You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुपर एल निनो काय आहे? 2024 मध्ये भारताला दुष्काळाचा सामना करावा लागणार का?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
2024 मध्ये मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या नोआ (National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेनं याबाबतचा अंदाज काही दिवसांपूर्वी दिला आहे.
या बातमीत आपण सुपर एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.
नोआचा अंदाज काय?
मार्च ते मे हा आपल्याकडील उन्हाळ्याचा कालावधी असतो. नेमका याच कालावधीत एल निनो आतापर्यंतच्या सर्वांत तीव्र स्थितीत पोहचण्याची शक्यता आहे.
नोआ या संस्थेनं दिलेल्या अंदाजानुसार, मार्च ते मे 2024 या कालावधीत सुपर एल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. तीव्र ‘एल-निनो’ स्थितीची शक्यता 70 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
या कालावधीत विषुववृत्तीय सागरी पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक तापमानातही 2 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता 30 टक्क्यांहून अधिक आहे.
1972–73, 1982–83, 1997–98 आणि 2015–16 या वर्षांमध्ये अशाच प्रकारची स्थिती उद्भवल्यानं जगभरातील अनेक देशांना तीव्र तापमान, दुष्काळ आणि पूरस्थितीचा सामना करावा लागला.
2024 मध्ये अशाच प्रकारची स्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुपर एल निनो म्हणजे काय?
सुपर एल निनो म्हणजे काय, जे जाणून घेण्याआधी एल-निनो म्हणजे काय ते पाहूया.
एल-निनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे.
प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं.
प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं.
त्यात समुद्राच्या पाण्याच्या तापमानात आणखी वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते, या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात.
एल निनो आणि भारतातील दुष्काळ
प्रशांत महासागर हा जगातील सर्वांत मोठा महासागर असल्यामुळे त्यात घडणाऱ्या गोष्टी जसं की, वाऱ्यांचा जोर, त्यांच्या दिशा आणि कमी-अधिक होणारे तापमान यांचा परिणाम सगळ्या जगातील हवामानावर होतो.
ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे, त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.
जसं यंदा आपल्याकडे दुष्काल पडला आहे आणि वातावरणात एल निनो सक्रिय आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एल निनो आणि भारतीय मान्सूनचा परस्पर संबंध आहे. 1871 नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी 6 दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत. ज्यात अलीकडील 2002 आणि 2009 मधील दुष्काळांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सर्वच एल निनो वर्षांमुळे भारतात दुष्काळ पडलेला नाही. उदाहरणार्थ 1997-98 या वर्षी एल निनो प्रचंड सक्रिय होता, पण त्यावेळी दुष्काळ पडला नव्हता.
सुपर एल निनोचा मॉन्सूनवर परिणाम होणार?
सुपर एल निनोमुळे उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये सरासरीपेक्षा तापमान वाढ होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुपर एल निनोचा भारतातील पावसावर परिणाम होऊ शकतो का, हे जाणून घेऊया.
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात, “भविष्यकाळात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती तयार केली जात आहे, ती बरोबर नाहीये. याला कारण फक्त एल निनो हा एकच फॅक्टर दुष्काळाला कारणीभूत आहे, असं नाही. हवामान बदल हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे.
“हवामान बदल म्हणजे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणं आणि इतर मिथेन, नायट्रस ऑक्साईड याचं प्रमाण वाढणं. यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचं तापमान 1.5 अंश सेल्शिअसनं वाढलेलं आहे. जागतिक तापमान वाढीमुळे तिथले हवेचे दाब कमी होतात, मग इकडचे वारे जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं जातात, तिथं अतिवृष्टी होते आणि इकडं दुष्काळ पडतो. ही स्थिती हवामान बदलामुळे होते.”
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सांगतात, “एल निनो आधी मार्चपर्यंत राहिल असं म्हणत होते, आता तो जूनपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या देशात मार्च, एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा असतो आणि उष्णता असते. एल निनो जर टिकून राहणार असेल, तर उष्णता सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांच्या उष्णतेवर आपलं जून महिन्यातील मान्सूनचं आगमन अवलंबून असेल, तर त्याच्यावर एल निनोचा परिमाण होऊ शकतो.”
पण, वातावरणात सुपर एल निनो सक्रिय आहे की नाही, हे कधीपर्यंत कळेल या प्रश्नावर माणिकराव खुळे सांगतात, “भारतीय हवामान खातं मान्सून संदर्भात पहिलं भाकित एप्रिल महिन्यात देणार आहे. त्याचं निरीक्षण आतापासून चालू आहे. जागतिक पातळीवरच्या नोंदी यात घेतल्या जातात, त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यामुळे एप्रिल महिन्यात सुपर एल निनो आहे की नाही याबद्दल बरीचशी कल्पना आपल्याला येईल."
त्यामुळे आता एल निनो, सुपर एल निनो आणि हवामान बदलाचा परिणाम येत्या हंगामावर किती व कसा होईल, ते येणाऱ्या काळात कळेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)