जस्टिन ट्रुडो यांनी केली कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा

जस्टिन ट्रुडो यांनी लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचं नेतेपद आणि कॅनडाचं पंतप्रधानपद अशा दोन्ही पदांच्या राजीनाम्याची घोषणा केलीय.
कॅनडाची राजधानी ओटावा इथे त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
जस्टिन ट्रुडो हे नोव्हेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान बनले. त्यानंतर गेली सलग 9 वर्षे ते कॅनडाच्या पंतप्रधानपदावर होते.
जोपर्यंत लिबरल पार्टी ऑफ कॅनडा हा ट्रुडोंचा पक्ष पुढील नेत्याची निवड करत नाही, तोपर्यंत पंतप्रधानपदावर ते कायम राहतील.
ट्रुडो यांच्यावर पक्षातून आणि पक्षाबाहेरून राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. विशेषत: गेल्यावर्षी म्हणजेच 2024 च्या डिसेंबरमध्ये कॅनडाचे अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर हा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.


ट्रुडो म्हणाले, 'मी योद्धा आहे'
जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर देशाला पुढच्या निवडणुकीत 'खरी निवड' करण्याची संधी मिळाली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.
सोमवारी (6 जानेवारी) कॅनडाची राजधानी ओटावा इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रूडो म्हणाले, ''कॅनडाचा पंतप्रधान म्हणून सेवा करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही कोरोनाच्या काळात देशाची सेवा केली. मजबूत लोकशाहीसाठी काम केलं. व्यापार वाढीसाठी काम केलं. मी एक योद्धा आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे."
ट्रुडो म्हणाले, 'नवीन सुरुवात करण्याची वेळ'
पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, ट्रुडो म्हणले, "वेळोवेळी विरोधकांनी आणलेल्या अडथळ्यांमुळे संसदेचं कामकाज पूर्णपणे थांबलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून संसदेत उपयुक्त कामं होत नव्हती."
ट्रुडो म्हणाले की, "माझ्या राजीनाम्यामुळे कॅनडामध्ये तापलेलं राजकीय वातावरण शांत होईल आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात होऊ शकेल. कॅनडासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक किचकट आव्हानं निर्माण झाली आहेत. आणि त्यामुळे संसदेत आता नव्याने सुरुवात करता येऊ शकेल."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी पुढे सांगितले की या पुनर्रचनाचे दोन भाग असतील - मार्चच्या अखेरीस संसदेचे कामकाज स्थगित होईल आणि या राजीनाम्यामुळे देशात झालेलं ध्रुवीकरण कमी होऊ शकेल.
मार्च महिन्यात कॅनडाच्या संसदेत विश्वासदर्शक ठराव होईल. ज्यामुळे संसदेला कॅनेडियन सरकारबाबत पुढची पावलं उचलता येतील. ही प्रक्रिया लोकशाहीच्या कार्यपद्धतीनुसार होणार असल्याचं ट्रुडो म्हणाले.
राजकीय संकट काय आहे?
कॅनडाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कॅनडात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय.
20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही कॅनडाला आर्थिक पातळीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कॅनडाने अमेरिकेच्या सीमेला लागून असलेल्या सीमा सुरक्षित केल्या नाहीत आणि तेथून अनियमित स्थलांतरित आणि बेकायदेशीर ड्रग्जवर नियंत्रण मिळवलं नाही, तर ट्रम्प यांनी कॅनडाच्या वस्तूंवर 25 टक्के शुल्क लादणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. असं झाल्यास ही स्थिती कॅनडासाठी विनाशकारी असेल, असं अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कॅनडाची 75 टक्के निर्यात अमेरिकेत होते. त्यामुळे त्यावरील करात वाढ झाल्यास कॅनडाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
अशी करवाढ झाल्यास त्याचा कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला होता.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं होतं, "अमेरिका कॅनडाला दरवर्षी 10 कोटी डॉलरचं अनुदान का देतो याचं उत्तर कुणाकडेही नाही. बहुतांश कॅनडाच्या नागरिकांना 51 वं राज्य व्हायचं आहे. त्यामुळे ते करावर आणि सुरक्षेवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत करू शकतील. 51 वं राज्य होणं हा खूप चांगला विचार आहे, असं मला वाटतं."
वयाच्या 44 व्या वर्षी पंतप्रधानपदी
जस्टिन ट्रुडो 2015 साली वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी पहिल्यांदा कॅनडाचे पंतप्रधान झाले होते.
2019 मध्ये पुन्हा त्यांचा पक्ष सत्तेत आला आणि ते पंतप्रधान झाले, पण त्या निवडणुकीत त्यांची लोकप्रियता बरीच कमी झाली.
2019 मध्ये करोना आला. त्यावेळी ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाच्या सरकारचं काम पाहून कॅनडाची जनता त्यांना सहज बहुमत देईल, असं वाटलं होतं.
2019 मध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या. मात्र, या निवडणुकीत ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाच्या 20 जागा कमी झाल्या.
नंतरच्या काळात लिबरल पक्षाचे सदस्यही ट्रुडो यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत होते.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर काही दिवसांपूर्वीच झालेल्या टोरंटो पोटनिवडणुकीत कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
मतदान सर्वेक्षणातही ट्रूडो मागे पडल्याचं दिसलं. डिसेंबरमध्ये केवळ 22 टक्के कॅनेडियन लोकांनी ट्रूडो यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. यावरून त्याची घसरलेली लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली.
या सर्वेक्षणात कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोलिव्हिएर हे ट्रूडो यांच्यापुढे दिसले. ते 24 पॉईंट्सने ट्रूडो यांच्यापुढे होते. यावरून कॅनडाच्या पुढील निवडणुकीत लिबरल पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कॅनडामध्ये बहुपक्षीय व्यवस्था आहे. मात्र, देशाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ लिबरल आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षांनाच सरकार स्थापन करता आलं आहे.
ट्रुडो यांनी याआधी जाहीर केलं होतं की, ऑक्टोबरपूर्वी होणाऱ्या निवडणुकीत तेच लिबरल पक्षाचे नेते असतील. मात्र, डिसेंबरमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च नेत्यानं राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव निर्माण झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











