You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तरस हा प्राणी कसा असतो? कुठे आढळतो? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
तरसाने माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच घडल्याचे जाणकार सांगतात. नेमका हा तरस प्राणी असतो कसा? तो माणसासाठी धोकादायक असतो का? तो कधी हल्ला करु शकतो? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.
तरस प्राणी नेमका असतो तरी कसा?
तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये तरस आढळतात भारतात शरिरावर पट्टे असलेल्या प्रकारातले तरस आढळतात.
भारतातील तरस हे एकटे किंवा त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचा जबडा हा इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मेलेल्या गाई, म्हशी यांची मोठी हाडे फोडून हे तरस खाऊ शकतात इतका मोठा यांचा जबडा असतो.
तरसाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांच्याशी संपर्क केला. कुकडोळकर म्हणाले, ''तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांची हडे उरलेले मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन देखील ते खातात.''
''तरस हा मुख्यत्वे कोरड्या भागात, तसेच पठाराच्या भागात आढळणारा प्राणी आहे. कमी उंचीच्या टेकड्या किंवा जमीनीखाली बिळं करुन हा प्राणी राहतो. कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व अधिक असते. त्याचा जबडा भलामोठा असतो. त्या जबड्यात प्रचंड ताकद असते.''
तरस माणसावर हल्ला करु शकतो का?
तरस माणसावर हल्ला करु शकतं का याबाबत माहिती देताना कुकडोळकर म्हणाले ''वन्यजीव सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. ते माणसापासून सुरक्षित अंतर पाळत असतात. माणूस त्यांच्या जवळ आला तर ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. त्यामुळे तरसामध्ये रेबिज पसरतो. रेबिजची लागण झाली असेल तर ते माणसावर हल्ले करुन चावा घेऊ शकतात. त्याचबरोबर तरस जखमी असेल किंवा मादीसोबत पिल्लं असतील तर ती माणसावर हल्ला करु शकते.'' परंतु तरसाने जाणिवपूर्वक माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच असल्याचं देखील कुकडोळकर सांगतात.
खेडच्या पशुधन विकास अधिकारी विनया जंगले म्हणाल्या, ''तरस सहसा मानवी वस्तीत येत नाही. मानवी वस्तीत आला तर तो कोंबड्या आणि इतर प्राणी खाण्यासाठी येतात. तरसाला जंगलाची स्वच्छता करणारा प्राणी म्हणतात. दुसऱ्या प्राण्याने केलेल्या शिकारीची उरलेली हाडे ते खातात. त्याचबरोबर ससे, पक्षी यांची शिकार देखील ते करतात. माणसावर सहसा ते हल्ले करत नाहीत.''
सर्व प्राण्यांमध्ये शक्तीशाली जबडा
'तरसाचा जबडा हा सर्व प्राण्यांपेक्षा शक्तीशाली असतो. त्याच्या जबड्यात जबरदस्त ताकद असते' अशी माहिती पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाल्या, ''तरसाचे आयुष्य साधारण 15 ते 20 वर्षांपर्यंत असते. तर त्याचे वजन 35 ते 40 किलोइतके असते. महाराष्ट्रात हा प्राणी साधारण अहमदनगर, सासवड, मानकडोह या भागात अधिक आढळतो.''
'तरस शक्यतो निर्जनस्थळी राहतो परंतु शहरीकरणामुळे त्याचा मानवाशी संपर्क वाढू लागला आहे', असं निरीक्षण देखील पाटील नोंदवतात. तरसाचं खाद्य कमी होत असल्याने देखील ते भटकंती करत असल्याचं पाटील म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)