पुण्याच्या शुभम लोणकरचा पंजाबच्या लॉरेन्स बिश्नोई गँगशी कसा संबंध आला? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
लाँरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करताना संबंधित व्यक्तीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगने घेतली असल्याचे म्हटले. त्यानंतर या हत्येमागे बिश्नोई गँग आहे का? याचा तपासही मुंबई पोलीस करत आहेत.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे? या हत्येचं अकोला कनेक्शन आहे का? तसेच बिश्नोई गँग महाराष्ट्रात कशी पसरली हेच जाणून घेऊयात.
सोशल मीडियातून स्वीकारली जबाबदारी
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर पडल्यानंतर निर्मल नगर परिसरात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तिथं पोहचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.
हत्या झाली त्यावेळी घटनास्थळावर तीन आरोपी होते. यापैकी धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंग या दोन आरोपींनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलं होतं. तसेच शिवकुमार गौतम हा आरोपी फरार आहे. या हत्येबद्दल या तिन्ही आरोपींना मोहम्मह झिशान अख्तर हा आरोपी मदत करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images/ANI
आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 21 राउंड गोळ्या जप्त केल्या असून लारेन्स बिश्नोई गँगचा यात काही हात आहे का? याबद्दल तपास करत असल्याचं मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
दरम्यान, लाँरेन्स बिश्नोई गँगकडून या हत्येची जबाबदारी स्विकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. “शुबू लोणकर महाराष्ट्र” या नावानं ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
हा शुबू लोणकर म्हणजे अकोला जिल्ह्यातील शुभम लोणकर आहे का? ही पोस्ट त्याचीच आहे का? यासंबंधी मुंबई पोलीस तपास करत आहेत.


शुभम लोणकरचा बिश्नोई गँगसोबत संबंध कसा?
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अकोला पोलिसांनी जानेवारी महिन्यात कारवाई केलेल्या प्रकरणातील आरोपींची पुन्हा झाडाझडती घेतली.
16 जानेवारीला शस्त्र तस्करीच्या एका गुन्ह्यात अकोट पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर या दोघांना पुण्यातल्या वारजे परिसरातून अटक केली होती.
शुभम लोणकर पिस्तूल पुरवत असल्याचं समोर आलं होतं. त्याची जामिनावर सुटका झाली होती. पण, त्यावेळी केलेल्या चौकशीमध्ये शुभम लोणकर याच्या मोबाईलमध्ये लाँरेन्स बिश्नोईसोबतचे दोन व्हिडिओ कॉल आणि काही ऑडिओ कॉल सापडले होते.
त्यामुळं बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्यानंतर फक्त तपासासाठी या दहाही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.

फोटो स्रोत, TWITTER
आठ आरोपींची चौकशी केली. शुभण लोणकर आणि प्रवीण लोणकर यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता ते दोघेही घरी नव्हते.
दोघेही जून महिन्यापासून गायब असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली, अशी माहिती अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणारी फेसबुक पोस्ट आम्ही देखील पाहिली. पण, ती पोस्ट ज्या शुबू लोणकर महाराष्ट्र नावानं व्हायरल झाली तोच हा शुभम लोणकर आहे का? याची आम्हाला माहिती नाही. त्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत, असं सिंह यांनी सांगितलं.
कोण आहे शुभम लोणकर?
शुभम लोणकर हा मूळचा अकोटमधील नेव्हरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षणही अकोटमध्येच झालं असून तो 32 वर्षाचा आहे. तो आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर पुण्यात दूध डेअरीमध्ये काम करत असल्याचं आमच्या चौकशीत समोर आलं होतं, असंही बच्चन सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान अकोला पोलिसांनी शुभम लोणकरचे लाँरेंन्स बिश्नोईसोबत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल अद्यापही यायचा आहे.
प्रवीण लोणकरला पुण्यात अटक
मुंबई पोलिसांनी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातील वारजे परिसरातून 13 सप्टेंबरला सकाळी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण लोणकरने या हल्लेखोरांना राहण्यासाठी भाड्यानं रुम दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि गुरमैल सिंह हे तिन्ही आरोपी पुण्यात स्क्रॅप गोळा करायचं काम करायचे आणि पुण्यातल्या वारजे परिसरात राहत होते. ते नेहमी मुंबईला ये-जा देखील करत होते.
प्रवीण लोणकरही या आरोपींच्या खोलीपासून काही अंतरावर त्याच परिसरात राहत होता. अकोल्याच्या जुन्या प्रकरणात प्रवीण लोणकरला देखील अटक झाली होती.
त्याचा भाऊ शुभम लोणकर आणि लाँरेन्स बिश्नोईचे व्हिडिओ कॉलही पोलिसांना सापडले होते. त्यामुळे हे दोन्ही भाऊ बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बिश्नोई गँगचं काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?
29 मे 2022 ला पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी लाँरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली होती. त्यानतंर या प्रकरणात लाँरेन्स बिश्नोईच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.
या टोळीत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातली दोन मराठी मुलं होते. संतोष जाधव या प्रकरणात शॉर्प शूटर असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी त्याला गुजरातमधून अटक केली होती.
संतोष हा मूळचा आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी गावचा. पण, वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याची आई त्याला आणि त्याच्या लहान बहिणीला घेऊन मंचर इथे राहायला आली.
संतोष हा अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगार म्हणून समोर आला. 2017 साली एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच 2019 मध्ये त्याच्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
पुढं त्यानं सोशल मीडियावरून पोस्ट टाकत स्वतःच्या पूर्व साथीदार ओंकार बाणखेलेची हत्या केली होती.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात दुसरं नावही पुणे जिल्ह्यातलं होतं. ते म्हणजे सौरभ महाकाळ. सौरभ महाकाळ हा नारायणगावचा रहिवासी आहे. त्यानं संतोष जाधवला मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
तो लहान असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला असून तो त्याच्या नातेवाईकाकडे वाढला. तो देखील लहान वयातच गुन्हेगारीकडे वळला. पण, तो बिश्नोई गँगपर्यंत कसा पोहोचला? तर सौरभ महाकाळ 2021 मध्ये संतोष जाधवच्या संपर्कात आला.
त्यानंतर त्याच्या माध्यमातून सौरभ महाकाळचा बिश्नोई गँगचा सदस्य विक्रम बरारसोबत संपर्क झाला होता. हा तोच विक्रम बरार आहे ज्याला त्यानंतर सौरभ सातत्यानं विक्रम बराडच्या संपर्कात होता. त्याच्याच मार्फत तो पंजाब, हरयाणा, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यात गेला होता, अशी माहिती त्यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी दिली होती.

पण, ही मुलं या गँगकडे का वळली असावीत? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो.
याबद्दल सिद्धू मुसेवालाची हत्या झाली त्यावेळी मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकारानं नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं होतं, “पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात लहान वयातच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांचं प्रमाण मोठं आहे. यातूनच त्यांच्या गँग तयार होतात."
बेकायदेशी कामातून मिळणाऱ्या पैशांची त्यांना चटक लागते. छोटे गुन्हे करता करता ते मोठे गुन्हे करायला लागतात, असं ते म्हणाले होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











