मुंबईत गोवरच्या आणखी 24 केसेस, एकूण 3208 जणांना लक्षणं

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
1. मुंबईत गोवरच्या आणखी 24 केसेस
मुंबईत सोमवारी (21 नोव्हेंबर) ला गोवरच्या आणखी 24 केसेस आढळून आल्या असल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. गोवंडीमध्ये एक वर्षाच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाल्याचा अंदाजही पालिकेने पुढे व्यक्त केला.
त्यामुळे 1 जानेवारीपासून आतापर्यंत गोवरच्या रुग्णांची संख्या 208 इतकी झाली आहे
यावर्षी गोवरने आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. गोवंडीमध्ये झालेल्या मृत्यूची चौकशी सुरू आहे.
गोवंडी आणि देवनार भागात सहा मृत्यू झाले आहेत, तर कुर्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर
गोवरसदृश्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांची संख्या 3208 झाली असल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.
द प्रिंट ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
2. नाहक अटकेमुळे न्यायव्यवस्थेवर भार- न्या (निवृत्त) उदय लळीत
अलीकडच्या काळात दिवाणी वादांना फौजदारी खटल्यांचा रंग दिला जात आहे आणि विनाकारण अटक करून न्यायालयीन व्यवस्थेवरील भार वाढवला जात असल्याचे परखड मत माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सोमवारी व्यक्त केले.
न्यायमूर्ती के. टी. देसाई स्मृती व्याख्यानमालेतील ‘फौजदारी न्यायप्रणालीचे प्रभावीकरण’ या विषयावरील व्याख्यानात लळीत बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
न्यायमूर्ती लळीत यांनी फौजदारी न्यायदान प्रणालीतील अनेक त्रुटींवर यावेळी बोट ठेवले. सध्याच्या काळात पांढरपेशांकडून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यात काही तंत्रज्ञानाशी संबंधित पैलू असलेली प्रकरणे आहेत, मात्र अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणेला आवश्यक प्रशिक्षण दिले गेल्याचे वाटत नाही, असं मतही लळीत यांनी मांडलं.
कोठडी सुनावताना कोठडीची का गरज आहे? तपासात नेमकी काय प्रगती आहे? असे प्रश्न न्यायदंडाधिकाऱ्यांकडून विचारलेच जात नाहीत किंवा त्यांचं प्रमाण फारच तुरळक असल्याबाबतही माजी सरन्यायाधीशांनी खंत व्यक्त केली.

फोटो स्रोत, Getty Images
3. काँग्रेसला माझी औकात दाखवायची होती, ते विकासावर का बोलत नाहीत- मोदी
गुजरात निवडणुकीच्या प्रचारात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उडी घेतली आहे. सोमवारी झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींना नावं ठेवल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर खरमरीत शब्दात टीका केली.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार सुरेंद्रनगरमध्ये झालेल्या एका रॅलीत मोदी यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावरही टीका केली.
पाटकर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यावर नर्मदा आंदोलकांना शिक्षा करा, असं आवाहन मोदींनी मतदारांना केलं.
4. मुंबई महापालिकेसाठी शिंदे-फडणवीसांची मोठी खेळी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तगड्या विद्यमान नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतल्यास मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त जागा जिंकता येतील यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांनी रणनीती आखली आहे.
एखाद्या वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक ज्या पक्षाकडे जाईल त्याला ती जागा देण्याच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते कामालाही लागले आहेत.
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढविणार असले तरीही उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील विद्यमान नगरसेवकांना निवडून येण्याची योग्यता पाहून पक्षप्रवेशाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
5. हृदयासाठी लागणारे स्टेंट आणखी स्वस्त होणार
हृदयाच्या वाहिनीतील अडथळे दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे स्टेंट आता आणखी स्वस्त होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
स्टेंटचा अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने ही बातमी दिली आहे. स्टेंटचा या यादीत समावेश करावा की नाही यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. The National Pharmaceutical Pricing Authority तर्फे आता या स्टेंटची किंमत ठरवली जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








