जेव्हा कराचीतून भटकी कुत्री गायब होऊ लागली; बिबट्याच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी शहराची गोष्ट

    • Author, एहसान सब्ज
    • Role, पत्रकार, कराची

कराची शहर हे पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

गगनचुंबी इमारती, मोठ्या कंपन्यांची मुख्य कार्यालयं, बँका आणि औद्योगिक प्रकल्प या शहरात आहेत. पाकिस्तानमधील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं बंदरही या शहरात आहे.

हेच कराची शहर ब्रिटीश काळात बिबट्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध होतं.

1937 साली ख्रिसमसनिमित्त ब्लॅक अँड व्हाईट कॅमेऱ्यानं काढलेलं वरील छायाचित्र दोन मृत बिबट्यांची आहेत. यात ब्रिटीश शिकारी जी. ग्रोसन बेचर आणि या शिकारीसाठी त्यांना मदत करणारे स्थानिक लोक दिसत आहेत.

मोहम्मद मोअज्जम खान हे पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारी संस्था डब्ल्यूडब्ल्यूएफचे पाकिस्तानमध्ये तांत्रिक सल्लागार आहेत.

वर्ष 1937 मध्ये सिंध नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये छापलेल्या या फोटोची आणि ग्रोसेन बेचर यांच्या लेखाची पुष्टीच तर होतेच, शिवाय मोहम्मद मोअज्जम खान यांचं म्हणणं आहे की, 1960 च्या दशकापर्यंत कराचीचा पश्चिम किनारा हा स्थानिक आणि इंग्रज शिकाऱ्यांसाठी 'बिबट्याच्या शिकारीसाठी' (लेपर्ड हंटिंग) आवडतं ठिकाण होतं.

याबाबत मोअज्जम खान सांगतात की, ज्या ब्रिटीश अधिकाऱ्याचा हा फोटो आहे तो 40 च्या दशकात कराचीमध्ये स्थापन झालेल्या मेसर्स अँड स्पिनर्स नावाच्या कंपनीचा व्यवस्थापक होता.

ग्रॉसेन बेचरने ख्रिसमसच्या दिवसाविषयी लिहिलं आहे, "सुट्टीच्या दिवशी माझ्याकडे काही काम नव्हतं, माझं कुटुंब दुसऱ्या देशात होतं आणि मला खूप कंटाळा आला होता. म्हणून मी शिकारीला जाण्याचा निर्णय घेतला. मी घरातून बाहेर पडलो आणि कराचीच्या हद्दीतील मुराद खान धरणाच्या परिसरात गेलो."

सध्या हकीम मोहम्मद सईद शहीद यांचं हमदर्द विद्यापीठ ही त्या परिसराची ओळख आहे.

"स्थानिक लोकांच्या मदतीनं मी माझ्या 12 बोअरच्या बंदुकीनं एक नव्हे, तर दोन बिबट्यांना ठार केलं. तो एक आश्चर्यकारक दिवस होता, ही ख्रिसमसची संध्याकाळ कधीही विसरता येणार नाही. दोन बिबट्यांची शिकार करताना पाहणं हे कधीही न विसरता येणारं दृश्य होतं."

कराचीचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञही होते शिकारी

24 एप्रिल 1965 रोजी कराचीमधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक 'जंग'मध्ये प्रकाशित झालेल्या या छायाचित्रात कराचीतील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. एच.एम. रिझवी हे त्यांनी शिकार केलेल्या बिबट्यासोबत दिसत आहेत.

हे छायाचित्र प्रसिद्ध करण्याच्या आठवडाभर आधी शहरापासून 40 मैल अंतरावर असलेल्या हब नदीजवळ त्यांनी या बिबट्याची शिकार केली होती.

1977 मध्ये प्रकाशित झालेल्या 'मॅमल्स ऑफ पाकिस्तान' या पुस्तकाचे लेखक डॉ. थॉमस जोन्स रॉबर्ट्स यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

हे तेच डॉक्टर एस.एम.एच. रिझवी आहेत जे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ असण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही काम करत असत.

डॉ. एस.एम.एच. रिझवी यांचे पश्चिम पाकिस्तानचे तत्कालीन गव्हर्नर लेफ्टनंट जनरल अतीकूर रहमान यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना कराचीमध्ये सफारी पार्कच्या स्थापनेसाठी जागा देण्यास पटवून सांगितलं. वन्यजीव तज्ज्ञ हा ऐतिहासिक पराक्रम असल्याचे मानतात.

जेव्हा कराचीतून भटकी कुत्री गायब होऊ लागली

एखादा प्राणी कुत्रे गायब करत आहे, असं सुरुवातीला गावकऱ्यांना वाटलं. म्हणून ते पंजाच्या खुणांचा पाठलाग करत रेधीजवळच्या गुहेत पोहोचले. त्यावेळी तिथं तरस राहत असेल, असं त्यांना वाटलं.

या लेखात असंही म्हटलं आहे की, त्यावेळी एक स्थानिक मच्छीमार सुलेमान स्वतः पुढे आला आणि त्यानं गुहेत जाण्याची तयारी दर्शवली.

"तो कंदील आणि दोरी घेऊन आत गेला. सिंधमध्ये तरसाला जिवंत पकडण्याची ही एक सामान्य पद्धत होती. पण आत जाताच त्यांच्यावर भयंकर बिबट्यानं हल्ला केला. सुलेमानला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण जखमेत पसरलेल्या विषामुळे तो वाचू शकला नाही."

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

बिबट्यांच्या तोंडाला मानवी रक्त लागलं होतं आणि कुत्र्यांनंतर ते स्वत: किंवा त्यांची मुलं पुढची शिकार असू शकतात, अशी भीती मच्छीमारांना वाटत होती. म्हणून त्या सर्वांनी मिळून मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी गोळा केली आणि गुहेच्या तोंडाशी बांधली.

दरम्यान, तेथून सहा मैल अंतरावर असलेल्या मालेर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलीस तेथे पोहोचल्यावर मच्छीमार आणि मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी बंदुका, भाले आणि काठ्या घेऊन बिबट्याला गुहेतून बाहेर काढलं आणि त्याला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला.

गुहेत जुन्या हाडांबरोबरच नुकताच मृत पावलेल्या एका कुत्र्याचे अवशेषही सापडले.

त्यावेळच्या सिंध डिस्ट्रिक्ट गॅझेटियरनुसार, 1896 ते 1915 दरम्यान सिंधमध्ये 21 बिबटे मारले गेले. त्यापैकी दोन वगळता सर्व कराची जिल्ह्यात मारले गेले. यावरून त्या भागात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते.

1920 पासून, पब हिल रांगेतही (कराचीपासून सुमारे 30 मैल अंतरावर असलेल्या लासबेला येथे) अनेक बिबट्यांची शिकार करण्यात आली आहे.

जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनुसार, 1939 मध्ये, कराचीच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 18 मैल अंतरावर असलेल्या रेहरी गोठ या किनारपट्टीवरील मासेमारी गावाजवळ एका प्रौढ नर ब्लॅक पँथरची शिकार करण्यात आली होती.

त्या भागात ब्लॅक पँथरचा शोध आश्चर्यकारक होता. कारण मेलेनिझमसाठी (काळ्या रंगाचे अनुवांशिक वैशिष्ट्य) अनुकूल परिस्थिती नव्हती. त्यामुळं ही एक दुर्मीळ आणि असामान्य घटना होती.

गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे बिबट्या शहरी भागात

किर्थर डोंगररांगेतील बाचल सोनहिरो गावात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नर बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

हे गाव एम 9 मोटरवेपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. किरथर राष्ट्रीय उद्यान 3087 चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे.

हंगोल नॅशनल पार्कनंतर हे पाकिस्तानचं दुसरं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. या भागात मानवी लोकसंख्या कमी असून बाचल सोनहिरोसारखी छोटी गावे आहेत. तिथे अद्यापही चांगले रस्ते नाहीत.

वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक जावेद मेहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रिझवी यांच्यानंतर किरथरमध्ये बिबट्याच्या शिकारीची ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षभरात अशी कुठली घटना रेकॉर्डवर आलेली नव्हती.

दुसरीकडे किरथर राष्ट्रीय उद्यान, दोरेजी आणि इतर परिसरातील बिबटे शहरी लोकवस्तीकडे येण्याची भीती मोअज्जम खान यांनी व्यक्त केली आहे.

"उत्तर प्रदेश आणि राजस्थान या भारतातील राज्यांचं उदाहरण तुम्ही घ्या, जिथे दररोज काही वन्य प्राणी लोकवस्तीत येऊन दहशत माजवल्याच्या घटना घडत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येते.

कुत्रे हे खरं तर बिबट्यांचं आवडतं अन्न आहे आणि जर त्यांच्या मनात आलं तर ते घरातल्या पिंजऱ्यांत बंद ठेवलेल्या कुत्र्यांनाही ओढून नेऊन आपलं भक्ष्य बनवतील."

तज्ज्ञांचं मत असं आहे की, बिबट्या शहरी भागात जाण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानातील गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

याबाबत मोअज्जम खान सांगतात की, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे इको सिस्टीममध्ये बिघाड झाला आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. कुत्रे हे बिबट्यांचे आवडते खाद्य असल्याने आणि शहरी भागात त्यांची संख्या वाढल्याने बिबट्या शहरात येणं स्वाभाविक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)