गुजरात : 2002 ची दंगल, गोव्यातील ‘ती’ मिटिंग आणि ‘अडवाणी काहीच न बोलता फक्त रडले...’

फोटो स्रोत, AFP
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, राजकोट
2002 मध्ये जेव्हा गुजरातमध्ये दंगल झाली तेव्हा सलमान शेख (नाव बदललंय) 35 वर्षांचे होते. त्यांची तीन मुलं आणि पत्नीसोबत ते राजकोटमध्ये एका अपार्टमेंट मध्ये राहायचे.
सलमानचा फ्लॅट ग्राऊंड फ्लोरवर होता. त्या अपार्टमेंटमध्ये सलमान शेख यांचं एकमेव कुटुंब होतं जे मुस्लिम होतं. बाकी त्या अपार्टमेंटमध्ये सगळे हिंदू लोक राहत होते.
27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमध्ये दंगल भडकली. त्यामुळे राजकोटमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण होतं. सलमान शेख सुद्धा घाबरले होते.
सलमान शेख यांना विचारलं की, सगळ्या हिंदूंमध्ये ते एकटेच होते म्हणून त्यांना भीती वाटली होती का?
यावर सलमान शेख सांगतात, "अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहत असणारं एक हिंदू कुटुंब रोज रात्री आम्हाला त्यांच्या घरी बोलवायचं. कित्येक रात्री आम्ही त्या कुटुंबासोबत घालवल्या. ते गुजरात सरकारच्या जमीन आणि महसूल विभागात ड्रायव्हर म्हणून काम करायचे.
माझं मन तर म्हणतंय अशा चांगल्या व्यक्तीचं नाव सांगायला हवं, पण भीती वाटते की, यामुळे त्यांच्या कुटुंबाला उगाच त्रास सहन करावा लागेल. आज जे हयात नाहीत. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला."
सलमान शेख पुढे सांगतात, "दंगल पेटली असली तर राजकोटमध्ये त्याचा एवढा काही परिणाम जाणवला नव्हता. पण त्यांना माझ्या कुटुंबियांची चिंता होती.
2002 च्या आधी मी धार्मिक अल्पसंख्याक आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी नेहमीच हिंदू लोकांच्या सोबत राहिलो पण मनात भीती कधी आली नाही. गुजरातच्या सौराष्ट्र भागात तर हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी भावनाही नव्हती."

फोटो स्रोत, Getty Images
2002 च्या दंगलीमुळे शेख यांच्या आयुष्यात काय बदल झाले?
ते म्हणतात की, "काय बदल झाले, काय परिणाम झाले हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे तर, बघा आज ज्या कुटुंबाने मला त्याकाळी आसरा दिला त्यांचं नाव घ्यायला मला आज भीती वाटते. त्यांनी माणुसकीच्या नात्याने खूपच चांगलं काम केलं, पण तरीही मला त्यांची नावं सांगायला भीती वाटते. कारण यातून त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील. तर दुसरीकडे मला पण माझी ओळख उघड करायला भीती वाटते. 2002 आधी अशी कोणतीही भीती माझ्या मनात आली नव्हती."
सलमान शेख यांची दोन मुलं आता कॅनडात राहतात. दोन्हीही डॉक्टर आहेत. सलमान यांना वाटतं की, या दोघांनीही तिकडंचंच नागरिकत्व घ्यावं.
सलमान शेख 56 वर्षांचे आहेत. त्यांना जेव्हा विचारलं की, आपल्या मुलांशिवाय ते आपलं आयुष्य कसं काढतील?
तेव्हा ते म्हणाले, "प्रत्येक बापाला असंच वाटतं की, त्याच्या मुलांना जगायला चांगलं आणि सुरक्षित वातावरण मिळावं. माझ्यासाठी तर माझी मातृभूमी हीच आहे, आणि मला इथंच मरायचं आहे."
गुजरात निवडणुकांच्या संदर्भात मागच्या दोन आठवड्यांपासून मी वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरतोय. आम्ही ज्या गाडीने फिरतोय त्याचे ड्रायव्हर हिंदू आहेत.
जिथे जिथे ब्रिज, पूल, उड्डाणपूल, नवे रस्ते, रिव्हर फ्रंट आणि स्टेडियम्स नजरेस पडत आहेत तिथंतिथं ते गाडी स्लो करतात आणि एकदम उत्साहाने सांगतात की, सर हे बघा हे मोदीजींनी बनवलंय. इथं उड्डाणपूल नव्हता तेव्हा रस्ता जॅम व्हायचा. हे स्टेडियम बघा सर किती भारी बनवलंय. आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे इथली गुंडगिरी पूर्णपणे संपली आहे.
मी विचारलं गुंडगिरी संपली कशी? तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सांगितलं की, "2002 नंतर गुंडगिरी राहिलीच नाही. 2002 पूर्वी इथं इतकी गुंडगिरी चालायची की, ना कोणाला व्यवसाय करता येत होता ना आमच्या मुली-बहिणी सुरक्षित होत्या."

फोटो स्रोत, AFP
अर्थ
अहमदाबादस्थित ज्येष्ठ पत्रकार राजीव शाह म्हणतात, "2002 नंतर गुजरातमध्ये जे बदल घडले त्यात तुम्हाला असं दिसेल की, ज्यांनी 2002 च्या दंग्यात घरं जाळली ते तुम्हाला ही गोष्ट अभिमानाने सांगतील. पण हेच दुसरीकडे दंगलग्रस्त मुस्लिमांना आधार देणारा त्याविषयी काळजीपूर्वक सांगेल."
राजीव शाह म्हणतात, "2002 नंतर जी दंगल घडली त्यानंतर भाजप गुजरातमध्ये एकही निवडणूक हरली नाहीये. गुजरात मधील शहरी हिंदू मध्यमवर्गाने 2002 च्या दंगलीविषयी फारशी असहमती दाखवली नाही. इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये लवकर शहरीकरण झालं त्यामुळे मध्यमवर्गही उदयास आला."
"शहरीकरण आणि मध्यमवर्गाचा उदय असा थेट संबंध आहे. शहरांवर आणि मध्यमवर्गावर भाजपची पकड एकदम मजबूत आहे. मी यावेळेस काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला विचारलं की, गुजरातच्या निवडणुकांचे निकाल काय लागतील?
यावर त्याचं उत्तर होतं की, शहरातल्या 60 जागा भाजपसाठी सोडून द्या आणि उरलेल्या 160 जागा अर्ध्या अर्ध्या करा. आणि गुजरातच्या निवडणुकांचे निकाल हेच असतील. शहरी मध्यमवर्गाला वाटत की, भाजप मुस्लिमांना बरोबर ताब्यात ठेवते."
राजीव शाह म्हणतात की, "2002 मध्ये जे काही घडलं ते चुकीचं होतं, हे लोकांना पटवून देण्याची हिंमत गुजरातमधल्या कोणत्याच पार्टीमध्ये नाहीये. त्यांना याची भीती वाटत राहते.
अहमद पटेल म्हणायचे की, निवडणुक लढण्याचा काहीच फायदा नाही कारण ते हरतील. याचा वाईट परिणाम होईल. अहमद पटेल यांना वाटायचं की, यामुळे मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप होईल. म्हणजे विचार करा, हिंदू समर्थक दिसण्यासाठी भाजपचं प्रेशर कोणत्या लेव्हलपर्यंत काम करतं.
आम आदमी पक्षावरही एवढा दबाव आहे की, त्यांनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याचं वक्तव्य केलं."

फोटो स्रोत, Getty Images
बिहारमधल्या दंगलीनंतर काँग्रेसचा सफाया, पण गुजरातमध्ये भाजप मजबूत
1989 मध्ये बिहारमधील भागलपूरमध्ये भीषण दंगल उसळली होती. या दंगलीनंतर काँग्रेसला आजअखेर सत्तेत परतता आलं नाही.
जेव्हा दंगल घडली तेव्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं. आणि सत्येंद्र नारायण सिंह मुख्यमंत्री होते. या दंगलीनंतर सत्येंद्र नारायण सिंह बिहारच्या राजकारणातून गायब झाले.
दरम्यान राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांनी भागलपूरचे तत्कालीन एसपी केएस द्विवेदी यांची बदली थांबवली होती.
जेव्हा दंगल घडली तेव्हा दंगलखोरांसोबत मवाळ धोरण अवलंबल्याचा आरोप द्विवेदींवर करण्यात आला होता. मुख्यमंत्री असलेल्या सत्येंद्र नारायण सिंह यांनी राजीव गांधींच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
के एस द्विवेदी यांची बदली थांबवल्याने मुस्लिमांमध्ये चुकीचा संदेश गेल्याचं सत्येंद्र नारायण सिंह यांचं म्हणणं होतं.
त्याच पद्धतीने 1987 साली उत्तरप्रदेशमध्ये मेरठ जिल्ह्यातील हाशिमपुरामध्ये 42 मुस्लिमांचा जीव घेण्यात आला होता. तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री होते नारायण दत्त तिवारी. या हत्याकांडानंतर यूपीमध्येही काँग्रेस सत्तेवरून गेली.
भागलपूर दंगलीनंतर बिहारी जनतेने काँग्रेसला कायमचा निरोप दिला. तर उत्तरप्रदेशातील हाशिमपुरा घटनेनंतरही काँग्रेसची हीच परिस्थिती झाली होती.
पण गुजरातमध्ये असं काय घडलं की 2002 च्या दंगलीनंतर भाजपचा पराभवच झाला नाही, आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची लोकप्रियता गुजरातबाहेरही वाढली.

फोटो स्रोत, Getty Images
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ अच्युत याज्ञिक सांगतात की, "गुजरातच्या मध्यमवर्गीयांमध्ये प्रदीर्घ काळापासून हिंदुत्वाची जाणीव रुजवली जात आहे. आणि त्याला जे खतपाणी द्यावं लागतं ते कधीच थांबलेलं नाहीये.
गुजरातमधील जातीय राजकारणाला उभारी देण्यात तिथल्या संप्रदायांचाही सहभाग आहे. जसं की, स्वामीनारायण पंथ आणि स्वाध्याय पंथ."
"या संप्रदायांमुळे जातीव्यवस्था दुबळी झाली. शहरांमध्ये आल्यावर जातीची अस्मिता दुबळी होते. शहरीकरण झाल्यामुळे जातीव्यवस्थेची बंधनं कमकुवत झालेली असतात.
त्यामुळे शहरात आल्यावर लोक अशा संप्रदायांमध्ये सामील होतात. आणि इथले जे संप्रदाय आहेत ते अप्रत्यक्षपणे हिंदुत्वाचं राजकारण पुढे नेण्यात मदत करत आहेत."
अच्युत याज्ञिक पुढं सांगतात, "तसं बघायला गेलं तर गुजरातच्या तुलनेत बिहारमध्ये शहरीकरणाचा वेग खूपच कमी आहे. त्यामुळेच इथं जातीव्यवस्था आपली पाळंमुळं टिकवून आहे.
जसंजसं नागरीकरण वाढत जाईल तसतसं कास्ट असोसिएशन कमकुवत व्हायला सुरुवात होईल. कारण त्याला कोणता तरी पर्याय हवा असतो. संप्रदाय याला पर्याय म्हणून पुढं येतो आणि हिंदुत्वाच्या राजकारणाला खत-पाणी देतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्राऊंड लेव्हलवर मजबूत होत गेला पण हेच काँग्रेसचं सेवा दल पाहिलं तर ते कुठेच नाहीये. आपण जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी शहरीकरण थांबवून ठेऊ शकत नाही. शहरीकरण तर होतच राहील, पण यासोबतच संप्रदायांची वाढ आणि हिंदुत्वाविषयीची त्याची ओढ धोकादायक आहे."
अच्युत याज्ञिक पुढं सांगतात, "काँग्रेसने सत्तेत असतानाही संघटना मजबूत केल्या नाहीत. गुजरात काँग्रेसमध्ये झिन्ना भाई दर्जीसारखे नेते होते. त्यांना गुजरातच्या कानाकोपऱ्याची माहिती असायची. त्यामुळे हाताच्या बोटांवर ते जातीय समिकरणांची आकडेमोड करायचे.
काँग्रेसमध्ये आता असे नेते उरलेले नाहीयेत. किंबहुना काँग्रेसला अशा नेत्यांकडून काही धडेसुद्धा घ्यायचे नाहीयेत."

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार दर्शन देसाई म्हणतात, "काँग्रेस त्यांच्या शासनकाळात झालेल्या दंगलींना धोरणांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे जस्टीफाय करू शकत नाही. तसंच भाजपही या दंगलींना धोरण आणि तत्वज्ञानाच्या आधारे समर्थन देत नसेल तरी त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा स्पष्ट आहे."
"ते हिंदुत्वाबद्दल उघडपणे बोलतात. गुजरातच्या दंगलींना हिंदूंमध्ये जस्टीफाय करण्यात भाजपला यश मिळालंय. जेव्हा तुम्ही 2002 च्या गुजरात दंगलीबद्दल गुजरातच्या बाहेर बोलता तेव्हा बहुसंख्य हिंदू आधी गोध्राबद्दल बोला असं म्हणतात.
गुजरातच्या दंगलीनंतर मोदी कृती आणि प्रतिक्रिया याविषयी बोलले होते. मोदींच्या या वक्तव्याशी लोक मोठ्या प्रमाणावर सहमत असल्याचं दिसतं, कारण 2002 च्या दंगली गोध्राचं प्रत्युत्तर होतं."
दर्शन देसाई म्हणतात, "काँग्रेस अशा दंगलीचं समर्थन करू शकत नाही किंवा समर्थन करण्याचा प्रयत्नही करत नाही. भागलपूर असो वा हाशिमपुरा, उलट दंगलीत ते व्हिलनच्या रुपात समोर येतात.
2002 च्या दंगलीनंतर अवघ्या दोन वर्षांत केंद्रात काँग्रेस सत्तेवर आली. पण त्यांनी गुजरात दंगलीची ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी होती, ती हातची संधी घालवली. काँग्रेसचे लोक अहमद पटेलांचं नाव घेतात की त्यांनी हे घडू दिलं नाही."
2002 च्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढल्याचं पत्रकार प्रदीप सिंह सांगतात.
ते सांगतात की, "2002 नंतर हिंदू लोकांना असं वाटलं की, त्यांना एक असा नेता भेटलाय जो त्यांना भारतात दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगू देणार नाही.
तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की, गुजरातमध्ये जी दंगल झाली ती गोध्रा हत्याकांडानंतर झाली. त्यामुळे भाजपला जस्टीफाय करणं सोपं झालं की, ही दंगल का झाली. दुसरी गोष्ट म्हणजे गुजरात मधील हिंदू लोक खूप धार्मिक आहेत. ते त्यांच्या गोष्टींबाबत खूप आग्रही असतात.
जसा यूपी बिहारमध्ये मुस्लिमांचा दबाव आहे तसा गुजरातमध्ये नाहीये. म्हणजेच इथं मुस्लिम लोकसंख्या कमी आहे. तुम्ही गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणू शकता, पण तरीही भाजपने आपल्या सर्व संघटना इथंच जास्त मजबूत केल्यात."

फोटो स्रोत, Getty Images
2002 च्या दंगलीनंतर गुजरातमध्ये लोकशाही कमकुवत होईल किंवा कोणाशीही भेदभाव करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे काही बदल झालेत या तर्काशी गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री आणि गुजरातचे ज्येष्ठ भाजप नेते नितीन पटेल सहमत नाहीयेत.
ते म्हणतात, "2002 च्या दंगलीबद्दल न्यायालयाने सर्वकाही सांगितलंय. दोषींना शिक्षाही झाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली गुजरातचा सर्वांगीण विकास झालाय, त्यामुळेच भाजप इथं मजबूत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
2002 ची दंगल आणि नरेंद्र मोदींची लोकप्रियता
7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 24 फेब्रुवारी 2002 रोजी मोदींनी राजकोट-2 मधून विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली. मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील ही पहिलीच निवडणूक होती. मोदी 14,700 मतांच्या फरकाने जिंकले होते.
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा इथं साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 डब्याला आग लागली आणि यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला. यानंतर गुजरातच्या बऱ्याच भागात दंगली पसरल्या.
डिसेंबर 2002 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि यावेळी मोदींनी राजकोट-2 ऐवजी गांधीनगरजवळील मणिनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली.
फेब्रुवारीमध्ये मोदी 14 हजार मतांनी जिंकले होते, मात्र यावेळच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या यतीन ओझा यांचा 75,331 मतांनी पराभव केला.
2007 मध्ये मतांचा हा फरक आणखीनच वाढू लागला होता. 2007 मध्ये ते मणिनगरमधून 87,000 मतांच्या फरकाने निवडून आले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी 86,373 मतांच्या फरकाने निवडून आले होते.
भाजप गुजरातमध्ये 1995 पासून सर्व निवडणुका जिंकताना दिसते. पण 2002 मध्ये दंगल झाल्यानंतर जी निवडणूक झाली त्यावर्षी डिसेंबरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वांत मोठा विजय मिळाला.
1995 मध्ये 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपच्या एकूण 121 जागा होत्या. 1998 मध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपने 117 जागा जिंकल्या.
त्यानंतर डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 127 जागा निवडून आणल्या. 2007 मध्ये 116 आणि 2012 मध्ये 115 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
पण सर्वांत कमी जागा त्यांना 2017 च्या निवडणुकीत मिळाल्या होत्या.
2017 मध्ये भाजपला फक्त 99 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. 2013 मध्ये, भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व अशा 26 लोकसभा जागा जिंकल्या होत्या.
2019 मध्येही भाजपने ही मॅजिक फिगर कायम ठेवली.

फोटो स्रोत, Getty Images
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ घनश्याम शाह म्हणतात,
"2002 च्या आधी नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये कोणीही ओळखत नव्हतं. मोदींनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपलं राजकारण पुढे नेलं. त्यांनी मुस्लिमविरोधी राजकारणासोबतच भ्रष्टाचाराच्या विरोधातही घोषणा दिल्या. त्यांची 'न खाऊंगा न खाने दूंगा' ही घोषणा मध्यमवर्गीयांच्या पसंतीस उतरली होती."
"मध्यमवर्गीयांना असं वाटलं की, मोदींच्या मागे त्यांचं कुटुंब नाहीये तर मग ते भ्रष्टाचार कोणासाठी करतील. मोदींनी दंगलीविषयी कृती आणि प्रतिक्रिया असं वक्तव्य केलं होतं. पण मी असं अजिबात म्हणणार नाही की, हिंदुत्वाच्या राजकारणामुळे मोदींची लोकप्रियता वाढली.
मोदींनी विकासाच्या गोष्टी केल्या. मोदींना हे माहीत होतं की, हे सेंटिमेंट शेवटपर्यंत राहणार नाहीत. मोदींसाठी हिंदुत्व हे मिशन आहे आणि आर्थिक विकासासोबत सुशासनावर बोलणं त्या मिशनपर्यंत पोहोचण्याची चावी आहे. मोदींना असं वाटतं की, जेव्हा संकट वाढत जातं तेव्हा हिंदुत्व ट्रम्प कार्ड म्हणून पुढं आणायचं असतं."
महाराजा सयाजीराव विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले इफ्तिखार खान सांगतात की, 2002 च्या दंगलीनंतर गुजरातमध्ये काही गोष्टी प्रस्थापित झाल्या.
ते सांगतात की, "जसं की, गुजरातमध्ये हिंदू लोक मुस्लिमांना घर भाड्याने देत नाहीत. मुस्लिमांसोबत भेदभाव होतो. आणि आता ते इतकं सामान्य झालंय की, त्यावर आश्चर्य व्यक्त करावं असंही काही राहिलेलं नाही."
"भाजपच्या भीतीमुळे इथले इतर राजकीय पक्ष लोकसभा असो विधानसभा असो मुस्लिमांना तिकीट देणं टाळतात, हा सुद्धा मुद्दा राहिलेला नाहीये.
कोणताही ठोस पुरावा नसला तरी मुस्लिमांना कोणत्याही गुन्ह्याच्या आरोपाखाली वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवता येतं. जर मुस्लिम पीडित असेल आणि गुन्हेगार हिंदू असेल तर त्यांना विशिष्ट धर्माचे असल्याचा फायदा मिळतो. आणि हे तुम्हाला बिल्किस बानो प्रकरणात पाहायला मिळेल."
सुरतमधील सोशल सायन्स स्टडी सेंटरचे प्रोफेसर किरण देसाई म्हणतात, "2002 च्या दंगलीनंतर गुजरातमध्ये जी काही लिबरल स्पेस होती ती संपून गेली. हिंदुत्वाची विचारधारा अगदी प्रत्येक घराघरात पोहोचली.
भाजपने निवडणुकीच्या राजकारणात हुकूमशाही स्वीकारली. अटलबिहारी वाजपेयी किंवा प्रमोद महाजन अशा तुलनेने उदारमतवादी नेत्यांना भाजपमध्ये आता स्थान उरलं नाही. निवडणुकीच्या राजकारणात मोदींनी विजयाची भाषा रचली आहे आणि विरोधात बसलेल्यांना हा विजय मोडून काढण्यासाठी कोणताच उपाय सापडत नाहीयेत."

फोटो स्रोत, Getty Images
28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादच्या नरोदा पाटिया आणि आसपासच्या भागात दंगलखोरांनी 97 अल्पसंख्याकांची हत्या केली होती. या हत्याकांडात सामील असलेल्या 32 जणांमध्ये मनोज कुकरानी नावाचा व्यक्ती होता.
यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मनोज कुकरानीची मुलगी पायल कुकरानीला तिकीट दिलंय. नरोदा पाटियामध्ये दंगलीला बळी पडलेल्यांपैकी सलीम शेख हे एक आहेत.
जेव्हा त्यांना पायल कुकरानीला तिकीट देण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले," 2002 च्या दंगलीत पायल कुकरानीच्या वडिलांनी गरीब मुस्लिमांना मारण्यासाठी खूप कष्ट घेतलं होतं. त्यामुळे त्यांना बक्षीस तर मिळणारच होतं. कायद्यानुसार दोषीला निवडणूक लढवता येत नाही म्हटल्यावर त्यांच्या मुलीला तिकीट मिळालं."
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि 1995 मध्ये भाजपला बहुमताने सत्तेवर आणणारे शंकर सिंह वाघेला म्हणतात, 2002 च्या दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांना नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रिपदावरून हटवायचं होतं, पण अडवाणी मोदींवर ठाम होते.
वाघेला पुढं सांगतात, "एप्रिल 2002 मध्ये गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत वाजपेयींनी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून जवळपास हटवण्याचाच निर्णय घेतला होता, पण यासाठी आडवाणी तयार नव्हते.
2016 मध्ये लालकृष्ण अडवणींच्या पत्नी कमलाजी यांचं निधन झालं तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी मी त्यांना म्हटलो की, गोव्यात तुम्ही मोदींना वाचवलं आणि त्यांनी आज तुमची पक्षात काय अवस्था केलीय? अडवाणी काहीच न बोलता फक्त रडले."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








