You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डार्लिंग्स : बायकोला रोज रात्री मारहाण आणि मग सकाळी सॉरी म्हणायचं; चित्रपटाची चर्चा का होतेय?
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
घरगुती हिंसाचारावर प्रकाश टाकणारा डार्लिंग्स नावाचा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा यात प्रमुख भूमिकेत आहेत. एका तरुण मुस्लिम जोडप्याची प्रेमप्रकरण, हिंसाचार आणि बदल्याची ही गोष्ट आहे.
हम्झा (विजय वर्मा) आणि बद्रूनिस्साच्या (आलिया भट्ट) लग्नाला तीन वर्षं होतात. पण या ना त्या कारणानं हम्झा बद्रूनिस्साला मारहाण करत असतो. रात्रीच्या मारहाणीनंतर सकाळी तो तिची माफीही मागतो. "मी तुला मारतो,कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे," असं स्पष्टीकरण तो या मारहाणीमागे देत असतो.
पतीचं दारुचं व्यसन थांबल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतर ही मारहाण थांबेल असं बद्रूनिस्साला वाटत राहतं.
पण नवऱ्याच्या वागण्यात काहीच बदल होत नाही आणि तो मर्यादा ओलांडतोय हे लक्षात आल्यावर मात्र बद्रून्नीसा तिच्या आईच्या मदतीनं नवऱ्यावर हिंसाचार करू लागते.
या दोघी हम्झाला किडनॅप करतात आणि घरात डांबून ठेवतात. त्यानंतर त्यानं तिच्यासोबत जे काही केलं ते ती त्याच्यासोबत करते.
चिपत्रपटाच्या दिग्दर्शक जस्मीत के रीन सांगतात, "एका आई आणि मुलीची ज्यांची स्वत:ची स्वप्नं आहेत, त्यांची कल्पना माझ्या डोक्यात होती. पण, काहीतरी चुकीचं घडतं आणि मुलीच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात. ते सुरळीत करण्यासाठी मग या जोडीला विचित्र कल्पना सुचतात."
आईनं आधीच या गोष्टी सहन केलेल्या असतात. त्यामुळे मुलीच्या नशिबीही तेच येऊ नये असं तिला वाटतं. म्हणून मुलीला ती एकतर नवऱ्याला सोडून दे किंवा मारून टाक, असा सल्ला देत असते.
"हा एका मुलीचा प्रवास आहे. कारण ती सहिष्णुतेपासून बदला घेण्याचा विचार करण्यापर्यंतचा प्रवास करते आणि हिंसाचारापासून दूर जाते," रीन सांगतात.
या चित्रपटाला देशविदेशात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं नेटफ्लिक्सनं बीबीसीला सांगितलं आहे.
"डार्लिंग्सला नॉन इंग्लिश भारतीय चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वोच्च जागतिक ओपनिंग मिळाली आहे आणि प्रेक्षकांनी सुरुवातीच्या आठवड्यात 10 दशलक्ष तासांपेक्षा जास्त वेळ तो पाहण्यात घालवला आहे," असा नेटफ्लिक्सचा दावा आहे.
कौटुंबिक हिंसाचार कळीचा मुद्दा
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जागतिक स्तरावर तीनपैकी एका महिलेला लिंग-आधारित हिंसाचाराचा सामना करावा लागतो. त्यापैकी बहुतेक हिंसाचार हे जोडीदाराकडून केले जातात. भारतात वर्षानुवर्षे महिलांविरोधात सर्वाधिक हिंसक गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यांची संख्या नियमितपणे समान राहिली आहे.
2020 मधील आकडेवारीनुसार, पोलिसांना 1 लाख 12 हजार 292 महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. म्हणजे दर पाच मिनिटांनी एक तक्रार. पण इथं या महिलांना शांत राहण्याची संस्कृती आणि हिंसाचाराला मान्यता देणाऱ्या विचारांशीही लढावं लागतं.
नुकत्याच झालेल्या एका सरकारी सर्वेक्षणानुसार, 40% पेक्षा जास्त स्त्रिया आणि 38% पुरुषांनी सांगितलं की, पत्नीनं तिच्या सासरच्या व्यक्तींचा अनादर केला, तिच्या घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष केले, पतीला न सांगता ती बाहेर गेली किंवा सेक्ससाठी नकार दिला असेल तर पतीनं तिला मारहाण करणं योग्य आहे.
त्यामुळेच मग हम्झा जेव्हा त्याच्या पत्नीला मारहाण करत असतो, तेव्हा त्यांचे शेजारी मूकपणाने ते बघत असतात.
रीन सांगतात, "चित्रपटासाठी संशोधन करत असताना मला आढळलं की बहुतेक कुटुंबं घरगुती हिंसाचाराला अनुकूल आहेत, लोक त्यासोबत जगायला शिकतात."
"मी बर्याच महिलांशी, यातून बाहरे पडलेल्या महिलांशी, विवाहित स्त्रियांशी बोललो. त्या रडत होत्या. त्यांना माहित होतं की त्यांच्यासोबत हिंसाचार केली जात आहे. पण माणूस सुधारेल या आशेवर त्या जगत होत्या."
चित्रपटावर टीकाही झाली
डार्लिंग्स प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावर टीकाही झाली. या चित्रपटातून पुरुषांविरोधातील हिंसाचाराला खतपाणी घालतं जात आहे, असं पुरुष अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटलं. तर आलिया भट्टची तुला 'भारतीय एंबर हर्ड' अशी केली. एंबर हर्ड ही एक हॉलिवूड अभिनेत्री आहे, जिचा नुकताच तिच्या पतीविरुद्ध (जॉनी डेप) घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात पराभव झाला आहे.
सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन या पुरुष अधिकारविषयक गटानं ट्विट केलं की, "चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या हजारो पुरुषांवर आघात झालाय. आलिया भट्ट आणि तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकायला हवा."
रीन हे आरोप फेटाळून लावतात.
"घरगुती हिंसा ही काही एकाच बाजूनं घडते असं नाही. ती पुरुषांसोबतही घडते. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि आम्ही याकडे संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने पाहिलं आहे.
"आम्हाला माहित आहे की हिंसा हे उत्तर नाही आणि आम्ही कोणत्याही लिंगाच्या विरोधात हिंसेला प्रोत्साहन देत नाही. खरं तर, चित्रपटाचा संदेश हिंसाविरोधी आहे आणि जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला ते कळेल. जर तुम्ही चित्रपट पाहिला नाही आणि त्यावर टीका केली, तर मग मी यावर काय बोलू?" असंही रीन सांगतात.
अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला पाठिंबा दिला. काहींनी सांगितलं की त्यांना चित्रपट पाहून आनंद झाला. हिंसाचारातून बाहेर पडलेल्यांनी लिहिलं की चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना सशक्त वाटलं. भारतासारख्या पितृसत्ताक समाजात, बहुतेकदा महिलांनाच घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो, असंही काहींनी निदर्शनास आणून दिलं.
दीप जैस्वाल यांनी ट्विट करत लिहिलं की, "आम्ही रस्त्यांवरील महिलांच्या सुरक्षेवर खूप लक्ष केंद्रित करतो. पण घर आणि त्यांच्या विश्वासाचे वर्तुळ कधीकधी अधिक धोकादायक असते हे कबूल करण्यास मात्र विसरतो."
या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे खूश असल्याचं रीन सांगतात.
"चित्रपट मनोरंजनासाठी आणि लोकांना खिळवून ठेवण्यासाठी बनवला जातो. पण मला वाटतं की, कलेच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं पाहिजे आणि आमचा चित्रपट लोकांशी संवेदशील अशाच विषयावर बोलत आहे."
"आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार या विषयावर चर्चा सुरू करायची होती. चित्रपटातील पात्रं समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्याचं प्रतिबिंब दाखवतात. घरगुती हिंसाचारावर चर्चेची सुरुवात करायचा हेतू साध्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत," रीन पुढे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)