श्रीकांत ठाकरे : राज ठाकरेंच्या वडिलांकडून जेव्हा 'मार्मिक'ची सूत्रं काढून घेतली होती...

फोटो स्रोत, Dilip Thakur
- Author, दिलीप ठाकूर
- Role, ज्येष्ठ सिनेपत्रकार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू अशी हल्ली अनेकांना श्रीकांत ठाकरेंना ओळख वाटते. पण श्रीकांत ठाकरे हे स्वतंत्रपणे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. संगीत क्षेत्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातंच, मात्र व्यंगचित्र, चित्रपट समीक्षा ते अगदी वादक आणि सिनेपत्रकार म्हणूनही त्यांचं कार्य मोलाचं आहे.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी त्यांच्या आवडत्या ‘पप्पा’ अर्थात श्रीकांत ठाकरे यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या आहेत. मोहम्मद रफींना मराठीत गाणं गायला लावणारा संगीतकार ते ‘मार्मिक’ची सूत्रं काढून घेतल्यानंतर श्रीकांत ठाकरेंची नाराजी, असा मोठा पट दिलीप ठाकूर यांनी या लेखातून उलगडला आहे :
साठच्या दशकात मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात जन्माला आलेली माझी पिढी शालेय वयात असतानाच आमचे पालक एकाच वेळेस आमचे नाव वाचनालयात आणि संगीत शाळेत घालणार, ही तेव्हाची परंपराच होती. तो साप्ताहिकांचा काळ असल्याने अन्य साप्ताहिकांसह व्यंगचित्र साप्ताहिक असे बिरुद असलेले ‘मार्मिक’ हाती आले, तर त्या काळात घरी रेडिओ आणला तरी चाळीत साखर वाटली जाई, त्यावर मुंबई आकाशवाणीवर मराठी गाणी आवर्जून ऐकली जात.
मार्मिक हाती येताच पहिल्या पानावरचे बाळासाहेबांचे व्यंगचित्र, मधल्या पानांवरील विविध प्रकारच्या व्यंगचित्रांची रविवारची जत्रा पाहून झाल्यावर शेवटच्या पानावरील अंधेर नगरीतील ‘शुद्धनिषाद’ यांची खरमरीत, बोचरी अशी 'सिने प्रिक्शान' वाचायची सवय कधी लागली हे समजलेच नाही.
रेडिओवर संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली गाणी ऐकताना श्रीकांत ठाकरे म्हणजेच ‘शुद्धनिषाद’ हे माहित नव्हते. ते माहित पडले आमच्या हिंद विद्यालय हायस्कूलमधील शिक्षिका निकळंकर यांच्यामुळे. त्यांचे पती प्रभाकर निकळंकर हे मेहमूद अभिनित व दिग्दर्शित 'कुंवारा बाप'चे छायाचित्रणकार आहेत, याचे आम्हा विद्यार्थ्यांना विशेष कौतुक होते.
अशातच निकळंकर मॅडम एकदा मधल्या सुट्टीत म्हणाल्या, श्रीकांत ठाकरे व प्रभाकर निकळंकर यांनी निर्माण केलेला 'शूरा मी वंदिले' हा चित्रपट तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत सेन्ट्रल थिएटरमध्ये आवर्जून पहा.
याच औपचारिक गप्पांत समजले की, श्रीकांत ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे भाऊ आणि तेच ‘शुद्धनिषाद’ नावाने चित्रपट समीक्षा लिहितात. आमच्या पिढीला श्रीकांत ठाकरे असे समजत-उमजत गेले. पण ते सहजी समजणारे होते का? आणि त्यांची अफाट, खोलवर प्रतिभा, बहुस्तरीय वाटचाल पाहता ते इतके सहजी का समजावेत?

फोटो स्रोत, Dilip Thakur
‘अष्टपैलू’ श्रीकांत ठाकरे
श्रीकांत ठाकरे मला पहिले समजले हे असे अगदीच त्रोटक स्वरुपात, पण काही वर्षातच मार्मिकमधील लेखनाच्या निमित्ताने मी त्यांच्या सहवासात आलो आणि त्यानंतर मला जे उमजत, समजत, कळत गेले, तो प्रवास आजही म्हणजे, 10 डिसेंबर रोजी त्यांचा एकोणीसावा स्मृतिदिन आहे, तरीही तो सुरुच आहे. आजही श्रीकांतजी मला काही बाबतीत नव्याने लक्षात येतात.
श्रीकांतजी ठाकरे इतके आणि असे अनेकदा स्वत:च्याच विश्वात वावरलेले उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे की कुठून सुरुवात करावी, किती सांगावे, कोणत्या आठवणी, गोष्टी, किस्से, अनुभव सांगाव्यात असे होणे अगदी स्वाभाविक आहेच. ते खूपच वेगळे होते असे म्हणता येईल. पण वेगळे म्हणजे कसे हे कदाचित सांगता येणार नाही.
ते 'ठाकरे'च. स्वभावही 'ठाकरी ' आणि फटकळ लिहिणे-बोलणेही 'ठाकरी'. पण एक स्वतंत्र ठसा उमटण्यात यशस्वी. प्रबोधनकारांचा पुत्र यापासून त्यांच्याबद्दल बरेच बरेच काही सांगता येईल. आजच्या पिढीला ते राज ठाकरे यांचे पिता म्हणून माहित. काही अगदीच निवडक गोष्टी सांगतो. जो ट्रेलर ठरावा. मेन पिक्चर यापेक्षाही भारीच. आणि एका मोठ्या सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, माध्यम व राजकीय वाटचालीतील त्यांचा एक वाटाही.

फोटो स्रोत, Dilip Thakur
एकाच वेळेस वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, होमिओपॅथिकचे जाणकार, इतकेच नव्हे तर त्यांनी बराच काळ फोटोग्राफीचीही हौस मौज केली अशा अनेक गोष्टींतून त्यांची चौफेर वाटचाल झाली. त्यांच्या या प्रत्येक गुणावर सविस्तर बरेच लिहीता येईल. तरी तो विषय संपणार नाही इतके आणि असे त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांनीच ते घडवले.
‘शिवसेनाप्रमुखांचे भाऊ’ ही त्यांची एक ओळख असली तरी त्या ओळखीत अथवा त्या ओळखीच्या सावलीत ते वावरले अथवा हरवले नाहीत. कायमच बाळासाहेबांना साथ देत राहिले.
मला आठवतंय, एकदा शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला, तेव्हा श्रीकांतजी स्टेजवर बाळासाहेबांच्या शेजारीच होते. शिवसैनिकांनी तसे होऊ दिले नाही.
वादक म्हणून श्रीकांतजींनी शालेय वयातच सुरुवात केली. सुरुवातीस बुलबुलतरंग मग तबला असे करत करत नवीन वाद्य शिकत वाटचाल करीत असतानाच रेडिओवर त्यांना पहिल्यांदा 10 मार्च 1944 रोजी वादनाची संधी मिळाली. पण तत्पूर्वीच त्यांच्या आईचे 27 फेब्रुवारी 1944 ला निधन झाले. आपल्या आईने आपला हा प्रोग्रॅम न ऐकल्याची खंत त्यांना कायमच राहिली.
मोहम्मद रफींना मराठी गाणी गायला लावणारे संगीतकार
वादक आणि मग संगीतकार म्हणून त्यांची वाटचाल खूपच मोठी आणि त्यात एक गोष्ट, त्यांच्या संगीत दिग्दर्शनात मोहम्मद रफी यांचे गायन. याबाबत त्यांच्या आठवणी खूप होत्या.
त्यातील एक गोष्ट म्हणजे, रफींनी श्रीकांतजींकडे हा ‘छंद जिवाला लावी पिसे’, ‘प्रभू रे खेळ तुझा न्यारा’, ‘शोधिसी मानवा’, ‘हे मना आज कोणी बघ तुला साद घाली’, ‘हंसा मुलानो हंसा’, ‘प्रभू तू दयाळू कृपावंत दाता’, ‘नको आरती की नको पुष्पमाला’ अशी गाणी गायल्यावर मोहम्मद रफी यांनी श्रीकांतजींना आपण एक कोळीगीत करुया असे सूचवले.
श्रीकांतजींनी वंदना विटणकर यांच्याकडून ‘अग पोरी दर्याला आलयं तुफान’ हे लिहून घेतले आणि त्यांनीच पुष्पा पागधरे यांचे नाव सूचवले. त्यांच्याकडून आवश्यक अशी रिहर्सल करुन घेतली आणि मग रेकॉर्डिंगचे पक्के केले.
आपल्या प्रत्येक कामात आपण परफेक्ट असायला हवे यावर श्रीकांतजींचा कटाक्ष होता. पण नेमक्या रेकॉर्डिंगच्या वेळेस वादनकार बरेच नवीन होते व त्यांचा नव्याशी मेळ बसेना. त्यातच सहाय्यक अनिल मोहिलेही आले नाहीत.

फोटो स्रोत, Dilip Thakur
श्रीकांतजींना वाटत होते, आजचे रेकॉर्डिंग रद्द करुया. पण मोहम्मद रफी यांनी विश्वास दिला, सर्व काही ठीक होईल. यावेळी संगीतकारही श्रीकांतजी आणि अरेंजरही तेच. त्यात त्यांचे प्रेशर वाढण्याची भीती. पण गाणे पूर्ण झाल्याचे समाधान.
श्रीकांतजींनी शोभा गुर्टू, निर्मलादेवी अशा अनेक गायकांसोबत काम केले आणि तेवढ्या त्यांच्या आठवणी होत्या. जस जसा विषय निघे तसे ते त्या आठवणी सांगत.
सत्तरच्या दशकात मुंबई दूरदर्शनवरील 'शामे गजल' या कार्यक्रमात फक्त श्रीकांतजींच्या गजला होता हे विशेष. गजल हा त्यांचा अतिशय आवडता प्रकार.
ठाकरे बंधूंनी ‘बडी बहू’चं केलेलं लेटरिंग
श्रीकांतजींचा कला प्रवास बहुस्तरीय. इतका की, फार पूर्वी ते फेमस स्टुडिओत ते वादनकार म्हणून काम करीत असताना बाळासाहेब फेमस पिक्चर्सच्या ऑपेरा हाऊसमधील ऑफिसमध्ये नवीन चित्रपटांची शो कार्ड्स आणि पेपर पब्लिसिटीचे डिझाईन करीत. नर्गिस, मेरा सुहाग, मोहन या चित्रपटांची शो कार्ड्स त्यांचीच.
एकदा बाळासाहेब फेमस स्टुडिओत श्रीकांतजींना भेटायला आले असताना कला दिग्दर्शक वाटेगावकर यांनी या भावांना 'बडी बहू' या चित्रपटाचे लेटरिंग करण्याची संधी दिली.
‘मार्मिक’चं नामकरण आणि ‘मटा’मधील ‘बन्या बापू’
व्यंगचित्र साप्ताहिक असलेल्या ‘मार्मिक’चं नाव कसे ठरले, याचाही एक किस्सा आहे.
'न्यूज डे' या वृत्तपत्रातून बाहेर पडल्यावर बाळासाहेबांनी 'कार्टूनिस्ट ' या नावाचे इंग्रजी साप्ताहिक काढायचे ठरवले. पण प्रबोधनकार म्हणाले, मराठी साप्ताहिक हवे.
आता नावाचा विचार सुरु झाला. तिरंदाज की अंजन? तेवढ्यात प्रबोधनकार म्हणाले, मार्मिक.

फोटो स्रोत, Dilip Thakur
13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिक साप्ताहिक सुरु झाले आणि 1962 साली महाराष्ट्र टाईम्स सुरु झाला आणि तेव्हा संपादक व्दा. भ. कर्णिक यांनी श्रीकांतजींना पॉकेट कार्टून काढण्याची संधी दिली.
बन्या बापू या टोपणनावाने त्यांनी 1964 च्या सुरुवातीपर्यंत ती व्यंगचित्र काढली.
...आणि मी त्यांना ‘पप्पा’ म्हणू लागलो!
स्वत:ची अफाट प्रतिभा असलेल्या श्रीकांतजींचा मला माझ्या सुदैवाने भरपूर सहवास लाभला. अनेक चांगल्या आठवणी आणि अनुभव आहेत. सांगावे तेवढे थोडेच. आणि त्यातच मी त्यांनी ‘पप्पा’ कधी म्हणू लागलो, हे समजलेच नाही.
त्यांनी 'माझं घर' या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेले गाणे त्यांना स्वतःला इतके आवडले की त्यांनी आपल्या घरी ते स्पूनवर लागोपाठ दोनदा ऐकवले. दुर्दैवाने तो चित्रपट त्या गाण्याच्या पुढे गेलाच नाही.
प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' (1973) या मूळ पस्तीस एमएमच्या चित्रपटावर अनेक वर्षांनी वितरक गुलशन रॉय यांनी तांत्रिक सोपस्कार करुन घेत तो सिनेमास्कोप करुन रिपिट रनला प्रदर्शित केला, तेव्हा पप्पा म्हणाले, आपण बादल थिएटरला जाऊन 'जंजीर'वर काय तांत्रिक गोष्टी केल्यात त्या पाहूया. त्यांना तो सगळाच फसलेला प्रकार वाटला. पण महत्वाचे होते ते, अशा अनेक गोष्टी आपण आवर्जून जाणून घ्यायला हव्यात ही त्यांची भावना.
प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जादूगर' फ्लॉप होऊन काही दिवसच झाले असताना पप्पा व मी प्रकाश मेहरा यांच्या जूहू येथील सुमित प्रिव्ह्यू थिएटरमध्ये एका मराठी चित्रपटाच्या प्रेस शोसाठी गेलो असता, श्रीकांतजी आले असल्याचे प्रकाश मेहरांना समजताच ते केबिनबाहेर आले. आणि मग त्यांच्या केबिनमध्ये आमच्या तिघांच्या 'जादूगर’च्या अपयशा'वर मनसोक्त गप्पा रंगल्या.
पप्पा आणि मेहरा हे दोघेही अतिशय सडेतोड, रोखठोक, स्पष्ट बोलणारे. पप्पा 'जादूगर 'मध्ये काय काय फसले यावर बोलत होते. तर प्रकाश मेहरा अमिताभने आपल्याला या चित्रपटाच्याबाबत पटकथेत फेरफार, मनमोहन देसाईंच्या 'तुफान 'मधील त्याच्या दुहेरी भूमिकेतील एक जादूगर असणे आणि हे दोन्ही चित्रपट पाठोपाठच्या शुक्रवारी प्रदर्शित होणे यावर बोलत होते. यापुढे अमिताभसोबत काम करणार नाही असेही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Dilip Thakur
आमच्या या भेटीवर पप्पांनी मार्मिकमध्ये लिहिताना यावेळी मीदेखिल होतो हे आवर्जून लिहिले. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घेत, त्यावर कधी बोलून तर कधी लिहून व्यक्त होणे त्यांना कायमच आवडायचे आणि अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी सांगता येतील.
अधूनमधून पप्पांसोबत मातोश्रीवर जाण्याचा योग येई. तेव्हाचे मातोश्री वेगळे होते. मुख्य हॉलमध्ये भरपूर वृत्तपत्र असत. पप्पा आत गेल्यावर मी ती वृत्तपत्र वाचत असे. एकदा अॅन्टी-चेंबर्समधून अमिताभ तर एकदा मनोजकुमार येताना दिसला. पप्पांकडून मातोश्रीवर येत असलेल्या फिल्मवाल्यांची 'खबरबात' मिळत असे.
मुंबईत 1984 च्या जानेवारीत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असताना आम्ही कुलाब्यातील स्ट्रॅन्ड थिएटरमधील सिंहावलोकन विभागातील गुरुदत्त दिग्दर्शित चित्रपट एकत्र पाहताना त्यांनी मला साठच्या दशकातील चित्रपटासंदर्भात बरीच माहिती दिली.
श्रीकांत ठाकरेंकडून ‘मार्मिक’ची सूत्रे काढून घेतली गेली तेव्हा...
त्या काळात हा महोत्सव पंधरा दिवसांचा असे आणि त्यातच एक दिवस शिवसेना भवनात पहिल्या व्यंगचित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं.
तेव्हा त्यांनी मुंबई व पुणे शहरातील व्यंगचित्रकारांसह मार्मिकच्या आम्हा लेखकांना आवर्जून आमंत्रित केले. त्यात संजय राऊतही होता. त्याच वर्षीच्या षण्मुखानंद सभागृहातील मार्मिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात मला व संजय राऊतला आवर्जून स्टेजवर बसण्याची संधी दिलीच आणि पप्पांच्या या गोष्टीची बाळासाहेबांनी दखल घेत आपल्या भाषणात आम्हा दोघांचाही उल्लेख केला.
पण वर्षभरात परिस्थितीत बदल झाला. 1985 च्या मार्मिक वर्धापन दिनापासून पप्पांकडून मार्मिकची सूत्रे काढून घेतल्याने ते अतिशय निराश झाले. सोहळ्यात त्यांची ती अस्वस्थता लक्षात येत होती.
अतिशय कष्टाने व अनेक अडचणींवर मात करीत, आव्हाने पचवून त्यांनी मार्मिक जगवला होता, वाढवला होता. या धक्क्यातून त्यांना सावरणे आवश्यक होते. त्यानंतर कधीही घरी गेल्यावर नवीन चित्रपट कोणता पाहिला हा विषय काढत राहिलो. तेव्हा ते दादरमध्ये नवीन चित्रपट पाहत.

फोटो स्रोत, Getty Images
23 जानेवारी 1989 रोजी सामना सुरु होताच ते आम्हा चित्रपट समीक्षकांसोबत चित्रपट पाह्यला येऊ लागले.
कालांतराने म्हणजे, 2002 साली चिनार पब्लिशर्सच्या वतीने त्यांचे 'जसं घडलं तसं' हे त्यांचे आत्मचरित्र बाळासाहेबांच्या हस्ते वांद्र्याला एका कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले तेव्हाचे ‘पप्पा’ आजही स्पष्ट आठवताहेत. आपल्या चौफेर वाटचालीची अशी नवीन पिढीला माहिती व्हावी अशी त्यांची इच्छा पूर्ण होत होती.
श्रीकांत ठाकरेंचे अखेरचे दिवस
अखेरच्या आजारपणाच्या काळात कृष्णकुंजवर मी त्यांना भेटायला जायचो, तेव्हा अशाच काही गोष्टींची आठवण मी त्यांना करुन देत गप्पांत रमवायचा प्रयत्न करायचो. अगदी त्यांच्या निधनाच्या चारच दिवस अगोदर मी नेहमीप्रमाणेच त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते काहीसे थकलेले वाटले.
अखेर 10 डिसेंबर 2003 रोजी दुपारी दुर्दैवी बातमी आलीच.
आजही मी जेव्हा पप्पांचा विचार करतो, तेव्हा त्यांच्या अफाट अष्टपैलुत्व, प्रतिभा यांची खरंच म्हणावी तशी कदर आणि कौतुक झाले का असा प्रश्न पडतो. पण आता उत्तर मिळणार नाही.
‘शिवसेनाप्रमुखांचा भाऊ’ असल्याचा त्यांनी कोणताही फायदा अथवा आधार घेण्याचीही आवश्यकता नव्हती, तेवढे ते समर्थ होते. आणि तसे काही करणे त्यांचा स्वभाव नव्हताच. ते खूप डिफिकल्ट होते असे म्हटले जाई, पण कामचुकारपणा, बेशिस्त, आगाऊपणा या गोष्टी सहन न होताच ते फटकळपणे पटकन बोलत हे त्या पिढीतील अनेकांत दिसे.

फोटो स्रोत, Dilip Thakur
गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी एकही वादक चुकलेला त्यांना चालत नसे. याचा अर्थ त्याचे कामात लक्ष नाही असे ते मानत.
मार्मिकमध्ये शुद्धलेखनाची एकही चूक त्यांना मान्य नसे. 'सामना'तील आपल्या लेखनातील काना-मात्रा अगदी बरोबर आहेत हे ते अगोदरच सांगत. त्यामुळे कंपोझरपासून प्रूफ रिडरपर्यंत सगळेच सावध असत.
.... आणखीन बरेच काही सांगता येईल आणि तरीही तो जणू ट्रेलर ठरावा इतके आणि असे श्रीकांतजी ठाकरे चतुरस्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते. श्रीकांतजींची मुलगी जयवंती यांचे पप्पांवर निस्सीम प्रेम. त्यांनी कायमच आपल्या पप्पांचा फोटो डीपी ठेवलाय.











