LGBTQIA: समलैंगिक पुरुषांसाठी बांधलेलं जगातील एकमेव कारागृह

कूमा तुरुंग

फोटो स्रोत, The Greatest Menace

फोटो कॅप्शन, कूमा तुरुंग
    • Author, गैरी नन
    • Role, बीबीसी

ऑस्ट्रेलियातील सर्वांत थंड शहरात असलेलं कूमा नावाचं जेल अर्थात कारागृह. या कारागृहात अनेक गंभीर रहस्य दडली आहेत.

'समलैंगिक गुन्हा' करणाऱ्या पुरुषांना कारागृहात टाकण्याच्या विशिष्ट उद्देशाने 1957 मध्ये हे कारागृह पुन्हा सुरू करण्यात आलं होतं. समाजातून समलैंगिकता हद्दपार करणे हे अंतिम उद्दीष्ट होतं. आणि माणसांवर याचा परिणाम काय होतो ही चाचणी करण्याच्या उद्देशाने हे कारागृह सुरू करण्यात आलं होतं.

एका नवीन पॉडकास्टनुसार, कूमा कारागृह हे समलैंगिक पुरुषांसाठी बनलेलं जगातील एकमेव ज्ञात कारागृह असल्याचं मानलं जातं.

या कारागृहात समलैंगिक कैद्यांना वेगळं ठेवण्याचं खरं कारण मात्र अद्याप ही समजू शकलेलं नाही. कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती नाही.

66 वर्षांच्या लेस स्ट्रेझेलेकी यांनी 1979 मध्ये या कारागृहात कस्टोडियल सर्व्हिस ऑफिसर म्हणून काम करायला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी कूमामध्ये 'करेक्टिव्ह सर्व्हिसेस म्युझियम'ची स्थापना केली. सुरक्षेचा विचार करून कैद्यांना तिथं ठेवण्यात आल्याचं त्यांच मत आहे.

लेस स्ट्रेजेलेकी (डावीकडे) यापूर्वी कूमा तुरुंगात काम करायचे.

फोटो स्रोत, Thomas McCoy

फोटो कॅप्शन, लेस स्ट्रेजेलेकी (डावीकडे) यापूर्वी कूमा तुरुंगात काम करायचे.

बीबीसीला ते सांगतात, "कूमा ही एक सुरक्षाव्यवस्था होती. आम्ही समलैंगिक कैद्यांवर लाल रंगाचा 'N/A' शिक्का मारायचो. याचा अर्थ त्यांना सामान्य कारागृहात ठेवता येत नव्हतं." ते पुढे सांगतात, "अशा कैद्यांना सिडनीच्या लाँग बे सारख्या मोठ्या तुरुंगात ठेवल्यास हिंसाचाराचा धोका होता."

दरम्यान या कारागृहात कर्मचारी असलेल्या क्लिफ न्यू यांचा दावा आहे की, इथं कैद्यांना कठोर वागणूक देण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलं होतं. क्लिफ न्यू यांनी 'द ग्रेटेस्ट मेनेस' या पॉडकास्ट सिरीज मध्ये सांगितलं होतं की, 1957 मध्ये कारागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ इथं यायचे.

कैद्यांच धर्मांतर करण्याच्या उद्देशाने हे सगळं सुरू होतं, असं क्लिफ यांना वाटतं. ते सांगतात, "या लोकांना 'योग्य' मार्गावर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांच्यामते ते या लोकांना ठीक करू शकत होते."

त्यामुळेच कैद्यांना सिंगल सेलमध्ये ठेवलं जातं होतं असं 94 वर्षांच्या क्लिफ यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, "कोणत्याही दोन कैद्यांना एकत्र ठेवलं जातं नव्हतं. आमची सर्वात मोठी समस्या होती त्यांच्यावर लक्ष ठेवणं."

'न्यू साउथ वेल्समध्ये समलैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा होता'

ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार, न्यू साउथ वेल्सचे न्यायमंत्री रेग डाऊनिंग यांनी या कारागृहाच्या स्थापनेचं श्रेय घेतलं होतं.

रेग डाऊनिंग

फोटो स्रोत, State Library of NSW

फोटो कॅप्शन, रेग डाऊनिंग

असं म्हटलं जातं की रेग यांनी 1957 मध्ये सिडनी मॉर्निंग हेराल्डमधून त्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाविषयी 'अभिमान' व्यक्त केला होता. ते म्हणाले "समलैंगिक कैद्यांना इतर कैद्यांपासून वेगळं ठेवणार कारागृह तुम्हाला युरोप किंवा अमेरिकेत कुठेही पाहायला मिळणार नाही."

1958 च्या प्रेस स्टेटमेंटमध्ये रेग डाऊनिंग यांनी कूमा कारागृह हे 'समलैंगिक कैद्यांना ठेवण्यासाठी डिझाइन केलेलं जगातील एकमेव ज्ञात कारागृह' असल्याचं म्हटलं होतं.

न्यू साउथ वेल्समध्ये 1984 पर्यंत समलैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा होता. त्यामुळे कुमाच्या या कारागृहात समलैंगिक असणे किंवा समलैंगिकतेशी संबंधित गुन्ह्यांमधील आरोपींना या कारागृहात ठेवलं जातं होत.

1955 मध्ये आणलेल्या नव्या आणि कठोर कायद्यांद्वारे समलैंगिकतेवर जोरदार आघात करण्यात आला. राज्याचे पोलिस आयुक्त कॉलिन डेलानी यांनी याबाबत कडक भूमिका घेतली. तत्कालीन अॅटर्नी जनरल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा असा विश्वास होता की 'या वाईट संगतीमध्ये सुधारणा करण्यासाठी हा कायदा आवश्यक होता आणि ज्याची अंमलबजावणी तातडीने होणं गरजेचं होतं.'

इतिहासकार गॅरी वोडरस्पून यांनी बीबीसीला सांगितलं की, "तत्कालीन कायद्यानुसार, एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाशी बोलत असेल तरी ही त्याला अटक केली होऊ शकत होती. हा कायदेशीर बदल म्हणजे समलैंगिक संबंध ठेवू इच्छिणाऱ्या पुरुषांच्या स्वातंत्र्यावर चढवलेला हल्ला होता."

समलैंगिक संबंध ठेवल्याच्या गुन्ह्यासाठी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली होती. किंवा तसा प्रयत्न केल्यास 5 वर्षांच्या कारावासाची तरतूद होती. "अशा व्यक्तीच्या संमतीने किंवा त्याशिवाय" समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे, असं कायद्यात नमूद करण्यात आलं होतं.

समलिंगी असल्याचं आमिष दाखवून अटक

वोडरस्पून यांच्यासोबतच पॉडकास्ट, पुराव्याचा हवाला देऊन सांगतात की, समलैंगिक असलेल्या पुरुषांना पकडण्यासाठी पोलिसांनी 'एजंट' म्हणून काम केलं.

वोडरस्पूनचा यांचा दावा आहे की, "हे पोलीस सहसा समलिंगी असणाऱ्या पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्याचं आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात न्यायचे."

कूमा शहराची लोकसंख्या जवळपास 7 हजार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कूमा शहराची लोकसंख्या जवळपास 7 हजार आहे.

1958 मध्ये, न्यू साउथ वेल्स सरकारने 'समलैंगिकतेमागे असणारी कारण आणि त्यांच्यावरील उपाय' शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली. या समितीमध्ये 'वैद्यक, मानसोपचार तज्ञ, दंडशास्त्र आणि सामाजिक आणि नैतिक कल्याण क्षेत्रातील तज्ज्ञांचाही समावेश होता.

या समितीमध्ये दोन पाद्री, दंड व्यवस्थेचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि सिडनी विद्यापीठातील दोन शिक्षणतज्ञ होते.

त्या समितीने कूमा कारागृहाला 'दोषी असलेल्या समलैंगिक गुन्हेगारांसाठी विशेष संस्था' बनवण्याची शिफारस केली जेणेकरून तपास करणं अधिक सोपं होईल.

'समस्येचे वैज्ञानिक मूल्यांकन आणि संभाव्य उपाय' शोधल्यानंतर, डाऊनिंग म्हटले की, "सरकारला विश्वास आहे की या समस्येवर जोरदार प्रहार केला पाहिजे."

या कारागृहावर अनेक वर्षे संशोधन करणारे पत्रकार, ज्यांनी याविषयी पॉडकास्ट तयार केलं ते पॅट्रिक अब्बूद म्हणतात, "मनोचिकित्सकांनी असे प्रश्न विचारले की, तुमच्या आईच्या नियंत्रणामुळे तुम्हाला इतर स्त्रियांविषयी भावना निर्माण होत नाहीत का? यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, समलैंगिकतेचे मुख्य कारण आईचं प्रमाणाबाहेर असलेलं नियंत्रण."

ते सांगतात, "समलैंगिकता निर्मूलन करण्याच्या त्यांच्या मिशनमध्ये ते निव्वळ अयशस्वी ठरले आहेत. पॉडकास्टवरून कळतं की त्या तुरुंगात ही पुरुषांनी लैंगिक संबंध ठेवले होते. काही समलैंगिक पुरुष तर त्यांच्या तुरुंगातील प्रियकरांना भेटण्यासाठी गुन्हे करून परत कारागृहात आले होते."

पण तो अहवाल कधी सापडलाचं नाही. याचा अर्थ हे प्रकरण जाणूनबुजून लपवण्यात आल्याचं अब्बूद यांचं मत आहे. वोडरस्पून यांनाही असंच वाटतं.

या कारागृहात समलैंगिक कैद्यांना पाठवण्याचं प्रकरण कधी थांबलं याची मात्र काही माहिती मिळत नाही.

वोडरस्पून म्हणतात, "बरेच रेकॉर्ड एकतर हटवले गेलेत किंवा नष्ट करण्यात आलेत."

न्यू साउथ वेल्सच्या कारेक्टिव्ह सर्व्हिसेस आणि तसेच समुदाय न्याय विभागाने 'ऐतिहासिक स्वरूपाचा' हवाला देत या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिलाय.

अब्बूद यांच्या मते, समलैंगिक कैद्यांना ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला तिथं पाठवलं जातं असावं. कारण या प्रकरणाशी संबंधित एका मंत्र्याने 1982 मध्ये हे धोरण अस्तित्वात असल्याचं विधान केलं होतं.

अब्बूद म्हणतात की लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांनाही कुमाकडे पाठवलं जात होतं. त्यामुळे समलैंगिक कैदी आणखीनचं बदनाम झाले होते.

वोडरस्पून म्हणतात, हल्ली हल्लीच तिथल्या संसदेत 'धार्मिक भेदभावावरील विधेयकावर' लैंगिक हिताच्या आधारावर भेदभाव करण्यास परवानगी देण्याबाबत चर्चा झाली आहे.

अशा गोष्टी पुन्हा घडू नये यासाठी आपण खूप काळजी घेतली पाहिजे असं त्यांच म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)