मासिक पाळीत अति रक्तस्राव झाल्यावर काय करावे?

फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळीसंबंधित प्रश्नांची उत्तरं आजही सर्वांना वेळीच मिळतात असे नाही.
या विषयावर उघड चर्चा करणं टाळलं जातं आणि त्यामुळे अनेक समस्या अनुत्तरित राहातात.
या अज्ञानापोटी अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
त्यामुळेच मासिक पाळी संदर्भात गुगलवर विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण येथे घेणार आहोत.
या काळात जर कुठलाही शारीरिक त्रास होत असेल मनाने औषध गोळ्या न घेता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं डॉक्टर सांगतात.
1) मासिक पाळीत किती रक्तस्त्राव होतो?
मासिक पाळी हा स्त्रीच्या मेन्स्ट्रुएशन चक्राचा एक भाग आहे.
एनएचएसच्या माहितीनुसार जास्त रक्तस्त्राव असणाऱ्या दिवशी रक्ताचा रंग लाल असतो आणि इतर दिवशी तो गुलाबीसर, तपकिरी किंवा काळा असतो.
मासिक पाळीत साधारणतः 30 ते 72 मिली म्हणजे 5 ते 12 टिस्पून इतके रक्त जाते अशी एनएचएस माहिती देते.
काही महिलांमध्ये यापेक्षा जास्त रक्त जाऊ शकते.
2) मासिक पाळी किती दिवस असते?
बहुतांश महिलांमध्ये ती दर 28 दिवसांनी येते.
मात्र अनेक महिलांमध्ये मासिक पाळी 21 ते 40 दिवसांमध्ये येऊ शकते.
3. अधिक रक्तस्राव का होतो, त्यावर काय करावे?
अधिक रक्तस्त्राव आणि वेदना होण्याला मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स असे म्हणतात. याची अनेक कारणं असू शकतात, बीबीसी हिंदीने यावर एक व्हीडिओ बनवला आहे. त्यात हेवी पिरियड्सबाबत किंवा अतिरक्तस्रावाबद्दल माहिती दिली आहे.
ज्यावेळेस 80 मिली पेक्षा जास्त रक्तस्त्राव होतो तेव्हा त्यास मेनोरेजिया किंवा हेवी पिरियड्स म्हणतात. पण हे मिलीलिटरचे गणित सर्वांच्या लक्षात राहील असे नाही. त्यामुळे हेवी पिरियड्स ओळखण्यासाठी काही लक्षणे सांगितली जातात.
रक्तस्त्रावत गाठी येणं, पॅड सारखे बदलावे लागणं, तासातासाला पॅड बदलावं लागणंस औषधं घेऊनही पोटातल्या वेदना कमी होणं अशी लक्षणं हेवी पिरियड्सची असतात. याची कारण गर्भाशयासंदर्भात, चयापचयासंदर्भात आणि संप्रेरकं म्हणजे हार्मोनल असू शकतात.
काही महिलांना मेनोपॉज जवळ असताना किंवा मेनोपॉजच्या आधीच्या एक वर्षी हेवी पिरियडचा अनुभव येतो.

फोटो स्रोत, Getty Images
गर्भाशयात मांसल गाठी, गाठी, लसिकाग्रंथी तयार असल्यास किंवा स्त्रीबीज कोशात म्हणजेच ओव्हरीमध्ये सिस्ट निर्माण झाल्यास हार्मोनल दोष तयार होऊन हेवी पिरियड्स होऊ शकतात.
काही वेळेस रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असते तेव्हाही हा त्रास होण्याची शक्यता असते. रक्त पातळ होण्यासारखी औषधं घेतली जात असतील तेव्हाही हेवी पिरियडचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
संसर्ग किंवा औषधांमुळेही हा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी जेवणात हिरव्या पालेभाज्या, बीट असे लोहयुक्त पदार्थ खाणे, दररोज तीस ते चाळीस मिनिटे व्यायाम करणे असे उपाय डॉक्टर सुचवतात. अर्थात रक्तस्राव किंवा पाळीसंदर्भातील सर्व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.
तुम्हाला कोणत्या प्रकारची औषधं आणि उपचार करण्याची गरज आहे हे डॉक्टर योग्य तपासणी करुनच सांगू शकतील. इंटरनेट किंवा इतर ऐकीव माहितीवरुन स्वतःच उपचार करणे आणि औषधं घेणं टाळावं.
4) मासिक पाळीचा कालावधी किती असतो?
मासिक पाळीचा कालावधी 3 ते 8 दिवसांपर्यंत असू शकतो.
साधारणतः तो 5 दिवस चालतो. त्यातील पहिल्या दोन दिवसांत जास्त्र रक्तस्त्राव होतो.
अशी माहिती नॅशनल हेल्थ सर्विसने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
5) मासिक पाळी कधी सुरू होते?

फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळी साधारणतः मुलीच्या वयाच्या 12 व्या वर्षी सुरू होते.
काही मुलींमध्ये ती आधी किंवा नंतर येऊ शकते.
साधारणतः मुलीच्या 16 व्या 18 व्या वयापर्यंत त्यांची पाळी नियमित सुरू झालेली असते.
काही मुलींमध्ये वेगवेगळ्या कारणांनी यात बदल होऊ शकतात.
6) गर्भ कधी राहातो?
मासिक पाळीची माहिती विचार करताना महिला गरोदर राहाण्याची शक्यता कधी असते हा प्रश्न नेहमी विचारला जातो. मात्र महिला कधी गरोदर राहू शकते, तिचा गरोदर होण्याचा सर्वाधीक पोषक काळ कोणता असे विचारल्यास त्याचे स्पष्ट आणि एकच उत्तर सांगणे अशक्य आहे.
साधारणतः महिलेच्या ओव्युलेशन म्हणजे बीजकोश फुटून स्त्री जननपेशी बाहेर येण्याच्या काळात गर्भ राहाण्याची शक्यता जास्त असते.
पुढच्या मासिक पाळीच्या 12 ते 14 दिवस आधीचा हा काळ असतो.
एनएचएसने दिलेल्या माहितीनुसार पुरुषाचे शुक्राणू महिलेच्या पोटात ओव्युलेशन येण्याआधी 7 दिवसापर्यंत तग धरून राहू शकतात.
म्हणजेच गरोदर राहाण्याचा काल अलिकडेपर्यंत येऊ शकतो.
7) मासिक पाळीदरम्यान सेक्स? योग्य की अयोग्य?
पाळीदरम्यान सेक्स हा विषय भारतीय समाजात कदाचित अगदी विचित्र वाटणारा असू असतो. पण पाश्चिमात्य देशांमध्ये यासंदर्भात संशोधन सुरू आहे.
पाश्चिमात्य माध्यमांमध्ये याविषयी अनेक वेळा लिहिलं बोललं जातं.
मासिक पाळीदरम्यान शरीरसुखाचा आनंद घ्यावा की नाही यासंदर्भात अनेक प्रवाद आहेत. शास्त्रीयदृष्ट्या यात काहीच वावगं नसल्याचं स्पष्ट होतंय.
एका संशोधनानुसार, 500 लोकांपैकी 55 टक्के महिलांनी मासिक पाळीदरम्यान सेक्स हा अनुभव अगदीच नैसर्गिक आणि अनोखा असल्याचं सांगितलं. मात्र 45 टक्के महिलांना हा अनुभव फारसा भावलेला नाही.
मासिक पाळीदरम्यान सेक्स याविषयावर पुरेसं संशोधन झालं आहे.
या संशोधनानुसार 45 टक्के महिलांना पाळीदरम्यान सेक्स करताना अधिक उत्तेजित वाटतं असं स्पष्ट झालं आहे.
मात्र एवढा अभ्यास होऊनही याविषयावर संशोधक ठोस असा निष्कर्ष काढू शकलेले नाहीत.
8) नेहमी एकमेकींसोबत राहणाऱ्या स्त्रियांची पाळी एकाच वेळी येते का?
एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीही एकाच वेळी येते, असा सर्वसाधारण समज आहे.
पण यात कितपत तथ्य आहे? यामागे एक विचार हा आहे की, एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांचे फेरमॉन्स (माणसं किंवा प्राण्यांच्या शरीरातून स्त्रवणारं एक संप्रेरक) एकाच वेळेस स्त्रवतात. यामुळेच कदाचित एकत्र राहाणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येऊ शकते. बऱ्याच जणींना यात तथ्य आहे, असं वाटतं.
असं का होत असेल? यामागचा एक प्रचलित विचार असा आहे की, हे स्त्रियांमधलं एकमेकींना साहाय्य करण्याचं धोरण असावं.
एकाच पुरुषाच्या अंतःपुराचा भाग होण्यापासून वाचण्यासाठी याची त्यांना मदत होते. एकाच वेळी सगळ्या स्त्रियांची मासिक पाळी आल्यास पुरुष त्या कालावधीत दुसऱ्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवू शकत नाही. यामुळेच कदाचित एकमेकींच्या सान्निध्यातल्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येत असावी, असंही सांगितलं जातं.
अर्थात असेही काही अभ्यास समोर आलेत ज्यात एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकत्र येत नाही असा निष्कर्ष काढला गेला आहे. काही लोकांनी आधीच्या अभ्यांसांमध्येही बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. अभ्यासकांनी हा अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या लोकांविषयी टीकाकारांना शंका आहेत.
त्यांच्या मते आधीच्या अभ्यासकांची 'पाळी एकत्र येण्याची' व्याख्या फारच पसरट आहे. त्यात नेमकेपणा नाही.
9) मासिक पाळी नीट राहावी म्हणून काय खावं, काय खाऊ नये?
मासिक पाळी सुरळीत राहाण्याचा आणि तुम्ही काय आहार घेताय याचाही फार जवळचा संबंध असतो.
समतोल आहारामुळे पाळीचं चक्र नियमित राहातं. पाळीमध्ये अगोदरपासूनच गुंतागुंत असेल तर आहारात योग्य बदल केल्यानं फायदा होऊ शकतो.
जंक फूडमुळे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी उशीरा येणं किंवा वेळेपेक्षा जास्त लांबणं असे प्रकार घडू शकतात. अन्नात हिमोग्लोबिनची कमतरता असेल पाळीच्या वेळी कमी रक्तस्राव होऊन त्रास होऊ शकतो.
अधिक वाचा- मासिक पाळी सुरळीत होण्यासाठी काय खाऊ नये?
10) मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे साइड इफेक्टस काय असतात?
सणावारात, पूजेअर्चेत पाळीचं 'विघ्न' नको म्हणून महिला या गोळ्या सर्रास आणि सतत घेतात.
नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. गौरी पिंप्राळकर म्हणतात, "या गोळ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रेकमेंड करत नाहीत." त्या पुढे सांगतात, "इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात, त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याचे अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.
या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस आम्हाला पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका दहा-पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याही हाय डोसमध्ये. त्याचे परिणाम फार घातक असतात."
कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो.
अधिक वाचा- या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








