ना. धों. महानोर : शेतकरी, आमदार, लेखक, आणि निसर्गकवीचा असा होता प्रवास

ना.धों. महानोर

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. ते 81 वर्षांचे होते.

मराठी कवी, गीतकार, शेतकरी, आणि माजी आमदार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिली होती.

महानोरांचा जन्म पळसखेड गावात झाला होता. शालेय शिक्षण या गावात झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जळगावात घेतलं. निसर्गावरच्या असंख्य कविता केल्यामुळे ते रानकवी म्हणून प्रसिद्ध होते.

अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिलं होती. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

2009 मध्ये जनस्थान पुरक्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

रसरशीत निसर्गभान जागवणारे कवी

मराठी विश्वकोश या वेबसाईटवर कवयित्री अरुणा ढेरे यांनी ना.धो.महानोरांची ओळख करून देताना म्हटलं आहे, “ महानोरांनी गद्यलेखन केलेले असले, तरी रसरशीत निसर्गभान जागविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत. जिला अस्सल, संपन्न आणी तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल, तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. म्हणूनच पूर्वकालीन वा समकालीन कवींना प्रभावापासून ही कविता मुक्त आहे. तसेच लोकगीतांतील छंद-लय, जिवंत उत्स्फुर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. अनुभवागणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तींशी सूर जमविणारी चित्रमयताही त्यांच्या कवितेत आढळते. काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत.”

महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (1967) हा आहे.. त्यानंतर वही (1970) आणि पावसाळी कविता (1982) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी−1972), गपसप (1972), गावातल्या गोष्टी (1981−दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी, 1982) प्रसिद्ध झालेले आहेत.

शेती हे पहिलं प्रेम

ना.धो. महानोर

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राला मुलाखत देताना महानोर त्यांच्या शेतीच्या प्रेमाबद्दल बोलले होते. ते वयाच्या अठराव्या वर्षापासून शेती करत होते. शेती हे त्यांचं पहिलं प्रेम आहे असं ते म्हणायचे. सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांनी पळसखेड्याला 26 सिमेंट बंधारे, 26 दगडी बंधारे, 3 तलाव बांधून घेतले होते. त्यांनी माती अडवली, पाणी जिरवलं, शेतीच्या विकासातला तो आजही महत्त्वाचा प्रयोग मानला जातो. मी दिखावेगिरी करत नाही काम करतो असं ते म्हणायचतो.

सव्वा लाख रुपयांत शेतकरी सन्मानाने कसा उभा राहू शकतो याचा मार्ग त्यांनी ‘शेती आत्मनाश व नवसंजीवन’ या पुस्तकाद्वारे केला होता. त्यांची पुस्तकं वाचून मुंबई पुण्यातील शेतकरी गावात येऊन शेती करू लागले होते. महानोरांच्या अनेक कविता शेतकऱ्यांना तोंडपाठ होती.

'या शेताने लळा लावला असा असा की,

सुख दु:खाला परस्परांशी हसलो रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो'

ही कविता महाराष्ट्राचीच झाली आहे असं ते म्हणत असत

निसर्गगीतांची खाण

ना.धो.महानोर

फोटो स्रोत, Getty Images

निसर्गगीतं आणि कविता म्हणजे ना.धो. महानोर हे एक समीकरणच महाराष्ट्रात तयार झालं आहे. त्यांनी रचलेली कितीतरी गीतं महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या ओठी आहेत. वानगीदाखल सांगायचं तर, ‘नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ अशी अनेक गाणी वर्षानुवर्षं रसिकांच्या ओठी आहे.

‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ ही अंगाईसुद्धा त्यांनी लिहिली.

रोखठोक राजकीय भूमिका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1978 साली राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. कला आणि शेती तज्ज्ञ क्षेत्रातून त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाली होती. साहित्य, कलावंतांचं ते प्रतिनिधी होते. यशवंतराव चव्हाणांमुळे माझी नियुक्ती झाली होती असं ते म्हणाले होते.

2019 च्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची तेव्हा चर्चा झाली होती. 2019च्या निवडणुकीची तुलना 1977 सालच्या निवडणुकीशी केली होती. हे करत असतानाच त्यांनी 77 सालच्या पु.ल. देशपांडेंच्या भूमिकेशी 2019 सालच्या राज ठाकरेंशीही तुलना केली होती.ना.धों. महानोर यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले, “व्यंग दाखवण्याची व सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका आल्या. आदरणीय पु.ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आपण करत आहात.”

महानोर सांगतात, "आणीबाणी 1975 मध्ये लागू करण्यात आली होती. 1977 मध्ये निवडणुका झाल्या. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर प्रचंड प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. बोलण्यावर, लिहिण्यावर गदा आली होती. आम्ही करतो ते बरोबर, तुम्ही करता ते चुकीचं अशी सरसकट भूमिका इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. शेती आधारीत अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. सामान्य नागरिकांची फरफट होत होती."

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांवेळी पु.ल.देशपांडे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या भूमिकेवर झोड उठवली. त्यावेळी पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली होती. राज ठाकरेंनीही अशीच भूमिका 2019 मध्ये घेतली होती असं महानोरांचं म्हणणं होतं.

2020 साली झालेल्या साहित्य संमेलनात फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या नियुक्तीवरून वाद झाला होता. तेव्हा ना.धों.महानोर यांनी ठाम भूमिका घेतली होती. साहित्यिकाची जात ही केवळ उच्च साहित्य असते. मराठी भाषेच्या विकासात ख्रिश्चन लेखकांचे योगदान असताना दिब्रेटो यांना विरोध का असा सवाल महानोरांनी विचारला होता. जाती धर्माचे कप्पे करून लेखकाला कमी लेखू नका असे आवाहन महानोर यांनी केलं होतं.

मान्यवरांची श्रद्धांजली

ना.धों.महानोर यांना अनेक मान्यवरांनी आणि नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.

ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. त्या म्हणतात, “ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. हि आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती,शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' ‘रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)