एल निनो आणि दुष्काळाचा नेमका संबंध काय? खरिपानंतर रब्बी हंगामही वाया जाणार?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतीय मान्सूनवर एल निनोचा होणारा परिणाम आता अधिकाधिक स्पष्ट होत चालला आहे.

मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान सरासरी तापमानापेक्षा जास्त असून एल निनोची स्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं आहे.

जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत एल निनो स्थिती कायम राहण्याची 95 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे, असं अमेरिकेच्या National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेनं म्हटलंय.

याशिवाय, गेल्या 174 वर्षांमध्ये 2023 चा ऑगस्ट महिना हा जगभरात सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचं या संस्थेनं म्हटलंय.

यासाठी इतर वातावरणीय घटकांप्रमाणे एल निनो घटकही कारणीभूत ठरलाय.

एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यावर्षी अतिरिक्त तापमान वाढ होत असल्याचं या संस्थेनं नमूद केलंय.

एल निनोची परिस्थिती पुढील काही महिने कायम राहिल्यास ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि आशियातील देशांमध्ये भयंकर दुष्काळ पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पण, मूळात हा एल निनो नेमका काय असतो? एल निनो आणि भारतीय मान्सूनचा काय संबंध आहे? एल निनोमुळे भारतात दुष्काळ पडतो का? एल निनोचा पुढच्या मान्सूनवर काय परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

एल निनो आणि भारतातला दुष्काळ

प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली असून ती पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं अलीकडेच वर्तवली आहे.

आता तुम्हाला एल निनो म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल.

तर, एल-निनो आणि ला-निना ही प्रशांत महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं.

याउलट प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा कमी होतं, तेव्हा त्या स्थितीला ‘ला-नीना’ असं म्हणतात.

प्रशांत महासागर हा जगातील सर्वांत मोठा महासागर असल्यामुळे त्यात घडणाऱ्या गोष्टी जसं की, वाऱ्यांचा जोर, त्यांच्या दिशा आणि कमी-अधिक होणारे तापमान यांचा परिणाम सगळ्या जगातील हवामानावर होतो.

एल निनोमुळे भारतात दुष्काळ पडतो का, तर या प्रश्नाचं सरळसरळ उत्तरं देता येत नाही.

पण ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे, त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एल निनो आणि भारतीय मान्सूनचा परस्पर संबंध आहे. 1871 नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी 6 दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत. ज्यात अलीकडील 2002 आणि 2009 मधील दुष्काळांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सर्वच एल निनो वर्षांमुळे भारतात दुष्काळ पडलेला नाही. उदाहरणार्थ 1997-98 या वर्षी एल निनो प्रचंड सक्रिय होता, पण त्यावेळी दुष्काळ पडला नव्हता.

साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी एल निनोची परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा प्रभाव साधारणपणे 9 ते 12 महिने टिकत असतो.

महाराष्ट्रातील कोणते जिल्हे रेड झोनमध्ये?

1 जून 2023 ते 20 सप्टेंबर 2023 दरम्यानचा महाराष्ट्रातील पावसाचा नकाशा पाहिल्यास, राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पावसाची तुट ही 20 ते 59 टक्क्यांदरम्यान आहे.

याचा अर्थ पावसातील खंड कायम राहिल्यास, हे जिल्हे दुष्काळाच्या संकटात ओढवू शकतात.

यामध्ये, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या 13 जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये ज्यादा पाऊस पडला असून इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडल्याचंही या नकाशात दिसून येतं.

3 मोठे प्रश्न उद्भवणार

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास दुष्काळ पडेल आणि त्यामुळे 3 मुख्य प्रश्न उभे ठाकणार आहेत.

1. शेतातल्या पिकांना जगवायचं कसं?

सध्या पावसाअभावी सगळ्याच पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीन, मका पिके पिवळी पडली आहेत. उदीड, मूग ही पिकं तर हातातूनच गेली आहे.

कापसाचा विचार केल्यास पाण्याअभावी कपाशीची पानं गळू लागली आहेत. यामुळे उत्पादन खर्चही निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

पावसाचा खंड कायम राहिल्यास जे काही 20 ते 30 % उत्पादन निघण्याची शक्यता आहे, तेही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

2. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

सप्टेंबर 2023 च्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात 432 गावं आणि 1763 वाड्यांमध्ये टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू आहे.

सरकारी-खासगी अशा एकूण 481 टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या, 2022 च्या सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात एकाही गावाला किंवा वाडीला टँकरनं पाणीपुरवठा केला जात नव्हता.

या आकडेवारीवरुन, पुरेसा पाऊस पडला नाही तर भविष्यात पाणीटंचाई किती भीषण असू शकते याचा अंदाज येतो.

3. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता

आज घडीला जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यातील मुरघास संपण्याच्या स्थितीत आहे.

दुभत्या जनावरांना ताजा हिरवा चारा लागतो. या चाऱ्याची देखील वाणवा आहे. पावसानं पाठ फिरवल्यानं चाऱ्याच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

आधी 2 हजार रुपये टन दरानं मिळणारा चारा, आता हजार 5 रुपये टन इतक्या दरानं मिळणंही अवघड झालंय.

अशास्थितीत जनावरांना चारा उपलब्ध कसा करायचा, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असणार आहे.

हवामान तज्ज्ञ काय म्हणत आहेत?

हवामान बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे भारतातील पावसावर परिणाम झालेला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस होणार आहे, असं मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे व्यक्त करतात.

ते सांगतात, “महाराष्ट्रात सध्या 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एल-निनोचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

“सध्या प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान 31°C पर्यंत वाढलंय. हिंदी महासागराचं तापमान 30°C पर्यंत आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिने बिनापावसाचे चालले आहेत. आता पाऊस झालाच तर अल्पसा पाऊस शक्य आहे, जास्त पावसाची शक्यता नाहीये.”

एल-निनो आणि भारतातील दुष्काळातील संबंध समजून सांगताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणतात, "एल निनोचा भारतावर अधिक परिणाम होतो. एल निनो आणि भारतातील जून ते सप्टेंबरमधील पाऊस यांच्यात थेट संबंध असतो.

"प्रशांत महासागरात अतिदाब, अतिथंडी म्हणजे ला निना असला की आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. पण प्रशांत महासागरात अतिउष्णता, कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे एल निनो असला की मात्र आपल्याकडे दुष्काळ पडतो."

रबी हंगामही हातातून जाणार?

पावसातील मोठ्या खंडामुळे खरिप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून चालला आहे. आता पाऊस पडला नाही तर रबी हंगामातही हाती काही लागणार नाही, असंच चित्र निर्माण झालं आहे.

सप्टेंबरमधील पावसाविषयी माणिकराव खुळे सांगतात, “16 ते 19 सप्टेंबर हे रबी हंगामासाठीचं पहिलं आवर्तन असतं. पण, त्यावेळी अपेक्षित पाऊस झाला नाही. पाऊस चांगला झाला असता तर रबी हंगाम उभा राहिला असता. धरणं भरली असती, नदी-नाले ओसंडून वाहू लागले असते. पण तसं न झाल्यामुळे आता जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार नाही.

“25 ते 30 सप्टेंबर हे रबी हंगामासाठीचं दुसरं आवर्तन आहे. पण याहीवेळी विशेष असा पाऊस पडण्याची शक्यता नाही. पाऊस पडला तर किरकोळ स्वरुपात पडू शकतो. तिसरं आवर्तन हे 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान असतं. यावेळी पाऊस झाला तरी त्याचा विशेष फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.”

असं असेल तर शेवटची आशा आहे ती परतीच्या पावसाची.

परतीचा पाऊस तरी व्यवस्थित पडेल का, या प्रश्नावर माणिकराव खुळे सांगतात, एल निनो सक्रिय असल्यानं सध्या तरी परतीच्या पावसाबाबतही फारसं आशादायक चित्र दिसत नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)