बांगलादेश पाकिस्तानच्या वाटेवर? बांगला राष्ट्रवाद की इस्लामी राष्ट्रवाद काय ठरणार वरचढ?

बांगलादेश पाकिस्तानच्या वाटेवर जाणार का? बांगला राष्ट्रवाद की इस्लामी राष्ट्रवाद काय ठरणार वरचढ?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार उलथवून सत्तांतर झाल्यानंतर तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ही राजकीय अस्थिरता फक्त वरवरची आणि तात्पुरत्या स्वरुपाची नाही. तर बांगलादेशचा आधार असलेला बंगाली भाषिक राष्ट्रवाद आणि नवा इस्लामी राष्ट्रवाद यांच्यातील संघर्ष आता तिथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

बांगलादेशातील नेमकी स्थिती काय आहे, याचा आढावा घेणारा हा लेख.

पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारे झाली होती. नंतरच्या काळात भाषेच्या आधारे बांगलादेश पाकिस्तानमधून वेगळा झाला होता. बांगलादेशच्या स्वांतत्र्यामागचा मूळ विचार बांगला राष्ट्रवाद होता. तो राष्ट्रवाद इस्लामच्या विरोधात नव्हता.

मार्च 1948 मध्ये मोहम्मद अली जिन्ना यांनी उर्दूला पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केलं. त्याचवेळी बांगला राष्ट्रवादाची मूळं रोवली गेली होती. त्याचा परिणाम म्हणून 1952 मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात भाषिक आंदोलनाची सुरुवात झाली होती.

बांगलादेश जेव्हा पाकिस्तानातून वेगळा झाला, तेव्हा धर्माच्या आधारे निर्मिती झालेल्या पाकिस्तानबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

लोक म्हणत होते की, 'धार्मिक अस्मिताच सर्वकाही नसते. त्यामुळे धर्माच्या आधारे राष्ट्र तयार करण्याचा निर्णय चुकीचा होता. लोक म्हणू लागले होते की बंगाली अस्मिता, इस्लामी अस्मितेपेक्षा वेगळी आहे.'

बांगलादेशची निर्मिती झाल्यावर त्या देशानं बांगला राष्ट्रवाद आणि सेक्युलर लोकशाहीचा अंगीकार केला. शेख मुजीब-उर रहमान यांनी निर्णय घेतला होता की, राष्ट्र म्हणून धर्मनिरपेक्षता हा बांगलादेशचा पाया असेल.

बांगलादेशात अलीकडच्या काळात भारताविरोधात अनेक निदर्शनं झाली आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशात अलीकडच्या काळात भारताविरोधात अनेक निदर्शनं झाली आहेत

इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानच्या बाबतीत जो अनुभव आला होता, त्यातून हा निर्णय घेण्यात आला होता. बांगलादेशात कट्टरतावादी इस्लामिक गटांवर बंदी देखील घालण्यात आली होती. कारण त्यांना पाकिस्तानधार्जिणं मानलं जायचं.

मात्र, सेक्युलर राहण्याचं बांगलादेशचं धोरण फारकाळ भक्कमपणे टिकू शकलं नाही. 1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीब-उर रहमान यांची हत्या करण्यात आली आणि बांगलादेशात लष्करानं सत्ताबद्दल केला.

तिथे लष्करी राजवट आली. बांगलादेशातील धर्मनिरपेक्षतेसाठी हा खूप मोठा धक्का होता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बांगलादेशातील लष्करी हुकुमशहा जिआ-उर रहमान यांनी 1977 मध्ये बांगलादेशच्या राज्यघटनेतून 'सेक्युलॅरिझम' काढून टाकलं. तसंच बांगलादेशात इस्लामिक पक्षांवर असलेली बंदी देखील हटवली.

1988 मध्ये जनरल हुसैन मोहम्मद इरशाद यांनी इस्लाम हा बांगलादेशचा राष्ट्रीय किंवा राज्य धर्म केला.

अर्थात 2009 मध्ये शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सत्तेत आल्यावर राज्यघटनेत 'सेक्युलॅरिझम'चा समावेश करण्याचं आश्वासन देण्यात आलं.

2011 मध्ये बांगलादेशच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला. तसंच इस्लाम हा राष्ट्रीय धर्म म्हणून कायम राहिला.

इस्लाम हा राज्य धर्म

बांगलादेशच्या राज्यघटनेतील कलम दोन नुसार इस्लाम राज्य धर्म आहे. मात्र त्याचबरोबर कलम 12 मध्ये म्हटलं आहे की बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि तिथं इतर धर्माच्या लोकांनादेखील बरोबरीचा अधिकार देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर, बांगलादेशची वाटचाल बांगला राष्ट्रवादाकडून इस्लामिक राष्ट्रवादाकडं होत आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

बांगलादेशच्या हंगामी सरकारचं प्रमुख मोहम्मद युनूस यांनी अनेक सुधारणा आयोगांची नियुक्ती केली होती. यामध्येच एक राज्यघटना सुधारणा आयोग देखील होता. या आयोगानं बांगलादेशच्या राज्यघटनेतून सेक्युलॅरिझम ही संज्ञा काढून टाकण्याची शिफारस केली होती.

मोहम्मद युनूस यांच्या सरकारला बांगलादेश जमात-ए-इस्लामी या संघटनेचा देखील पाठिंबा आहे.

बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारवर आरोप होतो आहे की ते इस्लामी कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारवर आरोप होतो आहे की ते इस्लामी कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जमात-ए-इस्लामीबद्दल म्हटलं जातं की बांगलादेश मुक्तियुद्धाच्या वेळेस ते पाकिस्तानबरोबर होते. एकप्रकारे स्वतंत्र बांगलादेशला जमात-ए-इस्लामी विरोध करत आली आहे.

याच महिन्यात, प्रथम आलो या बांगलादेशमधील न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीकुर रहमान म्हणाले होते की, "1971 मध्ये आमची भूमिका सैद्धांतिक होती. भारताचा फायदा व्हावा यासाठी आम्हाला स्वतंत्र देश नको होता."

"आम्हाला वाटत होतं की आम्हाला मताधिकार देण्यासाठी पाकिस्तान्यांना भाग पाडण्यात यावं. जर हे शक्य झालं नसतं तर अनेक देशांनी गनिमी काव्याची युद्धनीती अंमलात आणत स्वातंत्र्य मिळवलं आहे."

शफीकुर रहमान यांचं म्हणणं होतं की, "जर आपल्याला कोणाच्या मदतीनं किंवा कोणाच्या बाजूनं स्वातंत्र्य मिळालं तर एकाचं ओझं दूर सारून दुसऱ्याच्या ओझ्याखाली दबण्यासारखं ते असेल. गेल्या 53 वर्षांपासून बांगलादेशच्या बाबतीत ते खरं झालेलं नाही का?"

"एखाद्या विशिष्ट देशाला एखादा विशिष्ट राजकीय पक्ष आवडत नाही, असं आपल्याला का ऐकायला यावं. जर एखाद्या विशिष्ट देशाला नको असेल तर एखादा पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. स्वतंत्र देशातील वातावरण असं असतं का? बांगलादेशच्या तरुणांना आता असं ऐकायला आवडत नाही."

हिमाद्री चॅटर्जी कोलकाता विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की बांगलादेशात नेहमीच हायब्रिड म्हणजे मिश्र राष्ट्रवाद होता.

बांगला राष्ट्रवाद विरुद्ध इस्लामी राष्ट्रवाद

प्राध्यापक चॅटर्जी म्हणतात, "बांगलादेशची निर्मिती बांगला राष्ट्रवादाद्वारे झाली आहे. मात्र इस्लाम बांगलादेशातून गेलाच नव्हता. बांगला राष्ट्रवादाला समर्थन देणारे इस्लामच्या विरोधात नव्हते. तिथं सुरुवातीपासूनच हायब्रिड राष्ट्रवाद होता."

"शेख हसीना यांना वाटलं की फक्त बांगला राष्ट्रवादाच्या आधारे त्यांना देश चालवता येईल. हीच त्यांची चूक होती. बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाच्या रोमांसमधून देश कधीच बाहेर पडला होता. शेख हसीना यांना ही गोष्ट लक्षात आली नाही."

प्राध्यापक हिमाद्री चॅटर्जी म्हणतात, "सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशाकडे पाहिल्यावर असंच वाटतं की बांगला राष्ट्रवादावर इस्लामी राष्ट्रवाद वरचढ होतो आहे. मात्र तिथली जनता असं होऊ देणार नाही. बांगलादेशातील लोकांनी पाकिस्तानला पाहिलं आहे आणि आताही पाहत असतील. मला वाटत नाही की ते अशी चूक करतील."

शेख हसीना यांची सत्ता हटवण्यात आल्यापासून बांगलादेशात अनेक भारतविरोधी निदर्शनं झाली आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना यांची सत्ता हटवण्यात आल्यापासून बांगलादेशात अनेक भारतविरोधी निदर्शनं झाली आहेत

सुमित गांगुली स्टॅनफोर्ड विद्यापीठात भारत-अमेरिका संबंधांबाबत हटिंगटन प्रोग्रॅममध्ये सीनियर फेलो आहेत. 12 फेब्रुवारीला त्यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात बंगाली राष्ट्रवाद आणि इस्लामी कट्टरतावाद यांच्यावर एक लेख लिहिला होता.

या लेखात सुमित गांगुली म्हणाले होते, "1980 च्या दशकात बांगलादेशी लोक कामासाठी मोठ्या संख्येनं आखाती देशांमध्ये गेले. यातील बहुतांश लोकांना सौदी अरेबियात काम मिळालं. बांगलादेशातील लोकांना सौदी अरेबियात पूर्णपणे वेगळाच इस्लाम दिसला."

"त्याचबरोबर बांगलादेशातील राजकारणात इस्लामचा प्रभाव वाढत होता. सौदी अरेबियानं बांगलादेशातील मदरशांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली."

"या मदरशांमधील इस्लाम बंगाली इस्लामपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. बांगलादेशातील समाजात या नव्या इस्लामची मूळं घट्ट झाली. बंगाली राष्ट्रवादाचा कट्टरतावादी इस्लामशी फारसा ताळमेळ बसत नव्हता हे उघडच आहे."

"शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बंगाली राष्ट्रवादाचा असहजपणा, अडचणी आणखी वाढल्या. शेख मुजीब-उर रहमान यांच्या घरावरील हल्ल्यात या दोन राष्ट्रवादात ताळमेळ नसल्याचं दिसून आलं. या हल्ल्यामागे जमात-ए-इस्लामीचे लोक होते."

पाकिस्तानातील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक परवेज हुदभाई गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशात गेले होते. परवेज हुदभाई यांना देखील असं जाणवलं की बांगलादेशात बांगला राष्ट्रवादावर इस्लामी राष्ट्रवाद वरचढ ठरतो आहे.

भारत की पाकिस्तान, शत्रू कोण?

परवेज हुदभाई म्हणतात, "बांगलादेशात एकप्रकारची अस्वस्थता आहे. आता तिथं एका बाजूला सेक्युलर राष्ट्रवाद आहे. ज्यामध्ये भाषिक अस्मितेचा मुद्दा आहे. या गोष्टीवर बांगलादेशातील लोक बराच काळ अभिमान बाळगत आले आहेत."

"दुसऱ्या बाजूला बांगलादेशात धार्मिक शक्ती डोकं वर काढत आहेत. त्यांचा प्रयत्न आहे की बांगलादेशला इस्लामी रंग दिला जावा. मात्र मला वाटतं की बांगलादेशचा समाज आतून भक्कम आहे."

"बांगलादेशातील महिला बुरखा परिधान करत नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबर काम करतात. पाकिस्तानी महिलांच्या तुलनेत बांगलादेशी महिला अधिक आधुनिक आहेत. माझ्या दृष्टीनं बांगलादेशात मंथन सुरू आहे. मात्र तिथं इस्लामी शक्तींचा विजय होणार नाही."

"1971 मध्ये इस्लामच्या नावाखाली त्यांच्यावर किती अत्याचार झाले होते, या गोष्टीची बांगलादेशातील लोकांना आठवण असेल."

परवेज हुदभाई पुढे म्हणतात, "शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर इस्लामी शक्तींना बळ मिळालं आहे. मात्र बांगलादेशातील लोक त्यांचा भूतकाळ इतक्या सहजपणे विसरणार नाहीत. पाकिस्तान इस्लामी राष्ट्रवादाला काय फळं आली आहेत, हे बांगलादेशातील लोक पाहत असतील."

"बांगलादेशानं लक्षात घेतलं पाहिजे की धार्मिक राष्ट्रवादानं पाकिस्तानला कुठे नेऊन ठेवलं आहे. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले झाले आहेत. मात्र तिथे अजूनही हिंदू आणि मुस्लीम एकत्र काम करत आहेत. तसं पाकिस्तानात शक्य नाही."

परवेज हुदभाई म्हणतात की जर बांगलादेशात बांगला राष्ट्रवादावर इस्लामी राष्ट्रवाद वरचढ झाला, तर हा देश विभाजनाच्या दिशेनं वाटचाल करू लागेल.

हुदभाई म्हणतात, "मी आताच ढाक्याला गेलो होतो. तेव्हा तिथे ढाका विद्यापीठात लोक वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांची जयंती साजरी करत होते. असं पाकिस्तानात कधीही होऊ शकत नाही. मला ही गोष्ट खूप आवडली. मोहम्मद युनूस देखील या कार्यक्रमाला आले होते."

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस

बांगलादेशात राष्ट्रवादासंदर्भात खूप चर्चा होते आहे. बांगलादेशातील राष्ट्रवादात पाकिस्तानला शत्रू मानावं की भारताला, या मुद्द्यावर देखील चर्चा होते आहे.

परवेज हुदभाई म्हणतात की बांगलादेशात पाकिस्तानबाबतचा दृष्टीकोन बदलतो आहे. कारण तिथे आता पाकिस्तानबद्दल संताप दिसत नाही. बांगलादेशमधील राजकीय पक्षदेखील बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील भारताच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

मिर्झा अब्बास बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी एक डिसेंबरला ते म्हणाले होते की, "भारताला दोन हिंदू देश निर्माण करायचे आहेत. त्यांना चितगांववर कब्जा करायचा आहे. प्रत्येकजण म्हणतो की बांगलादेश एक छोटा आणि गरीब देश आहे."

"मात्र मला वाटतं की बांगलादेश एक उदार आणि भक्कम देश आहे. भारतानं लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं सैन्य छोटं आहे. मात्र 1971 मध्ये आम्ही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय युद्ध लढलो होतो. बांगलादेशचे 20 कोटी लोक सैनिक आहेत."

मिर्झा अब्बास म्हणाले होते, "इतकंच काय, याच वर्षी हुकुमशहा असलेल्या शेख हसीना यांना आमच्या मुला-मुलींनी कोणत्याही शस्त्राशिवाय सत्तेतून दूर केलं. राहुल गांधी म्हणाले होते की भारतानं बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं."

"मात्र भारतानं बांगलादेशची निर्मिती केलेली नाही. आम्ही बांगलादेशला स्वंतत्र केलं. भारतानं तर पाकिस्तानचं विभाजन केलं आणि ते स्वत:च्या स्वार्थासाठी केलं. आमच्या हितासाठी केलं नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.