‘ना. धों. महानोरांच्या कविता गाण्यासाठी जेव्हा लता मंगेशकरांनी हट्ट केला होता...’

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
- Author, इंद्रजीत भालेराव
- Role, कवी आणि लेखक
हिंदीत जसं गुलजारांना ग्लॅमर आहे, तसं वलय 1980-85 च्या काळात ना. धो. महानोरांना मिळालं होतं.
महानोर आमच्या पिढीचा आयकॉन होते. आम्ही लिहायला, वाचायला लागलो, तेव्हा सर्वार्थानं मराठी वाङ्मय विश्वात डंका वाजत होता तो महानोरांचा.
खरंतर मराठी निसर्गकवितेत बालकवी, बोरकर आणि त्यानंतर महानोर हा प्रवास किंवा हे तीन टप्पे आहेत म्हणा ना.
बालकवींच्या कवितेत निखळ निसर्ग येत होता. बा. भ. बोरकरांच्या कवितेत निसर्गासोबत माणूस येत होता. पण ना. धो. महानोरांच्या कवितेत निसर्ग होता, माणूस होता आणि प्रत्यक्ष शेत होतं, जिथे शेतकरी कष्टत होता.
हा तिघांच्या निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टीतला फरक होता.
शेतकवी महानोर
महानोरांची कविता एका बाजूनं निसर्ग कविता होती, दुसऱ्या बाजूनं ती रानातली कविता होती.
‘ह्या शेताने लळा लावला असा असा की,
सुखदु:खाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच असा जखडला,
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...’
ही त्यांच्या अगदी पहिल्या कवितासंग्रहातली पहिली कविता. स्वतःच्या कवितेची प्रकृती सांगणारी.
त्यानंतर त्यांचा वही कवितासंग्रह आला आणि त्यानंतर आला पावसाळी कविता. त्यात सुरुवातीलाच एक कविता होती की,
'मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा,
इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा...
इथले रानोमाळ सघन घन पसरीत हिरवी द्वाही,
झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणिक मी ही...'
महानोरांनी अशी केवळ शेतांची, रानांची वर्णनं केलेली नाहीत तर रानातलं सौंदर्य, रानातला निसर्ग आणि त्याच्यासोबत रानातले कष्टही या कवितेत येत होते. शेती करणाऱ्यांच्या दुःखाचं गाणंही ती कविता गायला लागली.
पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या चळवळीलाही भाषा देण्याचं, आवाज देण्याचं काम महानोरांच्या कवितेनं केलं.
लयबद्ध गीतकार
महानोरांनी जैत रे जैत, सर्जा, दोघी, एक होता विदूषक अशा चित्रपटांसाठी गीतं लिहिली. महानोर चित्रपटसृष्टीत एवढे यशस्वी कशामुळे झाले? तर मुळात ते लयबद्ध लिहिणारे कवी होते.
त्यांचा जमाना मुक्तछंदाचा होता, पण महानोर छंदबद्ध कविता लिहित होते, लयविभोर कविता लिहित होते. चित्रपटसृष्टीला हेच तर हवं असतं. जसे ग दि माडगूळकर आणि शांताबाई शेळकेही चित्रपटक्षेत्रात यशस्वी झाले होते.
गदिमा, शांताबाई आणि महानोर या तिघांनीच, चित्रपट गीतांमध्ये वाङ्मयीन गुणवत्ता टिकून ठेवली. महानोर चित्रपटक्षेत्रात यशस्वी झाले, पण म्हणून चित्रपटांना लागणारी कुठलीही आडा-चौताल गाणी लिहित बसले नाहीत.

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
त्यांनी गाण्यातली गुणवत्ता टिकून ठेवली. चित्रपटाचे कथानक काय आहे, दिग्दर्शक आणि संगीतकार कोण आहे हे पाहूनच त्यांनी गाणी लिहिली. उठसूट कुणासाठीही ते लिहित बसले नाहीत आणि त्यामुळे त्यांना ती गुणवत्ता टिकवून ठेवता आली.
‘जैत रे जैत’ चित्रपटातल्या गाण्यांचं उदाहरण घ्या.
“जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी,
येंधळ येडं पाय कुनाचं झिम्मा फुगडी झालं जी”
किंवा
“मी रात टाकली, मी कात टाकली,
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली..”
ही गाणी अतिशय उत्स्फूर्त आहेत.
महानोरांच्या कवितांना हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर अशी त्या क्षेत्रातली दिग्गज माणसांनी संगीतकार आणि गायक म्हणून लाभली आणि त्यामुळे त्यांचा लौकिक आणखीनच वाढत गेला.

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
गंमतीचा भाग म्हणजे 'जैत रे जैत'मध्ये सुरुवातीला लता मंगेशकर नव्हत्या. म्हणजे त्या चित्रपटातली बहुतांश गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत. ती गाणी एवढी गाजली आणि आवडली, की लता मंगेशकरांना वाटलं आपणही महानोरांची गाणी गायला हवीत.
त्यामुळे मग त्यांनी ‘माझ्या आजोळची गाणी’ स्वतंत्रपणे रेकॉर्ड केली. त्यांनी हट्टच धरला होता हृदयनाथांकडे की महानोरांच्या कवितेला चाली दे, मला त्या गायच्या आहेत.
“किती जिवाला राखायच राखलं,
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं”
किंवा
“राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हांविण बाई…
कोणता करू शिणगार सांगा तरी काही?”
अशी गाणी निवडून लताबाईंनी गायली आणि तीही प्रचंड गाजली. मग सर्जा चित्रपटातलं ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ हे गाणंही खूप लोकप्रि

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
त्यानंतर ‘दोघी’ चित्रपट आला, जो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांनी दिग्दर्शित केला होता. तिथे महानोरांच्या कवितेला आनंद मोडकांच्या रुपानं नवे संगीतकार मिळाले. पुढे चित्रपटबाह्य काही गाणीही त्यांनी आनंद मोडकांसोबत केली.
किती सुंदर गाणी आहेत दोघी मध्ये.. महानोरांना दुःखाची, आणि महिलांच्या वेदनेची प्रचंड जाणीव होती, हे त्यातून दिसतं. त्यांच्या आसपास आई-बहिणींना, खेड्यापाड्यातल्या बायांना ते पाहात होते. त्यांची दुःखं त्यांनी पाहिली होती.

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
आमदार म्हणून तिहेरी भूमिका
यशवंतराव चव्हाणांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातला संस्कृतीपुरुष त्यांच्यावर प्रेम करत होता, त्यांना आपला मुलगा समजत होता.
सलग बारा वर्ष विधानपरिषदेत राहिल्यानं त्यांना राजकारणाचंही वलय लाभलं होतं.
त्या आधी कदाचित फक्त माडगूळकरांना असं ग्लॅमर होतं. माडगूळकरांनंतर राजकारण, चित्रपटसृष्टी आणि साहित्यविश्व या तीन्ही क्षेत्रातलं ग्लॅमर फक्त महानोरांच्या वाट्याला आलं. त्यानंतर ते कुणाच्या वाट्याला आलं नाही. तसा महानोर हा त्या दृष्टीनं अपवादात्मक कवी आहे.
महानोर हे निवडणूक लढवून गेले नव्हते, त्यांना कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून घेतलं होतं. ते कधीही निवडणुकीच्या राजकारणात गेले नाहीत, कुठल्या पक्षाचा त्यांनी प्रचार केला नाही.
विधानपरिषदेतले आमदार म्हणून त्यांनी खूप कामंही केली. कारण ते कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, पण त्यांनी तिहेरी भूमिका पार पाडली. वाङ्मयीन, सांस्कृतित आणि कृषी अशा तिन्ही क्षेत्रातले प्रश्न ते सभागृहात मांडत राहिले.
ते कलावंतांचे प्रश्न मांडत होते, साहित्य-संस्कृती मंडळाच्या अडचणी मांडत होते, नवलेखकांचे प्रश्न मांडत होते. चित्रपटाशी संबंधित असल्यानं चित्रपट क्षेत्रातल्या अडचणी मांडत होते.
पण शेतकरी असल्यानं शेतीतल्या अडचणीही मांडत होते. पाणी आडवा, पाणी जिरवासारख्या योजनांना शासनाचं बळ मिळावं म्हणून ते प्रयत्नशील राहिले.

फोटो स्रोत, Facebook/N D Mahanor
निसर्गाचा लळा लावणारा कवी
आपल्याकडे गाथा सत्तसईची प्राचीन परंपरा आहे. मराठवाड्यात, गोदावरीच्या परिसरातील शेतकऱ्यांविषयी दोन हजार वर्षांपूर्वी हाल सातवाहन नावाच्या पैठणच्या राजानं हा गाथा सत्तसई ग्रंथ लिहिला. गाथा सप्तशती नावानंही तो ओळखला जातो.
महानोर लिहू लागले, तेव्हा या गाथासत्तसईचं संपादन नुकतंच बाजारात आलं होतं. त्याचाही प्रभाव त्यांच्यावर पडला असण्याची शक्यता आहे.
ज्या बारकाईनं गाथा सत्तसईमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाचं चित्रण आलं आहे, तसंच ते महानोरांच्या कवितेत येतं. आणि नुसतंच सौंदर्यजाणीवा असण्यापेक्षा त्या सगळ्याशी, निसर्गाशी एकरूप होण्याची जी आध्यात्मिक जाणीव असते, तीही महानोरांच्या कवितेत पाहायला मिळते.
मनावर पकड घेईल अशा शब्दांममध्ये आणि लयीमध्ये असा निसर्ग नव्या पिढीच्या समोर येत राहिला, महानोरांच्या कवितेचा हा लळा टिकवून ठेवला, तर नव्या पिढीला नक्कीच निसर्गाचा लळाही लावता येईल.
(शब्दांकन : जान्हवी मुळे, बीबीसी मराठी प्रतिनिधी)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








