गुरपतवंत सिंग पन्नू आणि निखिल गुप्ता कोण आहेत, ज्यांनी भारताच्या अडचणी वाढवल्यात

गुरपतवंत सिंह पन्नू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गुरपतवंत सिंह पन्नू

न्यूयॉर्कमधील फुटीरतावादी नेत्याची हत्या करण्यासाठी भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांनी एका मारेकऱ्याला पैसे दिल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. हत्येच्या बदल्यात त्याला एक लाख डॉलर (सुमारे 83 लाख रुपये) देण्यात आल्याचं अमेरिकेने म्हटलंय.

अमेरिकेच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, या संदर्भात एका भारतीय अधिकाऱ्याकडून निखिल गुप्ता यांना सूचना मिळाल्या होत्या. माध्यामांमधील वृत्तानुसार, निखिल गुप्ता 52 वर्षांचे असल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकी कोणत्या फुटीरतावादी नेत्याची हत्या करण्यात येणार होती याची नेमकी माहिती फिर्यादी पक्षाने दिलेली नसली तरी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यामांमधील वृत्तानुसार, वकील आणि शीख फुटीरतावादी नेते असलेले गुरपतवंत सिंग पन्नू निशाण्यावर होते.

अमेरिकेने हे प्रकरण भारतासमोर मांडलं असून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले आहेत.

अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या आरोपपत्रात कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं नाही.

बागची म्हणाले, "आम्ही आधीच सांगितलं आहे की, अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेच्या बाजूने संघटित गुन्हेगारी, दहशतवाद, शस्त्रास्त्र व्यापार आणि इतर संबंधाबाबत माहिती देण्यात आली होती. यावर तपास करण्यासाठी भारताने एक विशेष तपास समिती स्थापन केली आहे."

यापूर्वी कॅनडाने शीख फुटीरतावादी नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप केला होता.

अशा परिस्थितीत भारताला अडचणीत आणणारे गुरपतवंत सिंग पन्नू आणि निखिल गुप्ता नेमके कोण आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?

पेशाने वकील असलेल्या पन्नूंचं कुटुंब पूर्व पंजाब मधल्या नाथू चक गावात राहायचं. नंतर ते अमृतसरजवळील खानकोट येथे स्थायिक झालं. पन्नूंचे वडील महिंदर सिंग पंजाब मार्केटिंग बोर्डाचे सचिव होते.

पन्नू यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण लुधियानात झालं. पन्नू यांनी 1990 च्या दशकात पंजाब विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले.

गुरपतवंत सिंह पन्नू

फोटो स्रोत, SOCIALMEDIA

फोटो कॅप्शन, गुरपतवंत सिंह पन्नू

1991-92 मध्ये पन्नू यांनी अमेरिका गाठली आणि तिथे त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात प्रवेश घेतला. इथूनच फायनान्समध्ये एमबीए केलं आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पन्नू यांनी 2014 पर्यंत न्यूयॉर्कमधील वॉल स्ट्रीटवर सिस्टम विश्लेषक म्हणून काम केलं. या काळात ते राजकीयदृष्ट्याही सक्रिय होते.

शीख फॉर जस्टिस म्हणजे काय?

2007 मध्ये पन्नू यांनी शिख फॉर जस्टिस या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं नोंदणीकृत कार्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आहे. तर पन्नूंचं कामकाजदेखील न्यूयॉर्क येथील कार्यालयातूनच चालतं.

भारतातील पंजाब राज्याला स्वतंत्र करून खलिस्तानच्या निर्मिती साठी 'शिख फॉर जस्टिस'ने 'सार्वमत-2020' ही मोहीम सुरू केली होती.

खलिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

याअंतर्गत पंजाब आणि जगभरात राहणाऱ्या शीखांना ऑनलाइन मतदान करण्यास सांगण्यात आलं. मात्र मतदानापूर्वीच भारत सरकारने शीख फॉर जस्टिस आणि खलिस्तान समर्थक म्हणवणाऱ्या 40 वेबसाइट्सवर बंदी घातली होती.

ही संघटना स्वतःला मानवाधिकार संघटना म्हणवते, पण भारताने तिला 'दहशतवादी' संघटना घोषित केलं आहे.

'दहशतवादी' संघटना म्हणून घोषित

भारताच्या गृह मंत्रालयाने 1 जुलै 2020 रोजी बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 (2019 मध्ये सुधारित) अंतर्गत नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.

या यादीत सातव्या क्रमांकावर गुरपतवंत सिंग पन्नूंचं नाव आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणारे पन्नू हे 'सिख फॉर जस्टिस' या अवैध संघटनेचे प्रमुख सदस्य आहेत.

मंत्रालयाच्या मते, 'पन्नू सीमेपलीकडून आणि परदेशातून होणाऱ्या दहशतवादाच्या विविध घटनांमध्ये सामील आहेत. सोबतच पन्नू देशविरोधी कारवाया आणि खलिस्तानी चळवळीत सामील आहेत. पंजाबमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन व्हावं आणि देश अस्थिर व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.'

गृह मंत्रालयाने यापूर्वी 10 जुलै 2019 रोजी यूएपीए अंतर्गत 'सिख फॉर जस्टिस' संस्थेवर बंदी घातली होती.

एनआयएने जप्त केलेली मालमत्ता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएने 15 जानेवारी 2019 रोजी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 120 ब, 124 अ, 153 अ, 153 ब, 505 आणि यूएपीएच्या कलम 13, 17 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

एनआयएचं म्हणणं आहे की, केंद्र सरकारला मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार, भारत आणि परदेशातील काही संस्था आणि व्यक्तींनी 'दहशतवादी' संघटनांसोबत गुन्हेगारी कट रचला आहे. त्यांनी 'खलिस्तानसाठी पंजाब सार्वमत 2020' या नावाने मोहीम सुरू केली असून यात 'सिख फॉर जस्टिस' ही संस्था देखील सहभागी आहे.

एजन्सीच्या मते 'सिख फॉर जस्टिस' सारख्या संघटना शीख समुदायाच्या लोकांना चिथवून भारतापासून पंजाब राज्य वेगळं करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. शिवाय तळागाळात आणि सोशल मीडियावर 'अलिप्ततावादी' व 'दहशतवादी' कारवाया करणं सुरू आहे

एनआयएचं म्हणणं आहे की यामुळे भारताचं सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात आली आहे. या 'अलिप्ततावादी' आणि 'कट्टरपंथी' घटकांमध्ये 'सिख फॉर जस्टिस'चे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंग पन्नू याचाही समावेश आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये, पंजाबच्या मोहाली येथील विशेष एनआयए न्यायालयाने पन्नूंची जमीन आणि घर जप्त करण्याचे आदेश दिले होते.

खलिस्तान

फोटो स्रोत, X/@NIA_INDIA

जप्त केलेल्या मालमत्तेत अमृतसरच्या खानकोट गावातील 5.7 एकर शेतजमीन आणि चंदीगड येथील सेक्टर 15 सी येथील घराचा एक चतुर्थांश भाग आहे.

जप्तीची ही कारवाई यूएपीए अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये करण्यात आली. 3 फेब्रुवारी 2021 रोजी एनआयए न्यायालयाने पन्नूविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. नोव्हेंबर 2022 मध्ये पन्नू यांना न्यायालयाने फरार घोषित केलं.

पंजाबमधील तरुणांना चिथावल्याचा आरोप

पंजाब पोलिसांनी एप्रिल 2020 मध्ये (कोरोना काळात) गुरपतवंत सिंग पन्नू आणि त्याची प्रतिबंधित संघटना 'सिख फॉर जस्टिस' विरुद्ध आयपीसीच्या कलम 124 अ आणि यूएपीएच्या कलम 10 अ, 13(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

त्याच्यावर देशविरोधी कारवाया केल्याचा, ऑटोमेटेड कॉलद्वारे पंजाबच्या तरुणांना भडकवल्याचा आरोप होता.

पंजाबमधील स्पेशल ऑपरेशन सेलचे एआयजी वीरेंद्र पाल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये आणि आसपास राहणाऱ्या लोकांच्या मोबाइल फोनवर उत्तर अमेरिकन प्रदेशातील एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला होता. हा कॉल रेकॉर्डेड होता.

वीरेंद्र पाल यांच्या म्हणण्यानुसार, या मेसेजमध्ये कोरोना साथरोगाच्या काळात कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या नावाखाली पंजाबमधील तरुणांवर अत्याचार होत असल्याचा दावा पन्नूने केला होता. यातून तो तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत होता.

खलिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

पाल यांच्या म्हणण्यानुसार, अशा फोन कॉल्सद्वारे पन्नू सिख फॉर जस्टिसचा फुटीरतावादी अजेंडा पुढे नेण्याचं काम करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा फोन कॉल्सवर लोकांना 'सिख फॉर जस्टिस'च्या धोरणांशी सहमत असल्यास 1 दाबा आणि पंतप्रधान आणि राज्य सरकारच्या धोरणांशी सहमत असल्यास 2 दाबा असं सांगण्यात आलं.

या मेसेजमध्ये पन्नू यांनी असंही म्हटलं होतं की, 'सिख फॉर जस्टिस' प्रत्येक कोरोना रुग्णाला 2,000 रुपयांची आर्थिक मदत देखील देईल.

निखिल गुप्ता कोण आहे?

अमेरिकन न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, भारत सरकारसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सूचनेवरून निखिल गुप्ता यांनी अमेरिकेतील एका मारेकऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला एका शीख फुटीरतावादी नेत्याला ठार मारण्याची सुपारी दिली.

आरोपपत्रात असा दावा करण्यात आलाय की, निखिल गुप्ता यांनी भारतीय अधिकाऱ्याशी केलेल्या संभाषणात अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत सहभागी असल्याची माहिती दिली होती.

आरोप पत्रानुसार, निखिल गुप्तांनी ज्या मारेकऱ्याशी संपर्क साधला तो अमेरिकन गुप्तचर विभागाचा एजंट होता.

या एजंटने निखिल गुप्तांच्या सर्व हालचाली आणि संभाषण रेकॉर्ड केलं आहे. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपपत्रात अमेरिकन एजन्सीच्या तपासाचा हवाला देत गुप्ता आणि भारतीय अधिकारी यांच्यात एनक्रिप्टेड अॅपद्वारे सतत बोलणं व्हायचं. या संभाषणादरम्यान गुप्ता दिल्ली किंवा आसपासच्या परिसरात असल्याचं म्हटलं आहे.

आरोपपत्रात असंही म्हटलंय की, निखिल गुप्तांवर गुजरातमध्ये एक गुन्हेगारी खटला सुरू आहे. यातून बाहेर पडण्याच्या बदल्यात त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एका भारतीय अधिकाऱ्यासाठी हत्या करण्याचं मान्य केलं होतं.

निखिल गुप्ता

फोटो स्रोत, US DEPARTMENT OF JUSTICE

आरोपपत्रात असा दावा करण्यात आलाय की, 12 मे रोजी गुप्तांना त्याच्याविरुद्धचा फौजदारी खटला मागे घेतल्याचं सांगण्यात आलंय.

त्यांना असंही सांगण्यात आलं की, इथून पुढे गुजरात पोलिसांकडून कोणीही कॉल करणार नाही.

23 मे रोजी, भारतीय अधिकाऱ्याने गुप्ता यांना पुन्हा आश्वासन दिलं की, त्यांचं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालं असून गुजरातमधील प्रकरण संपलेलं आहे. इथून पुढे तिथून कॉल येणार नाही

आरोपानुसार, अमेरिकेच्या विनंतीनंतर निखिल गुप्ता यांना 30 जून 2023 रोजी चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली. लवकरच त्यांना अमेरिकेच्या ताब्यात देण्यात येईल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)