हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात चौथा भारतीय अटक, कॅनडा पोलिसांचा दावा

हरदीप सिंह निज्जर

फोटो स्रोत, SIKH PA

    • Author, जेसिका मर्फी
    • Role, बीबीसी न्य़ूज, टोरंटो

शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या आरोपाखाली चौथ्या भारतीय नागरिकाला अटक केल्याचा दावा कॅनडाच्या पोलिसांनी केला आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

तपास पथकाने सांगितले की, हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी अमरदीप सिंगला 11 मे रोजी अटक करण्यात आली.

22 वर्षीय अमरदीप सिंग याच्यावर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

यापूर्वी याच हत्या प्रकरणात कॅनडाच्या पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांना अटक केली होती. यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांची करण ब्रार, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग अशी नावं असून, त्यांच्यावर हत्या आणि हत्येचा कट रचण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

यापूर्वी फुटीरतावादी शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्ये प्रकरणी तीन भारतीय नागरिकांना अटक केली असल्याचा दावा कॅनडा पोलिसांनी केला होता.

भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये निज्जर यांच्या हत्येनंतर एक मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

कॅनडातील व्हँकुव्हरजवळ गेल्यावर्षी जून महिन्यात 45 वर्षीय हरदीप सिंग निज्जर यांच्यावर मास्क परिधान केलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या घटनेनंतर हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांच्याकडं ठोस पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

भारताने मात्र याबाबतचे आरोप फेटाळून लावले होते.

यापूर्वी कोणाला झाली अटक?

पोलिस अधिकारी मनदीप मुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात 22 वर्षीय करण ब्रार, 22 वर्षीय कमलप्रित सिंग आणि 28 वर्षीय करणप्रित सिंग यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे तिघंही एडमंटन, अल्बर्टा याठिकाणी राहत होते. त्याठिकाणाहूनच पोलिसांनी त्यांना अटक केली.

कोर्टातील रेकॉर्ड्सनुसार या तिघांवर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले सगळे गेल्या तीन ते पाच वर्षांपासून कॅनडामध्ये राहत होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून या सर्वांचा "भारत सरकार"बरोबर काही संबंध आहे का, हेही तपासलं जात आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

सहायक आयुक्त डेव्हिड टेबोल म्हणाले की, "या प्रकरणांमध्ये स्वतंत्र चौकशी केली जात आहे. यामध्ये फक्त आज अटक केलेल्या लोकांचाच सहभाग असेल, असंही काही नाही."

या प्रकरणी तपास करणारे भारतीय अधिकाऱ्यांच्या साथीनं काम करत आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून असं एकत्र काम करणं अत्यंत आव्हानात्मक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

या हत्येमध्ये इतरही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून, भविष्यात आणखी काही जणांना या प्रकरणी अटक केली जाऊ शकते, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

कोण होते निज्जर?

हरदीप सिंह निज्जर हे फुटीरतावादी शीख नेते होते. खलिस्तानच्या भूमिकेसाठी ते सार्वजनिकरिपणे काम करत होते. भारतात स्वतंत्र शीख राष्ट्राची त्यांची मागणी होती.

1970 च्या दशकात शिखांच्या एका समुहानं भारतात फुटीरतावादी चळवळ सुरू केली होती. त्यात हजारो लोक मारले गेले होते.

त्यावेळपासूनच शिखांची लोकसंख्या जास्त असलेल्या देशांमध्ये या आंदोलनाचं सक्रिय काम केलं जात आहे.

भारतानं निज्जरला आधीच ‘दहशतवादी’ घोषित केलं आहे. निज्जर एका कट्टर फुटीरतावादी गटाचं नेतृत्व करत होते, असं भारताचं मत आहे.

निज्जर यांचे समर्थक मात्र हे दावे खरं नसल्याचं म्हणतात. निज्जर यांना त्यांच्या आंदोलनांमुळं धमक्या मिळत होत्या, असा समर्थकांचा आरोप आहे.

हरदीप सिंह निज्जर

फोटो स्रोत, SIKH PA

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्यावर्षी 18 जूनला व्हँकुव्हरच्या पूर्वेला 30 किलोमीटर अंतरावर सरे शहरातील गुरू नानक गुरुद्वाऱ्याच्या बाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

कॅनडाच्या गुप्तचर संस्थांनी निज्जर यांच्या जीवाला धोका असून ते ‘हिट लिस्ट’मध्ये असल्याचा इशारा दिला होता, असंही त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा काऊन्सिलचे सदस्य मोनिंदर सिंग 15 वर्षांपासून निज्जर यांचे मित्र होते. या प्रकरणातील तपासासाठी शीख समुदाय आभारी असल्याचं त्यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं.

त्याचवेळी सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता असल्याचंही ते म्हणाले. प्रचंड तणाव आणि निराशा असली तरी आशेचा एक किरण असल्याचं मतही त्यांनी मांडलं.

निज्जर यांच्या हत्येनंतर तीन महिन्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी, या प्रकरणाचा संबंध भारताशी असल्याबाबत कॅनडा तपास करत असल्याचं म्हटलं होतं.

भारतीय अधिकाऱ्यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. तसंच कॅनडा ‘खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांना’शरण देत असल्याचा आरोपही भारतानं केला होता.

या तणावामुळं भारतानं कॅनडाला भारतातील त्यांचे राजदूत कमी करण्यासही सांगितलं होतं.