भारत-कॅनडा तणाव : जेव्हा इंदिरा गांधींनी जस्टिन ट्रुडोंच्या वडिलांवर नाराजी व्यक्त केली होती

इंदिरा गांधी आणि पिएर ट्रुडो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जस्टिन ट्रुडोंचे वडील - पिएर ट्रुडो हे 1968 ते 1979 आणि 1980 ते 1984 या काळात कॅनडाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि पिएर ट्रुडो. ( संग्रहित)

भारत आणि कॅनडामधले संबंध अभूतपूर्व ताणले गेले आहेत. कॅनडातले उच्चायुक्त आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना भारताने तडकाफडकी परत बोलावलं. पण भारत आणि कॅनडात अशा प्रकारे तणाव निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही.

फक्त जस्टिन ट्रुडोच नाही, तर त्यांचे वडील पिएर ट्रुडो यांच्या कार्यकाळातही कॅनडा-भारतादरम्यानचे संबंध ताणले गेले होते.

जस्टिन ट्रुडोंचे वडील पिएर ट्रुडो हे 1968 ते 1979 आणि 1980 ते 1984 या काळात कॅनडाचे पंतप्रधान होते.

यापूर्वी काय काय घडलंय? जाणून घेऊया.

कॅनडामधली भारतीय लोकसंख्या

कॅनडामध्ये भारतीय वंशाची 14 लाख लोकसंख्या असून यापैकी अर्ध्याहून अधिक शीख आहेत. त्यांच्या 2021 जनगणनेनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ही लोकसंख्या 3.7% आहे.

भारतातून कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड मोठी असून 2022 मध्ये 3,20,000 भारतीय विद्यार्थी कॅनडात होते.

एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 40% होतं. तर 2021मध्ये सुमारे 80,000 कॅनेडियन पर्यटकांनी भारताला भेट दिली.

1974

1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली. जगभरातल्या देशांनी याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यामध्ये कॅनडाचाही समावेश होता.

भारताने कॅनडाच्या मदतीने उभारलेल्या CIRUS रिअॅक्टरचा वापर या अणुचाचण्यांसाठी करण्यात आल्याचा संशय कॅनेडियन सरकारने यावेळी व्यक्त केला होता.

1982

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॅनडाचे पंतप्रधान पिएर ट्रुडो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॅनडाचे पंतप्रधान पिएर ट्रुडो

1982 मध्ये भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. खलिस्तानी कट्टरतावादी तलविंदरसिंग परमार याने 1981 मध्ये पंजाबात दोन पोलिसांची हत्या केल्यानंतर कॅनडात पळ काढला होता.

परमारच्या प्रत्यापर्णाची मागणी भारताने कॅनडाकडे केली होती. पण पिएर ट्रुडोंच्या नेतृत्वाखालच्या कॅनडाने ही मागणी फेटाळली होती. यावरून दोन देशांतल्या संबंधात तणाव निर्माण झाला.

लाल रेष
लाल रेष

हाच तलविंदसिंग परमार पुढे बब्बर खालसा संघटनेचा प्रमुख झाला आणि 1985 मध्ये याच संघटनेने एअर इंडियाच्या कनिष्क विमानात स्फोट घडवून आणला ज्यात 329 जण मारले गेले.

कॅनेडियन सरकार खलिस्तानी कट्टरतावाद्यांवर कारवाई करत नसल्याबद्दल तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी नाराजी व्यक्त केली होती.

1984

1984 मध्ये कॅनडात एक मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये इंदिरा गांधींची त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून हत्या होत असल्याच्या प्रसंगाचं सादरीककरण करण्यात आलं होतं.

यावरून तेव्हा नाराजी व्यक्त करण्यात आली होतीच पण सध्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही यावर टीका केली होती.

1998

1998 मध्ये भारताने पुन्हा पोखरणमध्ये अणुचाचणी केली आणि तेव्हाही पश्चिमेतल्या इतर देशांसोबतच भारताचे कॅनडासोबतचे संबंधही ताणले गेले होते.

2018

जस्टिन ट्रुडोंची सहकुटुंब भारत भेट - 2018

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जस्टिन ट्रुडोंची सहकुटुंब भारत भेट - 2018

जस्टिन ट्रुडोंचा भारत दौरा वादग्रस्त ठरला. खलिस्तानी चळवळीशी संबंध असलेल्या जसपाल अटवाल नावाच्या व्यक्तीने मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यावरून वाद झाला.

भारत सरकारमधल्या काहींनी ट्रुडोंच्या दौऱ्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कॅनडाच्या तेव्हाच्या सुरक्षा सल्लागारांनी केला.

जून 2023

हरदीप सिंह निज्जर

फोटो स्रोत, X/VIRSA SINGH VALTOHA

फोटो कॅप्शन, हरदीप सिंह निज्जर

यानंतर भारत - कॅनडा संबंधांमध्ये पुन्हा तणाव सुरू झाला हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येपासून. निज्जर हे कॅनडातल्या व्हॅनकुव्हरमधल्या गुरू नानक सिख गुरुद्वाराचे अध्यक्ष होते.

18 जून 2023 ला एका गुरुद्वाऱ्याच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. निज्जर हे मूळचे जालंधरमधल्या भारसिंह पुरा गावचे.

भारत सरकारच्या म्हणण्यानुसार ते खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख होते आणि खलिस्तान टायगर फोर्सच्या सदस्यांचं नेटवर्किंग, प्रशिक्षण आणि त्यांना अर्थ सहाय्य देण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

सप्टेंबर 2023

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, G20 परिषदेसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सप्टेंबर 2023मध्ये भारतात आले होते.

भारत - कॅनडामधील व्यापारी करारांबद्दलची चर्चा थांबवण्यात आली.

G20 परिषदेसाठी जगभरातले नेते भारतात आले होते. याच परिषदेसाठी भारतात आलेले जस्टिन ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला तणाव दिसून आला. दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली.

बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारताच्या स्टेटमेंटमध्ये भारताने कॅनडातल्या भारतविरोधी खलिस्तानी चळवळीविषयीची काळजी व्यक्त केली होती, तर कॅनडाने त्यांच्या निवेदनात भारताकडून त्यांच्या कामकाजात होणाऱ्या 'Foreign Interference' चा उल्लेख केला होता.

निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंट्सचा हात असल्याच्या आरोपांचा तपास करण्यात येत असल्याचं यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी कॅनेडियन संसदेत जाहीर केलं.

यानंतर कॅनडातल्या आपल्या डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचं जाहीर करत भारताने कॅनेडियन नागरिकांना व्हिसा देणं थांबवलं. नोव्हेंबर 2023 मध्ये पुन्हा व्हिसा द्यायला सुरुवात करण्यात आली.

ऑक्टोबर 2023

भारताने कॅनडाच्या दुतावासातील 40 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आणि परिणामी कॅनेडियन दूतावासातल्या दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना भारत सोडून परतावं लागलं.

कॅनडा शीख फुटीरतावाद्यांना सूट देत असून हे भारतासोबत कॅनडासाठीही चांगलं नसल्याचं भारताने म्हटलं होतं.

नोव्हेंबर 2023

शीख फुटीरतावादी नेते गुरपतवंत सिंह पन्नू यांच्याविरोधात भारताने आरोप दाखल केले. पन्नू यांच्याकडे कॅनडा आणि अमेरकेचं दुहेरी नागरिकत्वं आहे.

Sikhs for Justice (SFJ) या संस्थेचे ते कायदेशीर सल्लागार आणि प्रवक्ते आहेत. या अमेरिकेतल्या शीख फुटीरतादावदी गटावर भारतात 2019 पासून बंदी आहे.

पन्नू यांची अमेरिकेत हत्या करण्याचा कट आपण उधळवून लावल्याचं याच्या काही दिवसांनी अमेरिकन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. या कटात भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय अमेरिकेनेही व्यक्त केला.

फेब्रुवारी 2024

कॅनेडियन तपास यंत्रणा पुरावे सादर करत नाहीत, तोवर भारत निज्जर हत्या प्रकरणी त्यांना माहिती देणार नसल्याचं कॅनडातल्या भारतीय उच्चायुक्तांनी जाहीर केलं.

एप्रिल 2024

निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका असल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्टने छापली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या गोष्टी निराधार असल्याचं म्हटलं.

जून 2024

हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येला वर्षं झालं तेव्हा कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्याआधीच्या महिन्यात पंतप्रधान ट्रुडोंनी पुन्हा एकदा निज्जर हत्या आणि भारताच्या संबंधांचा उल्लेख केला होता, आणि भारताने त्यावर आक्षेप घेतला होता.

ऑक्टोबर 2024

जस्टिन ट्रुडो

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी राजधानी ओटावामध्ये पत्रकार परिषद घेतली.

आणि यानंतर भारताने कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवण्यात भूमिका बजावली असल्याचा आरोप कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांच्या प्रमुखांनी केला आणि याच गोष्टींचा पुनरुच्चार ट्रुडोंनीही केला.

हे आरोप पूर्णपणे निराधार असून, ट्रुडो सरकारचा 'व्होट बँक पॉलिटिक्स' भोवतीचा हा राजकीय अजेंडा असल्याचं भारताने म्हटलं आणि भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यासह इतर भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावून घेण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)