सावरकरांनी 'तुम्ही मला अटक करा' अशी विनंती फ्रेंच अधिकाऱ्याला का केली होती?

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
विनायक दामोदार सावरकर यांच्या फ्रान्सच्या किनाऱ्यावर जहाजातून पलायन करण्याची आणि पुन्हा फ्रान्सच्या भूमीवर अटक होण्याची कहाणी अनेकदा चर्चिली गेली आहे.
सावरकरांच्या त्या प्रवासात नेमकं काय झालं होतं, त्यांना मुंबईत कसं आणण्यात आलं आणि पुढे कुठे ठेवण्यात आलं, याची माहिती देणारा हा लेख.
एक जुलै, 1909 या दिवशी सावरकरांमुळे प्रभावित झालेल्या आणि अनेकदा लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये येणाऱ्या मदनलाल धिंग्रा यांनी भारत मंत्र्यांचे सहकारी कर्झन वायली यांच्यावर गोळी झाडली.
विली यांच्या हत्येच्या प्रकरणात ब्रिटिश सरकारला सावरकरांची भूमिका सिद्ध करता आली नाही. मात्र, ब्रिटिश सरकारला या गोष्टीचा अंदाज नक्कीच आला असेल की मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांची घनिष्ठ मैत्री आहे. सावरकरांनी मदनलाल निर्दोष असल्याची याचिका तयार केली होती.
न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर न्यायालयात जेव्हा मदनलाल धिंग्रा यांना त्यांचा जबाब वाचू देण्यात आला नाही, तेव्हा सावरकरांनी तो एका ब्रिटिश पत्रकाराच्या मदतीनं लंडनमधील एका वृत्तपत्रात प्रकाशित केला होता.
मदनलाल धिंग्रा यांच्यावर वायली यांच्या हत्येचा खटला चालला. दीड महिन्यातच 17 ऑगस्ट 1909 ला त्यांना फाशी देण्यात आली. मात्र, याचदरम्यान नाशिकचे ब्रिटिश कलेक्टर आर्थर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणात सावरकराचं नाव आल्यामुळे लंडनमधील त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती.
सावरकरांना या गोष्टीचा अंदाज आला होता की लवकरच त्यांना अटक केली जाईल. त्यामुळेच ते लंडनहून पॅरिसला निघून गेले होते. मार्च 1910 मध्ये जेव्हा ते लंडनला परत आले, तेव्हा व्हिक्टोरिया स्टेशनमधून बाहेर पडताच त्यांना अटक करण्यात आली होती.


नीलांजन मुखोपाध्याय यांनी 'आरएसएस, आयकॉन्स ऑफ द इंडियन राईट' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "सावरकरांवर लंडनमध्ये खटला चालवण्यात यावा की भारतात? या गोष्टीवर सुरुवातीला इंग्रजांनी विचार केला. त्यातील मुद्दा असा होता की गुन्हा नाशिकमध्ये घडला होता, मात्र त्यावेळेस सावरकर इंग्लंडमध्ये वास्तव्यास होते."
त्यामुळे सावरकरांवर जास्तीत जास्त हत्येला मदत केल्याचा खटला चालवला जाऊ शकत होता. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला असता तरी त्यांना जास्तीत जास्त दोन किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास झाला असता.
मग ब्रिटिश सरकारनं सावरकरांनी भारतात दिलेल्या भाषणांचा शोध घेतला. त्या भाषणांच्या आधारे त्यांच्यावर खटला चालवता येईल का असा त्यांचा प्रयत्न होता.
शेवटी असं ठरलं की, सावरकरांवर इंग्लंडमध्ये खटला न चालवता त्यांच्यावर भारतातच खटला चालवण्यात यावा. 'फ्युजिटिव्ह ऑफेंडर्स ॲक्ट 1881' अंतर्गत सावरकरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जहाजातून सावरकरांना भारतात पाठवलं
1 जुलै, 1910 ला इंग्लंडच्या टिलबरी बंदरातून 'एसएस मोरिया' (SS Morea ) नावाचं जहाज निघालं. त्या जहाजात सावरकरांबरोबर सीजे पावर आणि स्कॉटलंड यार्डचे एडवर्ड पार्कर या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांव्यतिरिक्त दोन भारतीय हेड कॉन्स्टेबल मोहम्मद सिद्दीक आणि अमर सिंह सुद्धा होते.
विक्रम संपथ यांनी 'सावरकर, इकोज फ्रॉम द फॉरगॉटन पास्ट' हे सावरकरांचं चरित्र लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "पावर आणि पार्कर या दोघांना जबाबदारी देण्यात आली होती की त्यांच्यापैकी एकजण सातत्यानं सावरकरांवर लक्ष ठेवेल. त्यांना चार बर्थ असलेलं एक केबिन देण्यात आलं होतं. रात्रीच्या वेळेस ते केबिनला आतून कुलुप लावत असत."
"पार्कर आणि सावरकर खालच्या बर्थवर झोपायचे. तर पावर सावरकरांच्या वरच्या बर्थवर झोपत असत. सावरकरांच्या डोक्यावर असलेला लाईट रात्रभर सुरू ठेवला जात असे. फ्रान्समध्ये पोहोचेपर्यंत सावरकरांना हातकड्या घालण्यात आल्या नव्हत्या. त्यांना घालण्यासाठी शॉर्ट्स आणि एक स्वेटर देण्यात आलं होतं."

फोटो स्रोत, savarkarsmaraak.com
शौचालयाचा दरवाजा बंद करण्याची परवानगी नव्हती
या ब्रिटिश अधिकाऱ्यांना केबिनचा अटेंडंट सकाळी सात वाजता उठवत असे. त्यानंतर पावर आणि पार्कर तयार होत असत. यातील कोणालाही जेव्हा आंघोळ करायची असायची तेव्हा ते दुसरा सहकारी सावरकरांजवळ थांबत असे जेणेकरून त्यांच्यावर सतत नजर ठेवता यावी.
सकाळी आठ वाजेच्या सुमारास जेव्हा सावरकरांना शौचालयाचा वापर करायचा असायचा, तेव्हा हे दोघे ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय पोलिसांच्या ताब्यात देत असत. हे पोलीस केबिनच्या बाहेर त्यांची वाटत पाहत असत.
ते भारतीय पोलीस सावरकरांना शौचालयापर्यंत घेऊन जायचे. सावरकरांना शौचालयाचा दरवाजा कधीही आतून बंद करू न देण्याच्या आणि शौचालयाचा दरवाजा थोडा उघडा ठेवण्याच्या सूचना या पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.
जिब्राल्टरमध्ये जहाज थोडा वेळ थांबल्यानंतर सात जुलैला सकाळी फ्रान्सच्या मार्सेल (Marseille) बंदरात पोहोचलं.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
फ्रेंच पोलीस अधिकाऱ्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांशी भेट
वैभव पुरंदरे यांनी 'सावरकर, द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व' हे सावरकरांचं चरित्र लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "एसएस मोरिया जहाज मार्सेल बंदरात थांबताच, आनरी लेबलिया या फ्रेंच पोलीस अधिकाऱ्यानं जहाजावर येऊन ब्रिटिश अधिकारी पार्करला सांगितलं की यासंदर्भात लंडनच्या पोलीस आयुक्तांचा एक संदेश पॅरिसच्या पोलीस आयुक्तांना मिळाला आहे."
"लेबनिया यांनी पार्कर यांना सर्वप्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. तसंच बंदरात तैनात असलेल्या इतर फ्रेंच पोलीस अधिकाऱ्यांशीही त्यांचा परिचय करून दिला."
सावरकरांनी शौचालयातील कमोडच्या भोकातून पाण्यात उडी मारली
ब्रिटिश सरकारच्या कागदपत्रांनुसार आठ जुलैला सावरकर सकाळी सहा वाजताच उठले होते. पंधरा मिनिटांनी त्यांनी अद्याप झोपेत असलेल्या पार्कर यांना सांगितलं की त्यांना शौचालयात जायचं आहे.
पार्कर यांना सावरकरांना एकट्याला शौचालयात पाठवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी केबिनचं कुलुप उघडलं आणि सावरकरांना शौचालयाकडे घेऊन गेले.
त्यांनी सिद्दीक आणि अमर सिंह या दोन्ही भारतीय कॉन्स्टेबलला त्यांच्या मागे येण्यास आणि सावरकरांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर पार्कर त्यांच्या केबिनकडे परतले.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
वैभव पुरंदरे लिहितात, "अमर सिंहनं शौचालयात डोकावून पाहिलं. दरवाजाच्या खालच्या बाजूला देखील एक भोक होतं. तिथून त्याला चप्पल दिसत होती. जणूकाही ती चप्पल घालणारा व्यक्ती कमोडवर बसला आहे असं वाटत होतं. पूर्ण खात्री करून घेण्यासाठी अमर सिंहनं शौचालयाच्या आतील बाजूस पाहण्याचा प्रयत्न केला."
"त्यानंतर त्यानं जे पाहिलं ते पाहून थक्क झाला. सावरकर एका छोट्या भोकातून निघण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचं अर्ध शरीर बाहेरदेखील पडलं होतं. ते पाहताच अमर सिंह ओरडला आणि शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी पळाला. तोपर्यंत सावरकरांनी शौचालयातील भोकातून निसटून पाण्यात उडी मारली होती."
दोन्ही कॉन्स्टेबल आरडाओरडा करत बाहेरच्या बाजूस पळाले.

या बातम्याही वाचा:

फ्रेंच अधिकाऱ्याला सावरकरांचं म्हणणं लक्षात आलं नाही
जहाजाच्या डेकवर असलेल्या एका शिपायानं एका व्यक्तीला पाण्यात उडी मारताना पाहिलं. त्या शिपायानं त्या व्यक्तीवर दोन गोळ्यादेखील चालवल्या. मात्र त्या गोळ्या चकवण्यात सावरकरांना यश आलं.
जहाजानं बंदरापासून इतक्या लांब नांगर का टाकला होता? याबद्दल अनेक कहाण्या आहेत.
काही स्त्रोतांमध्ये बंदरापासून जहाजाचं अंतर एक किलोमीटर सांगण्यात आलं आहे. तर काही स्त्रोतांमध्ये हे अंतर 30 मीटर असल्याचं म्हटलं आहे.
जहाजातून पाण्यात उडी घेतल्यानंतर थोडं अंतर सावरकर पोहून गेले आणि मग जमिनीवर पोहोचल्यावर त्यांनी पळण्यास सुरुवात केली. ब्रिटिश ग्रंथालयात असलेल्या 'सावरकर केस कंडक्ट ऑफ द पोलीस ऑफिशियल्स' या दस्तावेजात या प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.
त्यानुसार, "कॉन्स्टेबल सावरकर यांच्या मागे 'चोर! चोर! पकडा! पकडा!' असं ओरडत धावत होते. त्यांच्याबरोबर जहाजातील काही कर्मचारीदेखील धावत होते. सावरकर जवळपास 200 यार्ड अंतर धावले. त्यांना जोरात धाप लागत होती. ते टॅक्सी थांबवण्यासाठी ओरडत होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे एकही पैसा नाही."

फोटो स्रोत, savarkarsmarak.com
तसंच त्या परिसरात असलेले अय्यर, मादाम कामा आणि वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय त्यावेळेस सावरकर यांच्या मदतीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत, हेदेखील दुर्दैव होतं.
विक्रम संपथ लिहितात, "यादरम्यान फ्रान्सचे सैन्याधिकारी ब्रिगेडियर पेस्कीदेखील सावरकर यांचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये सहभागी झाले होते. थोड्या वेळानं सावरकरांना पकडण्यात त्यांना यश आलं."
सावरकर यांना पकडण्यात आल्यावर ते फ्रेंच अधिकाऱ्याला म्हणाले, 'तुम्ही मला अटक करा. मला मॅजिस्ट्रेटसमोर घेऊन चला.'
सावरकरांना वाटत होतं की ते आता फ्रान्सच्या भूमीवर असल्यामुळे जर त्यांच्यावर खटला चालला तर तो फ्रान्समधील कायद्यानुसार असेल. कारण फ्रान्समध्ये ब्रिटिश कायदे लागू होत नाहीत.
राजकीय कैदी म्हणून त्यांना फ्रान्समध्ये राजकीय शरण मिळू शकणार होती. मात्र ब्रिगेडियर पेस्की यांना इंग्रजी अजिबात येत नव्हती. त्यामुळे सावरकर काय म्हणत आहेत ते त्यांना कळत नव्हतं.
सावरकरांना हातकड्या घालून मुंबईला आणलं
पेस्कीनं सावरकरांना भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यांनी सावरकरांना पुन्हा जहाजाच्या केबिनमध्ये आणलं. तिथे सावरकरांना वाईट वर्तणूक देण्यात आली आणि त्यांना हातकडी घालण्यात आली.
त्यानंतर त्यांना जहाजाच्या केबिनच्या बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नाही. शौचालयात जाताना एक पोलीस नेहमीच त्यांच्यासोबत शौचालयाच्या आत जात असे.
सावरकर यांच्या सुटकेच्या प्रयत्नामुळे पावर आणि पार्कर यांचं करियर आधीच उद्ध्वस्त झालं होतं. आता पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी हे दोघे अधिकारी काळजी घेत होते.

फोटो स्रोत, savarkarsmarak.com
मार्सेलमध्ये दोन दिवस थांबल्यानंतर 9 जुलैला 'एसएस मोरिया' जहाज पुढच्या प्रवासाला निघालं. 17 जुलैला जहाज एडनला पोहोचलं. तिथे सावरकर आणि त्यांच्यावर देखरेख करणारे पोलीस आणि अधिकारी यांचं जहाज बदलण्यात येऊन ते 'एसएस सेलसेटे' (SS Salsette) जहाजावर चढले.
22 जुलैला हे जहाज मुंबईला पोहोचेपर्यंत सावरकरांना दिवसरात्र हातकडी घातलेली असायची. मुंबईला पोहोचल्यावर सावरकरांना केनेडी या पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आलं.
सावरकरांना त्याच दिवशी दुपारी एक टॅक्सीतून व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनवर नेण्यात आलं. तिथे त्यांना नाशिकला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवण्यात आलं. नाशिकला पोहोचताच त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं.
विभागीय चौकशीत या घटनेसाठी पावर या अधिकाऱ्याला जबाबदार ठरवण्यात आलं. त्याची पदावरून अवनती करण्यात आली आणि त्याच्या पगारात दरमहा 100 रुपयांची कपात करण्यात आली.
सावरकरांच्या अटकेवर चोहोबाजूंनी टीका
याच दरम्यान फ्रान्सच्या प्रसारमाध्यमांनी ब्रिगेडियर पेस्की यांच्या कारवाईला 'राष्ट्रीय स्कँडल' म्हणत त्यावर टीका केली.
त्याचं म्हणणं होतं की ज्याप्रकारे ब्रिटिश अधिकाऱ्यांना फ्रान्सच्या भूमीवर एका राजकीय कैद्याला अटक करू देण्यात आली, ते फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे.

फोटो स्रोत, NANA GODSE
फ्रान्समधील जवळपास प्रत्येक वृत्तपत्रानं सावरकरांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आल्याबद्दल टीका केली. त्यात 'ले मोंड', 'ले माटिन' आणि 'ले टेंप्स' सारख्या सर्व वृत्तपत्रांचा समावेश होता.
काही दिवसांनी ब्रिटनमधील फ्रान्सचे राजदूत पियरे कौमबौन यांनी सावरकर यांना फ्रान्स सरकारच्या परवानगीशिवाय अटक करण्यात आल्याबद्दल त्यांचं फ्रान्सकडे प्रत्यार्पण करण्यात यावं अशी मागणी केली.
मग फ्रान्सनं हे प्रकरण हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेलं.
सावरकरांना 25-25 वर्षांच्या दोन शिक्षा
23 डिसेंबरला प्रक्षोभक भाषणं देण्याच्या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. त्यात सावरकरांना दोषी ठरवत अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
याचा अर्थ होता 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. एक महिन्यानं 30 जानेवारी 1911 ला जॅक्सन हत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देखील सुनावण्यात आला.

फोटो स्रोत, savarkarsmarak.com
या खटल्यातदेखील सावरकरांना काळ्या पाण्याची म्हणजेच 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
वैभव पुरंदरे लिहितात, "याच अर्थ असा होता का की 25 वर्षांच्या दोन शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील? नाही! याचा अर्थ असा होता की सावरकर आधी 25 वर्षांची एक शिक्षा पूर्ण करतील आणि मग त्यानंतर 25 वर्षांची दुसरी शिक्षा पूर्ण करतील. म्हणजेच त्यांना एकूण 50 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती."
तुरुंगात पत्नीची भावनिक भेट
यादरम्यान हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयानं त्यांच्या निकालात म्हटलं की सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात देण्याचं बंधन ब्रिटनवर नाही.
या निकालावर संपूर्ण युरोपात मोठी टीका झाली. सावरकर यांच्यासाठी दिलाशाची एकमेव बाब म्हणजे कधीकाळी तुरुंगात बाळ गंगाधर टिळक यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्याच कोठडीत सावरकरांनादेखील ठेवण्यात आलं होतं.
एक दिवस सावरकर त्यांच्या कोठडीत बसलेले असताना त्यांना संदेश आला की त्यांना तुरुंगाच्या वॉर्डनच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. सावरकर तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसलं की त्यांच्या पत्नी यमुना तिथे बसलेल्या आहेत.
पाच वर्षांपूर्वी इंग्लंडला कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर निघाले होते तेव्हा त्यांनी पत्नीचा निरोप घेतला होता.

फोटो स्रोत, savarkarsmarak.com
वैभव पुरंदरे लिहितात, "सावरकरांच्या पत्नीला वाटलं होतं की, त्यांचे पती ग्रे इन गाऊनमध्ये इंग्लंडहून परततील. मात्र आता त्या सावरकरांना एका शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्याच्या रुपात तुरुंगातील कपड्यांमध्ये पाहत होत्या. यानंतर बहुधा सावरकरांची पुन्हा कधीही भेट होणार नव्हती."
"सावरकरांनी पत्नीला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्नीला सांगितलं की जर देवाची इच्छा असेल तर त्यांची भेट पुन्हा होईल. कारण त्यांनी ऐकलं आहे की काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या कैद्यांना काही वर्षांनी त्यांच्या कुटुंबाला अंदमानला घेऊन जाण्याची आणि कुटुंबाला तिथे स्थायिक करण्याची परवानगी मिळते."
नंतर सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं, "माझ्या पत्नीचं उत्तर होतं, मला तुमची अधिक काळजी वाटते. जर तुम्ही स्वत:ची काळजी घेतली तर मी चांगली राहेन. लवकरच तुरुंगाच्या वॉर्डननं येऊन आम्हाला सांगितलं की आमच्या भेटीची वेळ संपली आहे."
"पत्नीचा निरोप घेतल्यानंतर बेडी घातलेली असतानादेखील मी आत्मविश्वासानं चालण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मला माहित होतं की माझी पत्नी मला पाहते आहे. बेड्यांमुळे मला चालण्यास काही त्रास होतो आहे, हे मला माझ्या पत्नीला जाणवू द्यायचं नव्हतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











