राज ठाकरे अखेर उद्धव ठाकरेंच्या आरोग्यावर बोलले...

राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

“उद्धव ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात लोकांना भेटत नसत. त्यामुळे त्यावरून त्यांच्यावर टीका होत असे, म्हणजे ती त्यांच्या प्रकृतीची चेष्टा नव्हती, तर परिस्थितीची चेष्टा होती,” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाताना ते कोल्हापुरात थांबले. कोल्हापुरात त्यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे 27 नोव्हेंबर रोजी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात म्हणाले होते की कोव्हिडच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे तब्येतीचं कारण सांगून कुणाला भेटत नव्हते पण आता पद गेल्यानंतर मात्र ते भेटत आहेत.

यावरून राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांनी टीका केली. त्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आणि आपली भूमिका मांडली.

उद्धव ठाकरेंच्या आरोग्याबाबत बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रिपदावर होतात, तेव्हा लोकांना भेटत नव्हतात. मुख्यमंत्रिपद गेल्यावर लगेच बरे झालात? हा विषय आरोग्य किंवा प्रकृतीचा नाही. त्याच्या मध्ये काय म्हणायचं आहे मला याचा आहे. आता काही समस्या नाही तुम्हाला? सगळं व्यवस्थित आहे? कुणी वाईट गोष्टीत खितपत पडावं, अशी कुणाचीही इच्छा नसते."

“मुख्यमंत्रिपदावरून गेल्या गेल्या दौरे सुरू झाले, सर्व गोष्टी सुरू झाल्या. त्यावेळी कोव्हिडचं कारण देत सर्वांना टाळत राहिलात. या गोष्टीचा अर्थ समजून घ्या. ही प्रकृतीची चेष्टा नव्हती, परिस्थितीची चेष्टा नव्हती.”

यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, “मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणुकींमधील यशापयशावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “2014 ला भाजपला बहुमत आलं. पण भाजपचा जन्म 1952 साली झाला. प्रत्येक गोष्टीला एक काळ जातो. शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला, पण शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता यायला 1985 साल उजाडावं लागलं.”

यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरही भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, “सीमावादाचा मुद्दा मधेच कुठून वर येतो? या गोष्टीची पत्रकारांनी छाननी करावी. कुठल्यातरी गोष्टीवरून लक्ष वळवण्यासाठी हा मुद्दा काढला जातो का? सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, तो देईल. तुम्ही त्याच त्याच बातम्या द्याव्यात आणि मूळ बातम्या आहेत, त्या दिल्या जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत का?”

राज ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

तसंच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही त्यांनी भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले की, “काही लोकांना पद असतं, पण पोच नसते. राज्यपाल हे त्यातले. पदावरती बसतात, पण कधी कुठली गोष्ट बोलावी, काय बोलावं, हे कळत नाही. राज्यापालांनाही कुणी स्क्रिप्ट देतं का?”

जनतेच्या मुद्द्यांवरून सगळं लक्ष विचलित करायचं, यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत का? असा संतप्त सवालही राज ठाकरेंनी व्यक्त केला.

हे वाचलंत का?