गुजरात विधानसभा निवडणूक : इसुदान गढवी गुजरातमध्ये 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

फोटो स्रोत, facebook
- Author, दिलीप गोहील,
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसीसाठी.
आम आदमी पक्षाने इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.
शेतकऱ्याचा मुलगा ते पत्रकार बनलेले गढवी हे एका वृत्तवाहिनीत काम करत होते. 14 जून 2021 रोजी त्यांनी आप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्याची मोठी चर्चा झाली होती.
आता याच गढवी यांना आपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.
गुजरातमधील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हे जनतेने सुचवलेले असतील, असं पक्षाने आधीच जाहीर केलं होतं.
त्यासाठी लोकांकडून पसंतीही मागवून घेण्यात आली. अखेरीस, इसुदान गढवी यांचं नाव आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून समोर आलं आहे.
इसुदान गढवी कोण आहेत?
इसुदान गढवी हे पेशाने मूळचे पत्रकार. एका प्रादेशिक भाषेतील टीव्ही वृत्तवाहिनीवर प्राइम टाइममध्ये 'महामंथन' या डिबेट शोसाठी त्यांना ओळखलं जातं.

फोटो स्रोत, facebook
या कार्यक्रमात लोकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून गढवी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली.
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील जामखंभाळीया तालुक्याजवळच्या पिपलिया गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात ते 10 जानेवारी 1982 रोजी जन्मले.
तिथून मग पत्रकार ते 'आप'चे राष्ट्रीय नेते बनलेल्या इसुदान गढवी यांच्या प्रवासाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
जामनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर गढवी यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना त्यांची विद्यापीठ सेक्रेटरी (जीएस) म्हणूनही निवड करण्यात आली होती.
पत्रकार बनल्यानंतर कुटुंबातून दूर असलेल्या शहरात ते राहायला आले. यादरम्यान 2014 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पत्रकारिता सोडून गावी जाण्याचा त्यांच्या मनात विचार सुरू होता.
पण त्यांच्या वडिलांनी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की कितीही अडचणी आल्या तरी पत्रकारिता सोडू नकोस. याच प्रेरणेतून त्यांनी आपली पत्रकारिता चालू ठेवली.
सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये त्यांनी ई टिव्हीसाठी वार्तांकन केलं. नंतर अहमदाबादमध्ये न्यूज-18 चॅनेलचे ब्युरो चीफ बनले.

फोटो स्रोत, Tejas vaidya
2016 मध्ये व्ही टीव्हीसारख्या आघाडीच्या चॅनेलमध्ये संपादक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.
वर उल्लेख केलेल्या महामंथन शोमधून त्यांची लोकप्रियताही वाढली.
लोकप्रिय न्यूज अँकर
पुढे इसुदान गढवी यांनी डिबेट शोमध्ये आपली चमक दाखवून दिली.
महामंथनमध्ये प्रामुख्याने शेतकरी, मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर बोलत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढली.
पीक विम्याच्या मुद्द्यावरून गुजरातमध्ये गदारोळ माजला होता. या मुद्द्यावर त्यांनी सर्व शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








