60 वर्षांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या मुलाची ओळख अशी पटली...

फॉरेन्सिक आर्टिस्टने मुलाच्या चेहऱ्याची पुनर्रचना केली

फोटो स्रोत, NATIONAL CENTER FOR MISSING & EXPLOITED CHILDREN

फोटो कॅप्शन, फॉरेन्सिक आर्टिस्टने मुलाच्या चेहऱ्याची पुनर्रचना केली
    • Author, मॅडेलिन हॅल्पर्ट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, वॉशिंग्टन

फिलाडेल्फिया शहरात 60 हून अधिक वर्षांपूर्वी पोलिसांना एका खोक्यात एक मृत मुलगा सापडला.

त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना तो मुलगा ‘बॉय इन द बॉक्स’ म्हणजे ‘खोक्यातला मुलगा’ म्हणून परिचित होता. त्याचे नाव जोसेफ ऑगस्टस झारेली असे निश्चित करण्यात आले.

पोलीस म्हणतात की, डीएनए तंत्रज्ञान आणि चौकशीमुळे त्यांना अखेर या प्रकरणातील मुलाची ओळख पटवणे शक्य झाले. हे या शहरातील सर्वांत जुने, मारेकरी न सापडलेले प्रकरण आहे.

"या रहस्याने येथील लोकांना पछाडले होते”, असे फिलाडेल्फियाचे पोलीस आयुक्त डॅनिअल आउटलॉ म्हणतात.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस म्हणाले, मुलाच्या आई-वडिलांचे नाव ते जाहीर करू शकत नाहीत आणि त्याच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार होते, हेही त्यांनी सांगितले नाही.

हे प्रकरण अजूनही चौकशीच्या अधीन आहे. या मुलाच्या आयुष्याविषयी कुणाला काही माहीत असल्यास त्यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या आधीही या मुलाच्या डीएनएवरून या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. पण ते नमुने पुरेसे नव्हते. फॉरेन्सिक तज्ञाने नंतर हेच डीएनए वापरून मुलाच्या नातेवाईकांची ओळख पटवली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या मुलाचे जन्माचे व दत्तक दस्तऐवज शोधले आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्याचा जन्म 13 जानेवारी 1953 रोजी झाला होता.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फेब्रुवारी 1957 मध्ये चार ते सहा वर्षांदरम्यान वय असलेल्या या मुलाचे अवशेष फिलाडेल्फियाच्या फॉक्स चेस परिसरातील जंगलसदृश भागात पुठ्ठ्याच्या जेसी पेनी बॅसिनेट बॉक्समध्ये एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले होते.

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्पॉयटेड चिल्ड्रननुसार, या मुलाचे शरीर नग्न होते आणि त्यावर खूप जखमा होत्या. त्याचे वजन फक्त 30 पौंड होते आणि त्याच्या शरीरावर खूप जखमा होत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली होती.

मुलाचा फोटो असलेली पोस्टर शहरभर वितरित केली होती.

स्थानिक पोलीस, डिटेक्टिव्ह्ज डॉक्टर आणि डीएनए विश्लेषक शेकडो स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील टिप्सचा उपयोग करून या प्रकरणाची उकल करण्याचा अनेक दशकांपासून प्रयत्न करत होते.

विडोक सोसायटी नावाच्या एका गटासह स्वयंसेवक व्यावसायिक गुप्तहेरांसाठीही हे प्रकरण आकर्षण ठरले होते. त्यांनी केलेल्या सहाय्यासाठी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी त्यांचेही आभार मानले.

तपास अधिकाऱ्यांनी हजारो संकेतांचा पाठपुरावा केला. पण यश मिळाले नाही. त्या मुलाचे न्यूयॉर्क सुपरमार्केटमधून अपहरण झाले आणि तो हंगेरीतून आलेला निर्वासित होता, असाही एक सुगावा लागला होता.

या मुलाचे स्थानिक दफनभूमीत दफन करण्यात आले आणि त्याच्या थडग्यावर ‘अमेरिकाज अननोन चाइल्ड’ म्हणजे अमेरिकेचा अज्ञात मुलगा असले कोरलेले आढळते.

कोणत्याही मुलाचे नाव आणि त्याच्या आयुष्याची कथा जगासमोर येण्यासाठी इतका कालावधी लागू नये, असे पोलीस आयुक्त आउटलॉ बुधवारी म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)