'हे' प्राणी, पक्षी आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर रडतात, प्रसंगी जीवही सोडतात

    • Author, जास्मिन फॉक्स-स्केली
    • Role, बीबीसी

दुःख व्यक्त करणं किंवा दुःखी होणं हा मानवी गुणधर्म असल्याचं मानलं जातं.

पण इतर प्राणी म्हणजे शार्क व्हेल (किलर व्हेल) असो किंवा कावळा हे प्राणी दुःखी होतात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? हे प्राणीही आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर दुःखी होतात.

जसं माणूस जवळच्या व्यक्तीला गमावल्यावर शोक किंवा दुःख व्यक्त करतो, त्याचप्रमाणं अनेक प्राणी आणि पक्षी देखील त्यांचे प्रियजन गमावल्यानंतर तीव्र दुःख व्यक्त करतात.

काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टनच्या किनारपट्टीवर एक मादी किलर व्हेल तिच्या मृत पिल्लाला ढकलताना दिसली.

ऑर्काला (किलर व्हेल) ताहलेक्वाह नावानं ओळखलं जातं. तिला 2018 मध्ये देखील असंच करताना पाहण्यात आलं होतं. त्यावेळीही तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी, ताहलेक्वाह तिच्या मृत पिल्लाला 17 दिवस ढकलत होती. ती त्या मृत पिल्लाला सतत परत आणत होती आणि बुडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होती.

विशेष म्हणजे किलर व्हेल दिवसाला सरासरी 120 किमी (75 मैल) प्रवास करू शकते.

अशा प्रकारे आपल्या मृत पिल्लाला वाहून नेणारी व्हेल ही एकमेव प्रजाती नाही. वर्ष 2021 मध्ये, एडिनबर्ग प्राणीसंग्रहालयानं दिलेल्या अहवालात एका चिंपांझीचा उल्लेख आहे.

'प्राण्यांसाठीही असते तणावाची स्थिती'

लियान नावाच्या चिंपाझीनं एका मृत पिल्लाला जन्म दिला होता. त्यावेळी लियान त्या पिल्लाचं शरीर सोडण्यास तयार नव्हती.

ती ते मृत पिल्लू घेऊन प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात घुटमळत होती. ती कोणालाही त्या पिल्लाच्या शरीराला हात लावू देत नव्हती.

प्राण्यांमध्ये काही बुद्धिमान सस्तन प्राणीही आहेत, जसं की डॉल्फिन्स आणि माकडं, हे देखील अशा प्रकारे वागताना दिसले आहेत.

"दु:खाच्या दृष्टीकोनातून विचार न करता हे वर्तन पाहणं कठीण आहे, असं वाटतं. कारण माणूस म्हणून, जर आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावलं, तर आपण त्या व्यक्तीस कोणत्या तरी पद्धतीनं जोडले जावू अशी आपली इच्छा असते," असं कार्डिफ विद्यापीठातील संज्ञानात्मक विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात तज्ज्ञ असलेल्या संशोधक बेकी मिलर म्हणतात.

"प्रिय असलेल्या मृत व्यक्तीशी संबंध टिकवून ठेवण्याच्या अशा प्रकारच्या इच्छेचं हे एक अत्यंत साधं स्पष्ट रूप आहे."

मिलर यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणांमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, हे प्राणी जिवंत असलेल्या त्यांच्या इतर पिल्लाप्रमाणं त्या मृत पिल्लाशी वागत नाहीत. यावरून हे लक्षात येतं की, त्यांच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे, हे त्यांना समजलं नाही असं म्हणता येणार नाही.

"ही एक अशा प्रकारची तणावाची स्थिती असते, जिथं प्राणी ती पूर्णपणे सोडू शकत नाहीत," असं मिलर म्हणतात.

त्या पुढं म्हणाल्या, "ते ज्या नव्या जगाला सामोरं जात आहेत, त्याच्याशी जुळवून घेण्याचा आणि ते नुकसान समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत."

"मानव आणि प्राणी दोघंही या फेरबदलाच्या काळातून जात असल्याचे हे संकेत आहेत. एका उदाहरणातून मिलर याकडे लक्ष वेधतात, प्राणी त्यांच्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या साथीदारांचा शोध घेतात. तर माणूसही शोकविधीच्या काळानंतर ज्याला शोध वर्तन म्हणतात त्यामध्ये गुंततो. अशावेळी तो मृत व्यक्तीच्या पाऊलखुणा किंवा संकेत शोधतो."

"1999 मध्ये, भारतीय प्राणीसंग्रहालयातील एक वृद्ध मादी हत्तीणीचा दुःख सहन न झाल्यानं मृत्यू झाला होता. या वृद्ध हत्तीणीच्या कळपातील एका तरुण हत्तीणीचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्याचं दुःख त्या वृद्ध हत्तीणीला झालं होतं. त्यातच ती हत्तीणी मरण पावली.

'काही प्राण्यांची वर्तणूक माणसांसारखी'

काहीवेळा ही वर्तणूक मृत्यूनंतरही कायम राहू शकते. प्रसिद्ध उदाहरणांमध्ये ग्रेफ्रायर्स बॉबीचा समावेश आहे. टेरियर जातीच्या श्वानानं (कुत्रा) एडिनबर्ग, स्कॉटलंडमध्ये त्याच्या मालकाच्या कबरीचे 14 वर्षे रक्षण केले.

तर हाचिको अकिटा हा कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूनंतरही जपानमधील एका रेल्वे स्टेशनवर त्याची वाट पाहत राहिला.

"जवळच्या साथीदाराला गमावल्यानंतर प्राण्यांमध्ये तीव्र दुःख दर्शवणाऱ्या काही कथाही सांगितल्या जातात. काही अहवालात असं म्हटलं आहे की, आपल्या पिल्लाला किलर व्हेल खात असल्याचं पाहून सी लायन मादी दुःखात व्याकूळ होऊन रडते."

याबाबत इतर उदाहरणंही आहेत. मानववंश शास्त्रज्ञ बार्बरा किंग यांनी त्यांचं पुस्तक "हाऊ ॲनिमल्स ग्रीव्ह" मध्ये मांजर, कुत्रे आणि ससे आपल्या सहकाऱ्यांचा शोध घेतात, रडतात, असं म्हटलं आहे.

घोडे त्यांच्या कळपातील सदस्याला जिथं पुरलेलं होतं तिथं जमा झाल्याचं वर्णन केलं आहे.

1999 मध्ये, एका भारतीय प्राणीसंग्रहालयातील दामिनी नावाची एक वृद्ध मादी हत्तीण आपल्या सहकारी हत्तीणीच्या मृत्यूचा धक्का सहन करु शकली नाही.

दामिनीची एक तरुण सहकारी होती. तिचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. हे दुःख दामिनीला सहन झालं नाही.

या मृत हत्तीणीसमोर दामिनी अश्रू ढाळत उभी असल्याचे दिसले. नंतर दामिनी इतकी उदास झाली की तिने अन्न खाणं बंद केलं. अखेर उपासमारीमुळं तिचाही मृत्यू झाला.

'पक्षी देखील शोक व्यक्त करतात'

जेन गुडॉल, एक इंग्लिश प्राइमेटोलॉजिस्ट आहेत, ज्या मागील 60 वर्षांहून अधिक काळ जंगली चिंपांझींचा अभ्यास करत आहेत. त्यांनी फ्लिंट नावाच्या एका तरुण चिंपांझीचं उदाहरण दिलं आहे.

आईच्या मृत्यूनंतर फ्लिंटनं आपल्या कळपातील सहकारी चिंपाझींशी संवाद साधणं बंद केलं, खाण्यास नकार दिला आणि अखेर एक महिन्यानं त्याचा मृत्यू झाला.

या काळात फ्लिंटमध्ये जे काही वर्तनात्मक बदल दिसले त्याला माणसांमध्ये 'क्लिनिकल डिप्रेशन' म्हटलं जातं.

पक्षी देखील शोक व्यक्त करतात, असं दिसून येतं. ग्रेलॅग हंसानं त्याचा जोडीदार गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती.

ऑस्ट्रियन प्राणीशास्त्रज्ञ आणि इथॉलॉजिस्ट कोनराड लॉरेन्झ यांनी त्याचं वर्णन 'माणसाप्रमाणे दुःख व्यक्त करतो अगदी तसंच' या शब्दातं केलं आहे.

हंसाने निराश होऊन आपलं डोकं खाली घेतलं, अन्नात त्याचा रस राहिला नाही आणि सभोवतालच्या जगाबद्दल तो उदासीन झाला.

हे केवळ किस्से नाहीत. अनुभवजन्य अभ्यास देखील सिद्ध करतात की, काही प्राण्यांमध्ये किमान दु:खासारख्या भावना असू शकतात.

प्रयोगशाळेतील अभ्यासातून दिसून येतं की, जेव्हा लहान माकडाच्या आईचा मृत्यू होतो.

तेव्हा ते दु:खाच्या एका विशिष्ट टप्प्यांमधून जातात, ज्यात रडणं आणि किंकाळणं असतं आणि नंतर हळूहळू ते सभोवतालच्या जगापासून अलिप्त होतात.

ते इतरांसोबत खेळत नाहीत, नवीन, रोमांचक, आकर्षक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि अखेरीस गोळ्यासारखं होऊन जातात.

दुसऱ्या अभ्यासात असं आढळून आलं की, जवळच्या नातेवाईकाला गमावलेल्या मादी बबूनमध्ये तणाव संप्रेरकांची (हार्मोन्स) पातळी वाढलेली असते, ही प्रतिक्रिया शोकाच्या काळात माणसांमध्ये देखील दिसून येते.

"ही वर्तणूक खरोखरच दु:ख म्हणून गणली जाते की नाही, हे मुख्यतः तुम्ही दुःखाच्या संकल्पनेची व्याख्या कशी करता यावर अवलंबून असते."

मानवाप्रमाणे प्राणीही अंत्यविधी करतात का?

माणसाचा अंत्यविधी करताना ज्या गोष्टी केल्या जातात, अगदी तशाच पद्धतीचं विधीवत वर्तन काही प्राणी त्यांच्या जवळच्या साथीदाराच्या मृत्यूनंतर करताना दिसतात.

हत्ती हे त्यांच्या कळपातील सदस्याचे अवशेष पाहण्यासाठी जातात. त्यांच्या हाडांना स्पर्श करतात, त्यांच्या सापळ्याच्या बाजूला दीर्घकाळ उभे राहतात.

चिंपांझी मृत प्राण्याचे तोंड आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी ओळखले जातात. कावळे, कबूतर आणि कोकिळांसारखे पक्षी मृत पक्षांच्या भोवती गोळा होतात. काहीवेळा पाने किंवा फांद्या मृत पक्षाच्या जवळ ठेवतात असं सांगितलं जातं.

"काही वर्षांपूर्वी मी एका मित्रासोबत माझ्या बाईकवरुन जात होतो. त्याचवेळी एका मृत मॅग्पीभोवती चार ते पाच मॅग्पीज वर्तुळ करुन उभे असल्याचे मला दिसले होते," असं बोल्डर विद्यापीठातील इकोलॉजी आणि इव्होल्यूशनरी बायोलॉजीचे प्रोफेसर मार्क बेकॉफ यांनी सांगितलं.

" हे सर्व पक्षी त्या मृत पक्षाच्या सभोवताली डोकं खाली घेऊन उभे होते. हलकंच त्या मृत पक्षाला चोच मारत होते. मग त्यातील एक पक्षी उडून गेला आणि त्यानं काही काड्या आणि पानं आणली. दुसऱ्यानेही तेच केलं आणि मग जवळजवळ सर्वांनीच तसं केलं. त्यानंतर त्या मॅग्पींनी डोकं थोडं खाली घेतलं आणि ते उडून गेले."

परंतु, आपण या संकल्पनेची व्याख्या कशी करतो, यावर हे वर्तन खरोखरच शोक किंवा दुःख मानलं जाऊ शकतं का हे मुख्यतः अवलंबून आहे.

हा एक तात्विक प्रश्न आहे, ज्यावर जोरदार वादविवाद किंवा चर्चा केली जाते. या विषयावर एका अलीकडील लेखात मिलर म्हणतात की, शोक साधारणतः दीर्घकाळ सुरू राहतो. जे महिने किंवा वर्षांपर्यंत चालू राहू शकतो.

दुःखाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू हा आहे की, त्यात अनेक वेगवेगळ्या भावनांचा समावेश असतो. 'तुम्हाला दुःख वाटू शकते, परंतु कदाचित इतर भावनाही असू शकतात जसं की राग किंवा आशा देखील असू शकते,' असं मिलर म्हणतात.

दु:खामध्ये आपलं नुकसान आणि त्याचे परिणाम ओळखण्याची एक जटिल प्रक्रिया आहे असे दिसते.

"जरी तुम्हाला कोण मरण पावला आहे हे स्पष्टपणे माहीत असेल, तरी देखील एक असा अर्थ असू शकतो. ज्यामध्ये तो गमावलेला व्यक्ती तुमच्या जगात आणि तुमच्या नेहमीच्या वर्तन आणि विचारांच्या पद्धतींमध्ये अजूनही समाविष्ट झालेला नाही," असं मिलर म्हणतात.

"खऱ्या दु:खासाठी अतिरिक्त मानसिक क्षमता आवश्यक आहे, जी प्राण्यांमध्ये नाही, असा युक्तीवाद काही तत्वज्ञानी करतात."

"म्हणून तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी कदाचित टेबलवर एक प्लेट ठेवायची असेल किंवा संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या गाडीचा आवाज येण्याचा तुम्हाला अंदाज असेल किंवा ते त्यांच्या आवडत्या सोफ्यावर बसलेले असतील आणि अशाच अनेक गोष्टींचा भास होतो. एका अर्थानं तुम्ही ती व्यक्ती तिथे असावी अशी आशा करता, तुम्हाला माहीत असतं की ती व्यक्ती मरण पावलेली आहे, तरी तुमची अपेक्षा असते."

प्राण्यांना साथीदार गमावल्यानंतर होतं दुःख

काही तत्वज्ञानी असा युक्तिवाद करतात की, काही प्राण्यांना साथीदार गमावल्यानंतर निःसंशयपणे दुःख वाटत असलं तरी, खऱ्या दु:खासाठी आणखी जास्त मानसिक क्षमता आवश्यक आहे, जी प्राण्यांमध्ये दिसून येत नाही.

यामध्ये मृत्यू कायमस्वरुपी असण्याची समज आणि ती व्यक्ती आपल्या जीवनातील भविष्यातील घटना आणि टप्पे यासाठी उपस्थित राहणार नाही हे ओळखण्याचा यात समावेश आहे.

तथापि, मिलर नमूद करतात की, ही व्याख्या केवळ प्राण्यांनाच लागू होते असं नाही, तर ती मुले आणि काही प्रौढांनाही लागू होऊ शकते.

"मला वाटत नाही की, सर्व मानवी दुःख मृत्यूशी संघर्ष करत नाहीत. शोक किंवा दुःख करणारी लहान मुलं कदाचित त्या टप्प्यावर त्यांचं नुकसान पूर्णपणे समजू शकत नाहीत, परंतु त्यांचं दुःख कमी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल."

आपल्या लेखात मिलर यांनी दु:खाची व्याख्या बदललेल्या जगात कसं जगावं हे शिकण्याच्या प्रात्यक्षिक प्रक्रियेसारखं केलं आहे. अनुकूलतेची ही व्यावहारिक प्रक्रिया प्राण्यांसाठीही खुली असू शकते.

कारण त्यासाठी बौद्धिक स्वरूपाची समज आवश्यक नसते. शेवटी, मिलर यांचा असा विश्वास आहे की, अनेक प्राणी दुःख अनुभवण्यास सक्षम आहेत.

मिलर म्हणतात, "माझ्या मते, इतर प्राणी एकमेकांशी खूप समृद्ध पद्धतीने आपलं जीवन सामायिक करू शकतात. त्यांच्या वर्तनाचे सर्व नमुने त्या दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असू शकतात.

म्हणून जेव्हा त्यांचा साथीदार मरण पावतो, तेव्हा त्यांनाही अशा प्रकारच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून जावं लागतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)