गुजरात विधानसभा निवडणूक : काँग्रेस आणि आप मुस्लिमांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत, कारण...

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA/Getty Images
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अहमदाबाद
अहमदाबादच्या ह्यूमन डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर (HDRC) या स्वयंसेवी संस्थेने 6 एप्रिल 2016 रोजी काही सफाई कामगारांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती.
या भरतीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, बनिया, पटेल आणि जैन समाजातील लोकांना प्राधान्य देण्यात येईल, असं या जाहिरातीत लिहिलेलं होतं. जाहिरातीच्या खाली संस्थेचे संचालक प्रसाद चाको यांची स्वाक्षरीही होती.
नोकरीची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणावरून मोठा वाद झाला. NGO च्या कार्यालयावर लोकांनी हल्लासुद्धा केला.
हल्ला करणाऱ्यांमध्ये उजव्या विचारांचेही लोक होते. तसंच काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचाही (NSUI) यामध्ये सहभाग होता. या प्रकारानंतर प्रसाद चाको यांना भूमिगत व्हावं लागलं.
अशा प्रकारची जाहिरात का दिली, असा प्रश्न प्रसाद चाको यांना विचारण्यात आला.
त्यांचं उत्तर होतं, "मी पूर्ण प्रामाणिकपणाने जाहिरात दिली. उच्चवर्णीयांकडून आरक्षणाचा विरोध होतो. त्यामुळे जे काम दलित लोक वर्षानुवर्ष करतात, त्यासाठी उच्च जातींना प्राधान्य देण्याबाबत म्हटलं तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल, हे मला पाहायचं होतं. मला प्रतिक्रिया कळाली."
राजीव शाह अहमदाबादचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते म्हणतात, "प्रसाद चाको यांचा हा प्रयोग अत्यंत रंजक होता. त्यांच्या जाहिरातीने सवर्णांची पोलखोल केली. NSUI कडून HDRC च्या कार्यालयावर हल्ला होण्यातून समजतं की गुजरात काँग्रेसमध्ये जातीयवादी आणि धर्मांध सवर्ण भरलेले आहेत. 2002 दंगलीनंतर गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष भाजपला घाबरून निवडणूक लढवतो, हे स्पष्ट होतं."
त्यांच्या मते, "भाजपच्या हिंदुत्वाला आणि बहुसंख्याकवादाच्या राजकारणाला आव्हान देण्यास काँग्रेस पक्ष घाबरतो. निवडणुकीत 2002 च्या दंगलीवर चर्चा केली तर आपलं नुकसान होईल, असं काँग्रेसला वाटतं."
2002 दंगलीवर चर्चा केल्यास हिंदू दूर जातात?
2002 च्या दंगलीवर काँग्रेसने चर्चा केली तर हिंदू भडकतील आणि भाजपच्या दिशेने झुकतील, असं आहे का?
राजीव शाह म्हणतात, "काँग्रेसची ही भीती स्वाभाविक आहे. माझ्या मते गुजरातचा शहरी हिंदू मध्यम वर्ग हा 2002 च्या गुजरात दंगलीशी कन्व्हिन्स आहे. अशा स्थितीत काँग्रेसने त्याचा विरोध केला तर मतदार भाजपकडे आणखी जास्त झुकू शकतो ही गोष्ट खरी आहे. तसंच काँग्रेस भाजपला या रणनितीने हरवू शकणार नाही. भाजपला हरवायचं असेल तर त्यांना थेट भिडावं लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
2002 साली 27-28 फेब्रुवारी दरम्यान गुजरातमध्ये दंगली सुरू झाल्या होत्या. त्या कित्येक दिवस सुरू होत्या.
गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेस रेल्वेच्या S-6 या डब्याला आग लावल्यानंतर ही दंगल उसळली होती.
या आगीत तब्बल 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये बहुतांश अयोध्यावरून अहमदाबादला परतणारे कारसेवक होते.
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत सरकारी आकडेवारीनुसार 1044 जण मारले गेले. त्यामध्ये 790 मुस्लीम तर 254 हिंदू होते.
डिसेंबर 2002 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका झाल्या. दंगली झालेल्या भागात भाजपला मोठा विजय मिळाला.
दंगलग्रस्त भागातील 65 पैकी 53 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
2002 साली भाजपला विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 126 ठिकाणी विजय मिळाला होता. यापैकी 73 जागा उत्तर आणि मध्य गुजरातमधील होत्या.
भाजपला त्यावेळी सर्वाधिक नुकसान सौराष्ट्र आणि कच्छ भागात झालं. तिथे भाजपच्या 11 मंत्र्यांपैकी बहुतांश जणांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
2002 निवडणुकीत हा विजय भाजपला 50 टक्के मतांनिशी मिळाला होता. काँग्रेस पराभूत झाला तरी त्यांना या निवडणुकीत 40 टक्के मते मिळाली होती.
कोणासोबतच पक्षपातीपणा नाही
गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन पटेल म्हणतात, "भाजपने कोणासोबतच पक्षपातीपणा केला नाही. बिल्किस बानो यांच्याबाबत बोलायचं झालं तर सगळं काही कायद्यानुसार झालेलं आहे. गुजरातमध्ये 2002 च्या दंगलीबाबत बोलणारे लोक गोध्राबाबत मात्र विसरतात. काँग्रेसच्या काळातच जास्त दंगली झाल्या आहेत. भाजपने उलट दंगली नियंत्रणात आणल्या. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर अंकुश ठेवण्याचं काम केलं. आता कोणताच पक्ष तुष्टीकरणाचं धाडस करत नाही."

फोटो स्रोत, Dipam Bhachech/Getty Images
भाजपची या प्रकरणातील भूमिका एकवेळ समजून घेता येईल. पण काँग्रेस असं का करत आहे?
अहमदाबादमध्ये सेंटर फॉर सोशल नॉलेज अँड अक्शनचे संचालक आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ अच्युत यागनिक म्हणतात, "काँग्रेसने काहीही केलं नाही तरी लोक मोठ्या संख्येने मतदान करतात, हे त्यांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी दंगलीवर चर्चा न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे."
ते पुढे सांगतात, "या पराभवानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर पहिलं विश्लेषण करण्यात आलं. पक्षाला ज्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं तिथे मुस्लिमांची संख्या 25 हजारपेक्षा जास्त आहे. काँग्रेस उमेदवार या भागांमध्ये मत मागण्यासाठीही गेले नव्हते."
"काँग्रेस पक्षाने सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला पण तरीही त्याचा पक्षाला फायदा झाला नाही. गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाचा विरोध हिंदुत्वविरोधी राजकारणाने व्हायला हवा होता. पण काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व धोरण स्वीकारल्याने ते आजपर्यंत अयशस्वी आहेत. आता तर स्थिती अशी आहे की काँग्रेस दुसऱ्या क्रमांकासाठी लढाई लढत आहे."
काँग्रेसने यंदाच्या गुजरात निवडणुकीत राजस्थानातील माजी मंत्री रघु शर्मा यांना प्रभारी बनवलं आहे. 2002 नंतर गुजरातमध्ये काँग्रेसच्या राजकारणात काय बदल झाला, असा प्रश्न बीबीसीने त्यांना विचारला.
ते म्हणाले, "आम्हाला भूतकाळात गुरफटून राहायचं नाही. 2002 च्या दंगलीतून लोक बाहेर आले आहेत. आता विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. तुम्ही बेरोजगारी, गरीबी, गैरसोयी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले पाहिजेत."
राहुल गांधी हे हिंदुत्वाच्या राजकारणाचा स्पष्टपणे विरोध करतात. पण गुजरात प्रदेश काँग्रेस ते करणं का टाळते?
या प्रश्नावर रघु शर्मा नाराज झाले. त्यांचं उत्तर होतं, "राहुल गांधी हिंदुत्व आणि हिंदूंच्या विरोधात नाहीत. तुम्ही अजेंड्याच्या बाहेर आलं पाहिजे. आम्ही हिंदू धर्माच्या विरोधात नाही. तुम्ही आम्हाला प्रश्नांमध्ये अडकवू पाहत आहात."
मुस्लिमांचं प्रतिनिधित्व
अच्युत यागनिक म्हणतात, "काँग्रेसला तर पहिल्यांदा आपल्या नेत्यांची सैद्धांतिक समज वाढवायला हवी. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नाही, हे काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांना माहितच नाही. हिंदुत्वाविरोधात बोलणं म्हणजे हिंदू धर्माविरुद्ध बोलणं नाही."

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/Getty Images
ते पुढे सांगतात, "काँग्रेसमध्ये बहुतांश नेते उजव्या विचारांचे आहेत. गुजरातमध्ये मुस्लिमांची संख्या 10 टक्के आहे. तरीसुद्धा भाजप गुजरातमध्ये मुस्लिमांना तिकीट देत नाही. तर काँग्रेसनेही मुस्लिमांच्या उमेदवारीत कपात सुरू केली आहे."
काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 6 मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्यापैकी 3 जणांना विजय मिळाला होता.
लोकसंख्येच्या हिशोबाने मुस्लिमांना कमीत कमी 18 तिकिटं तरी मिळायला हवीत, अशी मागणी दरियापूर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असलेले गयासुद्दीन शेख यांनी नुकतीच केली होती.
इतकी तिकिटं देणं जमलं नाही तर किमान 10-11 तरी तिकिटं द्यावीत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
काँग्रेस मुस्लिमांना लोकसंख्येच्या हिशोबाने तिकीट का देत नाही, याविषयी विचारल्यानंतर रघु शर्मा यांनी म्हटलं, "पक्ष केवळ जिंकणाऱ्या उमेदवारांना तिकिट देत असतो."
भाजपही मुस्लिमांना तिकीट न देण्याच्या प्रश्नाला हेच स्पष्टीकरण आजवर देत आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात गरबा कार्यक्रमादरम्यान दगडफेक केल्याच्या प्रकरणात काही मुस्लीम तरुणांना सार्वजनिकरित्या रस्त्यावर बांधून मारहाण करण्यात आली होती.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाने यावर मौन बाळगलं. पण जमालपूर खेडियाचे काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला आणि दरियापूरचे काँग्रेस आमदार गयासुद्दीन शेख यांनी त्याचा विरोध केला होता.
खेडावाला म्हणाले, या प्रकरणात काँग्रेसच्या मौनामुळे अल्पसंख्याकांमध्ये काळजी वाढली आहे.
मुस्लिमांबद्दल बोलणं हा गुन्हा आहे का?
झुबैर गोपलानी हे बडोदा येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते म्हणतात, "गुजरातमध्ये मुस्लिमांबाबत बोलणं हा गुन्हा झाला आहे. भाजपकडून आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही. भाजपला निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुस्लिमांविरुद्ध द्वेष गरजेचा आहे. पण काँग्रेस या द्वेषाचा ठाम विरोध करेल, असं आम्हाला वाटत होतं. पण असं केल्यास निवडणुकीत पराभूत होऊ, असं काँग्रेसला वाटतं. काँग्रेसला 2002 ची दंगल विसरायची आहे की जाणूनबुजून आठवायची नाही?"

फोटो स्रोत, Dipam Bhachech/Getty Images
गोपलानी पुढे सांगतात, "2002 च्या दंगलीबाबत प्रश्न उपस्थित केल्यास हिंदू आपल्याविरोधात एकजूट होतील, असं काँग्रेसला वाटतं. 2002 च्या दंगलीत मुस्लिमांवर जे अत्याचार झाले त्याला बहुसंख्याक हिंदू सहमत होते, असं कारण त्याचं असू शकतं का? या सहमतीशी असहमती कदाचित काँग्रेसला दर्शवायची नाही. तसं असल्यास त्यांनी ते स्पष्टपणे सांगावं. आम्ही आम आदमी पक्षाकडून अपेक्षा ठेवल्या होत्या. पण तेसुद्धा मुस्लिमांबाबत सावधच असतात."
गोपलानी यांच्या मते, "राहुल गांधी हे हिंदुत्वाच्या राजकारणाविरुद्ध स्पष्ट बोलतात, मात्र प्रदेश काँग्रेस त्याच्या उलट आहे. राहुल गांधी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्यापेक्षाही जास्त सेक्युलर आहेत. पण मीडियाने त्यांची प्रतिमा पप्पू अशी बनवली आहे."
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अर्जुनभाई रठावा म्हणतात, "निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करता येईल, असा कोणताही मुद्दा आम्हाला भाजपला द्यायचा नाही."
मुस्लिमांच्या हक्कांवर बोलणं हे धार्मिक ध्रुवीकरण कसं वाढवतं, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "भाजप त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करते. त्यामुळे आम्हाला इच्छा असली तरी आम्ही हे प्रश्न मांडू शकत नाही. पण आम आदमी पक्ष सर्वच समुदायांचे मुद्दे मांडत आहे."
गुजरातमध्ये 2000 नंतर जन्मलेल्या तरुणांना तर दंगलीबाबत फारशी माहितीही नाही.
आपचं मौन
आम आदमी पक्ष बिल्किस बानो प्रकरणात पूर्णपणे शांत आहे. बिल्किस बानो यांच्या बलात्कार प्रकरणातील दोषींना राज्य सरकारच्या सहमतीने मुक्त करण्यात आलं.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/Getty Images
2002 च्या दंगलीत बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तेव्हा त्या गरोदर होत्या. तसंच त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचीही दंगलखोरांनी हत्या केली होती.
अहमदाबादची पलक गुजरातच्या लॉ सोसायटी येथून बीबीएचं शिक्षण घेत आहे. 2002 च्या दंगलीवेळी ती फक्त 3 वर्षांची होती.
2002 च्या दंगलीबाबत काही माहीत आहे का, या प्रश्नाला तिने नकारार्थी उत्तर दिलं. कुटुंबीयांनी कधी याबाबत सांगितलं नाही. त्यामुळे काही विशेष माहिती नाही, असं ती म्हणाली.
पलकला हा प्रश्न विचारला तेव्हा ती संध्याकाळच्या वेळी अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंटवर बसली होती.
गुजरातचा कोणता नेता आवडतो, या प्रश्नाला तिने उत्तर दिलं, "मोदी. बघा मोदींनीच हा रिव्हरफ्रंट बनवला आहे. गुजरातमध्ये मोदींमुळेच भाजप जिंकत आहे. यावेळीही मोदींमुळेच ते जिंकतील."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








