ये देशभर दौरा करून सरकारविरोधी वातावरण तयार करत होते. त्यांनी धोती कुर्ता सोडून सफारी सूट घालायला सुरुवात केली. तसेच त्यांनी केससुद्धा कापले. मिशांना काळा रंग दिला आणि गोल चष्मा लावायला सुरुवात केली.
कार दिल्लीतून मुंबईला गेली. तिथं नानाजी देशमुखांनी आपल्या जुन्या मित्रांना संपर्क केला. पण, काही दिवसानंतर देशमुखांना अटक करण्यात आली.
कूमी कपूर लिहितात, "सुब्रमण्यम स्वामी त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी त्याच परिसरात त्यांना पोलिसांची गर्दी दिसली होती. इथे काहीतरी गडबड आहे असं त्यांनी देशमुखांना सांगितलं होतं. 'मी निघतोय, तुम्ही पण माझ्यासोबत चला' असा सल्लाही त्यांनी देशमुखांना दिला होता. पण, आपल्याला कुणी अटक करणार नाही असं नानाजींना वाटलं. ते तिथेच थांबले. पण, काहीवेळात पोलीस आले आणि त्यांना अटक केली."
अटक केल्यानंतर आपण नानाजी देशमुखांनाच अटक केली का हे पोलिसांना समजत नव्हतं. कारण, नानाजी देशमुखांनी पूर्णपणे वेशांतर केलं होतं. याचा फायदा घेत नानाजींनी शौचालयात जात जवळच्या लोकांचे नंबर लिहिलेली डायरी फ्लश केली. देशमुखांना आधी तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अंबाला तुरुंगात पाठवण्यात आलं.
मंत्रिपद नाकारलं
1977 मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या तीन दिवसानंतर जनसंघ, लोकदल, संघटन काँग्रेस आणि सोशलिस्ट पार्टी मिळून 'जनता पार्टी' स्थापन करण्यात आली. नानाजी देशमुखांनी निवडणूक लढण्यासाठी नकार दिला होता. पण, जयप्रकाश नारायण यांनी आग्रह धरल्यानं नानाजींनी बलरामपूर इथून निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार आणि बलरामपूरच्या राणीला मोठ्या फरकानं पराभूत केलं होतं.
मोरारजी देसाई नानाजी देशमुखांना आपल्या मंत्रिमंडळात मंत्रिपद द्यायला तयार होते. पण, नानाजींनी मंत्रिपद नाकारून आपल्या जागी मध्य प्रदेशातील नेता ब्रजलाल वर्मा यांचं नाव मंत्रिपदासाठी सूचवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
भाजपचे बडे नेते गोंविदाचार्य या प्रकरणाची दुसरी बाजू सांगतात.
विनय सीतापती यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की "संघाचे दुसऱ्या स्थानावरील नेते राजेंद्र सिंह यांनी नानाजींना सांगितलं होतं की पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून आपले अनेक उद्योगपतींसोबत चांगले संबंध आहे. तुम्ही उद्योगमंत्रीपद स्वीकारलं तर या संबंधांवर टीका होईल. प्रश्न उपस्थित केले जातील. त्यामुळे तुमची आणि पक्षाची प्रतिमा डागाळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नानाजींनी एकही शब्द न बोलता माघार घेतली."
सक्रिय राजकारणातून घेतला संन्यास
नानाजी देशमुख वाजपेयींपेक्षा वयानं मोठे होते. तसेच सत्तरच्या दशकात नानाजी असे एकमेव नेते होते जे अटलजींचा 'अटल' असा एकेरी उल्लेख करायचे.
सत्तेसाठी जनता पार्टीत ओढाताण वाढत होती. त्यामुळे नानाजी देशमुखांची निराशा वाढली. या वातावरणाला कंटाळून त्यांनी वयाची साठी ओलांडलेल्या नेत्यांनी संन्यास घेऊन तरुण नेत्यांच्या हाती सत्ता सोपवण्याचा सल्ला जनता पार्टीच्या नेत्यांना दिला.
त्यांनी 8 ऑक्टोबर 1978 मध्ये जेपींच्या उपस्थितीत पाटणा इथं सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी देशमुख कुठेही दिसले नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे देशमुख भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेवेळी आले नाहीत अशी चर्चा होती. पण, लालकृष्ण अडवाणी यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.
नलिन मेहता आपल्या 'द न्यू बीजेपी' या पुस्तकात लिहितात, "देशमुखांनी स्वतः वाजपेयी आणि मला आग्रह केला होता की नवीन पक्षाच्या स्थापनेत त्यांना संघटनेपासून दूर ठेवावं, असं स्पष्टीकरण अडवाणी यांनी दिलं होतं. नानाजी देशमुखांना काही काम असल्यानं ते या बैठकीत आले नाहीत. आमच्यासोबत त्यांचे मतभेद आहेत असं काहीही नाही, असं वाजपेयी यांना त्यांच्या भाषणात सांगावं लागलं होतं."
यानंतर नानाजी देशमुख राजकारणाकडे पुन्हा फिरकले नाही.
चित्रकूटमध्ये काम
नानाजी देशमुख उत्तर आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट इथं स्थायिक झाले. इथूनच त्यांनी आपलं काम सुरू केलं. त्यांनी ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत बदल घडवायचा होता. त्यामुळेच त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिलं ग्रामीण विद्यापीठ होतं.
मनोज कुमार मिश्र लिहितात, "नानाजींनी आर्थिक स्वावलंबन, शिक्षण आणि आरोग्यासोबतच अध्यात्मिक विकासालाही तितकंच महत्वं दिलं. चित्रकूट जिल्ह्यातील गावांना वाद, खटल्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी एक योजना सुरू केली. पिढ्यान पिढ्या या खटल्यात अडकलेल्या कुटुंबांना त्यांनी एकत्र बसवून न्यायालयाबाहेर भांडणं मिटवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे जवळपास 500 गावे तंटामुक्त श्रेणीत आली आहेत."
1999 मध्ये त्यांना राज्यसभेचं सदस्य म्हणून नामांकन मिळालं होतं. त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना सुरुवातीला 'पद्मविभूषण' आणि 2019 मध्ये 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फोटो स्रोत, ANI
दोन वेळा खासदार असूनही त्यांनी कधीच सरकारी बंगल्याचा वापर केला नाही. त्यांनी खासदारांचं वेतन वाढवण्यासाठी नेहमी विरोध केला. यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांना वाढवून मिळालेली रक्कम त्यांनी पंतप्रधान मदत निधीमध्ये दान केली होती.
त्यांनी खासदार निधीचा पूर्ण पैसा चित्रकूटच्या विकासात वापरला. त्यांनी आयुष्यभर लिखाण आणि वाचन केलं. त्यांची दृष्टी गेली तेव्हा त्यांना लिहिण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ते स्वतः बोलायचे आणि दुसऱ्याला लिहायला सांगायचे.
मृत्यूपूर्वी त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आपला मृतदेह वैद्यकीय कामासाठी दान केला होता. 27 फेब्रुवारी 2010 मध्ये 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











