महाराष्ट्रात 'या' 18 जिल्ह्यांवर आहे भीषण दुष्काळाचं सावट

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“दीड महिना झालाय तसा शितोडाही नाही. म्हणजे काहीच नाही. पाऊस झिमझमिही नाही आणि काहीच नाही. निसतं आभाळ येतंय, पाऊस अजिबात नाही. दुपारच्या पारी एकदम उन्हाळ्यासारखं उन पडतंय. असं वाटतंय उन्हाळाच लागला की काय.”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगरचे शेतकरी प्रशांत दिलवाले सांगत होते. दुपारी 1 ची वेळ होती आणि कडक उन पडलेलं होतं.

शेंद्रा कमंगर या गावातल्या शेतशिवारात मी हिंडत होतो तेव्हा सोयाबीनची, मक्याची शेती पिवळी पडल्याचं दिसत होतं. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेही भरलेली नाहीयेत.

विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. अगदी तीन-चार दिवस पुरेल एवढं पाणी शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे ते बोअरमधून पाणी विहिरीत टाकत आहे, जेणेकरून पिकांना जगवता येईल.

एकीकडे पावसानं ओढ दिलीय तर दुसरीकडे उन्हाचा चटका अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.

पुढच्या दोन महिन्यात पाऊसमान कसं राहिल? सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीनुसार राज्यातील कोणते जिल्हे गंभीर दुष्काळाच्या छायेत आहेत? जाणून घेऊया.

ऑगस्ट सर्वाधिक कोरडा, सप्टेंबरमध्ये काय?

यंदाचा ऑगस्ट महिना 1901 नंतरचा म्हणजे गेल्या 122 वर्षांतील सर्वांत कोरडा ठरलाय. या महिन्यात सरासरीपेक्षा फक्त 36% कमी पाऊस झाला.

ऑगस्टसाठी सर्वसाधारण पाऊस 254.9 मिमी असतो, पण या वेळी तो केवळ 161.7 मिमी झाला.

सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरी राहील. सोबतच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एल निनोची तीव्रता वाढून तो पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत राहिल, असंही विभागानं म्हटलं आहे.

एन निनो हा हवामानशास्त्रीय घटक आहे आणि त्याचा भारतीय मान्सूनवर परिणाम होत असतो.

महाराष्ट्रातील ‘हे’ जिल्हे दुष्काळाच्या संकटात

1 जून 2023 पासून ते 6 सप्टेंबर 2023चा महाराष्ट्रात पडलेल्या पावसाचा नकाशा पाहिल्यास, महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडला आहे.

याचा अर्थ प्रत्यक्षात जेवढा पाऊस पडला तो या कालावधीत पडलेल्या पावसाच्या सरासरीच्या 20 ते 59 टक्क्यांनी कमी असतो, तेव्हा त्याला अपुरा पाऊस म्हटलं जातं.

म्हणजेच महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांची दुष्काळाकडे वाटचाल सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे.

याशिवाय, या नकाशात हिरव्या रंगात जे 15 जिल्हे दाखवण्यात आलेत, त्यामध्ये सरासरीएवढा पाऊस पडला आहे.

पण पावसाचा खंड कायम राहिल्यास हे जिल्हेसुद्धा दुष्काळाच्या संकटात येऊ शकतात.

महाराष्ट्रात मुंबई शहर आणि नांदेड या दोनच जिल्ह्यात जादा पाऊस पडल्याचं यात दिसून येतं.

शेतकरी चिंतेत

पावसाच्या या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढे काही प्रश्नं उभे ठाकले आहेत.

प्रशांत दिलवाले सांगतात, “शेतकऱ्यासमोर खूप मोठे प्रश्न असतात. जनावरांकडे पाहायचं की कुटुंब चालवायचं? शेतीत आता एवढा मोठा खर्च केलाय हा कुठून निघन? शेतकऱ्याकडे घरात पैसे राहत नाही. कुठूनतरी व्याजानं पैसे आणून शेती करावी लागते. त्याचे पैसे कसे फेडणार?”

हवामान तज्ज्ञ काय म्हणताहेत?

पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आम्ही हवामान तज्ज्ञांशी बोललो. ते काय म्हणाले ते आता पाहूया.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात, “वातावरणात एल निनो हा घटक सक्रीय झालेला आहे. त्याचा परिणाम सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पावसावर होणार आहे. या दोन महिन्यांमध्ये पाऊस नॉर्मल पडेल की नाही, अशीही शंका आहे. पावसात खंडही पडणार आहे.”

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचं म्हणणं आहे की, “5 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात गडगडाटीसह चांगल्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे."

“मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार आणि मुंबई, कोकण विदर्भात जोरदार ते अति-जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.”

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास 2 डिग्रीने वाढ झालीय. 10 सप्टेंबरपर्यंतही ही वाढ अशीच टिकून राहू शकते, असंही खुळे यांनी म्हटलं आहे.

तापमानातील ही वाढ अशीच कायम राहिली तर आता जे 10 ते 15 टक्के उत्पादन हातात यायची शक्यता आहे तेसुद्धा हातात येणार नाही. पण थोडाफार पाऊस पडला तर त्या माध्यमातून पशुधन तरी जगवता येईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)