मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला बिहारी मतं मिळणार का?

फोटो स्रोत, facebook
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी 23 नोव्हेंबरला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये भेट घेतली.
या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी ही भेट राजकीय नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यातून अनेक राजकीय अर्थ निघतात.
आदित्य ठाकरे या भेटीनंतर म्हणाले, "तेजस्वी यादव यांना मी मुंबईत येण्याचं आमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबत आधीपासून चर्चा सुरू होती. कोरोनाच्या काळात भेट होऊ शकली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या सरकारचे काम चांगलं सुरू आहे.
बिहारमध्ये विकास दिसून येतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील जो युवक देशासाठी काम करू इच्छितो, रोजगार निर्माण करू इच्छितो, महागाईविरुद्ध काम करू इच्छितो हे सगळे एकत्र आले तर देशात काही तरी चांगलं करता येईल. त्याचबरोबर आमच्या दोन्ही कुटुंबांचे संबंध चांगले आहेत. ही मैत्री पुढेही चालत राहील. त्यामुळे प्रत्येक वेळी राजकारण करण्याची गरज नाही. आमचं उद्दीष्ट लोकशाही वाचवणे हे आहे. "
या भेटीनंतर आदित्य ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक राजकारणाची रणनीती पुढे नेताना दिसतायेत का? हा प्रश्न उपस्थित होतो. याचं कारण अमराठी मतांसाठी उद्धव ठाकरे यांनी 2003 साली 'मी मुंबईकर' या अभियानातून केलेला प्रयत्न..!
काय होतं मी मुंबईकर अभियान?
2003 साली उध्दव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष झाले. 2004 ला विधानसभा निवडणुका होत्या. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना निवडणुकीत सामावून घेण्याच्या दृष्टीने उध्दव ठाकरेंनी विचार करून सर्वसमावेशक राजकारणाची वाट धरली.
15 वर्षे मुंबईत राहत असणाऱ्या मुंबईकरांना सामावून घेण्याची ही रणनिती 'मी मुंबईकर' या अभियानातून राबवायला सुरुवात केली. मराठी, गुजराती, उत्तर भारतीय मतांचा समतोल साधण्याचा तो प्रयत्न होता. मुंबईसाठी एकत्र काम करूया असं आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनीही केलं होतं.
शिवसेनेच्या शाखांवर मराठीबरोबरच उत्तर भारतीय पदाधिकारी नेमायलाही सुरुवात केली. वांद्र्यामध्ये मी मुंबईकर या अभियानाला सुरूवात झाली तेव्हा शिवसेनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता असं काही जुने पत्रकार सांगतात.
कमलेश राय हे शिवसेनेचे पहिले उत्तर भारतीय शाखाप्रमुख होते. या अभियानातून उत्तर भारतीयांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण हे होत असताना 'मराठी माणसांच्या न्यायहक्काची लढणारी शिवसेना' ही भूमिका मागे पडत असल्याचं काही शिवसैनिकांना वाटत होतं. त्यावेळी शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने या अभियानाला विरोधही केला होता.
त्यावेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांचाही या अभियानाला विरोध असल्याचं बोललं जात होतं. राज ठाकरे यांनी तो विरोध बोलून दाखवला नसला तरी त्यांच्या कृतीमधून तो दिसून येत होता. या अभियानाची सुरुवात होत असताना वांद्र्याच्या रंगशारदामध्ये राज ठाकरे अनुपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
राज ठाकरेंच्या विरोधामुळे पुढे 'असं' घडलं...!
18 नोव्हेंबर 2003, रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी कल्याणमध्ये उत्तर भारतातून परीक्षार्थी दाखल झाले होते. पण महाराष्ट्रातल्या भरतीसाठी उत्तर भारतातील परीक्षार्थी कसे? महाराष्ट्रात याची जाहिरात का निघाली नाही? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांच्या समर्थकांनी परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली.
ही घटना इतकी मोठी झाली की, पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. महाराष्ट्रातल्या नियुक्यांसाठी जर बाहेरून लोकं आले तर आम्ही विरोध हा करणारच असं राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं. त्यानंतर उत्तर भारतीय संघटनांनी शिवसेनेच्या निषेधार्थ आंदोलनं केली.
वसईमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट फाडले. त्यावेळी उत्तर भारतीय रेल्वे अधिकार्यांनी मराठी माणसांना शिवी दिल्यामुळे हे आंदोलन पेटल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. या आंदोलनामुळे राष्ट्रीय जनता दलचे नेते लालू प्रसाद यादव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. या सगळ्यामुळे 'मी मुंबईकर अभियान' मागे पडलं.

फोटो स्रोत, facebook
मुंबईतल्या 'बिहारी' मतांसाठी 'तेजस्वी' साद?
या अभियानाचा कित्ता आदित्य ठाकरे आगामी निवडणुकीसाठी गिरवताना दिसत आहेत. मुंबई महापालिका निवडणूका पुढच्या काही महिन्यांत होऊ शकतात. महाविकास आघाडी एकत्रित असली तरी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विरूद्ध भाजप अशीच दिसेल यात शंका नाही. भाजपबरोबर तोडलेली युती, 40 आमदारांनी सोडलेली साथ यानंतर ही निवडणूकअधिक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे.
आतापर्यंत मुंबई महापालिका निवडणूकीत 'मराठी मतदार' हे शिवसेनेचं प्रमुख लक्ष्य राहीलं आहे. पण अमराठी लोकांची संख्या ही मुंबईत वाढतेय. लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीचे राष्ट्रीय आणि स्थानिक राजकारणात दोन अर्थ निघतात. स्थानिक पातळीवर बोलायचं झालं तर, मराठी मतदारांबरोबर अमराठी मतदारांना मुंबई महापालिका निवडणूकीसाठी स्वत:च्या बाजूने वळवण्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मुस्लिम, दलित आता उत्तर भारतीय मतदारांना स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करते आहे. ही भेट त्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भाजपविरोधी पक्षांना आणि मतदारांना साद घालण्याचं काम यातून सुरू आहे. मुंबईत अमराठी मतदारांना टाळून चालणार नाही हे उध्दव ठाकरेंनी कदाचित 2003 साली ओळखलं होतं. पण तेव्हा ते यशस्वी झाले नाहीत. तोच प्रयत्न आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून आता केला जातो आहे असं दिसतंय. "
सध्याच्या परिस्थितीत मुंबईतला अमराठी मतदार हा भाजप आणि कॉंग्रेसमध्ये विभागला गेला आहे. काही मतदार हे शिवसेनेच्या बाजूनेही आहेत. पण तो टक्का भाजप आणि कॉंग्रेसच्या तुलनेत कमी आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे तरुण नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून मुंबईतल्या बिहारी तरूणांना एकत्रित आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करू शकते.

फोटो स्रोत, facebook
शिवसेनेला या रणनीतीचा फायदा होईल का?
पूर्वीच्या काळी आक्रमक शिवसेना असताना उत्तर भारतीयांविरूद्ध जी आंदोलनं केली ती राज ठाकरे यांनी केली होती. उध्दव ठाकरे या आंदोलनात कुठेही नव्हते. जेष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "उध्दव ठाकरेंनी संजय निरुपम यांच्यासारखा बिहारी चेहरा नेता म्हणून समोर आणला. निरूपम यांना खासदार केलं. दौपेहर का सामनाचं संपादकही केलं होतं. त्यामुळे उध्दव ठाकरे विरूद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष कधी पाहायला मिळाला नाही.
त्यात ठाकरे घराण्यातील एक व्यक्ती पहिल्यांदा बिहारमध्ये नेत्यांच्या भेटीसाठी जातो. नितीशकुमार किंवा तेजस्वी यादव यांना मानणाऱ्या वर्गात जोपर्यंत एखाद्या नकारात्मक संदेश जात नाही तोपर्यंत नुकसान काहीच होणार नाही. उत्तर भारतीय मतदारांमध्ये उत्तर प्रदेशचे बरेचसे मतदार हे योगी आदित्यनाथ आणि बाकी राजकीय आणि धार्मिक मुद्यांमुळे भाजपच्या पाठीशी असल्याचं आपण मान्य केलं.
तरी बिहारमध्ये नितीशकुमारांचं सरकार आहे. त्यामुळे सर्वाधिक मतदार हे भाजपविरोधी आहेत. याच मूळ बिहारी पण मुंबईत राहणाऱ्या भाजपविरोधी मतदारांचा फायदा शिवसेना करू पाहतेय. निवडणुकीत काय होईल हे आता सांगणं कठीण आहे. पण झाला तर फायदा होईल असं वाटतं."
या रणनीतीवरून मनसे आणि भाजप उध्दव ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतील. पण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे याला कसं उत्तर देते आणि काय भूमिका मांडतेय यावरून पुढील अंदाज बांधता येतील.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








