मुंबई व्हेनिसकडून काय शिकू शकते? पुरापासून वाचण्यासाठी अख्खं शहर वर उचलता येईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Author, संकलन - जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मान्सूनच्या काळात मुंबईत सखल भागात पाणी साचणं ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही.
वरळी कोळीवाड्यासारख्या भागात तर अलीकडे भरतीच्या मोठ्या लाटाही आतपर्यंत घुसू लागल्या आहेत. 2020 साली ऑगस्टमध्ये तर गिरगाव चौपाटी ओलांडून समुद्राचं पाणी आत रस्त्यावर शिरलं होतं.
मुंबईसारखंच जगभरात किनाऱ्यावरील शहरं हवामान बदलामुळे वाढलेल्या सागरपातळीचा सामना करत आहेत. त्यात इटलीतल्या व्हेनिस शहराचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल.
पाण्यानं वेढलेलं, खाजण जमिनीत बेटाबेटांवर वसलेलं हे शहर तिथले कालवे आणि गोंडोला यांसाठी ओळखलं जातं. पण या शहराला अलीकडच्या काळात वारंवार पुराचा सामना करावा लागला आहे आणि या समस्येवर ते वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत.
समुद्राचं पाणी व्हेनिसखाली जमिनीत खोल भरून अख्खं शहरच समुद्रपातळीच्या वर उचलायचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. व्हेनिसमध्ये नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जातायत आणि त्यातून मुंबईला काही शिकता येण्यासारखं आहे का, जाणून घेऊया.
अॅक्वा आल्टा
व्हेनिस शहर इटलीच्या ईशान्य भागात एका मोठ्या लगूनमध्ये म्हणजे खाजणाच्या पाणथळ जागेत आणि इथल्या बेटा-बेटांवर वसलं आहे.
या लगूनमध्ये एका बाजूनं आल्प्स पर्वतातून वाहात येणाऱ्या नद्या येऊन मिसळतात. तर दुसरीकडून समुद्राचं पाणी भरती-ओहोटीनुसार ये-जा करतं. कधीकधी भरतीच्या लाटा एवढ्या मोठ्या असतात, की शहराच्या काही भागांत पाणी शिरतं.

फोटो स्रोत, Getty Images
अशा प्रचंड मोठ्या भरतीला व्हेनिसमध्ये ‘अॅक्वा आल्टा’ म्हटलं जातं.
समुद्रात उधाणाची वेळ, वारे आणि पाऊस असं एकत्र आल्यावरच लगूनमधल्या पाण्याची पातळी वाढल्यानं अशी अॅक्वा आल्टा येते. थोडक्यात, पाऊस आणि वादळ असेल तर अॅक्वा आल्टाचा जोर आणखी वाढतो.
खरंतर गेली अनेक शतकं अशा अॅक्वा आल्टाचा सामना या शहरानं केला आहे. पण अलीकडे असं उधाण येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
तसंच या लाटा अधिकाधिक विनाशकारी ठरतायत. नोव्हेंबर 2019 मध्ये काहीसं तसंच घडलं. व्हेनिसमध्ये तेव्हा 187 सेंटीमीटर उंचीच्या भरतीच्या लाटा आल्या.
इतिहासातली ती दुसरी सर्वात मोठी अॅक्वा आल्टा घटना ठरली. लाखो घनमीटर पाणी पूरबंधारे ओलांडून व्हेनिस शहराच्या जुन्या अगदी सिटी सेंटरमध्ये शिरलं.
तळमजल्यावरच्या अनेक घरांमध्ये तेव्हा पाणी शिरलं. शहरातला ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक इमारतींना धोका निर्माण झाला.
त्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आणि करोडो रुपयांचं नुकसान झालं.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर शहराचं रक्षण करण्यासाठी लगतच्या एडियाट्रिक समुद्रात पाण्याखाली दरवाजे बांधण्यात आले आहेत, जे भरतीच्या लाटांना रोखू शकतात.
पण ते पुरेसे ठरणार नाहीत, असं काहींना वाटतंय. कारण हवामान बदलामुळे समुद्राची पातळीच वाढते आहे.
पाण्यातलं शहर
खरंतर मध्ययुगात हे शहर वसवण्यात आलं, तेव्हा ती जागा अगदी सुरक्षित मानली जायची.
फ्रान्सच्या टूलूसमध्ये मध्ययुगीन इतिहासाच्या प्राध्यापक असलेल्या क्लेर ज्यूड द लारिव्हिएर त्याविषयी माहिती देतात, “सगळ्या बाजूंनी ही जागा पाण्यानं वेढली होती, त्यामुळे बाहेरच्या आक्रमकांपासून तिचं संरक्षण करता यायचं. पाणथळ जागा असल्यानं मासे भरपूर उपलब्ध होते, भाज्या, धान्यपिकं घेण्यासाठी जमिनही होती.”
म्हणजे अन्नही इथे उपलब्ध होतं. पण या पाणथळीच्या जागेत शहर उभारायचं तर त्याचा पाया अगदी मजबूत हवा. व्हेनिसच्या लोकांनी त्यासाठी अनोखा उपाय शोधला.
त्यांनी पायलिंगचं तंत्रज्ञान वापरलं, जे अजूनही वापरलं जातं. फक्त आजच्या काळात आपण सिमेंट काँक्रिटचे पिलर्स उभारतो, पण मध्ययुगातल्या व्हेनिसवासींनी त्याऐवजी उंच झाडांच्या खोडांचा वापर केला.

फोटो स्रोत, Getty Images
क्लेर सांगतात, “लाकडाचे मोठे खांब पाणथळ जागेतल्या चिखलामध्ये रोवून इमारतीचा पाया तयार करण्यात आला. त्यावर लाकूड, विटा, दगडांचे थर रचून वर इमारती उभारण्यात आल्या. जमिनीत पुरलेले हे लाकडी खांब चिखलानं वेढले असल्यामुळे सडत नाहीत. व्हेनिसमध्ये असे लाखो लाकडी खांब जमिनीत गाडलेले आहेत. व्हेनिसखाली जणू एक जंगलच आहे अशा खांबांचं.”
पाया मजबूत असला, तरी समुद्राकडून धोका होताच. पण मध्ययुगात अॅक्वा आल्टा आजच्यासारखी वारंवार येत नसे. तेव्हा महिन्यातून एकदा किंवा दोनदाच अशी भरती यायची, असं क्लेर सांगतात.
पुराचा सामना करणारे मुराझ्झी
दरवेळी अॅक्वा आल्टा आल्यावर शहराचं नुकसान होतं, कारण भरतीचा मारा इमारतींच्या पायाला सहन करावा लागतो.
पाण्याची पातळी सतत बदलत राहिली, तर लाकडी खांबांचंही नुकसान होतं. हे खांब हवेच्या संपर्कात आले तर त्यांची झीज होते, बॅक्टेरिया त्यांचं विघटन करू लागतात. त्यामुळे लाकूड कमकुवत होतं.
खाऱ्या पाण्यामुळे इमारतींचे दगडी भाग किंवा दगडी रस्त्यांवरही परिणाम होतो, त्यांची झीज होते.
मग अशा पुरापासून रक्षणासाठी पूर्वीच्या काळातले व्हेनिसवासी काय करायचे?
क्लेर सांगतात, “एक उपाय होता, तो म्हणजे आल्प्स पर्वतातून इथे वाहात येणाऱ्या नद्यांचं पाणी दुसरीकडे वळवायचं. दुसरं म्हणजे शहरातले कालवे आणि लगून वेळोवेळी स्वच्छ करायचं, त्यातला गाळ काढून टाकायचा.
“मग अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात मुराझ्झी बांधण्यास सुरुवात झाली. मुराझ्झी म्हणजे दगडी भिंती आणि बंधारे, जे समुद्राचं पाणी रोखून धरतील.”

फोटो स्रोत, Getty Images
आता एकविसाव्या शतकात त्याच भिंतींचं आधुनिक रूप म्हणजे मोझे बॅरियर्स. पण भरतीच्या लाटांना रोखणारे हे आधुनिक बंधारे शहर वाचवू शकतील का?
क्लेर सांगतात की हे बंधारे सध्या तरी शहराचं रक्षण करण्यासाठी पुरेसे वाटतात खरे, पण हवामान बदलामुळे वाढणारी समुद्राची पातळी पाहता हा उपाय पुरेसा ठरणार नाही.
व्हेनिसचे मोझे बॅरियर
1966 साली व्हेनिसमध्ये आलेल्या मोठ्या पुरानंतर इटलीच्या सरकारनं एडियाट्रिक समुद्राचं पाणी या शहरात शिरू नये यासाठी संरक्षक दरवाजे उभारण्याचं ठरवलं. नव्या उपाययोजनांचे प्रस्ताव मांडले गेले.
या शतकाच्या सुरुवातीला मोझे बॅरियर प्रकल्पावर काम सुरू झालं. हे बॅरियर्स उभारण्यासाठी वीस वर्ष लागली आणि त्यावर आजवर सहा अब्ज युरो एवढा खर्च झाला. 2020 साली हे दरवाजे काम करू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
मोझे बॅरियर्स हे आतून पोकळ असलेले दरवाजे आहेत. बहुतांश वेळा त्यात समुद्राचं पाणी भरलेलं असतं आणि ते समुद्रतळाशी पडून राहतात.
पण मोठ्या भरतीची शक्यता असते, तेव्हा या दरवाजांमधली हवा काढून घेतली जाते आणि ते वर उचलले जातात. एकमेकांना चिकटून राहिल्यानं हे बॅरियर्स एखाद्या भिंतीसारखं पाणी अडवण्याचं काम करतात.
मोझे प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या कंपन्यांच्या गटाचे प्रमुख एर्मेस रेडी सांगतात की, “साधारणपणे तीन ते पाच तास म्हणजे भरतीची वेळ असते तोवर बॅरियर्स उभे करावे लागतात.
“भरती कधी येणार आहे, याची वेळ आम्हाला ठावूक असते, कारण हवामानशास्त्रज्ञ त्याचं निश्चित भाकित करू शकतात. त्यानुसार हे दरवाजे कधी वर उचलले जातील हे आम्ही जाहीर करतो.

फोटो स्रोत, Getty Images
"पोर्ट अथॉरिटीशीही संपर्कात राहावं लागतं. कारण हे दरवाजे बंद केल्यावर कुठलीही जहाजं व्हेनिस लगूनमध्ये ये-जा करू शकत नाहीत.”
दरवेळी हे दरवाजे बंद केले जातात तेव्हा दोन लाख युरोंचं म्हणजे साधारण एक कोटी 80 लाख रुपयांचं नुकसान होतं.
मग अशात आता अॅक्वा आल्टा वारंवार येऊ लागल्या, तर हे नुकसान वाढणार नाही का?
एर्मेस सांगतात, “तुम्ही पंधरावेळा मोझे बॅरियर बंद केलं, तर तीस लाख युरोंचं नुकसान होईल. पण हे बॅरियर नसेल तर करोडो युरोंचं नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे हे दरवाजे बंद करणं फायद्याचंच आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात मोझे बॅरियरची योजना पहिल्यांदा मांडण्यात आली, तेव्हा वर्षातून आठ ते दहा वेळा हे दरवाजे बंद करावे लागतील असा अंदाज होता.
पण 2020 मध्ये हे दरवाजे काम करू लागले, तेव्हापासून आजवर ते 50 हून अधिक वेळा बंद करावे लागले आहेत.
हे दरवाजे काम करू लागल्यापासून व्हेनिसमध्ये पूर्वीसारखा विनाशकारी पूर आलेला नाही.
पण एर्मेस यांना जाणीव आहे की हा काही कायमचा उपाय नाही. भविष्यात समुद्राची पातळी किती वाढते, यावर बरंच अवलंबून आहे. एर्मेस यांच्या अंदाजानुसार साठ-सत्तर किंवा ऐंशी वर्षांनी नवे उपाय शोधावे लागतील.
शहरच वर उचललं तर?
मोझे बॅरियर भरतीच्या लाटांना अडवण्याचं काम करतायत. पण शहरच वर उचलता आलं तर?
हे शक्य असल्याचं पिएट्रो टियाटिनी सांगतात. टियाटिनी एक हायड्रॉलॉजिस्ट आहेत आणि इटलीच्या पॅडोव्हा विद्यापीठात हायड्रॉलॉजी आणि हायड्रॉलिक इंजिनीयरिंगचे प्राध्यापक आहेत. टियाटिनी हे लँड सबसायडन्स म्हणजे जमीन खचण्यासंदर्भात काम करणाऱ्या युनेस्कोच्या संस्थेचेही ते अध्यक्ष आहेत
ही नेमकी योजना काय आहे, याची माहिती टियाटिनी देतात, “भूगर्भातलं पाणी काढून घेतलं, तर वरची जमीन खचते, हे तुम्हाला माहिती असेलच. आम्ही विचार केला, की मग याच्याउलट केलं म्हणजे जमिनीत पाणी भरलं, तर जमीन थोडी वर उचलता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
व्हेनिसमध्ये खूप सारं पाणी उपलब्ध आहे, कारण हे शहरच खाजण जमिनीत वसलं आहे. शहराच्या चारशे-पाचशे मीटर खाली भूगर्भातही खारं पाणीच आहे, असं टियाटिनी नमूद करतात.
ते म्हणतात, “मग समजा इथल्या अॅक्विफर सिस्टिममध्ये म्हणजे भूजल धरून ठेवणाऱ्या सच्छिद्र खडकांमध्ये समुद्राचं खारं पाणी इंजेक्ट केलं, तर..? याचा आम्ही अभ्यास केला, तेव्हा काही लक्षणीय गोष्टी समोर आल्या. या प्रक्रियेमुळे जमिनीची उंची 25 ते 30 सेंटीमीटरनं वाढवता येणं शक्य होणार आहे.“
पिएट्रो टियाटिनी यांनी खरंतर 15 वर्षांपूर्वीच ही कल्पना मांडली होती. शास्त्रज्ञांनी ती उचलूनही धरली होती. पण तोवर मोझे बॅरियरचं काम सुरू झालं होतं. त्यामुळे बाकीच्या योजना मागे पडल्या.
पण आता लोकांना लक्षात येऊ लागलंय की केवळ मोझे बॅरियर्स पुरेसे ठरणार नाहीत. त्यामुळे व्हेनिसला बुडण्यापासून वाचवण्यासाठी अख्खं शहरच वर उचलायच्या पर्यायावरही गांभीर्यानं विचार केला जातो आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण जमिनीत इतक्या खोलवर असलेल्या खडकांमध्ये पाणी कसं ओतणार?
पिएट्रो टियाटिनी सांगतात, “योजना अशी आहे की काही विहिरी किंवा बोअरवेल्स खोदायच्या. आम्ही व्हेनिसमध्ये दहा किलोमीटर व्यासाच्या वर्तुळाकार भागाभोवती दहा विहिरी खोदल्या. त्या विहिरींतून लगूनमधलं पाणी जमिनीत सोडण्यात आलं. त्याचा परिणाम दिसून आला आहे.
“तीस सेंटीमीटरनं उंची वाढवण्यासाठी या प्रकल्पाला दहा वर्षे लागतील. आपण असं एकदम खूप जास्त पाणी नाही टाकू शकत. कारण त्यामुळे दबाव खूप जास्त वाढला, तर आतले खडक तुटू शकतात. आम्हाला जमिनीत कुठल्या भेगा निर्माण करायच्या नाहीयेत.”

फोटो स्रोत, Getty Images
पण तीस सेंटीमीटर पुरेसे ठरतील का, हाही प्रश्नच आहे. कारण अलीकडे अॅक्वा अल्टाच्या वेळेस समुद्रसपाटीपेक्षा 150 सेंटीमीटरहून अधिक उंच लाटा उसळल्या होत्या.
मग शहरही काही सेंटीमीटर्सऐवजी काही मीटर्सनं वर उचलता येईल का? टियाटिनी सांगतात, की जास्त उंची वाढवणं तसं कठीण आहे.
“आमची योजना केवळ शहराची उंची वाढवण्यापुरती मर्यादित नाही. मोझे बॅरियर्स आधीच काम करू लागलं आहे. या दोन्ही योजना एकत्रित काम करत राहिल्या पाहिजेत.”
दहा वर्षांपूर्वी योजनेचा प्रस्ताव मांडला तेव्हा 10 कोटी युरो लागतील असा अंदाज होता. आता किंमती वाढल्या आहेत, पण मोझे बॅरियर्सपेक्षा याचा खर्च कमीच असेल, असलं पिएट्रो सांगतात.
या योजनेतही काही अडचणीही आहेत. पण त्या सोडवणं कठीण नाही, असंही त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
“एका प्रश्न लोक विचारतात तो म्हणजे सगळ्या शहरातली जमीन वर उचलण्याची प्रक्रिया एकसारखी असेल का? कारण काही भाग वर आला आणि काही खालीच राहिला, तर इमारतींचा पायाच अस्थिर होईल.
“पण आपण भूगर्भशास्त्राची मदत घेतली आणि प्रत्येक विहिरीत नेमकं किती पाणी ओतायचं, याचा विचार केला, तर अगदी समान पद्धतीनं शहर वर उचलता येईल आणि इमारतींच्या सुरक्षेला कुठलाही धोका पोहोचणार नाही.
सरकारनं ही योजना राबवायचं ठरवलं, तर सर्वात आधी काही विहिरी खोदून चाचणी घ्यावी लागेल, असंही पिएट्रो सांगतात. त्यासाठी दोन ते तीन वर्ष लागू शकतात. त्यानंतरच ही योजना खरंच प्रभावी ठरेल की नाही हे सांगता येईल.
पण या प्रयोगाचा निकाल काहीही लागला, तरी व्हेनिसला असे उपाय करून पाहावे लागतील आणि केवळ मोझे प्रकल्पावर अवलंबून राहता येणार नाही. कारण या शहरात शिरणाऱ्या पाण्याची पातळी वाढते आहे आणि हवामान बदलामुळे ती या शतकाअखेरीस आणखी वाढेल.
लोकांचं शहर
सन 2100 पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी एक मीटरनं वाढू शकते. ही गोष्ट अनेकांना भीतीदायक वाटते.
कारण तोवर व्हेनिसनं काही उपाययोजना केली नाही, तर हे शहर आणि आसपासचा काही भाग पाण्याखाली जाऊ शकतो.
पण ही शक्यताच लोकांना जागं करू शकते, असं कार्लो राती सांगतात. कार्लो अमेरिकेतल्या MIT या संस्थेत प्राध्यापक आहेत आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल फ्युचर कौंसिल ऑन सिटीजचे सहअध्यक्ष आहेत.
“मला वाटतं याचा परिणाम फार भयानक असेल. म्हणजे व्हेनिसचे लोक जगण्याचा, उदरनिर्वाहाचा काही नवा मार्ग शोधून काढतील. शहरही जेम्स बाँड सारख्या चित्रपटांना शूटिंगसाठी जागा देऊन पैसा कमवू शकतं.
“व्हेनिस नष्ट झालं, तर मला खूप वाईट वाटेल, पण या शहरात या संकटाला तोंड देण्याची आणि सगळ्या जगाला नवा मार्ग दखवण्याची क्षमता आहे.”
कार्लो यांच्या मते व्हेनिसला अॅक्वा अल्टापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे प्रकल्प या समस्येच्या दुसऱ्या पैलूकडे मात्र दुर्लक्ष करतात. शहर खरंच वाचवायचं असेल, तर तिथे राहणाऱ्या लोकांचाही विचार करावा लागेल, असं कार्लो यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
“प्राचीन रोमन लोकांच्या भाषेत शहरासाठी दोन शब्द होते. अर्ब्ज आणि चिविटास. (Urbs आणि Civitas) ‘अर्ब्ज’ म्हणजे विटा-दगड-मातीनं उभारलेल्या इमारतींनी बनलेलं शहर. तर ‘चिविटास’ म्हणजे शहरातल्या नागरिकांचा समुदाय किंवा नागरी जीवन.
“व्हेनिसचा विचार केला तर, विशेषतः शहराच्या जुन्या ऐतिहासिक भागात ‘चिविटास’ नष्ट होतंय. लोक इथून बाहेर पडतायत. बेटांवर वसलेल्या या मूळ व्हेनिस शहरात सध्या 50 हजारांहून कमी नागरीक उरले आहेत. हे शहर भरभराटीस आलं, तेव्हा इथे याच्या चौपट लोक राहात होते. शहर आता रिकामं होत चाललंय. म्हणजे व्हेनिसला वाचवायचं तर आधी इथल्या समुदायाला वाचवायला हवं, मग इमारतींना.
मग व्हेनिसच्या नागरी जीवनाला पुन्हा मार्गावर आणायचं असेल आणि इथल्या ऐतिहासिक इमारती आणि रस्ते वाचवायचे असतील, तर काय करायला हवं?
कार्लो सांगतात, “सर्वात आधी तरुणांना इथे काम करण्यासाठी आकर्षित करून घ्यायला हवं.”

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगतात, “1970च्या दशकात व्हेनिसचं रुपांतर एका जागतिक शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रात करायची योजना होती. असं विद्यापीठ जिथे जगभरातले प्रतिभावान लोक एकत्र येतील आणि विचारांची देवाणघेवाण होईल.
“पण ही कल्पना मागे पडली आणि पर्यटन विशेषतः जगभरातून येणारे पर्यटक जास्त प्रभावी ठरले. त्यामुळे इथलं स्थानिक नागरी जीवन नष्ट झालं, लोक शहराबाहेर पडू लागले. पण आता व्हेनिसचं रुपांतर एका वर्ल्ड सिटीमध्ये करता येईल. हे शहर देशासाठी, युरोपसाठी, जगासाठी खुलं करायला हवं. “
व्हेनिसकडून मुंबईनं काय शिकायचं?
कार्लो यांच्यामते हवामान बदलाचा सामना कसा करायचा याविषयी हे शहर आपल्याला काही शिकवू शकतं, नवे उपाय सुचवू शकतं. एकप्रकारे व्हेनिस आपल्या ग्रहाचं, पृथ्वीचंच रूपक आहे.
म्हणजे व्हेनिस वाचवू शकलो, तर जगातली बाकीची शहरंही वाचवू शकतो.
मग व्हेनिसकडून मुंबईला काही शिकण्यासारखं आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
वैज्ञानिक प्रयोगाद्वारा समुद्राचं पाणी भूगर्भात सोडून एखादं शहर समुद्रसपाटीपेक्षा थोडं वर उचलता येणं शक्य आहे. हे शहराला मुदतवाढ देण्यासारखंच आहे. मोझे बॅरियर, बंधारे आणि बाकीच्या योजना शहराचं वाढत्या समुद्रपातळीपासून रक्षण करू शकतात.
पण कार्लो राती सांगतात तसं, व्हेनिसच्या इमारतींचं पाण्यापासून रक्षण हा समस्येचा केवळ अर्धा भाग झाला. कारण शहरातल्या जीवनाचा दर्जाही ढासळतो आहे. तो सुधारायचा, तर फक्त तंत्रज्ञान पुरेसं नाही.
हीच गोष्ट मुंबईलाही शिकावी लागेल. पावसाळ्यात मोठी भरती आली की मुंबई पाण्याखाली जाणार नाही यासाठी केवळ एका योजनेवर अवलंबून राहता येणार नाही. आणि मुंबईकरांचं जगणं सुधारायचं तर केवळ भौतिक सुविधा उभारणं पुरेसं ठरणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








