शेती : दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काय करावं?

महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन 1 महिना उलटला आहे.

पण अद्यापही राज्यातल्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस न पडल्याचं चित्र आहे.

त्यामुळे काही ठिकाणी खरिपातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 11 जुलैपर्यंत केवळ 47 % क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

राज्यात जवळपास 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिप पिके आहेत. त्यापैकी 11 जुलैपर्यंत 66 लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे.

बहुसंख्य शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

विदर्भ, मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकरी पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

काही ठिकाणी 8 दिवस, तर काही ठिकाणी 10 दिवसांहून अधिक खंड पावसात पडला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलं आहे.

पण, हे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतकरी वैयक्तिक पातळीवर काय करू शकतात, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

दुबार पेरणी टाळ्यासाठीचे उपाय

दुबार पेरणी टाळण्यासाठीच्या उपायांविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार सांगतात, "तुम्ही जर पेरणी केली असेल आणि काही प्रमाणात पीक उगवून आलं, असेल तर पोटॅशियम नायट्रेट हे जल विद्राव्य खते म्हणजे पाण्यात विरघळणारी खते (13:00:45)चे 70 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी टाकून फवारणी करावी. पोटॅशियममुळे रोपांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते."

तसंच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत जसं की विहीरी, तलाव, ठिबक किंवा तुषार सिंचन उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावं.

डॉ. सुभाष टाले निवृत्त विभागप्रमुख, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सांगतात, "तुमच्या शेताच्या आसपास जो काही पाण्याचा साठा उपलब्ध असेल मग यात तलाव, नाला, शेततळं यांच्यातील पाण्यानं पिकांवर फवारणी होईल.

जास्त पाणीही देऊ नये. अगदी 1 सेमी इतका जमिनीत ओलावा तयार होईल, इतकं पाणी द्यावं, यामुळे पिकाच्या कोंबाला ओलावा मिळेल आणि काही दिवस ते तग धरू शकेल."

पेरणी नेमकी कधी करावी?

महाराष्ट्रात अद्यापही जवळपास 50 % क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी बाकी असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.

पाऊस पडला की बहुसंख्य शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. पण, शेतकऱ्यांनी पाऊस नेमका किती पडला, हे तपासून पेरणी करणं गरेजचं आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यासच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

कृषी सहसंचालक तुकाराम मोटे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडल्यास आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी.

"कारण, इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होत असतो. त्याआधी पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये."

डॉ. सुभाष टाले सांगतात, "जमिनीत भरपूर ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. पाऊस जमिनीत चांगला मुरू द्यायला पाहिजे. दोन-तीन पाऊस चांगले होऊ द्यायचे आणि मगच पेरणी करायची. स्थानपरत्वे आपल्या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा.”

तर हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, “जमिनीत दोन ते अडीच फुटापर्यंत खोल माती ओली असली पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. नाहीतर पावसानं पुन्हा उघडीप दिली, तर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)