You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या पतीने मला साथ दिली नसती तर माझ्या वडिलांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केला असता'
- Author, भार्गव परीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
'लग्नानंतर माझ्या बायकोला घरी घेऊन जाण्यासाठी सासरवाडीचे लोक यायचे तेव्हा माझी बायको उदास व्हायची, माहेरी जायला नकार द्यायची आणि गावाहून परतल्यावर खूप भांडायची.'
"काही दिवसांपूर्वी, माझे सासरे दुपारी घरी आले असता तिने माहेरी जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी फार वाद घातला. मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर तिनं सांगितलं की, तिचे वडीलच तिच्यावर बलात्कार करतात. त्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.”
हे शब्द आहेत अहमदाबादच्या गोमतीपूरमध्ये राहणाऱ्या एका पतीचे, जो आपल्या पत्नीसोबत खंबीरपणे उभा राहिला.
त्यांचा विवाह अहमदाबादच्या जुहापुरा येथे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या जातीच्या रितीरिवाजांप्रमाणे झाला होता. त्यांचं वैवाहिक जीवन चांगले चालले होते.
मात्र, त्यांच्या पत्नीने स्वतःच्या वडिलांवरच वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला. लग्नाआधीही आणि लग्नानंतरही हे प्रकार सुरू असल्याचं तिने सांगितलं.
पीडितेला तिच्या पतीने पाठिंबा देत वेजलपूर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली असून आवश्यक पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
स्वतःच्या वडिलांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या पीडितेने बीबीसीला सांगितलं की, "मी इंग्रजी माध्यमात शिकत होते. मला अकरावीत सायन्स घेऊन संगणक अभियंता व्हायचे होते. पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं सांगून माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढलं.”
"एकदा माझी आई आणि बहीण माझ्या मोठ्या बहिणीला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी राजस्थानमध्ये घेऊन गेलेल्या. तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत घरी एकटीच होते. त्या रात्री त्यांनी माझ्यावर बलात्कार केला."
"मी कोणाला सांगितल्यास मला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली आणि माझ्या लहान बहिणीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली."
पीडिता सांगते, "मी घाबरले आणि त्यामुळे त्यांचं धाडस आणखी वाढलं. जेव्हा माझी आई शिवणकामाला जायची आणि माझी बहीण शाळेत जायची तेव्हा ते माझ्यावर बलात्कार करायचे."
"एकदा माझी तब्येत बिघडली, तेव्हा त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांनी औषध लिहून दिले. रात्री मला जबरदस्तीने औषध दिले. मी झोपल्यानंतर माझ्यावर पुन्हा बलात्कार केला."
"दरम्यान, माझे लग्न झाले. पण माझे वडील मला जाऊ देत नव्हते. अनेकदा माझे सासरे येऊन मला त्यांच्या घरी घेऊन जायचे. माझा नवरा चांगला माणूस असल्याने मला माहेरी पाठवायचा आणि पुन्हा माझे वडील तोच प्रकार करायचे"
"मला भीती होती की माझ्या नवऱ्याला कळलं तर माझं लग्नही तुटेल. पण एके दिवशी माझ्या वडिलांनी सगळ्या सीमा ओलांडल्या."
"एकदा ते माझ्या सासरी आले. तेव्हा घरी कोणीच नव्हते. त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा हट्ट धरला. मी नकार दिला तर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली."
"घराचा दरवाजा आतून बंद होता. माझा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्याने माझ्या नणंदेला हाक मारली. माझी नणंद घरी आली आणि गुपचूप निघून गेली."
मात्र, पतीने आता भूतकाळ विसरून नव्याने आयुष्य सुरू केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
शारीरिक शोषणाला बळी पडलेली मुलगी
पीडितेच्या पतीने बीबीसीला सांगितलं की, "आमचं लग्न झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला अनेकदा आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले, परंतु माझ्या पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिला."
"ती मला नेहमी म्हणायची की, तुझ्याशिवाय माहेरी जाणार नाही. पण मला वाटायचे की, वडील तिला आपल्या घरी घेऊन जातात कारण त्यांना आपल्या मुलीबद्दल माया आहे. त्यामुळेच माझीही हरकत नसायची. शिवाय आम्ही एकाच शहरात राहतो.
पण माहेरी गेल्यावर बायको रात्री उशीरा रडत फोन करायची. परत घेऊन जायला सांगत राहायची."
पीडितेचे पती सांगतात, "एकदा माझे सासरे माझ्या घरी आले आणि घरी कोणीही नव्हते. तेव्हा बाप लेकीत वाद झाला. त्याचवेळी माझी बहीण घरी आली आणि तिला पाहून माझे सासरे निघून गेले. माझी बायको खूप रडत होती."
"माझ्या बहिणीने तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तिने सांगितले की, तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लग्नानंतरही तिचे वडील तिला त्याचसाठी सारखे माहेरला घेऊन जायचे."
ते पुढे म्हणतात, "माझी बहीण आणि बायको दोघी माझ्याशी बोलल्या तेव्हा मला तिचं माहेरी न जाण्याचं कारण समजलं. मग मी माझ्या सासऱ्यांना माझ्या घरी येण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांनी माझ्याशी सुद्धा भांडण केलं.
समाजात बदनामी केल्याचे खोटे आरोप माझ्यावर लावले. शेवटी माझ्या पत्नीने माहेरच्या छळापासून बचाव करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली."
शारीरिक अत्याचार करणाऱ्या वडिलांना अटक
या प्रकरणाचा तपास वेजलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.बी. राजवी करत आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितले की, "आमच्याकडे ही 22 वर्षांची मुलगी तिच्या पतीसोबत आली होती. तिने तिच्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे."
"लग्नाच्या आधी आणि नंतर तिच्या वडिलांनी तिचे शारीरिक शोषण केल्याची तक्रार तिने केली आहे. जुहापुरा इथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आणि छोटासा व्यवसाय करणाऱ्या आरोपी वडिलांनी तिच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे काही पुरावे आहेत."
"बलात्कारानंतर पीडितेला औषध देणाऱ्या डॉक्टरांनी आणि पीडितेने दिलेल्या काही पुराव्यांच्या आधारे आम्ही आरोपी वडिलांना अटक केली आहे."
(आरोपी पक्षाशी संपर्क होऊ शकला नाही.)
वडील हे कसे करू शकतात?
आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांच्या मानसिकतेबद्दल सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एम.एन. यादव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, "यामागील मुख्य कारण म्हणजे पाच मुले झाल्यानंतर पत्नीबद्दल भावनिक आसक्ती कमी झाल्यास किंवा पत्नीने लैंगिक इच्छा पूर्ण न केल्यास मुलगी पहिली शिकार होते. असे 'लैंगिक विकृत' लोक दुर्बल असतात आणि विरोध सहन करू शकत नाहीत."
"मुलीचं शिक्षण बंद केल्यानंतर ती तिच्या वडिलांवर अवलंबून होती. तिच्या असहायतेचा फायदा वडिलांनी घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
जेव्हा तिच्या पतीने तिला पाठिंबा दिला तेव्हा तिने तिच्या वडिलांच्या अत्याचाराविरुद्ध बंड केले, परंतु जर तिला आधार नसता, तर तिने कदाचित तिच्या वडिलांचे अत्याचार सहन केले असते.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)