'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानची सहा विमानं पाडली होती, भारतीय हवाई दल प्रमुखांची माहिती

फोटो स्रोत, X/Indian Airforce
ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं, याबाबत भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान, पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक मोठं विमान पाडण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं आहे.
एअर चीफ मार्शल बेंगळुरूमध्ये भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित माहिती देत होते.
6-7 मे च्या रात्री पाकिस्तानमधील अतिरेकी छावण्यांना लक्ष्य करण्यात आलं, असं 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं म्हटलं होतं.
या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला.
16 वे एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात एपी सिंह म्हणाले की, या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची किमान पाच लढाऊ विमाने आणि एक मोठं विमान नष्ट केलं आहे.
त्यांनी सांगितले की, हे मोठं विमान ELINT किंवा AEW&C असू शकतं.
पुढे त्यांनी सांगितलं की, या विमानाला जमिनीपासून हवेत 300 किलोमीटर अंतरावर लक्ष्य करण्यात आलं होतं आणि एका प्रकारे हा आजपर्यंतचा जमिनीवरून हवेत केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यापैकी एक होता.
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाचे वर्णन एअर चीफ मार्शल यांनी 'हाय-टेक युद्ध' असं केलं आहे.
'हे एक हाय-टेक वॉर होतं जे 80-90 तास चाललं'
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाचं वर्णन एअर चीफ मार्शल यांनी 'हाय-टेक युद्ध' असं केलं आहे.
ते म्हणाले, "मी असं म्हणू शकतो की, आपण लढलेलं हे युद्ध एखाद्या हाय-टेक वॉरपेक्षाही अधिक होतं. हे युद्ध सुमारे 80-90 तास चाललं. यामध्ये आम्ही त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेचं मोठं नुकसान केलंय."
"हे नुकसान पाहून त्यांना ही गोष्ट तर स्पष्ट झाली होती की, जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर त्यांना आणखी नुकसान सहन करावं लागेल. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या डीजीएमओला पुन्हा संदेश पाठवला की, आम्हाला बोलायचं आहे. उच्च पातळीवर याचा स्वीकार करण्यात आला."

फोटो स्रोत, ANI
7 ते 10 मे दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षादरम्यान अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत.
31 मे रोजी, भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानसोबतच्या लष्करी संघर्षादरम्यान भारताची लढाऊ विमाने पाडण्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
त्याच वेळी, त्यांनी विमानांचं नुकसान झाल्याचा पाकिस्तानचा दावादेखील पूर्णपणे फेटाळून लावला.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात 'पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली' असा दावा केला होता.
मात्र, ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या किती लढाऊ विमानांचे नुकसान झालं, हे सांगितलं नव्हतं.
यापूर्वी, पाकिस्ताननेही भारताची 'पाच लढाऊ विमाने पाडल्याचा' दावा केला होता. मात्र, भारताने नेहमीच हे दावे फेटाळून लावले आहेत.
'जगाला संदेश दिला'
पुढे या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी म्हटलं की, "आम्ही अगदी नियोजनबद्ध ऑपरेशन केलं. त्यासाठी आम्ही तारखा निश्चित केल्या आणि सीमेजवळील 7 तळांवर हल्ला करण्यात आला."
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम विशद करताना त्यांनी मुरीदके-एलईटी मुख्यालयावरील हल्ल्याच्या आधी आणि नंतरचे फोटो दाखवले.
हे फोटो दाखवत असताना ते म्हणाले की, "हे त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) वरिष्ठ नेत्यांचं निवासी क्षेत्र आहे. ही त्यांची कार्यालयीन इमारत होती जिथे ते बैठका घेण्यासाठी एकत्र येत असत. हे ठिकाण रेंजमध्ये असल्याने आम्हाला शस्त्रांचे व्हीडिओ मिळू शकत होते."

फोटो स्रोत, ANI
एअर चीफ मार्शल एपी सिंगपुढे म्हणाले की, "पहलगामची दुर्दैवी घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या घटनेत इतके लोक मारले गेले. त्यामुळेच, आपल्याला प्रतिक्रिया द्यावी लागली. आपण राजनैतिकदृष्ट्या काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याच वेळी आपल्याला त्यांना योग्य उत्तर द्यावं लागेल, अशा स्वरुपाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. यावेळी हे अगदी स्पष्ट होतं की, आपण जगाला एक जोरदार संदेश पाठवला आहे."
"ही कारवाई फक्त लाँचपॅडपुरती मर्यादित नसावी. तर, दहशतवादी नेतृत्वाला आव्हान दिलं पाहिजे, अशी तयारी होती. इतर एजन्सींचाही त्यात सहभाग होता आणि आम्ही त्या नऊ तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. बहावलपूर आणि मुरीदके या दोन मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. आठ एजन्सी आणि तिन्ही दल यात सहभागी होते. हे सर्व नियोजित होतं," असंही विधान त्यांनी केलं आहे.
लष्कराचे उपप्रमुख याआधी काय म्हणाले होते?
एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 जण ठार झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तीव्र तणाव निर्माण झाला.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. तर पाकिस्ताननेही भारताच्या काही ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशातील लष्करी हालचालींकडे जगभराचे लक्ष होतं.
दरम्यान, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी याआधी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करताना सीमा भागात एक नाही तर अनेक शत्रू असल्याचा उल्लेख केला होता.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) 'न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज' कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारत-पाक संघर्षाच्या वेळी चीनची भूमिका काय होती, यावर भाष्य केलं.

फोटो स्रोत, ANI
"गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला मिळालेल्या 81 टक्के लष्करी उपकरणांचा पुरवठा चीनने केला," असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
लेफ्टनंट जनरल यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
संसदेत भारत-चीन संबंधांवर चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











