You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, एल निनो, ला-निनाचा कसा होणार परिणाम?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला. त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'एल निनो' आणि 'ला निना'मुळं निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागानं हे दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आहेत. एल निनो जाऊन ला निना येत असल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचं ते म्हणाले.
हवामान विभागाकडं असलेल्या जवळपास 70 वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तरपणे अभ्यास करून या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचंही महापात्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
त्यानुसार देशातील बहुतांश भागात म्हणजे जवळपास 75 टक्क्यांपेक्षा अधिक भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्वेतील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
नेमका अंदाज काय?
डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत बोलताना, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 5 टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असंही ते म्हणाले. तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील.
आजवरच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान सरासरी 87 सेंमी मीटर पाऊस होत असतो, हा आकडा समोर आलाय. हे 87 सेंटीमीटर प्रमाण म्हणजे देशातील सरासरी पाऊस.
जेव्हा या 87 टक्क्यांच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडत असतो, त्याला सरासरी पाऊस म्हणतात. त्यापेक्षा जास्त म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असतो. तर 90 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस असतो, असंही मोहोपात्रा म्हणाले.
म्हणजेच यावर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या 106 टक्के पाऊस पडू शकतो.
ला निना तारणार?
हवामान विभागाकडं उपलब्ध असलेल्या 1971 ते 2020 पर्यंतच्या माहितीचा अभ्यास करून हवामान विभागानं पावसासंदर्भात महत्त्वाचं विश्लेषण केलं आहे.
एल निनो आणि ला निना या हवामानाच्या परिस्थिती आणि त्याच्या प्रभावाचा विचार करून यंदाची शक्यता मांडण्यात आली आहे.
सध्या एल निनोची स्थिती काहीशी जास्त (मॉडरेट) आहे. पण त्याचा प्रभाव हळू-हळू कमी होत आहे. मान्सून सुरू होईप्रर्यंत तो अगदी कमी (न्यूट्रल) स्थितीला येऊ शकतो. तेव्हापासून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसपास ला निना स्थिती निर्माण होऊ शकते, असं मोहोपात्रा यांनी सांगितलं.
एल निनोचा मान्सूनवर नकारात्मक परिणाम होत असला, तरी ला निनाच्या स्थितीचा पावसावर सकारात्मक परिणाम होतो, ही समाधानकारक बाब असल्याचंही ते म्हणाले.
असा लावला अंदाज
हवामान विभागानं 1951 पासून 2023 पर्यंत कोणत्या वर्षी ला निनाची स्थिती होती याचा अभ्यास केला. त्यात 22 वर्षे ला निनाची स्थिती होती. पण त्यापैकी बहुतांश वर्षी पावसाचं प्रमाण हे सरासरी, सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिवृष्टी झाल्याचं दिसून आलं.
त्यात अपवाद फक्त 1974 आणि 2000 चा होता. त्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.
त्याचबरोबर एल निनोचा प्रभाव कमी होत असतानाच, ला निनोचा प्रभाव वाढत जातो तेव्हा समाधानकारक पाऊस होत असल्याचं हवामान विभागाच्या विश्लेषणात समोर आलं.
अशी स्थिती निर्माण झालेली नऊ वर्षे होती. त्यापैकी दोन वर्षे सरासरीपेक्षा जास्त पाऊस, 5 वर्षे अतिवृष्टी तर उर्वरित दोन वर्षातही समाधानकारक पाऊस झाल्याचं समोर आलं.
या अंदाजानुसार देशातील जवळपास 75 टक्क्यांपेक्षा जास्त भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. पण ईशान्येला किंवा जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड झारखंडचा काही भाग, पश्चिम बंगाल इथंही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही चांगला पाऊस?
छत्रपती संभाजीनगर मधील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनीही एल निनो आणि ला निना यांच्या या बदलत्या स्थितीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे.
हवामान अभ्यासकांना जानेवारी महिन्यापासूनच याबाबत संकेत मिळू लागले होते असं ते म्हणाले.
''गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात एल निनो तून सुपर एल निनोची स्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका बसल्यामुळं मान्सून तर कमी झालाच, पण परतीचा पाऊसही हवा तसा झाला नव्हता.''
गेल्या वर्षीपर्यंत नोव्हेंबर ते मार्च दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट व्हायची. पण यावर्षी तसं न घडता एप्रिल महिन्यात गारपीट झाली आणि येत्या काही दिवसांतही गारपीट होऊ शकते. हे एन निनो आणि ला निना यांच्या बदलत्या स्थितीचेच संकेत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
या संपूर्ण स्थितीचा विचार करता महाराष्ट्रात यंदा मान्सूनच्या पावसाबरोबरच मान्सूनपूर्व आणि परतीचा पाऊसही चांगला होण्याची शक्यता आहे, असं औंधकर म्हणाले.
एल निनो म्हणजे काय?
एल-निनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे.
प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं.
प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. त्यात आणखी जास्त वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते, या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात.
वारे वेगानं वाहू लागल्यामुळं समुद्राच्या पाण्याचं तापमान वेगानं कमी होऊ लागतं, त्या स्थितीला ला निना असं म्हटलं जातं.
या दोन्ही परिस्थितींचा जगभरातील हवामान किंवा प्रामुख्यानं तापमानावर परिणाम होत असतो.