ऑस्ट्रेलियात वाढतोय भारतीय टक्का

रोहित सिंग त्याच्या बहिणीसोबत अवनी वाईनरी चालवतो.
फोटो कॅप्शन, रोहित सिंग त्याच्या बहिणीसोबत अवनी वाईनरी चालवतो.
    • Author, शर्लिन मुलान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रोहित सिंगचा बोलण्याचा टोन त्याच्या आईपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

रोहितचं कुटुंब मेलबर्नपासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या मॉर्निंग्टन द्वीपकल्पात राहतं. तो दुसऱ्या पिढीतील स्थलांतरित आहे.

त्याचं कुटुंब तिथं बार चालवण्याचं व्यवसाय करतं. गेल्या दोन वर्षांपासून रोहित कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत आहे.

1990 च्या दशकात त्याचे पालक ऑस्ट्रेलियाला गेले आणि त्यांनी तिथं 'अवनी' नावाची बुटीक वाईनरी सुरू केली.

गेल्या दशकभरात मेलबर्नमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं रोहित सिंग सांगतो.

आता त्यानं 'अवनी'मध्ये अल्कोहोलसह रतीय खाद्यपदार्थ देत कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.

रोहित हा ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या 7 लाख 10 हजार भारतीयांपैकी एक आहे.

जगातील सर्वाधिक स्थलांतरिक नागरिक असलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो.

गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात भारतीयांची संख्या झपाट्यानं वाढली आहे आणि देशाच्या ताज्या जनगणनेनुसार, भारतीय हा ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रवासी समुदाय आहे.

ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या चीनच्या लोकांपेक्षा जास्त आहे. ती फक्त ब्रिटिशांपेक्षा कमी आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय स्थलांतरितांच्या या नवीन लोकांमागे तंत्रज्ञान क्षेत्रही आहे. ऑस्ट्रेलियात भारतातल्या प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढली आहे.

आरती बेटीगेरी एक पत्रकार असून सध्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आणि तिथं वाढलेल्या भारतीयांच्या अनुभवांवर एक संग्रह संपादित करत आहेत.

आरती सांगतात की, “त्यांचं कुटुंब 1960 च्या दशकात ऑस्ट्रेलियात आलं आणि त्यावेळी भारतीय लोक इथल्या सार्वजनिक जीवनात क्वचितच दिसत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियात दुसरा भारतीय पाहणे दुर्मिळ होते.

“पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता इथं भारतीय लोक जवळपास प्रत्येक क्षेत्रात नोकरी करत आहेत, व्यवसाय करतात आणि राजकारणातही पाऊल ठेवत आहेत."

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

न्यू साउथ वेल्सच्या नुकत्याच निवडून आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे चार राजकारणी आहेत. यामध्ये डॅनियल मुखे यांचा समावेश आहे, जे या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका प्रांताचे महसूल विभागाचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत.

मात्र भारतीयांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. इतर बिगरयुरोपीय देशांतील नागरिकांप्रमाणे भारतीयांनाही ऑस्ट्रेलियाच्या संघराज्यीय राजकारणात त्यांचं स्थान मिळवायचं आहे. सध्या त्यांची संख्या फार मोठी नाही.

दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यात सॉफ्ट पॉवरच्या निर्यातीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं आरती सांगतात.

अलीकडेच, हजारो भारतीयांच्या उपस्थितीत झालेल्या सिडनीच्या रॅलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचा टीव्ही शो मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया, क्रिकेट आणि चित्रपट भारतातील लोकांना जवळ आणत आहेत.

2014 पासून भारताच्या केंद्रीय सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारनं ऑस्ट्रेलियाशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं विश्लेषकांचं मत आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेले होते. तीन दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ऑस्ट्रेलियन भेट होती.

मे महिन्यात मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी स्थलांतरित कराराची घोषणा केली होती. ज्यानंतर विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिकांना ऑस्ट्रेलिया आणि भारतात प्रवास करणं आणि तिथं नोकरी करणं सोपं होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार पूर्ण करण्याची वचनबद्धताही व्यक्त केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या कराराचे फलित या कराराची दिशा ठरवेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच भेटीवर भारतात आले होते. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुरक्षा-आर्थिक सहकार्य, शिक्षण आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आणि CUTS इंटरनॅशनल या सार्वजनिक धोरण संशोधन संस्थेसोबत काम करणारे प्रदीप एस. मेहता म्हणतात, “पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या नियमित बैठकांमुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत आहेत. हे यापूर्वी कधी दिसलं नव्हतं.”

या भागीदारीचा फायदा दोन्ही देशांना होत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचाही चार सदस्यीय क्वाड गटात समावेश आहे ज्याचं उद्दिष्ट इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा प्रभाव कमी करणं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध कोट्यवधी वर्षं जुने आहेत. एकेकाळी, गोंडवाना नावाचा महाखंड सध्याच्या दोन राष्ट्रांना भौतिकरित्या जोडत असे. पण ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या लोकांच्या स्थलांतराचा इतिहास फार जुना नाही. 1800 च्या दशकात भारतातून पहिले स्थलांतरित ऑस्ट्रेलियात आले. ते ऑस्ट्रेलियात मजूर म्हणून आले होते किंवा त्याकाळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे नोकर म्हणून तिथं गेले होते.

1900 च्या दशकात, विविध प्रदेशातून आणि विविध नोकऱ्यांसाठी भारतीय ऑस्ट्रेलियात येऊ लागले आणि 1973 मध्ये व्हाईट ऑस्ट्रेलिया धोरण संपल्यानंतर भारतीयांची संख्या झपाट्यानं वाढली. व्हाईट ऑस्ट्रेलिया धोरण हे एक वर्णद्वेषी धोरण होते ज्या अंतर्गत कृष्णवर्णीय स्थलांतरितांना ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी नव्हती.

निदर्शन

ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या लोकांवरील पुस्तकाचे सह-लेखक आणि संशोधक जयंत बापट म्हणतात, “कोणत्या प्रकारच्या स्थलांतरितांना स्वीकारायचे याची ऑस्ट्रेलिया त्यावेळीही काळजी घेत असे. केवळ प्रशिक्षित कामगार आणि व्यावसायिक जसे की डॉक्टर, इंजिनियर, आयटी क्षेत्रातील कामगार, नर्स आणि शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांचं स्वागत होत होतं. या लोकांनाही अगदी कमी संख्येने ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी देण्यात येत होती.”

खरा बदल 2006 साली झाला जेव्हा जॉन हॉवर्ड यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं भारतीय विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे दरवाजे उघडले. त्यांनी असे धोरणात्मक बदलही केले ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेणं सोपं झालं.

बापट म्हणतात, “तात्पुरत्या स्थलांतरितांमध्ये अजूनही भारतीय विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांना पदवी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची परवानगी दिली जाते.”

मात्र अनेकदा तणावही निर्माण झाला आहे. 2000 मध्ये, सिडनी आणि मेलबर्नमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्यांची बातमी जगभर पसरली होती.

ऑस्ट्रेलियात मोठ्या संख्येनं भारतीयांनी याविरोधात निदर्शनं केली होती. भारतानंही यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती आणि ऑस्ट्रेलिया सरकारनं परिस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलली होती. असं असलं तरी, हिंसाचार आणि छळाची प्रकरणं अजूनही अधूनमधून समोर येत असतात.

इमिग्रेशनच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, आशिया आणि दक्षिण आशियाई देशांमधून येणारे स्थलांतरित त्यांची संस्कृती देखील ऑस्ट्रेलियात घेऊन येतात आणि यामुळे येथील समाजात विविधता येते. स्थलांतरामुळे ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.

पण काही विरोधी नेत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन धोरणांवरही टीका केली आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की, कमी पगारावर काम करणारे स्थलांतरित लोक ऑस्ट्रेलियन लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत आणि यामुळे संसाधनांवर ताण येत आहेत.

त्याच वेळी, भारतीय वंशाच्या काही लोकांचं म्हणणं आहे की, ते ऑस्ट्रेलियातील लोकांना भारतीय संस्कृती आणि वारशाची माहिती देऊन ऑस्ट्रेलियन समाज अधिक सर्वसमावेशक बनवण्यास मदत करत आहेत.

दिव्या सक्सेना

फोटो स्रोत, MEDIALAB

फोटो कॅप्शन, दिव्या सक्सेना

सिडनीमध्ये वाढलेल्या 24 वर्षीय दिव्या सक्सेनाला ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय पारंपरिक नृत्य कथ्थक आणि भरतनाट्यम अधिक लोकप्रिय बनवायचं आहे.

ती म्हणते, "सिडनीतील भारतीय समुदायात वाढ होत आहे आणि तिच्यासारखे सर्जनशील लोक दक्षिण आशियाई समुदायाभोवतीचे अडथळे दूर करत आहेत आणि एकमेकांना व्यवसायात मदत करत आहेत."

दिव्या सक्सेनाने अलीकडेच भारतीय ऑस्ट्रेलियन मेकअप आर्टिस्ट आणि सोशल मीडियावरील चर्चेतलं नाव रोवी सिंग यांच्यासाठी नृत्यदिग्दर्शन केलं. दक्षिण आशियाई समुदायाप्रती असलेले लोकांचे पूर्वग्रह मोडून काढण्यासाठी रोवी सिंग प्रयत्न करत आहेत.

दिव्या सांगते, “आमच्या कुटुंबाकडे इथं काहीच नव्हतं. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देता यावं म्हणून नोकरीत टिकून राहावं हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळेच ते मान खाली घालून काम करत राहिले आणि इथे मिसळण्याचा प्रयत्न करत राहिले. पण आमच्या पिढीतील लोकांना असा भार सहन करावा लागत नाही.”

"स्वत: निवडलेल्या मार्गावर चालल्यास आम्ही मोकळे आहोत आणि माझ्यासारखे बरेच लोक एक असा ऑस्ट्रेलिया तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत जो भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक स्वागतार्ह असेल," दिव्या पुढे सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)