IND vs NZ : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया या खेळाडूंमुळे बनली ‘ड्रीम टीम’

    • Author, ओंकार डंके
    • Role, बीबीसी मराठीसाठी

रोहित शर्माच्या टीम इंडियानं यंदाच्या वन डे विश्वचषक स्पर्धेत अपेक्षेपेक्षाही दमदार कामगिरी केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या प्रवासात संघातील जवळपास प्रत्येकानंच महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

मायदेशातच ही स्पर्धा होत असल्यानं, भारतीय संघ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होताच. पण टीम इंडियानं अनेक प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय साजरे केले आणि आपला दराराच निर्माण केला आहे.

भारतीय संघानं या स्पर्धेत सलग नऊ सामने जिंकले असून साखळी फेरीतला हा एकमेव अपराजित संघ आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉसनसारख्या काहींनी या टीमची तुलना 2003 आणि 2007 सालच्या वर्ल्ड कपमधल्या ऑस्ट्रेलियन संघाशी केली आहे.

सेमी फायनलमध्ये पोहोचलेली टीम इंडिया आता विश्वचषकाच्या विजेतेपदापासून फक्त दोन पावलं दूर आहे.

भारताच्या या यशाचं, बदललेल्या खेळाचं सर्वाधिक श्रेय कुणाला जातं? संघातल्या कोणत्या खेळाडूनं काय योगदान दिलं आहे? ते पाहूया.

रोहित शर्मा : पुढे होऊन लढणारा कर्णधार

सामने - 9, इनिंग - 9, धावा - 503, सरासरी - 55.88, 100/50 - 1/3

भारतीय संघ याआधी कधीही पहिल्या ओव्हरपासून आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखला जात नव्हता. विकेट सांभाळून खेळणे आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा करणे यावर भारतीय फलंदाजांचा भर असायचा.

पण रोहित शर्मानं टीम इंडियाच्या खेळाचा पॅटर्न बदलला आहे. धावांचा पाठलाग करताना पहिल्या 10 ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्येच सामन्याचा निकाल निश्चित होईल याची काळजी रोहित घेतो आहे की काय, असं वाटतं.

प्रथम फलंदाजी करतानाही त्याच्या आक्रमक खेळाचा टीम इंडियाला फायदा होताना दिसतो.

खरंतर रोहित विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भोपळाही न फोडता माघारी परतला होता. पण त्यानंतर श्रीलंकेचा अपवाद वगळता प्रत्येक सामन्यात त्यानं वेगवान खेळी केली आणि भारतीय डावाचा पाया घातला.

शुबमन गिल : दमदार खेळ आणि शतकाची प्रतीक्षा

सामने- 7, इनिंग - 7, धावा - 270, सरासरी - 38.57, 100/50 - 0/3

वन डेत फलंदाजांच्या रँकिंगमध्ये सध्या अव्वल स्थानी असलेल्या शुबमन गिलला डेंग्यूमुळे या विश्वचषकातले पहिल्या दोन सामन्यांत खेळता आलं नाही. पण आजारापणातून बाहेर पडल्यानंतर पहिल्याच बॉलवर त्यानं चौकार लगावला.

एकीकडे रोहित शर्मा पहिल्याच बॉलपासून गोलंदाजीवर तुटून पडत असल्यानं शुबमनला सेट होण्यासाठी वेळ मिळताना दिसो.

आपणही रोहितसारखी फलंदाजी करू शकतो हे त्यानं नेदरलँड्सविरुद्ध फक्त 30 बॉलमध्ये अर्धशतक झळकावून दाखवून दिलं आहे.

या स्पर्धेत टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये फक्त शुबमनलाच अद्याप शतक झळकावता आलेलं नाही. आता शेवटच्या टप्प्यात कमतरता भरुन काढण्याची संधी त्याच्याकडे असेल.

विराट कोहली : फलंदाजीचा आधारस्तंभ

सामने - 9, इनिंग - 9, धावा - 594 सरासरी - 99.00, 100/50 - 2/5

आपली चौथी विश्वचषक स्पर्धा खेळणारा विराट कोहली टीम इंडियाचा आधार आणि सध्याचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे.

या विश्वचषकात विराट शेवटपर्यंत फलंदाजी करत इनिंग कुठंही भरकटणार नाही याची जबाबदारी चोखपणे सांभाळतो आहे. त त्यानं स्पर्धेतील 9 पैकी 7 सामन्यांमध्ये अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे.

या दरम्यान विराटनं काही रेकॉर्डसही रचले आहेत. विराटनं सचिनच्या वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. तसंच एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या सचिनच्या रेकॉर्डपासून तो सध्या फक्त 80 रन्स दूर आहे.

पण या सर्व रेकॉर्डपेक्षा आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेल्या दोन वन-डे विश्वचषक स्पर्धा जिंकण्याच्या रेकॉर्डवर विराटचं लक्ष आहे आणि हा रेकॉर्ड करण्याच्या निर्धारानंच तो आता मैदानात उतरणार आहे.

श्रेयस अय्यर : चौथ्या क्रमांकाची चिंता मिटली

सामने - 9, इनिंग - 9, धावा - 421, सरासरी - 70.16, 100/50 - 1/3)

चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी कोण सर्वात योग्य आहे? य़ा प्रश्नाचं उत्तर टीम इंडियाला 2015 मधील संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत सापडलं नव्हतं. पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरनं ही काळजी दूर केलीय.

या स्पर्धेत काहीशी अडखळती सुरूवात करणाऱ्या श्रेयसनं उत्तरार्धात गती पकडली आहे. 82, 77 आणि नेदरलँड्‌सविरुद्ध नाबाद 128 या त्याच्या मागील तीन इनिंगमधील धावाच पाहा .

भारतीय फलंदाजांमध्ये विराटनंतर सर्वाधिक धावा करणारा श्रेयस आता स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाचा फलंदाज असेल.

के एल राहुल : अवघड दुखण्यावरचा योग्य इलाज

सामने - 9, इनिंग - 8, धावा - 347, सरासरी - 69.40, 100/50 - 1/1

के एल राहुल टीम मॅनेजमेंटनं त्याच्यावर आजवर दाखवलेला विश्वास या स्पर्धेत सार्थ ठरवताना दिसतो आहे.

पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 बाद 2 अशा बिकट परिस्थितीतून त्यानं विराटच्या साथीनं संघाला बाहेर काढलं होतं.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायची, म्हणजे खेळाडूसमोर सामन्यागणिक बदलत्या परिस्थितीनुसार खेळण्याचं आव्हान असतं. राहुलला ते नेमकं उमगलं आहे.

पहिल्या सामन्यात संयमी फलंदाजी करणाऱ्या राहुलनं नेदरलँड्सविरुद्ध फक्त 62 बॉलमध्ये शतक झळकावलं.

फलंदाजीसोबतच विकेटकिपिंगचं कामही राहुल चोख करतोय. तसंच DRS घेताना त्याचा सल्ला नेहमीच उपयुक्त असतो हे आपण सर्वांनी या स्पर्धेत वारंवार पाहिलंय.

सूर्यकुमार यादव : सूर्या होणार का रैना?

सामने - 5, इनिंग - 5, धावा - 87, सरासरी - 21.75, 100/50 - 1/1

हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला भारताच्या अंतिम 11 जणांच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. एरवी ट्‌वेन्टी20 चा स्टार खेळाडू मानल्या जाणाऱ्या सूर्यानं त्या संधीचं सोनं केलं.

लखनौमधील आव्हानात्मक पिचवर सूर्यकुमार यादवच्या 49 रन्सच्या खेळीमुळेच टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला होता. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे ‘सूर्या’ची ती इनिंग झोकाळली गेली. पण त्याचं महत्त्व कधी कमी होणार नाही.

2011च्या विश्वचषकात सेमी फायनलमध्ये सुरेश रैनानं शेवटच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी करत 36 धावांचीच पण इम्पॅक्ट निर्माण करणारी खेळी केली होती. यंदा भारतीय संघाला शेवटच्या टप्प्यात गरज भासली तर सूर्याही रैनासारखी खेळी करू शकतो.

मुंबई आणि अहमदाबादमधील खेळपट्टीही सूर्याच्या फलंदाजीला साथ देणारी आहे.

रविंद्र जाडेजा : ऑलराऊंडर नंबर 1

सामने - 9, इनिंग - 4, धावा - 111, सरासरी - 55.50,

ओव्हर्स - 73.3, विकेट्स - 16, इकॉनॉमी रेट - 3.97

भारतीय संघातील एकमेव ऑलराऊंडर म्हणून जाडेजा त्याच्यावरची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडतो आहे.

न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीला साथ देणं असो वा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेगानं धावा करणं, दोन्ही प्रकारची फलंदाजी त्यानं केली.

जाडेजानं या स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त 3.97 च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आहे. युवराज सिंहनंतर विश्वचषकातील एकाच सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय स्पिनर ठरला आहे.

जाडेजा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन फलंदाजांना फक्त जखडून ठेवत नाही तर त्यांना बाद करण्याचंही काम करतो आहे.

जसप्रीत बुमरा : बुम बुम बोलिंग

सामने - 9, इनिंग - 9, ओव्हर्स - 72.5, विकेट्स : 17, इकॉनॉमी रेट - 3.55

विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. त्याचं मोठं श्रेय पहिल्या बॉलपासून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराला जातं.

बुमराच्या अचूक गोलंदाजीचा फायदा अन्य गोलंदाजांनाही मिळतो आहे.

जाडेजाप्रमाणेच त्याचाही इकॉनॉमी रेट 4 पेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमरानं निर्माण केलेला दबदबा या वर्ल्ड कपमध्ये खऱ्या अर्थानं दिसलाय.

मोहम्मद शमी : अशक्य ते शक्य

सामने - 5, इनिंग - 5, ओव्हर्स – 32, विकेट्स - 16, इकॉनॉमी रेट - 4.16

मोहम्मद शमीच्या बोलिंगचं वर्णन करताना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ‘अशक्य ते शक्य करेल शामी’ हे वाक्य त्याच्या करिश्म्याचं वर्णन करायला पुरेसं आहे.

शमीला या स्पर्धेत तशी उशीरानं संधी मिळाली. पण, त्यानंतर त्यानं सर्व बॅकलॉग भरून काढला.

यंदा विश्वचषकातल्या त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट्स घेणाऱ्या शमीनं मागं वळून पाहिलेलं नाही.

इंग्लंडविरुद्ध 4 आणि मुंबईत वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या. शमीच्या जबरदस्त फॉर्ममुळेच टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाची गरज भासलेली नाही.

कुलदीप यादव : जोडीब्रेकर

सामने - 9, इनिंग - 9, ओव्हर्स – 75.1, विकेट्स - 14, इकॉनॉमी रेट - 4.78

समोरची टीम न्यूझीलंड असो वा नेदरलँड्स. जमलेली जोडी फोडण्याचं काम कुलदीप यादव करताना दिसतो आहे.

साखळीफेरीत कुलदीपच्या या कौशल्यामुळेच भारतीय गोलंदाजांना वेळोवेळी कमबॅक करत समोरच्या टीमवर दबाव वाढवता आला आणि वर्चस्व गाजवता आलं.

न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या अन्य सर्व टीम्स या बिगर आशियाई आहेत. त्यांच्या फलंदाजांसमोर कुलदीपची फिरकी भारताला आणखी फायदा देणारी ठरू शशकते..

मोहम्मद सिराज : सुरात गोलंदाजी

सामने - 9, इनिंग - 9, ओव्हर्स – 63.3, विकेट्स - 12, इकॉनॉमी रेट - 12

मोहम्मद सिराज या स्पर्धेतील सुरूवातीला चाचपडल्यासारखा वाटला. पहिल्याच बॉलवर चौकार देणाऱ्या त्याच्या गोलंदाजीवर टीकाही झाली.

पण श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात सिराजला खऱ्या अर्थानं सूर सापडला. सिराजनं त्या सामन्यात 16 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तेव्हापासून त्याचा भेदक मारा सुरू आहे.

सिराजला वर्ल्ड कपमध्ये ऐन मोक्याच्या क्षणी सूर गवसल्यानं भारतीय गोलंदाजीही अधिक घातक बनली आहे.

हार्दिक, शार्दूल, इशान आणि अश्विन

हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर, इशान किशन आणि रविचंद्रन अश्विन या चौघांनाही या स्पर्धेत मोजक्याच संधी मिळाल्या.

हार्दिकला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाला संघात घेतलं आहे. अश्विनला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

इशान किशन आणि शार्दूल फारशी छाप पाडू शकले नाहीत. पण वेळ पडली तर तेही चांगली कामगिरी करतील, असा विश्वास भारततीय चाहत्यांना आहे

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)