लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध भारत-कॅनडा तणावाशी कसा आला? कॅनेडियन पोलीस नेमकं काय म्हणाले?

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, GETTY IMAGES

    • Author, गुरज्योत सिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये ऐतिहासिक तणाव निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकरणात गुजरातच्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नावही घेतले जात आहे.

सोमवारी (14 ऑक्टोबर) कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) पत्रकार परिषदेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेत, भारतीय गुप्तहेर बिश्नोई गँगसोबत काम करत असल्याचे आरोप केले.

तसंच, भारतीय गुप्तहेर बिश्नोई गँगसोबत कॅनडामध्ये हिंसाचार माजवत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

आरसीएमपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅनडातील गुन्हेगारी कारवायांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोठा सहभाग आहे.

"कॅनडात राहणाऱ्या दक्षिण आशियाई समुदायाला, विशेषत: खलिस्तान समर्थकांना हे लोक लक्ष्य करत आहेत," असे आरसीएमपीचे प्रवक्ते ब्रिजिट गौविन यांनी म्हटले आहे.

“आरसीएमपीच्या दृष्टीने ही संघटित गुन्हेगारी आहे. बिश्नोई गँग सार्वजनिक ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारते आहे. ही गँग भारत सरकारच्या गुप्तहेर खात्याशी संबंधित असल्याची आमच्याकडे खात्रीलायक माहिती आहे," असेही गौविन म्हणाले.

नंतर संघटीत गुन्हेगारीविषयी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात, आरसीएमपीने लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पुन्हा उल्लेख केला.

आरसीएमपीचे प्रवक्ते म्हणाले, "लॉरेन्स बिश्नोई टोळी भारतात खंडणी आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सक्रीय आहे. आपल्या गुन्ह्यांची बिश्नोई गँगने जाहीर कबुली दिलेली आहे. अशा प्रकारच्या इतरही काही गँग आहेत, परंतु मी आता त्यांची नावे घेऊ इच्छित नाही."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

याशिवाय, आरसीएमपीने सांगितले की, "कॅनडामध्ये हत्यांच्या प्रकरणात जवळपास 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 22 आरोपींना खंडणी प्रकरणांत अटक करण्यात आली आहे."

सोमवारी (14 ऑक्टोबर) भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकमेकांच्या 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, "हरदीपसिंग निज्जर या कॅनेडियन नागरिकाची कॅनडाच्याच भूमीवर हत्या झाली. त्यामध्ये भारतीय गुप्तचरांचा सहभाग असल्याचे आमच्याकडे 'खात्रीशीर पुरावे' आहेत."

यापूर्वीही आरसीएमपीने या प्रकरणाच्या तपासाची माहिती जाहीर केली होती.

कॅनडात 2023मध्ये खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली. या प्रकरणात भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता, असा आरोप कॅनडा सरकारकडून करण्यात आला होता.

आरसीएमपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅनडातील कथित गुन्हेगारी कारवायांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गटाची मोठी भूमिका आहे.

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, आरसीएमपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅनडातील कथित गुन्हेगारी कारवायांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गटाची मोठी भूमिका आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर कडक शब्दात प्रतिक्रिया देत, कॅनडाचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत आपल्या निवेदनात म्हटले आहे, की "कॅनडातील ट्रूडो सरकारच्या भूमिकेमुळे आणि तेथील हिंसक वातावरणामुळे भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कॅनडा सरकारवर आता विश्वास उरलेला नाही."

याबाबत भारताने कॅनडाचे प्रतिनिधी स्टीवर्ट व्हीलर यांना बोलावून समज दिली होती. भारतीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या त्या बैठकीत हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय गुप्तचरांच्या असलेल्या सहभागाचे मी पुरावे दिले होते, असा दावा व्हीलर यांनी केला होता.

जून 2023 मध्ये हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

फोटो स्रोत, VIRSA SINGH VALTOHA/FB

फोटो कॅप्शन, जून 2023 मध्ये हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

लॉरेन्स बिश्नोईचं गुन्हेगारी विश्व

आरसीएमपीने केलेल्या आरोपांमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची पाळेमुळे अंडरवर्ल्डमध्ये खोलवर रुजल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लॉरेन्स बिश्नोई याचा जन्म पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुतरावाली या गावात झाला.

पोलिसांच्या नोंदीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचे खरे नाव सतविंदर सिंग आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार लहानपणी गोरापान असलेल्या सतविंदरला त्याचे कुटुंब प्रेमाने लॉरेन्स म्हणू लागले. त्याचे हे टोपण नाव नंतर त्याच्या खऱ्या नावापेक्षाही प्रसिद्ध झाले.

लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुतरन वाली या गावात झाला

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, लॉरेन्स बिश्नोईचा जन्म पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुतरन वाली या गावात झाला

विविध गुन्हेगारी प्रकरणांतील सहभागामुळे लॉरेन्स गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचे नाव अनेक 'हाय प्रोफाईल' गुन्ह्यांशी जोडले गेले आहे.

यामध्ये पंजाबचा प्रसिद्ध गायक शुभदीप सिंग उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचाही समावेश आहे.

सिद्धू मुसेवाला यांची मे 2022 मध्ये मन्सा जिल्ह्यातील जवाहर के गावात सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा परदेशातील साथीदार गोल्डी ब्रार यांने स्वीकारली होती.

याशिवाय बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांच्या प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले आहे.

एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणीही लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले होते.

महाराष्ट्रातील राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत नुकतीच हत्या झाली. या हत्या प्रकरणातील बिश्नोई गँगच्या सहभागाचा पोलीस तपास करत आहेत.

एनआयएने दाखल केले आरोपपत्र

मार्च 2023 मध्ये, भारताच्या ‘एनआयए’ने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि इतर 12 जणांचे ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ सारख्या खलिस्तानवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

एनआयएने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की “2015पासून पोलीस कोठडीत असणारा लॉरेन्स बिश्नोई गोल्डी ब्रारच्या सहकार्याने तुरुंगांमधून 'टेरर-क्राइम सिंडिकेट' चालवत आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये पंजाबमधील फरीदकोट येथे ‘डेरा सच्चा सौदा’चे अनुयायी प्रदीप कुमार यांची हत्या झाली होती. गोल्डी ब्रार या हत्या प्रकरणात आरोपी आहे.”

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, की ‘‘मोहाली येथील पंजाब राज्य गुप्तचर मुख्यालयावर झालेल्या ‘आरपीजी’ हल्ल्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग होता.’’

लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधील भटिंडा तुरुंग आणि दिल्लीतील तिहार तुरुंगासह इतर तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधील भटिंडा तुरुंग आणि दिल्लीतील तिहार तुरुंगासह इतर तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलं होतं.

जानेवारी 2024 मध्ये एनआयएने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की "ऑगस्ट 2022 मध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांविरोधात यूएपीए अर्थात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे."

एनआयएने म्हटले होते की, "‘हे गुन्हेगारी नेटवर्क मोठ्या प्रमाणावर उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत होते."

लॉरेन्स बिश्नोईने पंजाबमधील भटिंडा, दिल्लीतील तिहार तुरुंगासह इतर तुरुंगांचीही हवा खाल्ली आहे.

तो सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे.

'तुरुंगामध्ये असणारा गुन्हेगार बाहेरच्या गुन्ह्यांमध्ये कसा सहभागी असू शकतो,' असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला गेला आहे.

लॉरेन्सच्या तुरुंगातील मुलाखतींवर प्रश्नचिन्ह

तुरुंगातून गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होण्यबाबत तर लॉरेन्स बिश्नोईची चर्चा आहेच. पण त्याने तुरुंगातून प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचीही जोरदार चर्चा झाली.

मार्च 2023 मध्ये एका खासगी वृत्तसंस्थेने लॉरेन्स बिश्नोई याच्या दोन मुलाखती प्रसारित केल्या.

या मुलाखतींमध्ये लॉरेन्सने त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन केले.

लॉरेन्स बिश्नोईच्या या मुलाखतींचा तपास करण्यासाठी पंजाब सरकारने विशेष पथक स्थापन केले होते.

या तपास पथकाने जुलै 2023 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला.

दोन मुलाखतींपैकी पहिली मुलाखत पंजाबमधील खरार येथील सीआयए अर्थात गुन्हे अन्वेषण कार्यालयात घेण्यात आल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले.

तर दुसरी मुलाखत राजस्थानमध्ये चित्रित करण्यात आली.

लॉरेन्सने 2011 मध्ये डीएव्ही कॉलेज चंदीगडमध्ये प्रवेश घेतला जिथे त्याने विद्यार्थी राजकारणाची सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images

या मुलाखती प्रसारित होण्याच्या काही महिने अगोदर चित्रित करण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले.

न्यायालयाने पुढे सांगितले, की “मुलाखत घेतलेल्या व्यक्तीवर पंजाबमध्ये 71 खटले दाखल आहेत. तसेच त्याला बेकायदेशीर कृत्ये केल्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

मुलाखतकर्त्याने या मुलाखतीत बिश्नोई याने सुपारी घेऊन केलेले खून आणि त्याच्या गुन्हेगारी कारवायांचे समर्थन केले आहे. तसेच लॉरेन्सने एका चित्रपट अभिनेत्याला दिलेल्या धमकीचेही समर्थन केले आहे."

लॉरेन्स बिश्नोई याच्या त्या मुलाखतींबद्दल ज्येष्ठ पत्रकार सरबजीत धालीवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, की या मुलाखतीत लॉरेन्सने स्वत:ला खलिस्तान आणि पाकिस्तानविरोधी असल्याचे सांगितले. तसेच त्याने स्वत:ला राष्ट्रवादी म्हणूनही घोषित केले.

विद्यार्थी नेता ते 'ए ग्रेड' गुन्हेगार

विविध माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोईचा जन्म 1992-1993 मध्ये झाला.

लॉरेन्स बिश्नोई हा एक राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचं गाव अबोहरजवळ दुतारवाली हे आहे. हे गाव पंजाबमधल्या फाजिल्का जिल्ह्यात आहे.

फाजिल्का जिल्ह्यात हे गाव असलं तरी या गावाबद्द्ल एक विशेष माहिती लक्षात घेणं आवश्यक आहे. इथून हरियाणा, राजस्थानच्या सीमा अत्यंत जवळ आहेतच त्यातून भारत-पाकिस्तानची सीमा फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे.

लॉरेन्स बिश्नोई

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने लॉरेन्सच्या लहानपणाची आणि गावाची माहिती दिली आहे. लॉरेन्सच्या रंगरुपामुळे त्याला गावात मिल्की असं म्हटलं जाई. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता यांना पाश्चिमात्य नावांची आवड होती म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव लॉरेन्स असं ठेवलं.

बीबीसीचे प्रतिनिधी सुरिंदर मान यांना बिश्नोई ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार लॉरेन्सच्या कुटुंबाकडे सुमारे 110 एकर जमीन आहे.

लॉरेन्सचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. लॉरेन्सचे वडील लविंदर सिंग हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल होते.

लॉरेन्सने 2011 मध्ये चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे तो महाविद्यालयीन राजकारणात सहभागी झाला.

लॉरेन्स 'सोपू' या विद्यार्थी संघटनेचा सक्रिय नेता होता.

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लॉरेन्स बिश्नोई

पंजाब पोलिसांनी गुंडांची एक श्रेणी तयार केली आहे. त्यानुसार 'अ' श्रेणीमध्ये मोठ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुंडांचा समावेश केला जातो.

पोलिसातील नोंदीनुसार, लॉरेन्स 'अ' श्रेणीमधील गुंड आहे. लॉरेन्स 2014 मध्ये पहिल्यांदा तुरुंगात गेला होता.

मे 2022 मध्ये पंजाबी गायक शुभदीप सिंगच्या हत्येपूर्वी लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता.

लॉरेन्स बिश्नोई कोणत्या कायद्याखाली गुजरातच्या तुरुंगात आहे?

लॉरेन्स बिश्नोई एप्रिल 2023 पासून अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात ‘हायप्रोफाइल’ कैदी म्हणून स्थानबद्ध आहे.

बीबीसीचे पत्रकार रॉक्सी गगडेकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीआरपीसीच्या कलम 268 अंतर्गत अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात लॉरेन्स बंदिस्त आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार लॉरेन्सला या तुरुंगातून हलविण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मनाई केली. तसेच त्याचा या तुरुंगातील मुक्काम एक वर्षाने वाढविण्यात आला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)