You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
US Election : ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतले 9 महत्त्वाचे मुद्दे
5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे.
कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत?
समजून घेऊयात 9 मुद्दयांमध्ये
अर्थव्यवस्था
अमेरिकन अर्थव्यवस्थेत सध्या व्याजदर वाढलेले आहेत आणि अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. तज्ज्ञांनी मांडलेल्या अंदाजांपेक्षा ऑगस्ट महिन्यांमध्ये नोकरीच्या संधी कमी होत्या आणि बेरोजगारीच्या दरात किंचितच घट झालीय.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी म्हटलंय की, कष्टकरी कुटुंबांसाठी अन्न आणि घरांच्या किंमती कमी करण्याला त्यांचं प्राधान्य असेल. वाणसामानाच्या अवाजवी किंमतींवर बंदी, पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना मदत आणि घरांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं त्यांनी म्हटलंय.
तर महागाई संपुष्टात आणत अमेरिका पुन्हा परवडण्याजोगी करणार असल्याचं आश्वासन रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलंय. व्याजदर कमी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण यावर राष्ट्राध्यक्षांचं नियंत्रण नसतं.
नोंद नसलेल्या स्थलांतरितांना (Undocumented Immigrants) परत पाठवल्याने Housing म्हणजे घरांच्या उपलब्धतेबद्दलचा ताण कमी होईल असं त्यांनी म्हटलंय.
गर्भपात
Abortion Rights - गर्भपात करण्याचा अधिकार हा अमेरिकन निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन सुप्रीम कोर्टाने 1973मधल्या रो विरुद्ध वेड खटल्याचा निकाल पलटवत गर्भपाताचा घटनात्मक हक्क रद्द केला.
राज्यांना आता याविषयीचे नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. काही राज्यांनी गर्भपातावर पूर्णपणे बंदी घातलीय, तर काही राज्यांमध्ये गर्भपात कायदेशीर आहे.
गर्भपात करता येण्याचा हक्क हा कमला हॅरिस यांच्या प्रचारातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सत्तेत आल्यास देशातल्या सर्वांना हा हक्क पुन्हा देऊ असं हॅरिस यांनी म्हटलंय. तर ट्रम्प यांनी याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.
अधिक माहितीसाठी - अमेरिकेतील गर्भपातसंदर्भात 50 वर्षे जुना निर्णय सुप्रीम कोर्टाने बदलला
स्थलांतरित
हा मुद्दा ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातल्या दुसऱ्या डिबेटमध्येपण आला. 2023 वर्ष संपेपर्यंत अमेरिकेत मेक्सिकोमधून प्रचंड मोठ्या संख्येने स्थलांतरित आलेले आहेत. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्याची जबाबदारी बायडन यांच्या कार्यकाळात कमला हॅरिस यांच्याकडेच होती.
अमेरिका - मेक्सिको बॉर्डरवरचं भिंतीचं बांधकाम पूर्ण करून इथला बंदोबस्त वाढवत बॉर्डर सील करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. नोंद नसलेल्या स्थलांतरितांचं अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं Mass Deportation आपण करू, म्हणजे मोठ्या संख्येने त्यांना परत पाठवू असंही ट्रम्प यांनी म्हटलंय.
टॅक्सेस / कर
अमेरिकेतले मोठे उद्योग आणि 4 लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणारे नागरिक यांच्यावरील टॅक्सेस वाढवण्याचं कमला हॅरिस यांनी म्हटलंय. पण सोबतच कुटुंबांवरील टॅक्सचा भार हलका करणाऱ्या कर सवलतीही त्यांनी जाहीर केल्या आहेत.
तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही ट्रिलीयन डॉलर्स निधी होईल, इतके टॅक्सेस कमी करण्याचं म्हटलंय. 2017 मध्येही त्यांनी अशी कर कपात केली होती ज्याचा बहुतेक फायदा श्रीमंतांना झाला होता.
परराष्ट्र धोरण
युक्रेन - रशिया, इस्रायल - हमास अशा अनेक युद्धांमध्ये सध्या अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरतेय. याशिवाय चीनसोबतचे त्यांचे संबंधही कायम चर्चेत असतात.
युक्रेनला लागेल तितका काळ आपण पाठिंबा देऊ असं कमला हॅरिस यांनी म्हटलंय. निवडून आल्यास 21 शतकातली स्पर्धा चीन न जिंकता अमेरिका ती स्पर्धा जिंकेल याची खात्री आपण करू असंही त्यांनी म्हटलंय. गाझा युद्ध संपुष्टात यावं, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांमध्ये तोडगा काढण्यात यावा असंही त्यांनी अनेकदा बोलून दाखवलंय.
तर जगभरात सुरू असणाऱ्या संघर्षांपासून अमेरिकेने स्वतःला दूर ठेवावं असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. रशियासोबत तडजोडीची बोलणी करत आपण युक्रेनसोबतचं युद्ध 24 तासांत संपुष्टात आणू असंही त्यांनी म्हटलंय. पण असं केल्यास व्लादिमीर पुतिन यांना बळ मिळेल असं डेमोक्रॅट्सचं म्हणणं आहे.
ट्रम्प यांनी वेळोवेळी इस्रायललाही पाठिंबा दिलाय पण गाझा युद्ध ते कसं संपुष्टात आणू शकतात, याबद्दल ते बोललेले नाहीत.
हवामान
उप-राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करताना कमला हॅरिस यांनी हवामान बदल आटोक्यात आणण्यासाठीची अनेक पावलं उचलली आहेत. अक्षय ऊर्जा म्हणजेच Renewable Energy साठी अब्जावधी डॉलर्सचा निधी मिळवून देणारा इन्फ्लेशन रिडक्शन अॅक्ट मंजूर करण्यासाठी त्यांनी मदत केली.
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर कर सवलत आणि परतावा देणाऱ्या योजनाही सुरू करायला त्यांनी मदत केली. पण पर्यावरणवाद्यांनी विरोध केलेले गॅस आणि तेल काढण्याला असलेला विरोध मात्र त्यांनी मागे घेतलाय.
तर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना पर्यावरणाचं संरक्षण करणारे अनेक नियम मागे घेतले. यामध्ये पॉवर प्लांट्स आणि वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड पातळींबद्दलचे नियमही होते.
आर्क्टिक क्षेत्रातलं ड्रिलींग आपण सत्तेत आल्यास वाढवू असं त्यांनी या वेळच्या प्रचारात म्हटलंय.. सोबतच इलेक्ट्रिक कार्सवरही त्यांनी टीका केलीय.
आरोग्य
जो बायडन - कमला हॅरिस यांच्या कार्यकाळात Prescription Drugs म्हणजे डॉक्टरांकडून सांगण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आणि इन्शुलिनच्या किंमती 35 डॉलर्सवर ठेवण्यात आल्या.
तर आपण करदात्यांनी भरलेल्या पैशांतून Fertility Treatments उपलब्ध करून देऊ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लक्षावधी लोकांना विमा कवच देणाऱ्या अफोर्डेबल केअर अॅक्टला राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी विरोध केला होता, पण आता ते यासाठी प्रयत्न करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
गुन्हेगारी
आपण प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील होतो, तर ट्रम्प यांच्यावर खटला चालला, त्यात ते दोषी आढळले याची आठवण कमला हॅरिस वेळोवेळी करून देतात.
तर आपण ड्रग्स तस्करी, गँग्सद्वारे होणारी हिंसा बंद करू असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
बंदुका
Gun Violence हा अमेरिकेतला गंभीर मुद्दा आहे. दुसऱ्या डिबेटमध्येही तो आला. कमला हॅरिस या बंदुका बाळगण्याच्या विरोधात आहेत, त्यांना सगळ्यांच्या बंदुका काढून घ्यायच्या आहेत, त्यासाठी त्या पोलिसांचा निधीही बंद करतील असे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
तर कमला हॅरिस यांनी हे आरोप फेटाळून लावले. या निवडणुकीतले त्यांचे साथीदार टीम वॉल्झ आणि आपल्याकडे बंदुका असून आम्हाला सरसकट सगळ्यांच्या बंदुका काढून घ्यायच्या नाहीत, पण त्यासाठीचे कायदे आणखी कठोर व्हायला हवेत, असं कमला हॅरिस यांनी म्हटलंय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सलव्हेनियातल्या रॅलीदरम्यान गोळीबार झाल्यानंतर असॉल्ट रायफल्स (Assult Rifles) बंदी घालण्यात यावी अशी मागणी सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली होती. Gun Rights हा जो बायडन यांच्या प्रचारातलाही मोठा मुद्दा होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.