You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विषारी सापांच्या जंगलात तब्बल 529 दिवस जगलेल्या 'व्हॅलेरी' कुत्रीची गोष्ट
- Author, ब्रँडन ड्रेनन
- Role, बीबीसी न्यूज
ऑस्ट्रेलियाच्या कांगारू बेटावरील घनदाट जंगल, विषारी साप, भीषण उष्मा आणि काळजात धडकी भरवणारा 529 दिवसांचा संघर्ष आणि चमत्कारिकरीत्या जिवंत सापडलेली व्हॅलेरी…
हे वर्णन एखाद्या व्हीआयपी व्यक्तीच्या शोध मोहिमेचं नाही.
एका पाळीव कुत्रीच्या शोधासाठी तिच्या मालकांनी केलेले प्रयत्न आणि बचाव पथकानं आशा न सोडता शर्थीचे प्रयत्न करुन या घनदाट जंगलात तब्बल 5000 किमी प्रवास केला आणि या मिनिएचर डॅशहंड जातीच्या व्हॅलेरीला अखेर शोधून काढलं.
ऑस्ट्रेलियाच्या एका घनदाट जंगलात सुमारे 500 दिवस घालवल्यानंतर 'मिनिएचर डॅशहाउंड' या प्रजातीची एक कुत्री जिवंत सापडली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टी भागातील कांगारू बेटावर 'व्हॅलेरी' नावाची ही कुत्री सापडली आहे. या श्वानाला शोधण्यासाठी वन्यजीव बचाव पथकानं अनेक दिवस "रात्रंदिवस" मेहनत घेतल्याचं कांगाला वन्यजीव बचाव पथकानं सांगितलं.
कॅम्पिंगला गेले अन् व्हॅलेरी बेपत्ता झाली
नोव्हेंबर 2023 मध्ये, व्हॅलेरी ही कुत्री कॅम्पिंग ट्रिपवर आली असताना बेपत्ता झाली होती, असं तिच्या मालकांनी सांगितलं.
जॉर्जिया गार्डनर आणि तिचा प्रियकर जोशुआ फिशलॉक यांनी व्हॅलेरीला खेळण्यासाठीच्या प्लेपेनमध्ये ठेवले आणि ते दोघं मासेमारीसाठी गेले. जेव्हा ते परतले, तेव्हा व्हॅलेरी तिथे नव्हती.
भयानक उष्णता, जागोजागी विषारी साप या सर्वांपासून स्वतःला दूर ठेवत व्हॅलेरीनं सुमारे 529 दिवस अक्षरशः स्वतःला वाचवलं.
जॉर्जिया गार्डनरच्या शर्टच्या वासाच्या आधारे शोध घेण्यात आला आणि त्या आधारे व्हॅलेरीचा शोध लागला.
1000 तास अन् 5000 किमी प्रवास
"अनेक आठवड्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, आम्ही व्हॅलेरीला सुरक्षितपणे वाचवलं. तिची तब्येत चांगली आहे," असं कांगाला वन्यजीव बचाव पथकानं सोशल मीडियावर सांगितलं.
बचाव पथकाच्या स्वयंसेवकांनी व्हॅलेरीला शोधण्यासाठी तब्बल 1,000 तासांपेक्षा जास्त आणि 5,000 किमी अंतर प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.
या बचाव कार्यात पाळत ठेवणारे कॅमेरे आणि पिंजरा वापरण्यात आला. पिंजऱ्यात अन्न, जॉर्जिया गार्डनरचे कपडे (शर्ट) आणि व्हॅलेरीच्या खेळण्यांचा समावेश होता.
व्हॅलेरीला पिंजऱ्यात पकडल्यावर, जॉर्जिया गार्डनरचे कपडे घालून व्हॅलेरीच्या जवळ गेली, आणि व्हॅलेरी पूर्णपणे शांत होईपर्यंत तिच्या जवळ बसली, असे कांगाला वन्यजीव बचाव पथकाच्या संचालिका लिसा करन यांनी सांगितलं.
व्हॅलेरी गायब झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच तिथे आलेल्या इतर काही प्रवाशांनी तिला तिथेच एका कारखाली पाहिलं होतं. त्यांना पाहून घाबरलेली व्हॅलेरी झुडूपात पळाली होती, असं वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तामध्ये सांगितलं आहे.
कांगाला वन्यजीव बचाव पथकाचे दुसरे एक संचालक जेरड करन यांनी सांगितलं की, काही दिवसांनी व्हॅलेरीच्या गुलाबी रंगाचे कॉलरसारखं काहीतरी सापडल्याचे तिथल्या लोकांनी सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं.
"माझ्या मते, या जातीच्या कुत्र्यांची जंगलात टिकून राहण्याची क्षमता सर्व कुत्र्यांच्या जातींमध्ये सर्वात कमी आहे. पण त्यांना वास घेण्याची चांगली जाणीव आहे," असं जेरड म्हणाले.
अखेर शोध लागला…
व्हॅलेरीला शोधण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल सोशल मीडियावर प्रकाशित केलेल्या 15 मिनिटांच्या व्हीडिओमध्ये लिसा करन आणि जेरड करन यांनी याचं वर्णन केलं आहे.
पिंजऱ्यात व्हॅलेरी योग्य ठिकाणी जाऊन शांत होईपर्यंत त्यांना थांबावं लागलं, आणि त्यानंतरच ती पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही याची खात्री केली, असं लिसा करन यांनी सांगितलं.
"पिंजऱ्यात व्हॅलेरीला जिथं ठेवायचं होतं तिथे ती गेली. त्यानंतर दरवाजा बंद करण्यासाठी मी बटण दाबलं. सर्व काही उत्तम प्रकारे झालं," असं जेरेड करन म्हणाले.
मला माहीत आहे की, "व्हॅलेरीला शोधायला एवढे दिवस का लागले?' म्हणून लोक संतापले आहेत. परंतु, व्हॅलेरीला शोधण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत होतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व्हॅलेरीला सापडल्यानंतर, जॉर्जिया गार्डनरने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तिने म्हटले की, "ज्या लोकांनी त्यांचा पाळीव प्राणी गमावला आहे, त्यांनी आपला आशा, विश्वास गमावू नये. काही वेळा चांगल्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)