बाँडी बिस्ट: 31 महिलांवर बलात्कार करणारा 40 वर्षांनंतर सापडला

ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, NSW POLICE

अंदाजे 40 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराला हादरवणाऱ्या गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी ओळखलं आहे. या ‘सीरियल रेपिस्ट’नं सिडनी शहरात एकप्रकारे दहशतच माजवली होती. किथ सिम्स असं या बलात्काऱ्याचं नाव आहे.

किथनं 1985 ते 2001 या कालावधीत 31 महिलांना निशाणा बनवलं होतं. महिला जॉगिंगसाठी बाहेर गेल्या असताना किंवा त्या घरात एकट्या आहेत असे पाहून त्यांच्या घरात घुसत असे, मग हल्ला करत असे, असं पोलिसांनी सांगितलं.

आणखीही काहीजण या गुन्ह्यांमध्ये असण्याची शंका पोलिसांनी वर्तवलीय.

मात्र, नव्या डीएनए तंत्रज्ञानामुळे तपास अधिकऱ्यांना किथ सिम्सचा छडा लावता आला. मात्र, या गुन्हेगाराची ओळख पटली खरी, पण त्यापूर्वीच म्हणजे यंदा फेब्रुवारीत वयाच्या 66 व्या त्याचा मृत्यू झाला.

किथ सिम्सची ओळख पटली नव्हती, तोपर्यंत त्याला ‘द बॉंडी बिस्ट’ आणि ‘द ट्रॅकसूट रेपिस्ट’ अशा नावानं ओळखलं जात होतं. 1985 मध्ये त्याने पहिला गुन्हा केला होता आणि 2001 मध्ये त्याने शेवटचा गुन्हा केल्याची नोंद आहे.

त्यावेळी किथ सिम्सच्या गुन्ह्यांची स्वतंत्ररित्या चौकशी केली जात होती. मात्र, 2000 साली पोलिसांना या गुन्ह्यांमध्ये साम्य आढळलं आणि त्यांनी सर्व प्रकरणं एकत्र करून तपास करायला सुरुवात केली.

याचं कारण 12 पीडितांच्या डीएनए एकसारखाच मिळाला होता, तर इतर 19 घटनांमध्ये गुन्हेगाराची 'मोडस ऑपरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) एकसारखीच होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

14 ते 55 वर्षे वयोगटातील महिला पीडितांनी गुन्हेगाराबद्दल एकसारखंच वर्णन केलं होतं.

गुन्हेगार 160 ते 180 सेमी उंच असून, घारे डोळे, पसरट नाक असं वर्णन पीडित महिलांनी केलं होतं.

किथ सिम्स साधे कपडे परिधान करत असे, म्हणजे, ट्रॅकसूट, हूडी किंवा फुटबॉल शॉर्ट्स परिधान करत असे. चाकूनं तो पीडितांना धमकावत असे.

2019 मध्ये तपास अधिकाऱ्यांना पहिल्यांदा धागेदोरे सापडले. डीएनएच्या माध्यमातून शोध घेण्यास सुरुवात झाली. मग सप्टेंबरमध्ये सिम्सचे डीएनए आणि पोलिसांना सापडलेले डीएनए एकसारखे असल्याचे सिद्ध झाले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, 'सिम्स हा प्रेमळ वडील, प्रेमळ आजोबा होता. आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रेमानं वावरत असे.'

जेव्हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सिम्स गुन्हेगार असल्याचं सांगितलं, तेव्हा कुटुंबातील सदस्य म्हणाले की, आम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हती.

द डेली टेलिग्राफशी बोलताना तपास अधिकारी सेर्जंट शेले म्हणाले की, आम्ही त्याच्या पत्नीला भेटलो, तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला.

किथ सिम्सचा फेब्रुवारीत मृत्यू झाल्यानं अर्थातच आता त्याच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई करणं शक्य नाही.