You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
41 कोटींची गाय! भारतातून ब्राझीलमध्ये विक्री झालेल्या 'या' ओंगल वंशाच्या गायीचं काय आहे वैशिष्ट्य?
- Author, गरिकिपती उमाकांत
- Role, बीबीसीसाठी
आंध्र प्रदेशातल्या ओंगल गावातली एक गाय ब्राझीलच्या बाजारात 41 कोटी रुपयांना विकल्याचं समजताच भलतीच प्रकाशझोतात आली आहे.
ओंगल या जातीच्या या गाईला ब्राझीलमध्ये वियातिना-19 या नावानं ओळखलं जातं. फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलमध्ये झालेल्या लिलावात ही गाय मोठ्या किमतीला विकली गेली.
जगातली सर्वात महागडी गाय म्हणून या ओंगल गाईची नोंद झालीय.
या विक्रीनंतर आंध्र प्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यातल्या, विशेषतः करवाडी गावाच्या रहिवाश्यांनी आनंद व्यक्त केला. ओंगल जातीची गाय भारतीय असणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं.
गायीनं देशाची मान उंचावली
प्रकाशम जिल्ह्यातल्या ओंगल विभागापासून जवळपास 12 किमी अंतरावर करवाडी हे गाव आहे.
पोलावरपू चेंचुरामईय्या या गावकऱ्यानं 1960 ला एका ब्राझिलीयन नागरिकाला या ओंगल जातीची एक गाय आणि एक बैल विकला होता. त्यांचं पिल्लू, म्हणजे ही गाय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इतक्या मोठ्या किमतीला विकली गेली याचा आनंद चेंचुरामईय्या यांना झालाय.
पोलावरपू वेन्कटरामईय्या हे गावचे माजी सरपंच. एका गायीमुळे आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव सर्वदूर पोहोचत असल्याचं ते सांगत होते.
आंध्र प्रदेशात 4 लाख ओंगल जातीची जनावरं
"1962 ला टीको नावाच्या एका माणसानं एक बैल 60 हजार रुपयांना विकत घेतला आणि ब्राझीलला नेला. त्याने त्याचं वीर्यही जतन करून ठेवलं. ते अजूनही ब्राझिलीयन नागरिकांकडे आहे," ओंगल भागात शेती करणारे डॉ. चुंचू चेलामिया बीबीसीशी बोलताना सांगत होते. ते या ओंगल जातीवर संशोधन करत आहेत.
"मी त्या बैलालाही पाहिलं आहे. दिल्लीत झालेल्या पशू स्पर्धेत त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. तेव्हा पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीही अभिनंदन केलं होतं. म्हणूनच ब्राझिलीयन लोकांनी तो विकत घेतला," 88 वर्षांचे चेलामिया पुढे सांगतात.
लॅम फार्मचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. मुथ्थाराव सांगतात की ओंगल जातीची 4 लाख जनावरं आंध्र प्रदेशात आहेत. तर ब्राझीलमधल्या एकूण 22 कोटी जनावरांपैकी 80 टक्के पैदास ही ओंगल जातीच्या जनावरांनीच करण्यात आली आहे.
ओंगल गायीचं वैशिष्ट्य काय?
जनावाराचा शुभ्र रंग, सुडौल बांधा, राजबिंड रूप आणि पाठीवरचा उंचवटा पाहताना माणूस हरखून जातो.
गायीच्या इतर अनेक जाती असल्या तरी ओंगल त्यात वेगळी ठरते. त्यांचं वजन जवळपास 1100 किलो असतं. ते अतिशय ताकदवान असतात.
अतिशय उष्ण वातावरणातही ते तग धरून राहतात. सहज आजारी पडत नाहीत. फार चपळ असतात.
त्यांना एकदा जुंपलं तर पाच ते सहा एकर वावर नांगरूनच थांबतात. अशा जातीच्या गुराचं जन्मस्थान आहे प्रकाशन जिल्हा.
"गुंडलकम्मा आणि पलेरू या दोन नद्यांच्या मधल्या भागात या जगप्रसिद्ध ओंगल जातीचा उगम झाला आहे. या भागातली मातीची स्थिती, मातीमधली क्षाराचं प्रमाण आणि ते खात असलेलं गवत या सगळ्यातून ओंगल जातीला त्याची शक्ती मिळाली आहे," दुग्गीनेनी गोपीनाथ, ओंगलमधल्या शेतकरी संघटनेचे नेते सांगत होते.
ओंगल बैलांची संख्या कमी होतेय?
आंध्रप्रदेशच्या भागात एकेकाही ओंगल बैलांची जोडी कुठेही सहज दिसायची. मात्र कृषी क्षेत्रातलं वाढतं यांत्रिकीकरण, नगदी पिकांची वाढती मागणी आणि तांदळाचं घटतं उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांसाठी या जनावरांची काळजी घेणं अवघड होतं.
त्यामुळेच त्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे.
"मी गेल्या चाळीस वर्षांपासून शेती करतो. लहानपणी आम्ही बैलांसोबत शेत नांगरायचो. आता ट्रॅक्टर आल्यानंतर शेतीतून बैल नाहीसाच झालाय," मंडावा श्रिनिवास राव, एक शेतकरी सांगतात.
"कारवाडीतून पूर्वी अनेकदा बैलांची ब्राझीलला निर्यात व्हायची. आता तिथेही बैल दिसत नाहीत," असं गावातलेच एक शेतकरी, नागिनेनी सुरेश, सांगतात.
"1990 नंतर बैलांसोबत शेत नांगरणं जवळपास बंदच झालेलं दिसतं. ट्रक्टर वापरून नांगरणी वाढली. त्यामुळे आता आर्थिक परिस्थिती चांगली असणारे किंवा बैलांच्या शर्यतीचा नाद असणारेच या बैलांना सांभाळू शकतात," डॉ. चेलामिया सांगत होते.
पण काही ठिकाणी अजूनही शेतात बैलांचा वापर केला जातो. विशेषतः तंबाखूच्या शेतात नांगरणीसाठी बैल वापरतात.
"मी अजूनही चार बैलांसोबत शेती करतो. आम्ही एका दिवसात चार ते पाच एकर नांगरतो," एक शेतकरी, सिंगमसेट्टी अंकम्मा राव, सांगतात.
मांसाहारासाठ प्रसिद्ध
भारतात जनावरांचा वापर दुधासाठी किंवा शेतीसाठीच केला जातो. पण इतर देशात परिस्थिती वेगळी असल्याचं चेलामिया सांगतात.
"ब्राझीलमध्ये 80 टक्के गाय आणि बैल हे मांसाहारासाठी वापरले जातात. काही बैलांना पाठीवर उंचवटा नसतो. त्यांचंही वजन 450 ते 500 किलो असतं," ते म्हणतात.
पण ओंगल बैलांचं वजन 1100 ते 1200 किलोपर्यंत वाढतं. तिकडे बैलांच्या खाण्यापिण्यावरही फार पैसा खर्च होत नाही. त्यांच्या मांसांत चरबीचं प्रमाण कमी असतं, असं म्हटलं जातं.
त्यामुळे या बैलांना लोकांची पसंती असते, असं डॉ. चेलामिया सांगतात.
ओंगल बैलांचा वापर करून नवीन जातींची पैदास केली जात आहे.
पशुपालनावर अवलंबून असलेल्या ब्राझीलसारख्या देशांत ओंगल जातीच्या जैविक गुणसुत्रांचा वापर करून नवीन जमाती तयार केल्या जात आहेत.
"ब्राह्मण ही जात ओंगल जातीतूनच जन्माला आली आहे. ब्राझीलमधली 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनावरं ओंगल जातीच्या संकरणातूनच आली आहेत. त्यांचा विशेषतः मांसासाठी वापर केला जातो," डॉ. चेलामिया पुढे सांगतात.
नव्या जमाती कशा तयार केल्या जातात?
सर्वसाधारणपणे ओंगल गाय सहा वेळा जन्म देते. पण अलिकडेच ब्राझीलमध्ये नवा प्रयोग सुरू झाला असल्याचं चेलामिया पुढे सांगतात.
ते म्हणाले, "ओंगल गाय आणि बैलाची अंडी काढून कृत्रीम गर्भधारणा केली जाते. तो गर्भ तिथल्या स्थानिक गायीच्या पोटात वावला जातो. अशा पद्धतीनं ओंगल जातीचं उत्पादन वाढवलं जातं."
सरकारनं लक्ष द्यावं
ओंगल गायीचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी विकास करण्याचे प्रयत्न सरकारने केले पाहिजेत, असं शेतकरी संघटनेचे नेते एस. गोपीनाथ सुचवतात.
त्यासाठी ब्राझीलप्रमाणेच भारतातही अभ्यास आणि संशोधन व्हायला हवं. या जातीचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.
ओंगल जातीचा खजिना जतन करण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत नसल्याची खंत डॉ. चेलामिया यांनीही व्यक्त केली.
मात्र, ओंगल जात जपण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्यापरीने पूर्ण प्रयत्न करत असल्याचं चडालवाडामधल्या पशुधन उत्पादन केंद्राचे निर्देशक डॉ. बी. रवी आणि गुंटूरमधल्या लॅम फार्म पशु संशोधन केंद्रातले मुख्य वैज्ञानिक डॉ. एम. मुथ्थाराव बीबीसीशी बोलताना सांगत होेते.
ओंगल गाय आणि बैलाच्या संवर्धनासाठी सरकारने तीन केंद्र उभारली असल्याचंही बी. रवी यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)