‘पाऊस नसल्यानं मी अडीच एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला’

“पाऊस उशीरा झाला, त्यामुळे पेरणी उशीरा करावी लागली. त्यानंतरही पाऊसमान कमीच राहिलं. त्यामुळे अपेक्षित असं पीक आलं नाही. म्हणून मी 3 एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला.”

शेतकरी कल्याण सवने सांगत होते. ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या वाघाळा गावात राहतात.

तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवलाय.

पाथरीमध्ये 21 जुलैपासून पाऊस नाहीये. त्यामुळे पिकांची वाढ हवी तशी होत नाहीये, असं ते सांगतात.

कल्याण यांना आजपर्यंत सोयाबीन पिकासाठी 18 हजार रुपये खर्च आला. रोटावेटरचे धरून पूर्ण 20 ते 22 हजार रुपये खर्च आलाय.

ते पुढे सांगतात, “रबी हंगामातील पिक वेळेवर घेता यावं यासाठी मी रोटा फिरवला. रान दुरुस्त करुन घेतलंय. शासनाला आमची परिस्थिती समजली पाहिजे, म्हणून रोटा फिरवला.”

वाघाळा गावातीलच बापू शेळके यांनी आपल्या सोयाबीन पिकात मेंढ्यांचा कळप सोडून दिला.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “दीड एकरावर सोयाबीन लावलं होतं. 15 हजार रुपये खर्च आला होता. पण पावसाअभावी पीक करपू लागलं, दुसरा काही इलाजच नव्हता. म्हणून मग त्यात मेंढ्या सोडून दिल्या.”

बापू शेळके यांच्याकडे 3 एकर शेती आहे. दीड एकरात सोयाबीन आणि दीड एकरात कापसाची लागवड केली आहे. कापूसही आता सुकायला लागला आहे.

कल्याण सवने आणि बापू शेळके ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ज्यांच्याकडे पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध आहेत, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगवत आहेत.

पण, जे शेतकरी निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांचे डोळे आभाळाकडे आहेत.

पाऊस किती पडला?

महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीच्या 89 % पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या 122.8 % पाऊस झाला होता.

कृषी विभागानं 18 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यात 139.35 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 91 % पेरणी झाली आहे.

राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून, 75 ते 100 % पाऊस झालेले 13 जिल्हे आहेत आणि 15 जिल्ह्यांमध्ये 50 ते 75 % पाऊस झाला आहे.

राज्यात 25 ते 50 % पाऊस झालेले 13 तालुके आहेत.

महाराष्ट्रात 25 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत सलग 21 दिवस पावसामध्ये खंड पडलेल्या महसूल मंडळांची संख्या 41 एवढी आहे.

नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातार, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमधील ही 41 महसूल मंडळं आहेत.

यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक 12 महसूल मंडळांचा समावेश आहे.

त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाची प्रचंड गरज आहे.

पाऊस पुढे कसा राहिल?

गेल्या 7 दिवसात महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच पाऊस पडलेला नाहीये. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पुढील 3 ते 4 दिवस मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं 16 ऑगस्ट रोजी वर्तवला आहे.

हवामान विभागानं नुकताच देशभरासाठी पुढच्या 2 आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

त्यानुसार, 18 ते 24 ऑगस्टदरम्यान देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

25 ते 31 ऑगस्टदरम्यानही देशात सरासरीपेक्षा कमी किंवा सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या शेतातील पिकांसाठी मुसळधार पावसाची अत्यंत गरज आहे. हवामान विभागाचा अंदाज पाहिल्यास, पुढचे दोन्ही आठवडे मुसळधार पावसाची शक्यता कमीच दिसून येत आहे.

त्यामुळे यंदा राज्यात दुष्काळ पडणार का, या प्रश्नानं शेतकरी वर्गाला चिंतेत टाकलं आहे.

दुष्काळ पडणार का?

महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे, असं ज्येष्ठ हवामान शास्ज्ञत्र डॉ. रामचंद्र साबळे सांगतात.

डॉ. साबळे यांच्या मते, “महाराष्ट्राची दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. कारण राज्यात सरासरीच्या बराच कमी पाऊस झाला आहे. हा हवामान बदलाचा एकूण परिणाम आहे. यंदा मार्च-एप्रिल-मे महिन्यात वाऱ्याचा वेग अतिशय कमी होता. त्याचवेळेस यंदा कमी पाऊस होणार हे कळालं होतं. त्यामुळे यंदाचं वर्ष नुकसानकारक ठरणार आहे.”

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल आणि जुलैमध्ये सरासरीएवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे सध्या मान्सूनचं वर्तन दिसत आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे सांगतात, “ऑगस्ट महिन्यात साधारणपणे 10 दिवस पावसाचा खंड पडत असतो. 11 ते 20 ऑगस्ट या कालावधीदरम्यान हा खंड पडतो. सध्या आपण हा खंड अनुभवत आहोत.

“ज्या पद्धतीनं पाऊस पाहिजे त्यापद्धतीनं तो पडत नाहीये हे खरं आहे. यावर्षी एल निनो सक्रीय आहे. इथून पुढे तो कार्यरत झालेला आहे. याचाच अर्थ आपण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत, असा होतो. पण सध्या हे भाकित वर्तवणं घाईचं ठरेल.”

शेतकरी काय करू शकतात?

पाऊस कमी असल्यामुळे पिकं जगवायची कशी, असा प्रश्न सध्या बहुसंख्य शेतकऱ्यांसमोर आहे.

यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी काही उपाय सुचवले आहेत.

  • पोटॅशियम नायट्रेट या पाण्यात विरघळणाऱ्या खताची (13:00:45) 100 ग्रॅम प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पोटॅशियममुळे रोपांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. पीक 8 ते 10 दिवस तग धरू शकते.
  • हलकी आंतरमशागत करावी, जेणेकरुन जमिनीतील ओलाव्याचा ऱ्हास कमी करता येईल.
  • ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी ठिंबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
  • कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव जाणवल्यास कमी खर्चिक अशा जैविक पद्धतींचा वापर करुन कीड नियंत्रण करावं.

कमी पावसाला सरकार कसं तोंड देणार?

पाऊस कमी पडल्यास तीन प्रमुख समस्या उभ्या राहतात. एक म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो. दुसरं म्हणजे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा लागतो. आणि तिसरं म्हणजे शेतातील पिके वाचवण्याचं मोठं आव्हान असतं.

सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात 61 % पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 80 % पाणी साठा होता.

सध्या राज्यात 329 गावे आणि 1273 वाड्यांमधून 351 टँकर्स सुरू आहेत.

पाऊस न पडल्यास येणाऱ्या काळात ही परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. तशी ती होऊ नये यासाठी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारनं आधीच यादृष्टीनं पावलं टाकणं गरेजचं असतं.

18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

"पुढील काही दिवसात हवामान विभागानं राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगानं कृषी तसंच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावं.

"चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगानं योग्य ते नियोजन तयार ठेवावं," अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)