You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊन कौटुंबिक हिंसाचार: मारहाण करणाऱ्या पतीसोबत अडकून पडणं म्हणजे काय असतं?
1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी सवलत देण्यात आली असली तरी भारतात दोन महिन्यांहून अधिक काळ कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला. त्यापैकीच एक म्हणजे घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या बायका.
18 एप्रिलला तारा (नाव बदललेले आहे) घरगुती हिंसाचार पीडितांना मदत करणारं कुणी मिळतंय का, याचा इंटरनेटवर शोध घेत होती. तोपर्यंत लॉकडाऊन लागू होऊन जेमतेम तीन आठवडे झाले होते.
तिच्या लग्नाला 15 वर्षं झाली आहेत आणि या काळात तिच्या पतीने तिचा अनेकदा छळ केला. कधी शाब्दिक, कधी भावनिक, कधी मानसिक तर कधी शारीरिक… पण तिला नोकरी होती. त्यामुळे दिवसातला बराच वेळ ती घराबाहेर असायची. शिवाय तिचा नवरा नोकरीनिमित्त बरेचदा फिरतीवर असायचा. त्यामुळे तोही दूर रहायचा. मात्र, या लॉकडाऊनने सगळंच बदललं.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
"मी सतत भीतीच्या छायेत असते. कुठल्या गोष्टीवरून माझ्या नवऱ्याचा मूड खराब होईल, सांगता येत नाही," तारा दबक्या आवाजात बीबीसीशी फोनवर बोलत होती. नवऱ्याला आणि सासूला ऐकू जाऊ नये म्हणून तिने घराच्या वरच्या खोलीतून आम्हाला कॉल केला होता.
दोघंही तिला सारखं टोचून बोलतात आणि छळ करतात, असं तिचं म्हणणं आहे. ती सांगत होती, "मी चांगली बायको नाही, चांगली आई नाही, असे टोमणे मला सारखे ऐकून घ्यावे लागतात. त्यांना रोजच चमचमीत जेवण लागतं. मला एखाद्या नोकरासारखी वागणूक मिळते."
सातत्याने होणारा छळ आणि मारहाण असह्य होऊन एक दिवस ताराने मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिला इंटरनेटवर 'Invisible Scar' नावाच्या सपोर्ट ग्रुपचं फेसबुक पेज दिसलं. तिने त्यांना संपर्क केला.
Invisible Scar संस्थेच्या संस्थापिका एकता वर्मा यांनी सांगितलं, "आम्हाला मदतीसाठीचे अनेक फोन येत आहेत."
तारानेही एकता यांना फोन केला होता. एकता वर्मा यांनी सांगितलं की, त्यांनी ताराला सगळे पर्याय सांगितले - पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. कायदेशीररीत्या वेगळं होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज करता येऊ शकतो किंवा मग नवऱ्याला सांगून दोघंही कौन्सिलरची मदतही घेऊ शकतात.
मात्र, ताराने सांगितलं की, तिने एकदा नवऱ्याला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने मारझोड करणं बंद केलं. पण काही दिवसांनंतर नवऱ्याने पुन्हा मारझोड सुरू केली. त्यामुळे पोलिसात तक्रार देणं, हा पर्याय उपयोगाचा नसल्याचं ताराचं म्हणणं आहे. "मला फक्त देवच वाचवू शकतो. मी माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या मुलाला त्रास देऊ शकत नाही."
तक्रारींमध्ये मोठी वाढ
एकता वर्मा म्हणतात, "जोडीदार छळ करत असला तरी बहुतेक प्रकरणांमध्ये बायका त्यांना सोडचिठ्ठी द्यायला तयार नसतात. त्यांचं म्हणणं असतं की, असा काहीतरी उपाय सांगा ज्यामुळे नवऱ्याला अद्दल घडेल आणि ते चांगलं वागतील."
भारतीय समाजात घटस्फोटित महिलांकडे आदराने बघितलं जात नाही. त्यामुळे नवरा कितीही मारहाण करत असला, छळ करत असला तरी भारतात स्त्रिया सहसा घटस्फोटाचा पर्याय निवडत नाहीत.
अगदी मोजके आई-वडील आहेत जे नवरा चांगला नाही म्हणून त्याच्यापासून वेगळं होण्याच्या आपल्या मुलीच्या निर्णयाला खंबीरपणे पाठिंबा देतात. मुलीला मुलं असली तरी तिच्या पाठीशी उभे राहतात.
लॉकडाऊनमध्ये नवऱ्याच्या घरातून शेल्टर होममध्ये किंवा माहेरी जाऊन रहायचं म्हटलं तरी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने तेही शक्य होत नाही.
महिलांविरोधातल्या जेवढ्या तक्रारी नोंदवल्या जातात त्यापैकी 32% म्हणजे जवळपास एक तृतीयांश केसेस या नवरा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाच्या असतात. ही आकडेवारी 2018 या वर्षातली आहे.
2018 साली घरगुती हिंसाचाराच्या 1,03,272 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
2015-16 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार जवळपास 33% महिलांना जोडीदारांकडून शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचाराचा सामना करावा लागला आहे.
यापैकी केवळ 14 टक्के स्त्रियांनीच याविरोधात तक्रार दाखल केली. असं असलं तरी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"अशा तक्रारी येण्याचं प्रमाण एवढं वाढलं की, आयोगाने लॉकडाऊनच्या काळात महिलांना आधार मिळावा यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू केली. लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरी असल्याने फोनवर बोललो तर कुणीतरी ऐकेल अशी भीती ज्या महिलांना वाटते, त्यांच्या मदतीसाठी ही व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
23 मार्च ते 16 एप्रिल 2020 म्हणजेच लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जवळपास पहिल्या तीन आठवड्यात राष्ट्रीय महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या 239 तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्याआधीच्या तीन आठवड्यात केवळ 123.
बीबीसीशी बोलताना अर्थतज्ज्ञ आणि दिल्लीतल्या अशोका विद्यापीठातल्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी सांगितलं, "लॉकडाऊनमुळे आपलं कशावरच नियंत्रण नाही, या भावनेतून छळ करणाऱ्याला निराश वाटू लागतं. त्यांचा संताप होतो. यातून आपल्या बायको किंवा मुलांचा छळ करून, त्यांना मारहाण किंवा शिवीगाळ करून आपलं कशावर तरी नियंत्रण आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो."
प्राध्यापक अश्विनी देशपांडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे मार्च ते एप्रिलच्या तीन आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या ज्या तक्रारी आल्या त्याची तुलना गेल्या वर्षी याच काळात आलेल्या तक्रारींशी केली. तेव्हा असं लक्षात आलं की, गेल्यावर्षी याच काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडे रोज जवळपास 5 तक्रारी यायच्या. मात्र, यंदा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रोज जवळपास 9 तक्रारी येत होत्या.
मात्र, हे केवळ भारतातच घडतंय असं नाही. एप्रिलच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी म्हटलं होतं, "लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये जगभरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे." संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी याच कालावधीत आलेल्या तक्रारींच्या तुलनेत लेबनॉन आणि मलेशियामध्ये हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींची संख्या दुप्पट झाली होती तर चीनमध्ये तिप्पट झाली होती.
घरगुती हिंसाचार पीडितांसाठी हेल्पलाईन चालवणाऱ्या 'स्नेहा' या स्वयंसेवी संस्थेच्या नायरीन दारुवाला सांगतात, "भारतासारख्या देशात बाहेर येऊन उघडपणे तक्रार करणे, इथल्या स्त्रीसाठी सोपं नाही."
संस्थेने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराप्रती जागरुकता आणि निधी उभारण्यासाठी सेलिब्रेटीजना जोडलं. या आवाहनाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि यापुढे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू, अशी आशा असल्याचं दारूवाला सांगतात.
भीतीच्या छायेतलं जगणं
घरगुती हिंसाचाराची तक्रार सर्वांत आधी होते ती पोलिसांकडे. मात्र, ते महिलांशी फार सहानुभूतीने वागत नाहीत, असा एक सूर आहे. दुसरं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा ताण खूपच वाढला आहे. बंदोबस्तापासून ते कोरोनाग्रस्तांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतचं काम त्यांना करावं लागतंय.
मात्र, संकटात असलेल्या महिलेला मदत नाकारण्यासाठीचं हे कारण असू शकत नाही, असं प्रा. अश्विनी देशपांडे यांचं म्हणणं आहे. अशा महिलांना मदत पोहोचवणं, याचा अत्यावशक सेवेत समावेश करावा जेणेकरून पीडित स्त्रिला सुरक्षित ठिकाणी नेता येईल, असं प्रा. देशपांडे सांगतात.
आपल्यालाही पोलिसांनी मदत केली नाही, असं लक्ष्मी (नाव बदललं आहे) सांगते. नवरा नेहमी दारू पिऊन मारझोड करत असल्याचं लक्ष्मीचं म्हणणं आहे. ती सांगत होती, "तो माझ्यावर बलात्कार करतो. जोडीदार म्हणून नाही तर त्याची कामेच्छा भागवणाऱ्या एखाद्या वस्तूसारखा माझा वापर करतो."
यापूर्वी जेव्हा-जेव्हा हा जाच असह्य व्हायचा लक्ष्मी काही दिवसांसाठी माहेरी निघून जायची. मात्र, लॉकडाऊनमध्ये आता तेही शक्य नाही. नंतर तिला कळलं की तिचा नवरा सेक्स वर्करकडे जातो. त्यामुळे त्याला कोरोना विषाणूची बाधा होईल आणि त्याच्यामुळे घरात तिला तसंच तिच्या मुलांनाही कोरोनाची लागण होईल, अशी भीती तिला वाटू लागली. अखेर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
लक्ष्मीने सांगितलं की, पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला दम दिला आणि तो घराबाहेर पडू नये म्हणून त्याची बाईक जप्त केली. पण त्याला ताब्यात घेतलं नाही.
पोलीस ठाण्यातून आल्यावर नवऱ्याने बेदम मारहाण केल्याचं ती सांगते. "मला वाटलं आता सगळं सपलं." लक्ष्मीची 9 वर्षांची मुलगी धावत शेजाऱ्यांकडे गेली आणि त्यांनी मध्यस्थी करून लक्ष्मीला तिच्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवलं. तिथून लक्ष्मी डॉक्टरांकडे गेली आणि त्यानंतर पोलिसांकडे.
लक्ष्मी सांगत होती, "मला वाटलं माझ्याकडे बघून तरी पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याला अटक करतील. पण, असं काहीच झालं नाही. त्यांनी मला तिथून जायला सांगितलं. मला खूप अपमानास्पद वाटलं. असहाय्य वाटलं. घरी जायची खूप भीती वाटत होती. त्याने मला ठार केलं असतं तर?"
दुसरा दिवस उगवताच ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली. ती अजूनही घरी परतलेली नाही आणि नवऱ्यानेही आपल्याला एकही फोन केला नसल्याचं लक्ष्मी सांगते. बीबीसीशी बोलताना लक्ष्मी म्हणाली, "माझं आयुष्यही लॉकडाऊनप्रमाणे अनिश्चित झालं आहे."
घरगुती हिंसाचाराविषयीची माहिती आणि मदतीसाठीचे संपर्क-
• पोलीस हेल्पलाईन : 1091/1291
• राष्ट्रीय महिला आयोगाचा व्हॉट्सअॅप क्रमांक : 72177-35372
• दिल्लीतील NGO शक्तीशालिनी क्रमांक : 10920
• मुंबईतील NGO स्नेहा : 9833052684/9167535765
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)